Tuesday, August 9, 2016

भक्त, भुरटे आणि भामटे


वर्षभरापुर्वी एक व्यंगचित्र बघायला मिळाले होते. ‘पृथ्वीतलावरचा शेवटचा अरब’ असे त्याचे शिर्षक होते. तो जमिनीवर आडवा पडला आहे आणि हातातल्या तलवारीचे वार करीत तो आपल्याच पायाने तोललेल्या तलवारीशी झुंजतो आहे. सिरीया-लिबिया व इराकमध्ये जे काही अराजक माजले आहे, त्यावर आधारीत हे व्यंगचित्र होते. कारण मध्यपुर्व किंवा पश्चीम आशिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या भूभागात सध्या मुस्लिमच मुस्लिमांची कत्तल करतो आहे आणि खरा मुस्लिम कोण, ते ठरवणारी  ही अजब लढाई आहे. त्यात अर्थातच अरब मुस्लिमांचा पुढाकार असल्याने किंवा इस्लाम हा अरबी भूमीतला धर्म असल्याने तसे चित्र रंगवलेले असू शकते. पण त्याचा मतितार्थ उघड आहे. नुसते लढत रहायचे, रक्तपात घडवून आणत रहायचे. कशासाठी रक्तपात होतोय किंवा त्यातून काय सिद्ध होणार, याचा विचारही करायचा नाही, अशी ही मानसिकता आहे. त्यातून मग कुणाशी तरी झुंजत भांडत रहाणे, ही जीवनावश्यक बाब बनून जाते. गंमत अशी की प्रत्यक्षात ती जीवनाचा अंत घडवून आणणारी बाब आहे. पण जगण्यासाठी ज्यांना मरणाची ओढ लागली आहे, ते शत्रू शोधून काढतात किंवा शत्रूच उरला नसेल, तर आप्तस्वकीयातही शत्रू निर्माण करून त्यांच्याशी रक्त सांडणारी लढाई करू लागतात. एवढाच त्याचा मतितार्थ होता. मात्र ही प्रवृत्ती अरबांमध्येच असते असे मानायचे काही कारण नाही. आपणच श्रेष्ठ आहोत आणि आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असू शकत नाही, अशा भ्रमाने पछाडले, की कुठल्याही प्राणिमात्रामध्ये अशी मानसिकता फ़ोफ़ावू लागते. ती रक्तपाताकडेच घेऊन जाईल असे नाही. पण विनाशाकडे नक्कीच घेऊन जाते. हाती असलेलेही सुख भोगता येत नाही आणि भावाभावातही सुंदोपसुंदी सुरू होते. भाजपा काहीसा तशा अवस्थेत चालला आहे. अन्यथा पंतप्रधानांना आपल्याच निकटवर्ति गोरक्षकांना इशारा देण्याची नामुष्की कशाला आली असती?

