पाकिस्तान कितीही चिथावणीखोर कृत्य करीत असला तरी त्याच्याशी संवाद करावा आणि युद्धाचा मार्ग सोडून द्यावा; असा आग्रह अनेक शहाणे भारतालाच करीत असतात. त्यात प्रामुख्याने भारतातील सेक्युलर पुरोगामी शहाण्यांचा भरणा असतो. म्हणूनच असे लोक कला वा क्रिडा क्षेत्रातील लोकांची परस्पर देवाणघेवाण करावी असे म्हणत असतात. त्यातून दोन देशातला संवाद सुरू व्हावा, असे त्यांचे स्वप्न आहे. पण काही दशके उलटून गेली व भारताने कितीही मैत्रीचा हात पुढे केला, म्हणून दोन देशात संवाद होऊ शकलेला नाही. कारण पाकिस्तानला समजणारी भाषा भारत बोलू शकलेला नाही आणि भारताला पाकिस्तानची भाषा समजू शकलेली नाही. दोन व्यक्ती वा देशांमध्ये संवाद व्हायचा असेल, तर दोघांना समजणारी भाषा हेच माध्यम असायला हवे. त्यात एकजण उर्दूत बोलत असेल आणि दुसरा तामिळी भाषेत बोलू लागला, तर संवाद होऊच शकत नाही. पाकिस्तान हत्याराच्याच भाषेत बोलणार असेल आणि भारताने राजकीय चर्चेचा पर्याय पुढे केला, तर संवाद होणार तरी कसा? असाच गोंधळ दिर्घकाळ सुरू राहिलेला आहे. ती कोंडी इंदिराजींनी १९७१ सालात फ़ोडली होती आणि पाकिस्तानला समजणार्या हत्याराच्या भाषेतच पाकशी संपर्क साधला होता. जेव्हा पाकिस्तानला हत्याराची भाषा पचणारी नाही हे कळले, तेव्हाच त्यांचे पंतप्रधान झुल्फ़ीकार अली भुत्तो यांनी वाटाघाटीच्या टेबलावर बसायचे मान्य केले. वाटाघाटीची भाषा त्यांना समजू लागली आणि नंतरच सिमला करार होऊ शकला होता. आताही पुन्हा विसंवाद माजला आहे तर वाटाघाटींनीच दोन्ही देशांना चालावे लागेल. पण त्यासाठी आधी भाषा कोणती ते ठरवणे भाग आहे. भारतानेही म्हणूनच पाकला समजणार्या हत्याराच्या भाषेचा अवलंब करायचे ठरवलेले असावे. तशा भाषेतला संवाद सध्या नियंत्रण रेषेवर सुरू झाल्याच्या बातम्या आशावादी आहेत.
मागल्या आठ्वड्यात नियंत्रण रेषेनजिक असलेल्या कृष्णाघाटी भागात भारताच्या दोन जवानांना पाक हल्ल्यात शहीद व्हावे लागले होते. पण त्यांचे मृतदेह उचलून आणले जाईपर्यंत पाक सैनिकांनी त्यांची मुंडकी कापली होती. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. जागतिक कायद्यानुसार सैनिकांच्या मृतदेहाची विटंबना करता येत नाही. शत्रूचा सैनिक असला तरी मृत्यूनंतर त्यालाही सैनिकी सन्मानाने वागवण्याचे बंधन आहे. पण पाकने कधीच त्याचा सन्मान राखलेला नाही. त्यातूनच दोन्ही देशातील वैमनस्य अधिक विकोपास गेलेले आहे. अशाही स्थितीत भारतातील मुठभर शांततावादी नेहमी वाटाघाटीचा आग्रह धरत असतात. पण पाकला कुठलीच भाषा समजत नसेल तर बोलणी तरी कशी व कोणाशी करायची; जी समस्या होऊन जाते. पाकच्या नागरी सरकारशी बोलणी करायची, तर त्यांच्या शब्दाला पाकसेनेत कवडीचीही किंमत नाही. कुठलाही पाक लष्करप्रमुख वा स्थानिक सेनाधिकारी पाक सरकारचे आदेश जुमानत नाही. एका बाजूला भारताशी मैत्रीचा हात पाक सरकारने पुढे करावा आणि त्याचवेळी पाकसेनेने सीमेवर धुमाकुळ घालावा, असे नेहमीच होत राहिले आहे. याचा अर्थ असा, की पाक सरकारशी बोलणी करून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. ज्याच्या हाती अधिकार आहे वा ज्याचे कुणाचे पाकसेना ऐकते, त्याच्याशीच बोलणी करणे भाग आहे. पाकसेना जर लष्करप्रमुखाचेच ऐकत असेल, तर त्यालाच समजणारी भाषा असायला पर्याय नाही. अर्थात सेनाधिकार्यांना व प्रामुख्याने पाक सेनेला युद्धाची वा हत्याराचीच भाषा समजत असते. ती समजली तर त्याच भाषेत संवाद साधला जाऊ शकणार आहे. भारताने बहूधा त्याच भाषेतला संवाद सुरू केला आहे. तसे नसते तर नियंत्रण रेषेवर सातत्याने भारतीय तोफ़ा धडाडू लागल्या नसत्या, की क्षेपणास्त्रांनी पाकच्या छावण्या उध्वस्त होऊ लागल्या नसत्या.
