पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास मित्रांना वा सहकार्यांना नोटाबंदीची माहिती आधीच दिली होती, असा एक आरोप आहे. तसे असेल तर अशा लोकांनी त्या नोटा कुठे लपवल्या आहेत, त्याचाही खुलासा करावा लागेल. कारण नुसती आधी माहिती दिली वा मिळाली, हा गुन्हा होऊ शकत नाही. त्या माहितीचा उपयोग कोणी केला असेल, तर त्याचा तपशील पुढे आणला गेला पाहिजे. मग त्यालाही शिक्षेला पात्र ठरवले जाऊ शकते आणि मोदींनाही त्याचे उत्तर द्यावे लागेल. केजरीवाल किंवा ममता बानर्जी यांच्या पक्षाने तसा आरोप करताना, एक दिशाभूल करणारी माहिती समोर आणलेली आहे. ती माहिती म्हणजे बंगालच्या भाजपाने आपल्या खात्यामध्ये आधी एकदोन दिवस एक कोटी रुपयांची रोकड जमा केलेली होती. त्यांनी इतकी मोठी रोकड बॅन्केत जमा केली, म्हणजेच त्यांना सरकारकडून नोटाबंदीची माहिती आधी मिळालेली असणार असा दावा आहे. तो दावा कितपत खरा असू शकतो? जे भाजपाने केले, तेच आजही केजरीवाल किंवा ममतांचा पक्ष करू शकतो. ८ नोव्हेंबरनंतर दोन दिवसात त्यांनी तशी दोनचार कोटींची रक्कम आपापल्या पक्षाच्या खात्यामध्ये भरली असती, तरी त्यांच्यावर कोणी काळापैसा असा शिक्का मारू शकला नसता. आजही कोणत्याही पक्षाला वा व्यक्तीला बॅन्केत जुन्या नोटा भरण्यावर बंदी घातलेली नाही. उलट तसेच करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलेले आहे. त्यामुळे ममता वा केजरीवाल यांच्याकडे जुन्या नोटा असतील, तर त्यांनीही बॅन्केत जाऊन भरायला कुठलीही अडचण नाही. पण ती रक्कम पन्नास शंभर कोटींची असता कामा नये. भाजपाच्या बंगाल शाखेने जमा केलेली रक्क्म एक कोटीची आहे आणि त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यातून त्यांना कुठलीही सवलत मिळू शकणार नाही. तेव्हा त्यात मोठी गफ़लत अजिबात नाही. कारण तीच सवलत अन्य पक्षांनाही लागू आहे.
ज्या पक्षाची वार्षिक उलाढाल दोनतीनशे वा हजार पंधराशे कोटींची आहे, त्याच्या कुठल्या शाखेने एक कोटी दोन दिवस आधी भरले असतील, तर त्याला काळापैसा लपवणे म्हणता येत नाही. कारण ती रक्कम लपवलेली नाही. तर आधी वा नंतर बॅन्केतच जमा केलेली आहे. इतरांनीही त्यांचेच अनुकरण करायला काही अडचण नाही. मग केजरीवाल ममता कशासाठी आक्रोश करीत आहेत? त्यांना लोकांची दिशाभूल करायची आहे. सवाल जुन्या नोटा बॅन्क खात्यात भरण्याचा नसून, त्याच्या बदल्यात नव्या चलनी नोटा मिळवण्याचा आहे. भाजपाच्या त्या शाखेला अशा एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्या आहेत काय? नसतील तर गफ़लत कुठे आहे? नुसता भरणा आजही कुणी व्यक्ती, संघटना वा पक्षही करू शकतो. मग त्या नगण्य घटनेचे केजरीवाल यांच्यासारखे लोक कशाला भांडवाल करत आहेत? तर त्यांच्यापाशी उजळमाथ्याने भरण्यापेक्षाही मोठ्या रकमेच्या बाद नोटांच्या थप्प्या लागलेल्या आहेत. तितक्या नोटा आज बॅन्केत भरण्यासाठी गेल्यास, अनेक भुवया उंचावल्या जाणार आहेत. केजरीवाल वा ममता यांच्यासारख्या स्वच्छ लोकांपाशी इतक्या नोटा वा पैसे आले कुठून? त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. म्हणुन हे लोक असे रडकुंडीला आलेले आहेत. बेताल दिशाभूल करणारे आरोप करत सुटलेले आहेत. अजून तरी कुठल्या बॅन्केने कुणाच्या बाद नोटा भरून घेण्याचे नाकारले अशी बातमी आलेली नाही. मग त्या नोटा ८ नोव्हेंबर पुर्वी भरलेल्या असोत, किंवा नंतर भरलेल्या असोत. मात्र कुणालाही त्या तारखेनंतर मोठ्या संख्येने नव्या नोटा मिळू शकलेल्या नाहीत. त्या भाजपा वा मोदींच्या कुणा मित्रांना मिळालेल्या असतील, तर जरूर गुन्हा असू शकतो. कारण हा निर्णय बॅन्केत जुन्या नोटा भरण्याच्या विरुद्ध नसून, त्याच नोटा हिशोबात आणण्यासाठी केलेली धावपळ आहे.
पण एक नगण्य गोष्टीचे काहुर माजवून सवाल विचारला गेला आणि त्यालाच मोदींचा मोठा घोटाळा ठरवण्याचे नाटक रंगवले गेलेले आहे. सर्वकाही पारदर्शक असायला ह्वे; असा आक्रोश लोकपाल आंदोलनापासून केजरीवाल सातत्याने करीत आले. मग ताजा नोटाबंदीचा निर्णय काय आहे? प्रत्येकाला बॅन्केच्या वा हिशोबाच्या वर्तुळात आणायचा धाडसी प्रयत्न, म्हणजे सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणणेच नाही काय? पण त्याचे उत्तर केजरीवाल किंवा तत्सम लोक देणार नाहीत. ते म्हणणार परदेशी बॅन्केत काळा पैसा आहे, तो घेऊन या! म्हणजे इथे जो काही पैसा काळा म्हणून दडवला आहे, तो तसाच राहू द्यायचा काय? परदेशी बॅन्केत पडलेला पैसा मोदी सत्तेत येण्यापुर्वीच तिकडे गेलेला आहे. किंवा मोदींच्या कारकिर्दीत गेला असा कोणी दावा करू शकत नाही. ज्यांच्या कारकिर्दीत असा पैसा परदेशी गेला, त्यांनी तो रोखण्यासाठी काही केलेले नाही. युपीएच्या व कॉग्रेसच्याच कारकिर्दीत हा पैसा परदेशी गेलेला आहे. तो रोखण्यात अपेशी ठरलेल्या कॉग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणणार, आधी परदेशी पैसा घेऊन या. इथे ज्यांचा काळापैसा आहे, त्यासाठी सामान्य लोकांना त्रास होता कामा नये. यांच्याच जमान्यात ललित मोदी फ़रारी झाला, त्यालाही मोदींनी आणले पाहिजे. विजय मल्ल्याला मोठमोठी बिनतारणाची कर्जे युपीएच्या सरकारने दिली. मात्र त्याची वसुली मोदी सरकारने केली पाहिजे. मग कॉग्रेसला सत्ता कशाला हवी आहे? मल्ल्या वा ललित मोदींसह अनेकांना परदेशी काळापैसा घेऊन जाण्याच्या सवलती देण्यासाठी राहुलना सत्ता आपल्या पक्षाकडे हवी आहे काय? त्यांनी यासाठी आजवर काय केले, त्याचे उत्तर नाही आणि नुसती दिशाभूल करणारे आरोप व वक्तव्ये करण्याचा सपाटा लावलेला आहे. यातली केजरीवाल यांचॊ कांगावखोरी नजरेत भरणारी आहे. कारण ते काळापैसा खणायला वा पारदर्शक कारभारासाठी राजकारणात आलेले आहेत.
चिकनगुण्या वा न्युमोनियाने त्यांच्याच दिल्ली राज्यात लोक तडफ़डत असताना, त्यांना क्षणभर दया आली नाही. पण बॅन्केच्या दारात लागलेल्या रांगा बघून त्यांचेच हृदय कळवळलेले आहे. निर्भयासाठी न्याय मागायला हजारो लोक दारात आले आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला; तेव्हा बाहेर येऊन कोणाला जखमा झाल्या, ते विचारायला राहुलना सवड झालेली नव्हती. आता बॅन्केच्या दारात पैसे काढायला लोकांच्या रांगा लागल्या, तर त्यांना प्यायला पाणी मिळते किंवा नाही, यासाठी राहुल गहिवरून आलेले आहेत. त्यांनीच आपल्या मातेसह पक्षाच्या देणगी रकमेतून कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या खात्यात कर्जरूपाने देऊन हेराफ़ेरी केली. त्यावर कोर्टाने विचारणा केली, तेव्हा मल्ल्यासारखेच राहुल व सोनिया कायद्याच्या पदरामागे लपून बसलेले होते. भाजपाच्या बंगाल शाख्नेने निदान देणगी म्हणून आलेली रक्कम पक्षाच्याच खात्यात भरलेली आहे. राहुल सोनियांनी पक्षाचे पैसे त्या खात्यातून व्यक्तीगत मालकीच्या कंपनीला कर्जावू देऊन गफ़लती केलेल्या आहेत. त्याचा खटला वेगाने निकालात काढायला राहुल कोर्टात कशाला धावत नाहीत? बॅन्केच्या रांगेत गर्दी करणार्या लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा, राहुल सोनियांनी आपल्याच हेराफ़ेरी व अफ़रातफ़रीच्या खटल्यात सहकार्य केले, तरी देशातील मोठा भ्रष्टाचार निपटून काढायला मोठाच हातभार लागेल. त्यातही केजरीवाल इतके आवेशात पुढे आले नाहीत. दिल्लीचे लोक प्रदुषणाने हैराण झाले. तुंबलेले पाणी वा साठलेले कचर्याचे ढिग, यांनी दिल्लीकरांना नाक मूठीत धरून जगण्याची नामूष्की आली. तेव्हा केजरीवाल कुंभकर्णाची झोप काढत होते. माणसे किती बेशरम होतात, त्याचे हे नमूने आहेत. म्हणूनच आपली सफ़ाई देण्यापेक्षा त्यांना मोदींवर खोटेनाटे आरोप करण्यातून जगावे लागते आहे. अर्थात मोदी अशाच घणाचे घाव सोसून देवपण येण्याची खात्री बाळगून असल्याने, त्यांना यापैकी कोणाचीच पर्वा राहिलेली नाही.
एकदम बरोबर भाऊ
ReplyDelete