आचार्य अत्रे आपल्या हजरजबाबी बोलण्यासाठी विख्यात होते आणि त्यांच्या नावावर अनेक किस्से खपवले जात असतात. तसाच एक किस्सा आहे शिवाजी पार्कवरील एका सभेचा! अत्रे अत्यंत धिप्पाड शरीरयष्टीनचे होते आणि भाषणाला उभे राहिले असताना त्यांचे हात खिशात होते. तर समोरच्या गर्दीतल्या कोणीतरी खट्याळपणे त्यांना हात खिशातून बाहेर काढा, असे ओरडला. तात्काळ अत्र्यांनी त्याला चोख उत्तर देत म्हटले, ‘तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही.’ यातला अश्लिल संदर्भ ऐकणार्यांच्या व सामान्य बुद्धीच्या लोकांना नेमका उमजला. पण बहुतांश विचारवंत सामान्य बुद्धीचे नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत काही तरी दडलेले असल्याच्या संशयाने कायम पछाडलेले असते. अश्लिलता किंवा सौंदर्य हे मानवी दृष्टीत असते. ज्याची जशी नजर असते, तसे त्याला समोरचे दृष्य तसे दिसते. एक संतवचनही त्याचीच ग्वाही देते. ‘जिसकी रही भावना जैसी, प्रभू मुरत तिन देखी तैसी.’ हे सगळे तुमच्या मनाचे खेळ असतात. मग आपापल्या समजूतीनुसार कुणाला चोर किंवा कुणाला थोर ठरवण्याची अहमहमिका सुरू होत असते. हरयाणाच्या विधानसभेत दिगंबर पंथाचे मुनिश्री तरूण सागर यांना आमंत्रित करण्यात आल्यावर त्यांच्या विचारांचे समर्थन वा खंडन करण्यापेक्षा त्यांच्या कपडे वा नग्नतेवर मोठीच मल्लीनाथी झाली. ती करण्यातला वैचारीक संदर्भ कमी आणि विकृत आनंद सहज डोळ्यात भरणारा होता. आपण कपड्यांनी झाकलेलो आहोत आणि म्हणून सभ्य वा सुसंस्कृत, तर ते मुनिश्री विवस्त्र वावरतात, म्हणून असभ्य असल्याच्या प्रतिक्रीया लज्जास्पद होत्या. त्यात सभ्यतेचे लक्षणही नव्हते. कारण या प्रतिक्रीया बहुतांशी नग्नतेचे गुणगान करणार्या लोकांकडून आलेल्या होत्या. अन्य वेळी नग्नता किंवा वेशभूषेच्या दंडकांना शिव्या घालणार्यांनी इथे नग्नतेवर हल्ला कशाला करावा?
मुळातच मुनिश्री जसे विवस्त्र आहेत, तसेच मानव प्राणी सोडल्यास बाकीचे सर्व प्राणीमात्रही विवस्त्र जगत असतात. त्यापैकी काही प्राण्यांना आपण मानवी समाजात स्थानही दिलेले आहे. कुत्रा, गाय. म्हैस इत्यादी कोणी वस्त्रे वापरत नाहीत. मग त्यांना नग्न नागडे म्हणून हिणवायचे काय? मानवी संस्कृती म्हणून जे काही आहे, त्यात कपड्याचा वा वस्त्राचा शोध लागण्यापुर्वी माणूसही नग्नावस्थेतच जगत होता. त्याची चित्रेही अनेक जागी इतिहास म्हणून नोंदलेली आहेत. जेव्हा अन्य कोणी संस्कृतीरक्षक नग्नतेचा विरोध करायला उभे ठाकतात, तेव्हा तथाकथित ‘समविचारी’ कलाक्षेत्रातील नग्नतेच्या समर्थनाला हिरीरीने पुढे येतात. खजुराहो आदि उदाहरणे देऊन कलात्मक नग्नतेची पाठराखण करतात. मग त्यांना मुनिश्री जैन साधूची नग्नता कशाला टोचते? हुसेन नावाच्या चित्रकाराने सरस्वती वा हिंदू दैवतांची नग्न चित्रे रंगवली त्यावरून काहूर माजलेले होते. तेव्हा ज्यांनी नग्नतेचे समर्थन केले, त्यांनी आज तरूण सागर यांची खिल्ली उडवण्यात कुठला बुद्धीवाद आहे? तर आमच्या टोळीने ज्या नग्नतेला कला म्हणून मान्यता दिली आहे, ती नग्नता कलाविष्कार असतो. उलट आमच्या टोळीतले नसतील त्यांची विवस्त्रता मात्र नग्न म्हणून असभ्य असते, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? सत्यही नागडेच असते, ह्याचा अशा लोकांना विसर पडलेला आहे. कारण नग्नता, अश्लिलता, सौंदर्य वस्तुमध्ये नसते तर तुमच्या मनातल्या विकारात सामावलेले असते. म्हणून कुणाला चित्रात नग्नता दिसते आणि कुणाला साधूमुनीच्या विवस्त्रतेत नग्नता दिसते. सामान्य माणूस मात्र यापासून मैलोगणती दुर असतो. म्हणूनच त्याच्या निरागस नजरेला नग्नता बघावी किंवा नाही, याचे तारतम्य असते. त्याला अशा गोष्टी सतावत नाहीत, की अस्वस्थ करीत नाहीत. कारण त्याची नजर व बुद्धी साफ़ असते.