गेल्या तीनचार दिवसांपासून भारत पाक यांच्यातील काश्मिरी नियंत्रण रेषेवर धमासान माजलेले आहे. एका बाजूला निमलष्करी दलाने गल्लीबोळ व गावखेड्यात दडी मारून बसलेल्या घुसखोरांना हुडकण्याचा सपाटा लावला आहे. तर प्रत्यक्ष सीमेवर खड्या असलेल्या भारतीय जवानांनी नजरेच्या टप्प्यात येणार्या सीमेपलिकडील अड्डे व ठाण्यांवर थेट भडीमार सुरू केला आहे. त्याचे वर्णन बघितले तर आता पलिकडून चिथावणी मिळण्याची प्रतिक्षा संपलेली आहे. भारतीय सेना नजरेत भरणार्या पाक हद्दीतील छावण्या, अड्डे व ठाण्यांवर किंचीतही हालचाल दिसली, तरी तोफ़ा डागण्याचे पाऊल उचलू लागली आहे. शेजारच्या मित्राला हाक मारायची, तर त्याला ऐकूही जायला हवी ना? भारतीय सैनिक आजकाल आपल्या पाकिस्तानी सैनिक मित्रांना तोफ़ा व क्षेपणास्त्रांच्या धुमधडाक्यात हाका मारतात आणि त्या स्फ़ोटाने कानठळ्या बसू लागल्या, मगच पाक सेनेला जाग येत असते. हळुहळू अशा हाका थेट इस्लामाबाद व लाहोरमध्येही ऐकू येऊ लागणार आहेत. एकदा तशा कानठळ्या तिकडेही बसू लागल्या, मग पाक सेनेची झोप उडून जाईल. मग शांतपणे झोपा काढायच्या असतील, तर त्यांनाही हाकेला प्रतिसाद द्यावा लागेल. प्रतिसाद द्यायचा नसेल तर शांतपणे झोपू द्या अशी मनधरणी तरी करावी लागेल. भारताच्या धडाडणार्या तोफ़ा व सुटणारी भेदक क्षेपणास्त्रे, पाक सैनिकांना झोपेतून उठवणारी आहेतच. पण त्याच्याहीपेक्षा पाक सेनाधिकार्यांनाही साखरझोपेतूम जागी करणारी आहेत. सहाजिकच शांतपणे विश्रांती घ्यायची असेल व झोपा काढायच्या असतील, तर पाकसेनेच्या वरीष्ठांना भारताशी बोलणी करावीच लागतील. पण भारतीय लष्कर वा सेनादल राजकीय स्वरूपाची बोलणी करत नाही. तो अधिकार भारत सरकार्चा आहे. म्हणजेच भारतीय सेनेला रोखायचे असेल तर पाक सरकारला मध्यस्थी करावी लागेल ना?
याला म्हणतात संवाद! पाकशी बोलणी भारत सरकार करू शकते आणि तशी बोलणी पाकसेनेशी होऊ शकत नाहीत. पण पाक सेनेला हैराण करून टाकण्याची कामगिरी भारतीय सेना नक्कीच करू शकते. आज बहुधा त्याचीच सुरूवात झालेली आहे. वाहिन्यांवर प्रदर्शित करण्यात आलेले चित्रण बघितले, तर भारताने अतिशय भेदक अशा क्षेपणास्त्रे व दारूगोळ्याचा वापर या हल्ल्यात केलेला आहे. हल्ल्याचे स्वरूप बघता समोरून चिथावणी आलेली नसताना केलेला हल्ला आहे. म्हणजेच पाकला समजेल अशा विध्वंसक भाषेत भारताने प्रत्यक्षात दोन देशातील संवाद सुरू केला आहे. यात पाक सेनेचे नुकसान होतेच आहे. पण त्यांच्या मदतीला जे भाडोत्री मुजाहिदीन व जिहादी भुरटे तिथे अड्डा करून बसलेले आहेत, त्यांच्याही जीवावर प्रसंग येऊ लागले आहेत. सहाजिकच भारताच्या कुरापती काढणार्यांना त्यांच्याच हद्दीत सुखनैव जगण्यातही आता व्यत्यय आणला जात आहे. तसे करण्याची मोकळीक भारतीय सेनेला देण्यात आलेली आहे. त्यातून संवाद व वाटाघाटीची गरज पाकसेनेला वाटायची पाळी आणली जाणार आहे. जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हाच पाकसेनेला त्यांच्याही देशात नागरी सरकार असल्याचा साक्षात्कार होतो आणि दोन देशात संवादाला आरंभ होऊ शकतो. तशी मागणी पाक सरकारकडून पुढे केली जाते आणि प्रत्यक्षात पाकसेनेलाच संवादाची पळवाट हवी असते. ताज्या हल्ल्यांकडे बघता आणखी दहापंधरा दिवसात पकसेनेला तशी गरज भासू लागेल, अशी चिन्हे आहेत. मात्र तशी स्थिती आली म्हणून भारतीय सेना विश्रांती घेईल असे वाटत नाही. बहुधा दोन देशांची सत्ता व सरकारे वाटाघाटींना तयार होईपर्यंत सातत्याने असा भडीमार सुरूच राहिल. त्यात शक्य तितकी पाकची सीमपलिकडे असलेली युद्धसज्जता मातीमोल केली जाईल. कसेही असेना, दोन देशातील संवाद होण्यासाठी भारताने योग्य भाषा निवडली हे छान झाले.
Ekdam marmik vishleshan
ReplyDeleteज्याला ज्या भाषेत समजते ,त्याला त्याच भाषेत समजावले पाहिजे . छान लेख
ReplyDelete