Thursday, October 6, 2016

सर्जिकल कारवाईचा सापळा

shahid siddiqui के लिए चित्र परिणाम

शाहिद सिद्दीकी नावाचा एक उर्दू पत्रकार आहे. अनेकदा तो विविध वाहिन्यांवरही आपल्याला दिसतो. चार वर्षापूर्वी त्याने एका वाहिनीवर बोलताना एक गंभीर विधान केले होते. पण कोणीही ते गंभीरपणे घेतले नाही. तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकांना सामोरे जात होते. देशातली सर्व माध्यमे मोदींवर दंगलीचा आरोप करीत त्यांना बदनाम करण्यासाठी दिर्घकाळ एकवटलेली होती. काही काळ शाहीदही त्यात सहभागी झालेला होता. पण नंतर त्याची विवेकबुद्धी जागृत झाली आणि म्हणूनच त्याने आपल्या तमाम माध्यमातील बांधवांना जागवण्याचा केलेला तो प्रयास होता. आंधळ्या मोदी विरोधाने काहीही साध्य होणार नाही, उलट मोदी अधिकाधिक शक्तीशाली होत जातील, असेच त्याचे मत झालेले होते. कारण सलग दहा वर्षाच्या गुजरात दंगलीच्या अपप्रचाराने मोदी दुबळे होण्यापेक्षा देशभर त्यांची उजळ प्रतिमा निर्माण होत गेलेली होती. जितके भयंकर आरोप व कडवी टिका होत गेली; तितके मोदी ताकदवान होत गेले. ही वस्तुस्थिती होती. पण त्याची सिद्दीकीने केलेली मिमांसा मोठी चमत्कारीक होती. त्यावेळी वाहिनीवर बोलताना सिद्दीकी म्ह्णाला, ‘कृपया मोदींना सतत झोडणे व बेताल आरोप थांबवा. तुमच्या अशा बेछूट आरोपातूनच मोदींना उर्जा मिळत असते आणि ते अधिक जोमाने कामाला लागतात. तेव्हा कृपया मोदींवरची टिका थांबवा. निदान मोदींचे नाव घ्यायचे तरी थांबा.’ पण कोणी त्याचे शब्द मानले नाहीत आणि आज मोदी देशाचे पंतप्रधान होऊन जागतिक नेताही बनुन गेले आहेत. पण त्यांचा द्वेष करणारे मात्र त्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत. म्हणूनच मोदी हा मोठा नशीबवान माणूस वाटतो. प्रामुख्याने आता पाकिस्तानी हद्दीत जाऊन केलेल्या हल्ल्याविषयी शंका घेतली गेल्यावर तर, मोदींचे नशिब किती जोरदार आहे त्याची साक्षच मिळते.

लोकसभा प्रचारात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी म्हणाले होते, माझ्यावर फ़ेकल्या गेलेल्या दगडांना गोळा करून मी जिना तयार केला व त्यावरच चढून इथवर पोहोचलो आहे. पण त्यांना तिथेच थांबू देण्याची विरोधकांची इच्छा दिसत नाही. ते मोदींना अधिकाधिक उर्जा देऊन अधिक बलवान करायला कटीबद्ध झालेले दिसतात. अन्यथा प्रत्येक वेळी मोदींनी लावलेल्या सापळ्यात विरोधक अलगद जाऊन कशाला अडकले असते? आताही पाक हद्दीतल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी शंका घेतली गेली आहे. ती विरोधकांनी आपल्या बुद्धीने घेतलेली शंका आहे, की मोदींना तशीच विरोधकांकडून अपेक्षा होती? कारण अशा शंका व संसयानंतर पुरावे समोर आणले गेल्यास, त्याचा सर्वाधिक राजकीय लाभ मोदी व त्यांच्या भाजपालाच होणार आहे. कारण असे पुरावे समोर आणणे भाजपला लाभदायक ठरू शकते. पण तेच पुरावे त्यांनी स्वत:च समोर आणले असते, तर त्याला राजकीय हेतूने वा स्वार्थाने पुढे आणलेले पुरावे मानले गेले असते. कारण ह्या प्रतिहल्ल्याने भारतीय जनता वा मतदार सुखावलेला आहे. अशावेळी तसे पुरावेच समोर आले, तर तो मोदी नेतृत्वाच्या मर्दुमकीचा पुरावा ठरणार आहे. पर्यायाने कुठल्याही नजिकच्या मतदानात लोक मोदींवर मतांचा वर्षाव करतील. जगण्यातले व जीवाभावाचे सर्व प्रश्न बाजूला पडून, मोदींना या मर्दुमकीसाठी लोक डोक्यावर घेतील. मात्र त्यासाठी आधीच पुरावे समोर आणले गेले असते, तर मोदींसह भाजपावर लष्कराच्या कारवाईचा पक्षहितासाठी वापर केल्याचा आरोप झाला असता. किंबहूना त्यासाठी़च पाकविरोधी कारवाई झाल्याचाही उलटा आरोप होऊ शकला असता. कारवाईविषयीही राजकीय शंका घेतली गेली असती. पण विरोधकांनीच शंका घेतल्या आणि मागणी केली म्हणून पुरावे समोर आणल्यास, राजकीय लाभ उठवल्याचा आरोप कोणी करू शकणार नाही ना?

