Wednesday, September 7, 2016

अमिताभच्या जागी इमरान हाशमी?

राहुलच्या उत्तरप्रदेश यात्रेचा मुहूर्तालाच असा फ़ज्जा उडाला. ‘खाट’ सभेला आलेल्या लोकांमध्ये सभा संपताच खाटा पळवण्यावरून हाणामारी जुंपली.

rahul kisan yatra के लिए चित्र परिणाम

गेली दोन वर्षे आपली पाळेमुळे शोधण्यासाठी धडपडणार्‍या कॉग्रेसला आता उत्तरप्रदेश विधानसभा जिंकण्याचे वेध लागले आहेत. तशी देशातील या सर्वात मोठ्या राज्याच्या विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांनी व्हायची आहे. तिचे पडघम जानेवारी महिन्यात घुमू लागतील. त्याच सोबत पंजाब, उत्तराखंड अशा अन्य विधानसभांच्याही निवडणूका व्हायच्या आहेत. पण कॉग्रेसने आपली सर्व शक्ती उत्तरप्रदेशात पणाला लावण्याचा चंग बांधलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर नामक ‘मोदीभक्ता’ची सेनापती म्हणून निवड केली आहे. या लढाईची रणनिती किशोर गेले काही महिने करीत आहेत. त्यासाठी कॉग्रेस संघटनेकडून मदत मिळण्यापेक्षा अडथळेच अधिक आणले जातात, अशी तक्रार ऐकू येत होती. कारण आधी किशोरने राहुल वा प्रियंका यापैकी एकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्याचा प्रस्ताव पुढे केला होता. तो फ़ेटाळला गेल्यावर किमान ब्राह्मण चेहरा पुढे करण्याचे मान्य झाले. मात्र हे सर्व डावपेच कागदावर उत्तम असले, तरी त्यानुसार रणांगणात लढणारी फ़ौज आवश्यक असते. त्याची वानवा आहे. कारण मागल्या तीन दशकात क्रमाक्रमाने या मोठ्या राज्यातील कॉग्रेस रसातळाला गेलेली आहे. २००९ सालच्या लोकसभा मतदानात आशेचा किरण दिसला होता. कॉग्रेसने २० जागा जिंकून चमक दाखवली होती. पण त्याचे भांडवल करून पक्षाची संघटना बांधण्यापेक्षा कॉग्रेसमधील लाळघोट्या नेत्यांनी राहुलचे देव्हारे माजवण्यात धन्यता मानली. मग राहुलच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन विधानसभा जिंकण्याचे मनसुबे इतके धुळीला मिळाले, की राहुलना त्या निकालानंतर तोंड लपवून दडी मारायची पाळी आलेली होती. तेच राहुल आता उत्तरप्रदेशच्या मुलूखगिरीवर निघाले आहेत. मग परिणामात किती फ़रक पडू शकेल? दोन्हीतला फ़रक एकच आहे, तेव्हा राहुलचे सारथी दिग्विजय सिंग होते, आज प्रशांत किशोर आहेत.

एक गोष्ट कोणालाही मान्य करावी लागेल. किशोर हा पठडीतला राजकारणी वा रणनितीकार नाही. त्याने मागल्या लोकसभेत मोदींना मदत करताना चमत्कार घडवून दाखवला होता. प्रचलित व प्रस्थापित रणनितीकारांना चकीत करणारे खेळ केले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्याने दिल्ली व बिहारमध्ये करून भाजपालाधी धडा शिकवला होता. पण विजय संपादन करण्यासाठी जी रणनिती व योजना त्याने पुढे केल्या, त्या समजून घेत केजरीवाल व नितीशसह लालूंनीही मान्यता दिलेली होती. किशोरच्या मागणीनुसार वागण्याची व कृती करण्याची लवचिकता त्या प्रत्येक पक्ष व नेत्याने दाखवली होती. मात्र उत्तरप्रदेशात कॉग्रेसची रणनिती आखून लढाई लढताना, किशोरची भलतीच तारांबळ उडते आहे. राहुलना पुढे करून कॉग्रेसने लोकसभेत सर्वात मोठे अपयश संपादन करून दाखवले आहे. अशा व्यक्तीला पुढे करून प्रशांत किशोर कुठला पल्ला गाठू शकतो? दुसरी गोष्ट त्याच्या इच्छेनुसार नितीशला चेहरा म्हणून पुढे करण्याचा त्याचा आग्रह लालूंनीही मान्य केला होता. फ़ार कशाला मांझी यांना हटवून नितीशनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची किशोरची अटही मान्य झालेली होती. पुढल्या काळात त्याने जसे इशारे दिले व काम सांगितले, त्यानुसार नि:शंक मनाने नितीशनी वागणूक ठेवली होती. हे सहकार्य प्रशांत किशोरला कॉग्रेसकडून कितपत मिळू शकेल, याची शंका आहे. आधीच त्याने सुचवलेले चेहरे फ़ेटाळले गेले आहेत आणि ब्राह्मण चेहरा हवा, म्हणून शीला दिक्षीत यांना निवृत्तीतून राजकारणात आणले गेले आहे. दिर्घकाळ त्यांचा उत्तरप्रदेशी राजकारणाशी तीळमात्र संबंध राहिलेला नाही. त्यात पुन्हा प्रचाराचा चेहरा राहूल असणार आहे. राहुल हा लोकांनी निर्णायकरित्या फ़ेटाळलेला चेहरा आहे. म्हणूनच प्रशांतने प्रियंका हे नाव सांगितले होते. पण तेही नाकारण्यात आल्यावर काय शिल्लक उरले? दिग्विजयच्या जागी प्रशांत इतकाच फ़रक आहे ना?

