गेल्या दोन महिन्यात उत्तरप्रदेशात राहुल गांधी यांनी केलेल्या प्रयासांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आळसावलेल्या कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना नव्याने प्रेरणा देण्यासाठी आता प्रियंका गांधी यांनाही मैदानात आणायचा निर्णय घेण्यात आलेला दिसतो. अन्यथा सोमवारी होऊ घातलेल्या महत्वाच्या बैठकीला प्रियंकाची उपस्थिती असल्याचा गवगवा झाला नसता. गेली दहा वर्षे राहुलपेक्षा प्रियंका गांधीच नव्याने कॉग्रेसला संजिवनी देऊ शकतील, असे म्हटले जात आहे. पण प्रत्येकवेळी प्रियंकाचे नाव पुढे आल्यावर ज्येष्ठ नेतेही अबोल होतात आणि तसा निर्णय प्रियंकानेच घ्यायचा आहे, असे सांगून पळ काढतात. खरे म्हणजे तसा निर्णय प्रियंकाने घ्यायचा नसून तिच्या मातोश्री सोनिया गांधींनी घ्यायचा आहे. कारण आज तरी पक्षात निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार त्यांच्याच हाती केंद्रीत झालेले आहेत. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून प्रियंकाला पद्धतशीरपणे बाजूला ठेवून राहुलना नेतृत्वपदी आणुन बसवण्याचा अट्टाहास केलेला आहे. २००४ सालात राहुल प्रथमच अमेठी मतदारसंघातून उभे राहिले, तेव्हाही त्यांच्या समवेत प्रियंकानेच तिथे हजेरी लावलेली होती. मात्र तिला मिळणारा प्रतिसाद बघून अनेक कॉग्रेस नेत्यांना इंदिराजींचे रुप आठवले आणि प्रियंकाच्या कॉग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू झाली. ती चर्चा आजवर संपलेली नाही. पण त्या दिशेने एकही पाऊल टाकले गेलेले नाही. उलट ज्या कोणा नेत्यांनी तशी भाषा बोलली वा आवाज उठवला, त्यांचा पत्ता कॉग्रेसमध्ये कापला गेलेला आहे. सोनियांनी कधी त्या विषयाची वाच्यता केलेली नाही, किंवा प्रोत्साहनही दिलेले नाही. उलट तसे प्रयत्न हाणून पाडण्यात सोनिया यशस्वी झाल्या आहेत. आता तर सहा महिने त्यांनी पक्षाच्या कुठल्याही बैठकीतही हजर रहायचे टाळलेले आहे आणि जवळपास सर्वच सुत्रे राहुलकडे सोपवली आहेत. पण पुन्हा प्रियंकाचा विषय पुढे आला आहे.
प्रियंकाच्या बाबतीत दोन अडचणी कॉग्रेस व गांधी कुटुंबाला सतावत असू शकतात. इतका अट्टाहास करूनही राहुल पक्षाचे नेतृत्व खंबीरपणे करू शकलेला नाही. उलट अनेक नेत्यांनी त्याच्याविषयी नाराजी व्यक्त केल्यांने, त्यांचीच पक्षातून हाकालपट्टी करावी लागलेली आहे. जयंती नटराजन यांच्यापासून रीटा बहुगुण जोशीपर्यंत प्रत्येक नेत्याने राहुलमधील नेतृत्व गुणांच्या अभावावर बोट ठेवण्याचे धाडस दाखवलेले आहे. त्यांनी द्वेषभावनेने असे काही केल्याचा प्रत्यारोप होऊ शकत नाही. राहुलला राजकारणात उभा करण्यासाठी आरंभापासून त्यांच्या भाषणाचे मसूदे लिहून देणारे बुद्धीमान नेते जयराम रमेशही कंटाळून गेलेले असावेत. आजकाल तेही राहुलच्या कुठे आसपास दिसत नाहीत. कदाचित त्यांनी स्वेच्छेने राहुलपासून दुरावा घेतला असावा. किंवा राहुलच्या अपात्रतेविषयी त्यांनी आपले प्रामाणिक मत व्यक्त केलेले असावे. त्यांच्या सहवासात असताना राहुल किमान काही जबाबदार विधाने व वर्तन करताना दिसत होते. भले त्यामुळे राहुलच्या व्यक्तीमत्वाचा जनमानसावर प्रभाव पडू शकला नसेल. पण निदान राहुलना हास्यास्पद ठरावे लागण्यासारखे काही तोपर्यंत घडत नव्हते. अलिकडल्या काळात राहुलपासून रमेश दुरावले आणि त्याच्या प्रत्येक कृतीतून उथळपणा व बालीशपणा नजरेत भरू लागला आहे. प्रामुख्याने त्याची प्रचिती उत्तरप्रदेशातील किसानयात्रेत आलेली आहे. एका दिवशी सर्जिकल स्ट्राईकसाठी नरेंद्र मोदींचे कौतुक करायचे आणि दुसर्याच दिवशी मोदींवर ‘खुन की दलाली’ केल्याचा भडक आरोप करायचा, असा बेतालपणा केल्याने राहुल गांधी त्या यात्रेमध्ये हास्यास्पद होऊन गेले. संघविरोधी खटल्यातही सतत बदलत्या भूमिकेने राहुलना पोरकट बनवले गेले. आता कुठल्याही गर्दीत धावून जाण्याच्या उतावळेपणाने राहुलच्या नेतृत्वात निर्णायक खंबीरपणा नसल्याची खात्री लोकांना पटलेली आहे.