अशी कारवाई केल्याची घोषणा लष्कराचे संबंधित अधिकारी लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी केली होती. मोदी वा सरकारच्या कुणा मंत्र्याने तशी बढाई मारलेली नाही. पण त्यावर शंका घेणारे जी वक्तव्ये करीत आहेत, ती प्रत्यक्षात सेनेच्या कर्तॄत्वावर शंका घेत आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी किंवा कारवाई खरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी, सेनादलालाच पुरावे समोर आणावे लागतील. पण त्याचे श्रेय मग अलगद मोदी सरकारला दिले जाईल. कारण यापुर्वीही असेच प्रतिहल्ले युपीएच्या काळातही झाल्याचे चिदंबरम व अन्य कॉग्रेसनेतेच सांगत आहेत. म्हणजेच मोदी सरकारने नवे काही केले नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे. पण कॉग्रेसने त्याविषयी गाजावाजा केलेला नव्हता. इथपर्यंत राजकारण ठिक होते. कुणा भाजपावाल्याने वा मोदींनी आजही कॉग्रेसकडे त्याचा पुरावा मागितला नव्हता. पण कॉग्रेस नेत्यांनीच आता तसा पुरावा मागितला आहे आणि रणबीरसिंग यांनी तसे पुरावे असल्याचा हवाला दिलेला आहे. खरे ठरण्यासाठी रणबीरसिंग ते पुरावे सादर करतील. पण त्यातून वेगळाच प्रश्न असा येईल, की युपीएच्या काळात जे असे हल्ले झाले, त्याच्या पुराव्याचे काय? ते पुरावे कॉग्रेस नेते देऊ शकणार आहेत काय? कारण चिदंबरम किंवा अन्य कुणा कॉग्रेसवाल्याने तसे हल्ले केल्याचा दावा केलेला असला, तरी पुरावे असल्याचा दावा केलेला नाही. मग ताजे पुरावे समोर आल्यावर जुन्या पुराव्यांची मागणी झाल्यास कोण तोंडघशी पडणार आहे? कॉग्रेस आणि चिदंबरमच खोट्या हल्ल्याचे श्रेय मिळवू बघत होते, असा समज तयार होणार ना? कारण यापुर्वीच्या तशा हल्ला वा कारवाईचा पुरावा असल्याचे कोणीही मान्य केलेलेच नाही. म्हणजे कुठूनही बघा, लाभ मोदींचा व पर्यायाने भाजपालाच मिळणार ना? याला नशीब म्हणतात. कर्तृत्व सेनादलाचे, पण श्रेय मोदी व भाजपाला! पण ते श्रेय देण्याचा अट्टाहास कोणी केला आहे? मोदी विरोधकांनीच ना?

मोदी हा नुसता कामसू राज्यकर्ता वा प्रशासक नाही, तो धुर्त राजकारणीही आहे. शरद पवार चतुर व धुर्त असल्याचे सतत बोलले जाते. पण शंभर पवार एकत्र केल्यास एक धुर्त मोदी तयार होतो, हे विसरता कामा नये. आपल्या राष्ट्रप्रेमाची वा कार्यकर्तावृत्तीची मोदींनी कितीही ग्वाही द्यावी. पण त्यांच्यातला धुर्त राजकारणी कधीच संपत नाही. आपल्या प्रत्येक उदात्त वा जनहिताच्या कामातही मोदी राजकीय मतलब विसरत नाहीत. अगदी विरोध करताना वा विरोधकांशी खेळतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय सापळे लावत असतात आणि चतुराईने आपल्या विरोधकांनाही आपल्या इच्छेनुसार खेळायला भाग पाडत असतात. आताही प्रतिहल्ला झाल्यावर एकदाही त्यांनी या हल्ल्याचे श्रेय घेण्याचा प्रयास केला नाही, की त्याविषयी जाहिर वक्तव्य केले नाही. लष्करने व सेनादलाने आपले काम केले, तर त्यांनाच त्याविषयीची घोषणा करण्यासाठी पुढे करण्यात आले. सेनेनेही श्रेय मोदींच्या नेतृत्वाला दिले. पण आरोप आता मोदींवर आल्याने खुलाश्याचेही श्रेय आपोआप मोदींच्या वाट्याला जाणार. हे पुरावे फ़ुशारकी मारण्यासाठी पहिल्याच दिवशी सादर करता आले असते. पण त्याला उशीर केल्याने पुढला गदारोळ झाला आहे. म्हणजे विरोधक शंका काढणार हे मोदी ओळखून होते आणि म्हणूनच कारवाईची घोषणा करण्याची मुभा सेनेला दिली. मात्र पुरावे मागे ठेवायला मुद्दाम सांगितलेले असू शकते. गदारोळ झाल्यावर पुरावे देण्यातला राजकीय लाभ पहिल्या दिवशी फ़ुशारक्या मारून मिळाला नसता. विरोधकांनी शंका घ्यावी, मग थप्पड मारल्यासारखे पुरावे तोंडावर फ़ेकावेत, असला डाव नसेल याची कोणी हमी देऊ शकतो का? त्याचे होणारे राजकीय लाभ कोणी थांबवू शकणार आहे काय? अर्थात ही झाली तात्पुरत्या राजकीय लाभाची गोष्ट! यापेक्षाही मोठा राजकीय सापळा मोदींनी लावला आणि त्यात विरोधक आयते जाऊन फ़सले आहेत. त्याचा उलगडा उद्या करूया.

2 comments:

  1. आम्ही पण ४ सर्जिकल स्ट्राईक केलेत. पण कधी बोभाटा केला नाही.

    - शरद पवार😏

    पहीला सर्जीकल स्ट्राईक धरणात,
    दूसरा महाराष्ट्र सदनात,
    तीसरा लवासात
    चौथा पुरावे मीटवण्यासाठी मंत्रालयात.

    ReplyDelete
    Replies
    1. छान ! कोणीतरी हे उघडपणे मांडायलाच हवे

      Delete