लोक्सभा निवडणूकीच्या कालखंडात जागोजागी नरेंद्र मोदी धुमधडाक्यात प्रचारसभा घेत होते आणि आपल्या सरकारचा अजेंडा जाहिर करीत होते. त्यात गोमासाची होत असलेली प्रचंड निर्यात, हा एक मुद्दा महत्वाचा होता. भारतातून सर्वाधिक गोमासाची निर्यात होते आणि त्याला पिंक रिव्हॉल्युशन मानले जाते. ते थांबवले पाहिजे अशी भूमिका तेव्हा अनेक सभातून मोदींनी मांडली होती. नंतरच्या काळात गोहत्याबंदी कायदा आला व त्यावर कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले. त्याचे समर्थन भाजपा व मोदीसमर्थक करीत होते. त्यात गैर काहीच नाही. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात सरसकट गोहत्या होता कामा नयेत. पण जिथे कायद्याच्या चौकटीत बसून गोमास व्यवहार होत असेल, तिथे त्यावरून रणकंदन माजवणे घातक असते. पण तशा घटना घडू लागल्या आणि त्यावरून जळजळीत प्रतिक्रीयाही उमटू लागल्या. पण मोदी त्याविषयी बोलायचे टाळत होते. देशाचा पंतप्रधान असल्याने त्यांच्यावर काही मर्यादा येत असतात. आपल्याच पक्ष वा समर्थकांचे जाहिरपणे कान उपटणे त्यांना योग्य वाटले नसेल, तर त्याचा अर्थ त्या भक्तांनी समजून घेतला पाहिजे. पण मोदींचे लोकसभेतील यश म्हणजे आपल्याच आजवरच्या अतिरेकी आक्रमकपणाला मतदाराने दिलेली मंजुरी असल्याच्या भ्रमात वावरणार्‍यांना कुठले इतके भान असायला? त्यांनी कायदा धाब्यावर बसवून गोरक्षणाचा विषय आपल्या हाती घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच गोत्यात आणायच्या कारवाया सुरू केल्या. अजूनही मोदींना देशातील जनतेने निर्विवाद सत्ता बहाल केलेली नाही आणि जे यश मिळाले आहे तेही मित्र पक्षांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. याचेही भान राहिले नाही. मग काय आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची खुमखुमी दिवसेदिवस बळावत गेली तर नवल नव्हते. त्यातून मोदींच्या व पक्षाच्या सरकारलाच अडचणीत आणले जाऊ लागले.

कुठल्याही माणसात किंवा मानवी समुहात अशी मस्ती अकस्मात उदभवत नाही. त्याचा क्रमाक्रमाने उदय होत असतो. लोकसभेत भाजपाला यश मिळाले तेव्हा याप्रकारे कुठे घटना घडत नव्हत्या. ही प्रवृत्ती डोके वर काढायला दोन वर्षे खर्ची पडलेली आहेत. आधी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत भाजपाने बहूमत प्राप्त केल्याने सर्व राजकीय पक्ष गडबडून गेले होते आणि राजकीय अभ्यासक बिथरले होते. परिणामी आता भाजपाला पर्याय नाही, अशी समजूत व्हायला हरकत नव्हती. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. अजून भाजपाला निर्विवाद यश मिळालेले नाही. त्याची मदार मित्रपक्षांच्या सहकार्यावर अवलंबून आहे, ही गोष्ट विसरली गेली. तिथे शत्रू शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. याचा अर्थ असा, की प्रतिस्पर्धी वा शत्रू उरला नाही तर शांतपणे राज्य करण्याची गरज होती. पण तसे करण्यापेक्षा नवनवे शत्रू शोधण्याला आरंभ झाला. त्यातून मित्रांना शत्रू करण्यात आले आणि एकदा ही प्रक्रिया सुरू झाली, मग तिचा वेग आणखी वाढत जातो. मित्रांचाही आवाज संपला असे वाटले, मग आप्तस्वकीय किंवा कुटुंबातच शत्रू निर्माण केले जातात. गोरक्षा निमीत्ताने मोदींनी ज्यांच्याकडे बोट दाखवले आहे, ते कोणी परके नाहीत. त्यांच्याच पक्ष व संघटना परिवारातले आहेत. ज्यांचा रात्रीचे भामटे व गुंड आणि सकाळचे भुरटे गोरक्षक असा उल्लेख मोदींनी केला, ते कुटुंबातलेच नाहीत का? असे जाहिरपणे बोलायची वेळ मोदींवर आली, त्याचे कारण त्याच अरबी मानसिकतेमध्ये सामावलेले आहे. आपण अजिंक्य आहोत असे वाटू लागले, मग सतत लढायची खुमखुमी बळावत जाते.  कारण नसताना लढाईचा पवित्रा घ्यावा लागतो. गोरक्षा किंवा हिंदूत्वाच्या आक्रस्ताळ्या भूमिका मांडणारे त्यापेक्षा किंचीत वेगळे नाहीत. मोदींचे मौनव्रत समजण्याची बुद्धी त्यांनी गमावली आहे. म्हणूनच आता खुद्द मोदी विरोधातली आघाडी असे शूरवीर कधी उघडतात ते बघायचे.