मागल्या खेपेसही राहुल गांधी यांनी लोकसभेच्या यशावर स्वार होऊन विधानसभा जिंकण्यासाठी तीन महिने त्या राज्यात मुक्काम ठोकला होता. भट्टा परसोल या गावात पोलिसी हिंसाचार झाल्यावर केवळ मोटरबाईकने तिथे धाव घेण्याचे नाट्यही राहुलने पार पाडलेले होते. पण त्याचा काहीही प्रभाव मतदारांवर पडला नाही. उलट एका सजवलेल्या बसमधून राज्यभर सहा महिने यात्रा केलेल्या मुलायमपुत्र अखिलेशने बाजी मारून दाखवलेली होती. अखिलेशच्या प्रचाराला व यात्रेला माध्यमातून फ़ारशी प्रसिद्धी मिळालेली नव्हती. पण कुठल्याही लहानमोठ्या खेड्यातही अखिलेश बसवर उभा राहून सभा घेत अखंड फ़िरत होता आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचला होता. प्रशांतने योजलेली राहुल यात्रा माध्यमांचा खेळ अधिक वाटतो. शेतकरी, दलित, मुस्लिम, ब्राह्मण असे अनेक लहानमोठे समाजघटक जोडून घेण्य़ाची रणनिती योग्य आहे. पण ते जोडण्यासाठी हवा असलेला प्रभावशाली नेता वा चेहरा राहुल नाही. ही प्रशांतची मोठी अडचण आहे. इतक्या दिर्घ यात्रेमध्ये राहुल कितीकाळ टिकून रहाणार याची शंका आहे. धावते रोडशो करून पुन्हा दिल्लीला आपल्या सुखासिन जागी विश्रांतीला जाणे, हा राहुलचा परिपाठ आहे. कधी एखाद्या दलित गरीबाच्या झोपडीत वास्तव्य करणे, तिथे दोन घास खाणे, त्यांच्या मळकट मुलांना मांडीवर घेऊन बसणे, अशा देखाव्यात आता नाविन्य राहिलेले नाही. अगदी तेव्हा मनरेगाच्या मातीकामावर जाऊन दोन घमेली उचलण्याचेही नाटक होऊन गेलेले आहे. त्यात राहुल शोभत नाही, ही बाब विसरून चालणार नाही. पटकथा प्रशांतने झकास लिहीली आहे. पण त्यासाठी निवडलेला अभिनेता तितक्या ताकदीने अभिनय करणारा नसेल, तर एकूण चित्रपटाची स्थिती काय होऊ शकते? सलिम जावेदच्या पटकथेतली ताकद अमिताभच्या जागी इमरान हाशमी पडद्यावर आणू शकतो काय?

उत्तरप्रदेशची मुलूखगिरी आरंभ करताना देवरिया ते दिल्ली अशी यात्रा योजण्यात आलेली आहे. त्यात जवळपास अर्धे विधानसभा मतदारसंघ राहुल फ़िरतील, अशी कल्पना आहे. त्याचा आरंभ देवरिया येथील शेतकरी मेळाव्याने होणार आहे. त्यासाठीची तयारीही मोठी मजेशीर आहे. मोकळे मैदान वा खुर्च्या नसून अवघे पटांगण गावठी खाटा पसरून व्यापलेले आहे. गावठी पद्धतीने पंचायत भरवल्यासारखा हा मेळावा योजून राहुलना शेतकरी व ग्रामिणांपैकी एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यात गैर काहीच नाही. सर्वच राजकीय नेते व पक्ष अशी नाटके करतात. पण खेड्यातला सामान्य माणूस व त्याच्याशी एकरुप होण्यासाठी आवश्यक असलेली सहजता, खुप महत्वाची असते. ती राहुलपाशी अजिबात नाही. त्याला ग्रामिण वा शहरी लोकांचे प्रश्नच ठाऊक नाहीत आणि पढवलेले मुद्दे घेऊन बोलतानाही गफ़लती होतात. त्यातून विनोद निर्माण होतात. सवाल नुसत्या रणनितीचा किंवा सज्जतेचा नसून, लढाईची जाण असलेल्या सेनापतीचा आहे. कॉग्रेसपाशी लढायची इच्छा व इर्षा असलेला कोणी सेनापती उरलेला नाही. लढाई जिंकण्याची महत्वाकांक्षा असलेला नेता कॉग्रेस शोधू शकलेली नाही. आजी व पुर्वजांच्या पुण्याईवर आपली महत्ता सिद्ध करण्यासाठी धडपडणार्‍या मायलेकरांवर अवघा कॉग्रेस पक्ष अगतिकपणे अवलंबून आहे. कुठलीही संघटनात्मक शक्ती शिल्लक नाही आणि संघटना बांधण्याची इच्छाही संपलेली आहे. मग नुसत्या देखाव्याने पक्षाचा उद्धार होणार कसा? जाहिरातबाजी वा देखाव्याने लोकांना काहीकाळ भारावून टाकता येते. पण भर ओसरला, मग त्यात गाभाही दिसावा लागतो, तिथे सगळी पोकळी आहे. वठलेल्या झाडाची कठोरपणे छाटणी केल्यासच त्याला नवे धुमारे फ़ुटतात. बिचारा प्रशांत किशोर वठलेल्या बुंध्यालाच अंकुर धुमारे फ़ुटण्याची आशा लावून बसला आहे. राहुलना आणखी एका पराभवाने काही फ़रक पडणार नाही. पण मोदी, केजरीवाल व नितीशना यश मिळवून देणार्‍या प्रशांत किशोरला उत्तरप्रदेशातील दारूण पराभव दिवाळखोर घोषित करण्याचा धोका मोठा आहे.

रोजनिशी (दै, जनशक्ति)

3 comments: