एकामागून एक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना कोणी विधानसभा भरवून मतदान यंत्राच्या भानगडीवर अभ्यासवर्ग घेऊ लागला, तर त्याच्या मनात खोट आहे, असे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. गेल्या रविवारी आम आदमी पक्षाचा एक मंत्री कपील मिश्रा याला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारमधून बडतर्फ़ केले. कारण त्याच्याविषयी नाकर्तेपणाच्या तक्रारी आमदारांनी केल्याचा त्यांचा दावा होता. पण त्यामुळे खवळलेल्या कपील मिश्राने मुख्यमंत्र्यांचीच पोलखोल करण्याचा निर्धार केला. त्याने सोमवारी अनेक गंभीर आरोप केजरीवाल व अन्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर केले. त्याखेरीज आपल्याच खात्यात आपल्याला केजरीवाल कसे स्वच्छ काम करू देत नव्हते, त्याचा बोभाटा करून टाकला. अशा पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी समोर येऊन कपील मिश्राचे आरोप खोडून काढायला हवे होते. पण तसे काहीही झाले नाही. उलट त्यांच्या वतीने माजी मंत्री सौरभ भारद्वाज विधानसभेत उत्तर देतील, अशी हवा पसरवली होती. प्रत्यक्षात विधानसभा भरवली आणि त्यामध्ये आम आदमी पक्षाने मतदान यंत्रात कशी गफ़लत होऊ शकते, त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. अर्थात सभागृहामध्ये त्या़च पक्षाचे बहुतांश सगळे आमदार असल्यामुळे विरोधी सुर निघण्याची अजिबात शक्यता नव्हती. भाजपाचे एक आमदार विजयेंद्र गुप्ता यांनी कपील मिश्रांनी केलेल्या आरोपांचा विषय काढण्याचा प्रयत्न जरूर केला. पण सभापतींनी तो फ़ेटाळून लावत सौरभ भारद्वाज यांचे नाटक करण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांनीही सराईत कलाकार जादुगाराप्रमाणे मतदान यंत्रात गफ़लत करून कसा निकाल फ़िरवता येतो वा मते कशी पळवता येतात, त्याचे बेमालूम नाट्य सादर केले. त्यात ज्यांना मतांची चोरी बघायची होती, त्यांना तथ्य भासले तर नवल नाही. पण ज्यांची सारासार बुद्धी शाबुत आहे, त्यांना त्या कुतर्कबुद्धीचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे.
आम आदमी पक्षाने जसे प्रात्यक्षिक दाखवले त्यात कोणत्या त्रुटी आहेत, त्याची फ़ारशी तपासणी कोणी केली नाही. उदाहरणार्थ यातला पहिला दावा आहे तो यंत्राचा मदरबोर्ड बदलण्याचा! याचा अर्थ असा, की कुठल्याही बॅन्केतील तिजोरीचे कुलूप बदलण्याची मोकळीक! मतदान यंत्राचा ताबा केंद्राच्या प्रमुखाकडे असतो आणि जिथे मतदान चालू असते, तिथे अनेकजण एकाचवेळी हजर असतात. त्या यंत्राचा मदरबोर्ड बदलणे म्हणजे काय? तर यंत्र उघडून आतला एक सुटा महत्वाचा भागच बदलून टाकणे. असे काही प्रत्यक्ष मतदान चालू असताना कोणी कुठल्याही केंद्रात करू शकतो काय? मदरबोर्ड बदलण्यासाठी ९० सेकंद पुरेसे आहेत, हे सत्य आहे. पण तशी संधी कुठल्या मतदानकेंद्रात डझनभर साक्षीदारांच्या साक्षीने दिली जात असते काय? कोणी यापुर्वी अशी संधी कुठल्याही मतदान केंद्रात वा कुठल्याही निवडणूकीत कोणाला मिळाल्याचे ऐकले आहे काय? आताही उत्तरप्रदेश असो किंवा दिल्ली महापालिका असो, तिथल्या मतदानाच्या वेळी मदरबोर्ड बदलण्याची मोकळीक कोणाला तरी देण्यात आली होती काय? नसेल तर मदरबोर्ड बदलण्याचा विषय कुठे येतो? मतदान सुरू होण्यापुर्वी त्याची तपासणी करून त्याच्यावर सील ठोकले जाते. त्यानंतर त्यात कुठलीही हेराफ़ेरी करायची तर सील तोडावे लागणार ना? इतकेही इंजिनीयर म्हणून मिरवणार्यांना उमजत नसेल, तर त्यांच्या अकलेविषयी काय बोलावे? पण ज्यांच्या डोक्यावर यंत्रातील गडबडीचे भूत बसलेले आहे, त्यांना आम आदमी पक्षाचा कुतर्क आवडणे व मान्य होण्याला पर्याय नसतो. तुम्हाला जे बघायचे असेल तर तसेच दिसण्यालाही पर्याय नसतो. सत्य बघण्यासाठी वा शोधण्यासाठी चौकस बुद्धी आवश्यक असते. अर्थात तिथेच विषय संपत नाही. आपच्या या महान इंजिनीयरने आणखी एक जादू करून दाखवली. तीही तपासून बघायला हरकत नसावी.