मोदींनी एका समारंभात अशा गोरक्षकांचे कान उपटले म्हटल्यावर त्यांना संताप आला तर नवल नाही. मग त्यापैकी काहीजणांनी भाजपा व संघाच्या नेत्यांसोबतचे फ़ोटो जाहिर करून भाजपालाच उघडे पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. हे व्हायला पर्याय नसतो. मुस्लिम आधीच भाजपाचे विरोधक होते आणि त्यांना जवळ घेण्यासाठी मोदी प्रयत्नशील राहिले. उत्तरप्रदेश विधानसभा जिंकण्यासाठी दलितांना जवळ घेण्याचा पवित्रा मोदी आखत असताना, त्यांच्याच समर्थकांनी दलितांना मारहाण करण्याचा पराक्रम केला आहे. किंबहूना भाजपा व मोदी हा दलितांशा शत्रू असल्याचा जो अखंड प्रचार चालतो, त्याला खतपाणी घालण्याचे ‘बहुमोल’ कार्य मोदी व भाजपाच्या समर्थकांनीच यथासांग पार पाडले आहे. त्यांनी असे कशाला करावे? तर अंगातली खुमखुमी त्याला कारण असते. जेव्हा कॉग्रेस व अन्य पुरोगामी पक्ष निष्प्रभ व हतबल झाले, तेव्हा लढायचे कोणाबरोबर असा प्रश्न पडला. म्हणून मित्रपक्षांना लाथाबुक्के मारण्याचा खेळ सुरू झाला. आता ते मित्रही दुरावलेत. मग लाथाबुक्के कोणाला मारावेत? जवळ असतील त्यांनाच मारायला नकोत का? जेव्हा त्याचे धक्के सत्तेला व कारभाराला बसू लागले, तेव्हा त्याकडे अधिक काणाडोळा करणे पंतप्रधानांना शक्य नव्हते. मुठभर नेते किंवा उनाड समर्थकांच्या अहंकारासाठी देशाच्या सत्तेवर लाथ मारणे व्यवहार्य नाही, हे कळण्याइतके मोदी समंजस आहेत. म्हणूनच अखेरीस त्यांना या भुरटेगिरीवर तोफ़ डागावी लागली आहे. मात्र त्याचा उपयोग होण्याची शक्यता नाही. कारण अशा विनाशक मानसिकतेला वेसण घालणे सोपे असते, तर सिरीया लिबिया इराक इतका उध्वस्त झाला नसता. शत-प्रतिशत मानसिकता आता मोदींनाही भेडसावू लागली आहे. मग अजून तीन वर्षांनी ती भाजपाला कुठवर घेऊन जाईल? घाटातले फ़लक धोके दाखवतात. काणाडोळा करणार्‍याला कान पकडून थांबवू शकत नसतात.

5 comments:

  1. Dear Bhau
    First time its something you have written that majority will disagree with you including me.

    I am sure you are well aware that this Go raksha episode is just to bring Modiji & BJP in problem & what Modiji has said was needed & correct.

    Again lets consider for a moment that those Go Rakshak were BJP supporter, still what they did is not justifiable. Do you want our PM to support such acts & elements?

    Its not matter of Arebic Mentality or Egoism at all. Surprised to see such analysis from you. Anyways it happens.

    Reagrds
    Abhijeet Joshi

    ReplyDelete
  2. भाऊ ही मारहाण करणारे खांग्रेसवाले मोदी वेश पांघरून आलेले वाटतात खरे खोटे माहित नाही यांना जातियवादा शिवाय सत्ता मिळत नाही महाराष्ट्रात लोक जागेझालेत असे वाटते प्रथम जितुने मार खाया Kolhapur ला नितू वाचला

    ReplyDelete
  3. भाऊ एकदम बरोबर मोदींनी कान उघडणे आवश्यक होते. आणि ज्या प्रमाणे RBI ची धोरणे ज्या प्रमाणे white money ला लागु असतात व Black money वाल्यांना लागु होऊ शकत नाहीत त्याप्रमाणे मोदी म्हणाले प्रमाणे गोरक्षक घुसलेले/घुसवलेले गुंड कोण आहेत हे तपासणे अवघड आहे. आणि त्याचाच फायदा मिडिया वाले घेतात व भारता सारख्या खंडप्राय देशात धुडगूस घालत आहेत. अनेक वेळा नव्हे प्रत्येक वेळी मिडियाने नेहमीच एका ठराविक राजकीय पक्षांना टारगेट केले आहे. आता गोरक्षा कार्यकर्ते हे तशाच पक्षाचे कार्यकर्ते आहेत मोठ्या आवेशात मिडिया टोळी अॅटॅक करत आहे. याच मिडियाने ज्या वेळी एका पाठोपाठ एक कैक लाख कोटीचे भ्रष्टाचार होत होते तेव्हा यडुरप्पांचे काय असे प्रतिप्रश्न विचारुन एक प्रकारे प्रचंड भ्रष्टाचार करणार्‍यांना का कव्हर ऑपरेशन दिले होते व आता हे सर्व दाखवणारी शोध पत्रकारिता कोणाचे पाणी भरत होती की लोणी खात होती हे भारता सारख्या देशात केवळ दैवच जाणु शकते. कारण आपले देशबांधवच यात सामील असल्याने हे सामान्यांना कधीच समजणार नाही. व दिशाभूल मात्र होत राहील.
    आपण वाहिनीवरील चर्चांत कधी देशाच्या विकासा संबंधित चर्चां करताना कधी ऐकले आहे का? मोदिनी परदेश दौऱ्यात देशाच्या विकासाला दिशा देणार्‍या कित्येक करारा वर चर्चा केली आहे का?
    कि मिडिया ढोल वाजवताना व व्हाइट हाऊसमध्ये म्युझियम मध्ये फिरताना दाखवुन भारतीयांची दिशाभूल करुन कोणाचा अजेंडा मिडिया चालवतो आहे? तसाच हे मिडियाला विचारण्या एवढा आधीकार भारतीय संविधानाने नागरिकांना दिलाय का? ना खाऊगां ना खाने दुंगा या मोदी धोरणा मुळे % भागीदारीला सोकावलेल्या मिडियाची मोठी कोंडी झाली आहे.
    डोळस सामान्य माणूस हे न जाणण्या एवढा दुध खुळा नाही हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.
    परंतु गोरक्षा, दलित, महागाई, विकास 15 लाख रु राममंदिर या विषयावर मोदी सरकारची आश्वासने कितपत पुर्ण केली यावरुन हाच मिडिया जस जशा 2019 च्या निवडणूका जवळ येतील तशे सरकारवर धारदार हल्ले चढवेल व 2004 प्रमाणे या सरकारने काम चांगले केले पण लोकांन पर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले व निवडणूक हरले किंवा बहुमत मिळेवु शकले नाही ही सारवासारव करेल. एका बाजूने सरकारची चुकीची धोरणे लोकांना दाखवून त्यात बदल करावयास भाग पाडणे व
    सरकारचे चांगले काम लोकांन पर्यंत पोहोचवणं हे मिडिया कडुन आपाक्षित आहे. परंतु यात केवळ सद्य सरकारला बदनाम करण्याचा अजेंडा बर्‍याच चानलनी चालवला आहे. व देशमत विरोधी फिरवणे हाच हेतु यामागे आहे.
    व पाराचा कावळा करुन देशवासियांना दाखवत आहे. व आमच्या सर्वांकडे हे हतबल पणे पहाणे एवढाच पर्याय सध्या तरी आहे. हाच मिडिया जयललिता यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न का करत नाही?
    विदेशी मिडियाला नामोहरम करण्याची ताकत ना शासकीय मिडीयात आहे व सोशल मिडियाची पोहोच भारतासारखा अर्ध क्षिक्षीत देशात आहे. आपल्या सारख्यांच्या लेखा मुळे होणारी जन जागृती हा आशेचा किरण आहे.
    अमुल

