Monday, May 15, 2017

काय चाललंय काय?

kejri laloo के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेश विधानसभेची मतमोजणी चालू असताना आणि अंतिम निकाल हाती आलेले नसतानाही, भाजपाला अपुर्व बहूमत मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले होते. अशावेळी निकाल असे कशामुळे लागले किंवा मतदाराने असा एकतर्फ़ी कौल कशामुळे दिला, त्याचा माध्यमातून उहापोह आवश्यक होता. पण बहुतेक वाहिन्या आणि माध्यमातून आता मोदींना रोखण्यासाठी सर्वच पक्षांना एकत्र यावे लागणार आणि ते कसे एकत्र येणार, त्याची चर्चा सुरू झालेली होती. इतक्यात मायावतींनी विजय भाजपाचा झालेला नसून मतदान यंत्रातील गफ़लतीने मोदींनी सत्ता बळकावल्याचा आरोप तात्काळ केला होता. हळूच त्याला कॉग्रेसनेही समर्थन देण्याची भूमिका घेतली होती. मग त्याचवेळी मतमोजणी झालेल्या पंजाबात, कौतुकाच्या आम आदमी पक्षाचा बोर्‍या वाजल्याचेही स्पष्ट झाले आणि केजरीवाल यांना आपली अब्रु झाकण्यासाठी तेच कोलित हाती लागले. सहाजिकच एकूण विधानसभा निकालांवरची पहिली प्रतिक्रीया मतदान यंत्रांनी गडबड केल्याची होती. आपण पराभूत झालो, तर कशामुळे मतदाराने आपल्याला झिडकारले त्याची कोणाही मोदी विरोधकाला फ़िकीर नव्हती. त्यापेक्षा त्यांना आपल्या पराभवावर पांघरूण घालण्यात रस होता. उलट समोरचे सत्य नाकारण्याने विषय निकालात निघत नाही, हे ओळखलेल्या माध्यमातील पुरोगाम्यांना मोदी पुन्हा लोकसभा जिंकतील, अशा भयगंडाने पछाडलेले होते. सहाजिकच त्यांना सर्व पक्षांनी मोदी विरोधात एकत्र येण्याची घाई झालेली होती. पुढे त्याच निकालाची पुनरावृत्ती दिल्लीच्या तीन महापालिकात झाली आणि माध्यमातील जाणत्या पत्रकारांनी आपल्या परीने भारतातील तमाम पुरोगामी पक्षांची आघाडी करूनही टाकली होती. तसे झाले असते तर एव्हाना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोक्याला हात लावून बसायची पाळी आली असती. पण दिड महिन्यात चित्र कुठल्या कुठे भरकटले आहे.

उत्तरप्रदेशच्या निकालांना दीड महिना होत असताना आणि भाजपाने दिल्लीत निर्विवाद मते मिळवली असताना, विरोधकांची एकजुट होण्यापेक्षा एक एक पुरोगामी पक्षात रणधुमाळी माजलेली आहे. रविवारी दिल्लीत नव्या राजकारणाचा प्रयोग करणारे केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ग्रहण लागले आणि बुधवारी मायावतींनी आपल्या उत्तरप्रदेशातील प्रमुख असलेल्या बसपाला सुरूंग लावणारी कारवाई केली. आपापल्या दारूण पराभवासाठी मतदान यंत्रावर तुटून पडलेल्या या दोन्ही एकखांबी पक्षीय नेत्यांच्या निरंकुश नेतृत्वाला आव्हान देत त्यांचीच पापे बाहेर काढणारे दोन मोठे सहकारी चव्हाट्यावर आलेले आहेत. आम आदमी पक्षातले केजरीवालांचे मंत्री कपील मिश्रा यांनी मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर तोफ़ा डागत रविवारी आघाडी उघडली. त्या भडीमाराला तोंड देण्याचीही हिंमत केजरीवाल चारपाच दिवस करू धजावलेले नाहीत. दुसरीकडे मायावती यांनी बुधवारी आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यालाच पक्षातून हाकलून लावले आणि त्याच्यावर बेनामी संपत्तीचा आरोप केला होता. पण गुरूवारी या सहकार्‍याने पत्रकार परिषद घेऊन मायावतींच्या पापाची टेपच ऐकवली. थोडक्यात पुरोगामी आघाडीतले दोन मोठे महत्वाचे पक्ष आतूनच उध्वस्त होऊ लागले आहेत. त्यांच्या नेत्यांचे खरे चेहरे लोकांसमोर आणण्याचे कार्य त्यांच्याच सहकार्‍यांनी हाती घेतले आहे. पण त्यातला विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे. मायावतींनी मतदान यंत्रामुळे मते पळवली गेल्याचा आरोप केला होता. तो खरा असेल तर नसीमूद्दीन यांनी मुस्लिम मते मिळवण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत त्यांना हाकलण्याचे कारण काय? पाण्याचा उत्तम पुरवठा आप सरकारने केला म्हणून दिल्लीकरांनी त्या पक्षाला पालिकेत दिलेली मते यंत्राने पळवली असतील, तर कपील मिश्रा या पाणीमंत्र्याला नाकर्ता ठरवून हाकलण्याचे कारण काय?