सकाळी मतदान आठ वाजता सुरू झाले आणि दहा वाजेपर्यंत अमूक इतके मतदान झाले. त्यानंतर तिथे आलेल्या भाजपाच्या हस्तकाने आपला कोडवर्ड यंत्रामध्ये टाकला. त्यामुळे पुढल्या काळात जे काही मतदान झाले ते सर्वच्या सर्व भाजपाला मिळत गेले. असाही एक खेळ सौरभ भारद्वाज यांनी गणिती पद्धतीने सादर केला. त्यांच्या तर्कानुसार दहा वाजेपर्यंत या यंत्रामध्ये ज्यांनी मतदान केले ते खरे मतदान होते. कारण तोपर्यंत यंत्र नेमक्या पद्धतीने काम करीत होते. पण कोडवर्ड घातला आणि पुढली सर्वच मते भाजपाच्या खात्यात जमा होत गेली. हा त्यांच्या दावा मान्य करून आपण सत्याचा शोध घेऊ शकतो. समजा दहा वाजेपर्यंत झालेले मतदान कुठल्याही गफ़लतीशिवाय होऊ शकले आहे. मात्र त्यानंतर जितके मतदान झाले ते सर्वच्या सर्व भाजपाच्याच पारड्यात गेले आहे. त्यामुळेच भाजपाला इतक्या जागा मिळाल्या आणि बाकीच्या तमाम पक्षांना मते मिळूनही ती चोरली गेली आहेत. काही गोष्टींची आजही नोंद आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत किती मतदान झाले, त्याचीही नोंद प्रत्येक केंद्रात उपलब्ध आहे. मी त्या दिवशी वाहिन्यांच्या बातम्या बघत होतो आणि दिल्लीच्या महापालिकेत दहा वाजेपर्यंत कसेबसे दहा टक्के मतदान झाल्याचे बघितलेले आठवते. कारण मतदारात उत्साह नाही व मतदानाचे प्रमाण भलतेच कमी असल्याचा गदारोळ वाहिन्यांवर चालू होता. सहाजिकच दिल्लीत सर्वत्र दहा वाजेपर्यंत केवळ दहा टक्केच मतदान झाल्याची नोंद आजही सापडू शकते. आता भादद्वाज वा आम आदमी पक्षाचा कुतर्क मान्य करायचा, तर तोपर्यंतचे मतदान खरे होते. त्यानंतरचे मतदान मात्र गफ़लतीचे असते. दिल्ली महापालिका निवडणुकीत एकूण किती मतदान झाले? ६२ टक्के मतदान झालेले होते. म्हणजेच जितके मतदान झाले त्यातले ५२ टक्के मतदान भाजपाच्या खात्यात जमा व्हायला हवे ना?
सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत दहा टक्के मतदान झाले असेल, तर दहा नंतरच्या मतदानाचा सर्व कोटा भाजपाला जातो, म्हणजे किती होतो? ६२ मध्ये ५२ म्हणजे भाजपाला दिल्लीत मिळालेल्या मतांची टक्केवारी ७५ टक्केहून अधिक व्हायला हवी. पण मतमोजणीत तर भाजपाला अवघी ३९ टक्केच मते मिळालेली आहेत. म्हणजे आम आदमी पक्षाच्या महान इंजिनीयरच्या हिशोबाच्याही निम्मे मतेच भाजपाला मिळालेली आहेत. मग उरलेली भाजपाची पळवलेली मते कुठे गेली? किमान ३५-३८ टक्के मते भाजपाच्या पारड्यात आलेली कुठे दिसत नाहीत की हिशोबात सापडत नाहीत. तोच कुतर्क मान्य करायचा तर कॉग्रेस वा आम आदमी पक्षाला दहाबारा टक्केही मते मिळालेली दिसता कामा नयेत. पण त्या दोघांना मिळून भाजपाच्या दीडपट टक्केवारी मिळालेली दिसते. मग ही मते त्यांनी कुठून आणली? की मतदान केंद्रातले कर्मचारी व भाजपाचे तिथले हस्तक सातत्याने कोड बदलत होते आणि कधी भाजपाला मते मिळावीत तर कधी वास्तविक असतील त्यालाच मते मिळावीत असा खेळ करीत बसलेले होते? याचेही उतर भारद्वाज यांच्यापाशी आहे. सर्वच केंद्रात अशा गडबडी करण्याचे कारण नाही. अवघ्या २५-३० टक्के मतदान केंद्रात अशी गफ़लत केली तरी निकालावर मोठा परिणाम घडू शकतो. चला तोही आरोप वा कुतर्क मान्य करू. ठराविक केंद्रातच गफ़लती करायच्या, तर त्याचे जसेच्या तसे प्रतिबिंब अन्य केंद्रात पडता कामा नये. गफ़लत केलेली मतदान केंद्रे आणि तसे न झालेली केंद्रे, यांच्या आकड्यात मोठा फ़रक दिसायला हवा ना? ७०-७५ टक्के मतदान केंद्रामध्ये गफ़लत झालेली नसेल तर तिथली मतांची टक्केवारी व अन्यत्रची मतविभागणी यात जमिन अस्मानाचा फ़रक जाणवायला हवा. तशीही कुठली तक्रार ऐकायला मिळाली नाही. सर्वच मतदान केंद्रातला विभागणीचा प्रकार सारखाच आहे.
अशी गफ़लत कुठल्याही यंत्रात झालेली वा केलेली असेल, तर त्या ठराविक मतदान केंद्रात ७०-८० टक्के मते भाजपाला पडलेली दिसायला हवीत. पण दिल्लीतल्या कुठल्याही मतदान केंद्रात भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात मते मिळाल्याचे उदाहरण कोणी पुढे आणू शकलेला नाही. उलट मागल्या २०१३ च्या विधानसभा मतदानात जशी मतविभागणी झालेली होती, त्याचेच प्रतिबिंब यावेळच्या महापालिका मतदानात पडलेले आहे. यापेक्षा अधिक मतांची टक्केवारी भाजपाला लोकसभेच्या मतदानात मिळालेली होती. त्य तुलनेत बघितले तर भाजपाला आपल्या लोकसभेतील यशाची पुनरावृत्तीही करता आलेली नाही. तेव्हा भाजपा ४३ टक्के मते मिळाली होती तर मध्यावधी विधानसभेत भाजपा ३३ टक्के मते मिळाली होती. म्हणजेच दोन वर्षात भाजपाची मते अवघी ६ टक्के वाढलेली दिसतात, तर कॉग्रेसची गमावलेली १५ टक्के मते माघारी आलेली दिसतात. २०१३ सालात या तीन पक्षांना जशी मते होती, तशीच महापालिका मतदानात विभागणी झाली आहे. याचा अर्थच गेल्या दोन वर्षात इतके मोठे समर्थन देऊनही केजरीवाल यांनी जे दिवे लावले, त्याच्या विरोधात दिल्लीकराने आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. सौरभ भारद्वाज यांचा कुतर्क मान्य करायचा, तर अशी गफ़लत एकदाच झालेली असू शकते. ती मध्यावधी विधानसभा निवडणूकीत! कारण तेव्हा २०१५ सालात, केजरीवाल यांच्या पक्षाला त्यांनाही अपेक्षित नव्हती इतकी अफ़ाट मते मिळाली होती आणि ५४ टक्के मतांपर्यंत त्यांची मजल गेली होती. कुठलेही कर्तृत्व गाजवले नसताना दिल्लीकराने आम आदमी पक्षा ५४ टक्के मते देण्याचे काहीही कारण नव्हते. तरीही तितकी मते व जवळपास सर्वच जागा त्यांना मिळाल्या होत्या. पण ती गफ़लत केजरीवाल टोळीच्या इतकी मस्तकात गेली, की त्यांना विजय पचवता आला नाही आणि आता पराभवही पचवणे अशक्य होऊन गेले आहे.
दिल्लीत तेरा हजार मतदान केंद्रे होती. त्यातल्या तीन हजार जागी जरी गफ़लत करायची तरी त्या कारस्थानामध्ये किती हजार माणसे सजभागी करून घ्यावी लागतील? याचा अंदाज भारद्वाज केजरीवाल यांनी केला आहे काय? मतदान केंद्रात किमान तीनचार तरी आयोगाचे कर्मचारी असतात. त्याखेरीज उमेदवाराचे प्रतिनिधी असतात. अशा लोकांची संख्या किमान दहा इतकी होते. त्यातले निम्मे तरी विश्वासात घेतले पाहिजेत. म्हणजेच तीन हजार केंद्रात पंधरा हजार लोक अशा कारस्थानाचे साथीदार करावे लागतील. इतक्या संख्येतील एकही गद्दार होऊन भाजपा वा निवडणूक आयोगाचे पितळ उघडे पाडायला पुढे येत नाही? आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोजके प्रमुख नेते आहेत आणि काही डझन प्रवक्ते आहेत. त्यातले कपील मिश्रा वा शाझिया इल्मी यासारखे लोक बाहेर पडतात आणि केजरीवाल यांच्यावर एकाहून एक आरोप करतात. आतल्या गोष्टी चव्हाट्यावर आणतात. हजारभर लोकांच्या या पक्षातले दहाबारा लोक भानगडी चव्हाट्यावर आणायला मिळू शकतात. पण निवडणूक आयोग वा भाजपाच्या अशा कारस्थानातील पंधरावीस हजार कारस्थानी मात्र कुठल्याही बाबतीत गवगवा करण्याची हिंमत दाखवत नाहीत? त्यांच्यातला एकही गद्दार निघत नाही? इतके कारस्थान सोपे असते काय? चाणक्य म्हणतो, ‘षटकर्णो भिद्यते मंत्र:!’ म्हणजे कुठलेही गुपित दोन पलिकडे तिसर्या व्यक्तीच्या कानी पडले, तरी त्याचा भेद होऊ शकतो. पण इथे पंधरा हजाराहून अधिक लोक मतदान यंत्रातली गफ़लत करून चिडीचूप गप्प बसतात. त्यातले गुपीत जगासमोर येऊ शकत नाही? याचा अर्थ मोदी नावात काही जादू असली पाहिजे. किंवा भाजपामध्ये कमालीची दहशत असली पाहिजे. कुतर्काच्या जगात रमणार्यांना तर्कसंगत जगता येत नाही, किंवा बोलताही येत नाही. भ्रमात ते खुश असतात आणि त्यांना तिथेच सुखाने जगू देणे योग्य असते.
एका बाजूला पाणीपुरवठ्याचे अपुर्व काम केले असे केजरीवाल म्हणतात आणि आपल्याच मंत्र्याला पाण्याच्या कामात कसूर झाली म्हणून हाकलून लावतात. यातूनच मानसिक संतुलन किती बिघडले आहे, त्याची साक्ष मिळत असते. असले कुतर्क करीत बसण्यापेक्षा केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने मतदाराने आपल्याला मते कशाला नाकारली, त्याचा सुसंगत अभ्यास करावा. त्या निकालाशी आपली आजवरची मुक्ताफ़ळेही संदर्भाला घेऊन चिंतन करावे. मुख्यमंत्री केजरीवाल असो वा शिसोदिया आदी त्यांचे नेते प्रवक्ते असोत, ते एक गोष्ट सातत्याने व ठामपणे दोन वर्षे सांगत आहेत. मागल्या सत्तर वर्षात अन्य कुठल्याही पक्षाने वा सरकारने जितके काम केले नाही, त्यापेक्षा अधिक काम आम आदमी पक्षाने केलेले आहे. त्याचा लोकांनी काय अर्थ घेतला असावा? सत्तर वर्षात काहीही काम झाले नाही, तरी रस्ते, मेट्रो वा हायवे, कारखाने उभे राहिले. त्याच्या कित्येक पटीने केजरीवालांनी काम केलेले असेल, तर आता २०४० सालपर्यंत काही करण्यासारखे उरलेले नसणार. मग उगाच आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कशाला राबवायचे? त्यांना पुढली दोन दशके करण्यासारखे काही नसल्याने विश्रांती देण्याचा विचार करूनच दिल्लीकरांनी मते देण्याचे टाळले असावे. अन्यथा अतिशय संथगतीने व आळशीपणाने काम उरकणार्या भाजपाला इतके यश मिळाले नसते, की कॉग्रेसला लोकांनी पुन्हा मते दिलीच नसती. कुतर्काच्या पर्वतावर बसलेल्यांना कोणी वास्तव सांगावे आणि दाखवावे? भ्रमिष्टाला भिंतीवरची पाल हत्तीसारखी दिसत असेल, तर त्याच्याशी वाद घालू नये. कारण त्या पालीला असलेली सोंड वा लांबलचक सुळेही असा भ्रमिष्ट आपल्याला दाखवण्याचा धोका असतो. त्याला भ्रमातच रममाण होऊ देण्यात त्याचेही कल्याण असते. आम आदमी पक्षाला कुतर्कशास्त्राच्या अभ्यासिकेतून बाहेर काढणारा नेता भेटला तर गोष्ट वेगळी आहे. अन्यथा पुढल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काही शिल्लक उरेल किंवा नाही, याचीच शंका आहे.
आग रामेश्वरी, बम्ब सोमेश्वरी असा प्रकार.
ReplyDeleteतद्दन भिकार आहे केजरीवाल.
कुतरकाची चांगलीच चीरफाड़ केली .
ReplyDeleteउत्तम विवेचन. भाऊकाका
ReplyDelete