दिगंबर पंथाचे जैन मुनी विवस्त्र जगतात. त्यांना याच निसर्गात जगावे लागते आणि त्या निसर्गातली थंडी उन्हाळा यांचे परिणामही भोगावे लागत असतात. त्यामध्ये निसर्गाला दोष देण्याची सोय त्यांना नसते. थंडीवारा अंगावर झेलत नग्नावस्थेत जीवन कंठणे सोपे नाही. त्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम राहून निर्धारपुर्वक त्या शारीरिक पीडा सोसणे कितीजणांना शक्य आहे? यापैकी अनेकजण अन्नत्याग करून देहत्यागापर्यंत जातात. तितके आपल्या भूमिका व निर्णयावर ठाम रहायचे बळ किती लोक दाखवू शकतात? अशा साधू मुनींच्या नग्नतेने त्यांचे अनुयायी किंचीतही विचलीत होत नाहीत, ही बाब लक्षणिय आहे. त्यांच्या अनुयायांना त्यातली नग्नता बाधा आणत नाही, त्याला श्रद्धा म्हणतात. त्या नग्न भासणार्या साधूकडून बोधामृत घ्यावे, ही सामान्य बुद्धी असते. ते बोधामृत सोडून बाह्यरुपाची चिकित्सा करावी याला कुशाग्र बुद्धी म्हणतात. अशा लोकांनी वस्त्रातले व विवस्त्र साधूसंतांच्या वाट्याला जाऊ नये. काही दिवसांपुर्वी दिपिका पादुकोण हिच्या एका वेशावरून टाईम्स नावाच्या वृत्तपत्राने टिप्पणी केलेली होती. गरजेपेक्षा तिच्या स्तनांचा काही भाग प्रदर्शित होत असण्यावर ती टिप्पणी होती. त्यावर दिपिकाने टाइम्सला सुनावले होते. कपडे घालूनही नग्नता शोधणारी अशी ही बुद्धीमान सभ्यता आहे. माणूस म्हणून जगणार्यांना आपण पशू नसल्याचे सदोदित सिद्ध करण्यासाठी वस्त्रे प्रावरणे आवश्यक असतात. कारण त्याला अजूनही आपल्यातला पशू संपवता आलेला नाही. ज्याने त्या पशूवर मात केली, त्याला वस्त्राने झाकलेला देह आणि नग्न देह यातला फ़रक उमजत नाही. किंवा कुठला फ़रक पडत नाही. कपड्यातले लोक बलात्कारापर्यंत पशुतुल्य होऊन जातात. तसे कुणा नग्न साधूने केल्याची बातमी अजून तरी कुणा माध्यमाने प्रसिद्ध केलेली नाही.
आपल्या विकारांवर विचारांनी मात करण्याची सिद्धी सोपी नसते. नग्नतेची लाज संपवणे म्हणूनच अवघड आहे. काहीतरी लपवण्यासारखे असल्याची अपराधी भावनाच कपड्यांचा आग्रह धरत असते. सामान्य माणूस अशा तमाम विकारांचा बळी असतो. म्हणूनच त्याला कपड्यात झाकून जगावे लागते. वासनांवर मात करण्याच्या गप्पा जोरजोरात ठोकल्या जातात. पण तशीच प्रत्येक संधी शोधत जगणार्या पशूलाच माणुस म्हणतात. मग त्या लपवाछपवीला लज्जेचे नाव देण्यात आले. झाकली मूठ म्हणतात, तशी ही संस्कृती वा सभ्यपणा असतो. पहिली संधी मिळताच तो गळून पडतो. म्हणून नागरी समाजातच बलात्कार होतात आणि कोवळ्या मुलांचेही लैंगिक शोषण होऊ शकत असते. अशा समाजात उजळमाथ्याने प्रतिष्ठीत म्हणून नावाजलेल्यांनी कुणा नग्न साधूविषयी मुक्ताफ़ळे उधळण्यात काय अर्थ आहे? तटस्थपणे जगाकडे बघण्याची हिंमत जुळवणे व अंगी बाणवणे सोपे काम नाही. जगासमोर निरागसपणे विवस्त्र वावरणे म्हणूनच सोपे नाही. तरूण सागर यांनी समाजाला काय सांगितले वा कुठले प्रवचन दिले, यावर मतभेद असू शकतात आणि त्यांच्याशी सहमत असायचे काहीही कारण नाही. पण अशा व्यक्तीच्या नग्नतेसाठी त्याची खिल्ली उडवणे निषेधार्ह आहे. कारण हुसेनपासून अन्य अनेकांनी नग्नता ही प्रसिद्धीचा झोत अंगावर ओढून घेण्यासाठी केलेली केविलवाणी कसरत असते. तरूण सागर वा अन्य कुणी नग्न साधू मुनी प्रसिद्धीसाठी नग्नावस्थेत जगत नाहीत. त्यांच्या विचार व भूमिकांशी ते निष्ठेने एकरूप झालेले असतात. अनुयायी सुद्धा त्यांच्या नग्नता नव्हेतर निर्धारी निश्चयाला शरण जातात, हात जोडतात. त्या साधूमध्ये, त्याच्या साधूत्वामध्ये काय बघावे, तितकी तटस्थ पवित्र नजर त्या अनुयायांमध्ये असते. ज्यांच्यापाशी तितकी निरागस शुद्ध दृष्टीच नाही, त्यांना बुरख्यातली महिलाही नग्न ‘बघता’ येत असतेच की!
रोजनिशी (दै, जनशक्ति)
छान लेख भाऊ!
ReplyDeleteछान भाऊ उत्तम
ReplyDeleteअंजनच घातले भाऊ तुम्ही..
ReplyDelete