विरोधक हे आपल्याच कर्माने आपला खोटेपणा जगासमोर कसा मांडत आहेत, त्याचे हे दोन प्रमुख नमूने आहेत. एका बाजूला आपल्याला मतदाराने नाकारलेले नाही तर यंत्राने गडबड केल्यासा दावा आहे. पण त्याचवेळी आपल्या कामात राहिलेल्या त्रुटीसाठी अन्य कुणा सहकार्‍याच्या डोक्यावरही पराभवाचे खापर फ़ोडले जाते आहे. सर्वच आमदारांनी पाणीपुरवठ्यात गफ़लत असल्याची तक्रार केल्यामुळे कपील मिश्राला हाकलण्याचा निर्णय झाल्याचा दावा केजरीवालचे उजवे हात शिसोदियांनी केलेला आहे. त्यात तथ्य असेल तर मग पाण्यासाठीच मतदाराने पक्षाला नाकारल्याची कबुली दिली जात नाही काय? मग मतदान यंत्राविषयीचा आरोप निव्वळ बिनबुडाचा नाही काय? दुसरीकडे मायावतींची कहाणी आहे. मतदान यंत्रात गफ़लत केल्याचा पहिला आरोप त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी कुठला पुरावा दिला होता? मुस्लिम अधिक असलेल्या मतदारसंघात भाजपाला इतकी मते मिळालीच कशी? मुस्लिम भाजपाला मते देऊच शकत नाही. मुस्लिमांची मते आपल्यालाच मिळणार, यानुसार मायावतींनी यंत्रावर आक्षेप घेतला होता ना? म्हणजेच मुस्लिमांची बहुतांश मते बसपाला मिळाल्याची खात्री असल्यानेच त्यांनी यंत्रावर आरोप केला होता ना? त्यामध्ये तथ्य असेल, तर आता नसीमूद्दीन सिद्दिकी या सहकार्‍याला हाकलण्याचे कारण काय? याच नेत्यावर मुस्लिम मते मिळवण्याची जबाबदारी होती आणि तो मुस्लिम मते मीळवू शकला नाही, हा आक्षेप घेत त्याची बसपामधून हाकालपट्टी झालेली आहे. त्याच्या हाकालपट्टीचे कारण खरे मानायचे, तर मतदान यंत्रातील गफ़लत हा निव्वळ कांगावा ठरतो ना? अशी एकूण प्रत्येक पुरोगामी पक्षाची दुर्दशा आहे. आपण मतदारापासून का दुरावलो किंवा त्याने आपल्याला का नाकारले; त्याचा विचारही कोणाला करावा असे वाटलेले नाही. मोदींच्या लोकप्रियतेची मिमांसाही करण्याची बुद्धी झालेली नाही आणि अशा दिवाळखोरांच्या एकजुटीवर माध्यमातले पुरोगामी मोदींच्या पराभवाचे इमले उभारू बघत आहेत.

एकूणच राजकीय विश्लेषक व पुरोगामी पत्रकारांची ही शोकांतिका झालेली आहे. त्यांना राजकारणात उडी घेण्याची हिंमत नाही. राजकारणातले बदलते प्रवाह जाणून घेण्याची त्यांची तयारी नाही. कालबाह्य झालेल्या समजुती व परिमाणे घेऊन त्यांचे राजकीय विश्लेषण चालते. त्याच आधारावर त्यांना मोदी पराभवाची स्वप्ने पडत असतात. मोदी-शहांनी निवडणूकीचे तंत्र बदलून टाकले आहे, त्याचा यांना सुगवाही लागलेला नाही. आघाड्य़ा करून वा कागदावर आधीच्या मत टक्केवारीची बेरीज वजाबाकी मांडून, रणनिती आखण्याचे दिवस आता संपले आहेत. अन्य पक्षातले जिंकू शकणारे उमेदवार पळवून वा नेते फ़ोडून निवडणूका जिंकण्याची रणनिती या जोडगोळीने भंगारात काढली आहे. कितीही बेरजा केल्या वा आघाड्यांनी मतविभागणी टाळली, तरी भाजपाला रोखण्याचे काम सोपे राहिलेले नाही. भाजपाची रणनिती भेदून त्याला शह देता येईल. अनेक पक्षांची मोट बांधून आघाड्या उभारून मोदी पराभवाचे गणित मांडण्यापेक्षा, विविध पक्षातले बेबनाव कमी करून, आहेत त्या पक्षांनी आपापली संघटना सुदृढ करण्याला प्राधान्य दिले तरी खुप होईल. पक्ष म्हणजे संघटना आणि संघटना म्हणजे जनतेपर्यंत जाऊन भिडणारा कार्यकर्ता, हे बलस्थान केले तरच मोदी वा भाजपाला पराभूत करता येईल. पण ती लांबची गोष्ट आहे. नुसते रोखण्यात हे पक्ष यशस्वी झाले तरी त्याला उत्तम सुरूवात म्हणता येईल. पण त्यातले काहीही होताना दिसत नाही. उलट ज्यांना एकत्र जुंपून पुरोगामी पत्रकार मोठी आघाडी बनवायला आसूसले आहेत, त्यांच्या घरात, कुटुंबात व पक्षातच एकमेकांच्या उरावर बसण्याची स्पर्धा लागलेली आहे. पुरोगामी मित्रानो, हे काय चाललंय काय? अशाने मोदी व संघ संपवण्याचे तुमचे बेत तडीस कसे जाणार? जरा पुढाकार घ्या आणि अशा केजरीवाल, मायावती व मुलायम अखिलेशना एकजुटीचे महात्म्य तरी समजावून सांगा ना?

1 comment:

  1. मीडियाची पोटदुखी.आणि विरोधकांचा बट्ट्याबोळ या गोष्टींनी कुठे मोदी हरतात होय?

    ReplyDelete