मोदींना ज्यांनी नव्या अभिनव पद्धतीने लोकसभा जिंकायला मदत केली, त्या प्रशांत किशोरना कॉग्रेस व राहुलनी उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत मदतीसाठी सोबत घेतलेले होते. पण त्यांच्याशी जुळवून घेणे वा पक्ष संघटना व किशोर यांच्यात समन्वय साधणेही राहुलना शक्य झालेले नाही. त्यांनी बनवलेली रणनिती अमान्य करण्यात आली आणि नंतर योजलेल्या किसानयात्रेचाही राहुलच्या वर्तनाने बोजवारा उडवला. ती यात्रा अंतिम टप्प्यात आली असताना, सैनिकांच्या निवॄत्तीवेतनाचा विषय घेऊन राहुलनी किसानयात्रेतली मजा संपवून टाकली. शिवाय त्यात एका माजी सैनिकाने आत्महत्या केल्यावर त्याचे भांडवल करताना पोलिसांनी अटक होण्यापर्यंत तमाशा होऊन गेला. दोनचार दिवस सर्व वाहिन्यांवर धमाल उडाली, राहुल सदोदीत वाहिन्यांच्या कॅमेरासमोर राहिले. पण पक्षाला त्याचा कितपत लाभ होऊ शकला? याच दरम्यान उत्तरप्रदेशच्या एका मतचाचणीचा अहवाल आला आणि त्यात कॉग्रेस लोकसभेतील मतेही टिकवू शकत नसल्याचा निष्कर्ष हाती आला. एकूणच उत्तरप्रदेशात राहुल ही बुडती नाव असल्याचे नजरेस आले. त्यामुळे किसानयात्रेचा पुढला टप्पा म्हणून प्रियंकाला राज्यभर फ़िरवायचे ठरवले होते, तोही कार्यक्रम सोडून द्यावा लागला. थोडक्यात किसानयात्रा संपून आता महिन्याचा कालावधी उलटला आहे आणि किसानयात्रेने जी काही थोडी हालचाल झाली होती, तिच्यावर संपुर्ण पाणी पडले आहे. नंतरच्या राहुलच्या चाळ्यांनी पक्षाची प्रतिमा देशभर हास्यास्पद करून सोडली आहे. नोटाबंदीनंतर कुठल्याही बॅन्केच्या दारात जमलेल्या गर्दी व रांगेमध्ये उभे राहून लोकांशी केलेला संवाद, कॉग्रेसला मते देण्यापेक्षा हानीकारक ठरणार आहे. त्यामुळेच उत्तरप्रदेशात निदान सत्ता नाही, तर मुठभर आमदार तरी निवडून यावेत, अशी कसरत करावी लागणार आहे. ते बुडते तारू वाचवण्यासाठी़च मग प्रियंकाला तातडीने प्रचारात आणण्याला प्राधान्य मिळालेले असावे.
यापुर्वी प्रियंकाने उत्तरप्रदेशात प्रचार केलेला असला, तरी कौटुंबिक प्रभावक्षेत्राच्या बाहेर प्रचार केलेला नाही. अमेठी व रायबरेली या आई व भावाच्या मतदारसंघातच तिने आपले काम मर्यादित राखलेले होते. लोकसभेत त्याचा परिणाम दिसला तरी गेल्या विधानसभेत प्रियंकाचा आपल्या ‘गल्लीत’ प्रभाव दिसू शकलेला नाही. या दोन लोकसभा जागी मिळून दहा आमदार निवडून येतात. त्यापैकी तीन जागीच कॉग्रेस आमदार निवडून आलेले होते. उरलेल्या राज्यभर तेव्हा राहुलचा प्रभाव पडून कॉग्रेस बहूमत मिळवील अशी कॉग्रेसची अपेक्षा धुळीला मिळालेली होती. बहूमत सोडा, कॉग्रेस अवघ्या २४ जागा जिंकू शकली व चौथ्या नंबरवर फ़ेकली गेली होती. त्यानंतर राहुल कुठल्याही विधानसभा निवडणूकीत यशस्वी झालेले नाहीत. पण तेव्हाच्या विधानसभेत प्रियंकाही रायबरेली अमेठीत प्रभाव पाडण्याची किमया दाखवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच ‘प्रियंका लावो, कॉग्रेस बचावो’, ही झाकली मूठ आहे. ही मूठ आताच उघडली आणि निकामी ठरली; तर शेवटचा हुकमी पत्ता म्हणूनही त्याचे मोल राजकारणात शिल्लक उरणार नाही. यावेळीच लोकसभेला कॉग्रेसचा धुव्वा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली उडालेला होता. त्यानंतर प्रियंकाला आणण्याची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून ती झाकलेली मूठ आहे आणि पुढल्या लोकसभेपर्यंत झाकलेली राहिली, तरच तिचा हुलकावणी देण्यासाठी तरी उपयोग होऊ शकतो. असा हुकमाचा पत्ता उत्तरप्रदेशात वापरला आणि निरूपयोगी ठरला; तर पुढल्या लोकसभा निवडणूकीत हाती कसलाही पत्ता नाही, अशी कॉग्रेसची दयनीय स्थिती होऊन जाईल. म्हणूनच अनेक कॉग्रेस नेत्यांचाच प्रियंकाला उत्तरप्रदेशच्या रणभूमीत आताच उतरवण्याला विरोध आहे. त्यामुळेच कितीही गदारोळ झाला, तरी राज्यभर प्रियंका गांधी प्रचाराला फ़िरण्याची अजिबात शक्यता नाही. फ़क्त तशा बातम्याच रंगवल्या जाऊ शकतील.
छानच भाऊ
ReplyDelete