त्या घटनेला आता साडेतीन वर्षे होऊन गेली आहेत. वास्तविक तेव्हाही ती घटना खळबळजनक होती. देशात युपीए म्हणजे कॉग्रेसचे सरकार होते आणि त्यात शशी थरूर नावाचे एक ज्येष्ठ मंत्री होते. त्यांच्या पत्नीचा एका पंचतारांकित हॉटेलात मुक्काम होता. त्याचवेळी कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये बैठक चालू होती. थरूर त्या बैठकीला हजर होते आणि त्यांची पत्नी त्या हॉटेलमध्ये होती. संध्याकाळ होईपर्यंत बैठक चालली आणि थरूर माघारी हॉटेलात पोहोचले. तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा मृतदेह तिथे आढळला होता. तात्काळ सर्व वृत्तवाहिन्यांनी तिकडे धाव घेतली होती. पण आजवर त्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही. कारण ज्या खोलीचे दार आतून बंद होते, तिथेच सुनंदा पुष्कर म्हणजे थरूर यांची पत्नी, हिचा मृतदेह संशयास्पद रितीने आढळुन आला होता. त्यामुळे तिनेच आत्महत्या केली असावी, असा निष्कर्ष काढला गेला होता. तिच्या बिछान्यापाशी काही औषधेही पडलेली होती. पण अपायकारक औषधे घेऊन आत्महत्या करणार्या व्यक्तीचा मृतदेह इतका मस्त चादरीत गुंडाळलेला कसा सापडू शकतो? बिछान्यावरच्या चादरीलाही कुठे सुरकुती पडलेली नव्हती. याहीपेक्षा आणखी एक मोठी शंकास्पद गोष्ट म्हणजे ज्या केंद्रीय मंत्र्याला सरकारने प्रशस्त बंगला वास्तव्यासाठी दिलेला आहे, त्याने अकस्मात हॉटेलात सपत्नीक येऊन वास्तव्य कशाला करावे? असे अनेक प्रश्न तेव्हा विचारले गेले होते. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही वा अनेक प्रश्न दडपले गेले होते. शशी थरूर व त्यांची पत्नी सुनंदा यांच्यात त्याच दरम्यान मोठी खडाजंगी उडालेली होती. पण सरकार व पोलिसांना त्या प्रकरणाचा छडा लावायचीही गरज भासू नये, हीच बाब सर्वाधिक संशयाची होती. कारण यात एका मंत्र्याच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झालेला होता.
या घटनेच्या एकदोन दिवस आधी शशी थरूर पत्नीसह केरळहून विमानाने दिल्लीला परतले होते. तेव्हा त्याच विमानात आणखी एक केंद्रीय मंत्री व कॉग्रेसनेते मनिष तिवारीही प्रवास करीत होते. त्यांनी विमानतळावर, विमानात व दिल्लीला पोहोचल्यावरही, पतिपत्नीमध्ये वादावादी होत असल्याचे बघितले होते. आपण बघितलेले हेच दृष्य त्यांनी इतरांनाही कथन केलेले होते. त्या दोघांमध्ये असा कसला वाद चालला होता आणि जाहिरपणे भांडणाचे कारण काय होते? हा वाद तेवढ्यापुरता होता की त्यामागे आणखी काही रहस्ये दडलेली होती? मृत्यूच्या काही दिवस आधी सुनंदाने आपल्या अनेक जीवलग परिचितांना अनेक सुचक कहाण्या सांगितल्या होत्या. शिवाय काही गोष्टी सोशल माध्यमातूनही सांगितल्या होत्या. मेहर तर्रार नावाची एक पाकिस्तानी महिला पत्रकार आपल्या पतीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब सुनंदाने ट्वीटरच्या माध्यमातून कथन केलेली होती. ही तर्रार नावाची पाकिस्तानी महिला पत्रकार शशी थरूर यांना दुबईत भेटली होती आणि त्यानंतर हे वादळ उठलेले होते. नंतर या दोघांमध्ये काही सूचक देवाणघेवाण ट्वीटरच्या माध्यमातून झाली होती आणि त्यातूनच सुनंदाला आपल्या पत्नीचा ‘बेवफ़ाईची’ चाहूल लागलेली होती. त्यानंतर सुनंदाने अनेक वादग्रस्त विधाने ट्वीटरवर केलेली होती. त्यापैकी एक अतिशय गंभीर होते. ते पतिपत्नीपुरते मर्यादित नव्हते, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित होते. मेहर तर्रार ही पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची हस्तक असून, तीच आपल्या नवर्याला म्हणजे शशी थरूर याला जाळ्यात ओढू बघत आहे, असा सुनंदाचा आरोप अतिशय गंभीर होता. त्याची पोलिस व तात्कालीन सरकारने जराही दखल कशाला घेऊ नये? थरूर हे भारत सरकारचे मंत्री होते आणि त्यांची पत्नीचाच त्यांना पाक हेरसंस्था जाळ्यात ओढत असल्याचा आरोप होता.