    ReplyDelete
  4. नमस्कार भाऊ,

    तुमचे इथे दिलेले तार्किक काही पटले नाही. तुम्ही 'मूळ' न पाहता तुमच्या 'पेट' थेअरी कडे वळता हे योग्य नाही. तुमची थेअरी मोदी-शाह जोडी बाबत खरी आहे पण त्यावरून जो तो आपल्या नात्या-गोत्या वरच तुटून पडला आहे वा पडू पाहत आहे हे म्हणणे बरोबर नाही.

    गोरक्षण हा सर्व हिंदूंचा जिव्हाळ्याचा विषय बनत आहे - आज हिंदू(सनातन) धर्मातील खऱ्या गोष्टी लोकांना समजू लागल्या आहेत व गाय हि अत्यंत उपकारक म्हणूनच मातेसमान आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. मुळात मोदींनी लोकसभा निवडणूक प्रचारात जी काही आश्वासने दिली होती त्यात गोहत्या प्रतिबंध,काश्मीरचे ३७० कलम रद्द व पकिस्तानाला प्रखर प्रत्युत्तर हे जनतेला फार भावले. पण प्रत्यक्षात निर्विवाद बहुमत मिळूनही मोदींनी काँग्रेस सारखेच वागण्याचा प्रयत्न चालविला आहे. म्हणजे मुस्लिम समाजाला चुचकारणे, दलितांना वेगळे ठरवून वागणे - थोडक्यात एकसंध समाज ही काळाची गरज असताना divide n rule असेच चालू आहे.

    आज संपूर्ण देशात अजूनही गोहत्या थांबविण्याचा कायदा मध्यवर्ती सरकार (भाजपने) आणलेला नाही. उलट गोमास निर्यात विक्रमी चालू आहे . तुम्ही म्हणता कायदा धाब्यावर बसवून गोरक्षणांचे प्रकार होऊ लागले म्हणून मोदींना असे उद्गार काढावे लागले - खरे तर गोमांसाचा व्यवहार ९९.९९ हा बेकायदाच चालतो - म्हणूनच सर्रास गाई-गुरे कोंबलेली व त्यामुळे कित्येकदा मृत झालेली आढळतात. त्यात पोलीस, इतर राजकीय संबंध यामुळे हा बेकायदेशीरपणा राजरोस चालू आहे. पण जर एखादा गोरक्षक मानलं की बेकायदा स्वतः:च्या फायद्यासाठी कायदा हातात घेतो तर त्याला पोलीस कधीही आत टाकू शकतात. पण मोदींची जी दलित व मुस्लिम चांगुलपणा (दाखविण्या)साठी वक्तव्ये आहेत हे जनता पुरेपूर ओळखून आहे.

    भाजप हि खरीतर एक मोट आहे - ज्यात खरे राष्ट्र-धर्म प्रेमी आहेत व बरेच संधीसाधूही जमा झालेले आहेत व इतर हिंदू संघटना यांच्यातही म्हणावी तितकी एकी निर्माण झालेली नाही म्हणूनच तर भाजप चा राष्ट्र-धर्म प्रेमी 'अजेंडा' अजूनही हवेतच आहे व तुम्हाला वाटते की यांची पाय खेचाखेची चालू आहे - पण एक मात्र खरे की आश्वासने देऊन ती न पाळणे - यासारखा गुन्हा भाजप परत परत करत आहे व त्याची शिक्षा त्यांना होणारच!

    ReplyDelete