मेहर तर्रार हिने थरूर यांच्याविषयी व्यक्तीगत काही मतप्रदर्शन केले होते आणि हळव्या प्रेमळ भाषेत काही लिहीलेले होते. तिला तशाच आपुलकीच्या प्रणयी भाषेत थरूर यांनी प्रतिसाद दिलेला होता. पण त्याचा सुनंदाकडून गवगवा केला गेल्यानंतर थरूर यांनी कांगावा केला होता. आपण असे काही ट्वीटरवर लिहीलेले नसून, आपला अकाऊंट हॅक झाल्याचे त्यांनी म्हटले होते. नंतर तशा सर्व गोष्टी ट्वीटरवरून त्यांनी हटवल्या होत्या. केंद्रीय मंत्री असलेल्या थरूर यांचा सोशल मीडियातला अकाऊंट हॅक होणे व त्यावर पाक महिलेसंबंधी काही लिहिले बोलले जाणे; भारत सरकारच्या दृष्टीने गंभीर बाब नव्हती काय? यानंतर सुनंदाने आपल्याला कसे व्यावहारीक भानगडीत वापरले गेले व बळीचा बकरा बनवण्यात आले, त्याचा पर्दाफ़ाश करणार असल्याचेही तेव्हा जाहिर करून टाकले होते. आयपीएल या क्रिकेट स्पर्धेत केरळच्या संघाची मालकी हा वादाचा विषय होता आणि त्यात पत्नीला पुढे करून थरूर यांनी काही गैरव्यवहार केलेले होते. त्याचाच गौप्यस्फ़ोट सुनंदा करणार होती. पण तोपर्यंत तिला जगूच देण्यात आले नाही. अशा अनेक रहस्यांचा भेद सुनंदा करणार होती. तसे तिने ट्वीटरच्या माध्यमातून घोषित केले होते आणि आपल्या काही विश्वासातील मित्र परिचीतांनाही सांगितले होते. थोडक्यात सुनंदा ही अनेक शंकास्पद व्यवहार व भानगडी चव्हाट्यावर आणायला सिद्ध झालेली होती. त्या गोष्टी फ़क्त पती थरूरपुरत्या मर्यदित नव्हत्या. तर अनेकांचे मुखवटे त्यातून फ़ाटले जाण्याचा धोका निर्माण झालेला होता. त्यासाठीच तिचा काटा घाईगर्दीने काढण्यात आला असावा, अशीच शंका तेव्हाही घेतली गेली होती. नलिनी सिंग नावाच्या पत्रकार मैत्रीणीला तिने त्याची पुसट कल्पना दिली होती आणि प्रेमा नावाच्या टेलिव्हीजन महिला पत्रकारालाही भेटायला बोलावले होते. आता तोच धागा बोलू लागला आहे.
प्रेमा ही टाईम्स नाऊ वाहिनीची तेव्हा शोधपत्रकार होती आणि तिला सुनंदाने भेटायला येण्याचा संदेश दिलेला होता. पण हॉटेलच्या त्या रुममध्ये प्रेमाला प्रवेश मिळूच शकला नाही. तिथे हजर असलेला थरूर यांचा निष्ठावान नोकर प्रेमाला आतमध्ये येऊ देत नव्हता आणि प्रेमा सातत्याने त्याच्याशी फ़ोनवर बोलून प्रत्येक संवाद रेकॉर्ड करून घेत होती. सुनंदाने प्रेमाला आमंत्रित केल्यानंतर तिचा अल्पावधीत मृत्यू झालेला आहे आणि त्याविषयी कमालीची गोपनीयता राखली गेलेली आहे. आता तीच प्रेमा रिपब्लिक नावाच्या नव्या वृत्तवाहिनीवर दाखल झाली असून, तिने हे सुनंदाचे भूत उकरून काढले आहे. आपण थरूर यांच्या नोकराशी त्या दिवशी केलेला फ़ोनवरील संवाद प्रेमाने आता वाहिनीवरून जगजाहिर केला आहे. त्या मुद्रणाच्या टेप्स पोलिसांना दिल्या असूनही अजून चौकशी कशाला झालेली नाही, त्याची विचारणा केली आहे. यातली गोम अशी आहे, की सुनंदा सकाळीच मरण पावली होती आणि संध्याकाळी तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे छानपैकी नाटक रंगवण्यात आले. दिवसभर थरूर तालकटोरा स्टेडीयममध्ये हजर असल्याचे सांगितले व नोंदले गेले असले, तरी मध्यंतरी एकदा थरूर हॉटेलमध्ये येऊन गेल्याचा उल्लेख प्रेमाने रेकॉर्ड केल्याचा संवादामध्ये आढळतो. एकूणच प्रकरण सुनंदाने आत्महत्या केल्याचे ठरवून दाबले गेलेले आहे. पण ती आत्महत्या असण्य़ापेक्षाही तो खुन असू शकतो आणि त्यामागे एकटा पतीच नव्हेतर आणखी काही बडे लोक गुंतलेले असू शकतात. ह्या हत्याकांडामागे मोठे राजकारण असू शकते. त्याची सुरूवात थरूर यांच्या तर्रार प्रकरणाशी व त्यांनी सरकारी बंगला सोडून हॉटेलात मुक्कामाला जाण्यापासून झालेली असू शकते. आता हे सुनंदाचे भूत थरूर यांच्यासह कॉग्रेसच्या तात्कालीन सत्ताधारी नेत्यांच्याही मानगुटीवर बसण्याची दाट शक्यता आहे. त्याचे अनेक संशयास्पद पदर म्हणूनच तपासून बघितले पाहिजेत.
No comments:
Post a Comment