आज तामिळनाडूच्या राजकारणात एका मराठी माणसाचे खळबळ उडवून दिली आहे. त्याचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. तसा उल्लेख इथे महाराष्ट्रामध्ये अनेकदा झालेला असला, तरी आजवर तामिळनाडूत कोणी त्याच्या खर्या नावाचा उच्चारही करायचे टाळलेले होते. त्याला अवघा तामिळनाडू व तामिळभाषिक रजनीकांत या नावाने ओळखतो. कारण तो गेली तीन दशके तामिळी चित्रपटात सुपरस्टार म्हणून वावरतो आहे. त्याच्याविषयी अनेक कहाण्या दिर्घकाळ माध्यमातून येत राहिल्या. तेव्हा एक सामान्य बस कंडक्टर असूनही तो इतक्या मोठ्या लोकप्रियतेच्या शिखरावर कसा तो विराजमान झाला, ते सांगितले जात राहिले. जेव्हा अशा कहाण्या प्रसिद्ध व्हायच्या, तेव्हा त्याचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असल्याचे सांगितले जायचे. अन्यथा कधी त्याच्या खर्या नावाचा उच्चर झाला नाही. पण मुळचा मराठी आणि कर्नाटकात आरंभीचे आयुष्य काढलेल्या या मराठी माणसाने तिथे वास्तव्य केल्यानंतर अस्सल तामिळी होण्यात कुठली कसर ठेवली नाही. चित्रपटाच्या विविध भूमिका पार पाडताना, तो लोकपप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. पण त्याच्या खर्या लोकप्रियतेची पावती दोन दशकांपुर्वी मिळाली. तेव्हा तामिळनाडूत जयललिता नावाची लोकप्रिय अभिनेत्री राज्य करत होती. चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे सत्तेपर्यंत जाऊन पोहोचलेले ते दुसरे व्यक्तीमत्व होते. मुळात द्रविडी अस्मितेच्या आधारावर उदयास आलेल्या द्रविड मुन्नेत्र कझागम या पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांच्यामुळे ते शक्य झाले. त्यांनी लिहीलेल्या पटकथांना पडद्यावर सादर करताना एम जी रामचंद्रन यांनी सुपरस्टार हा पल्ला गाठला होता. तेच पहिले चित्रपट कलावंत ज्यांनी मुख्यमंत्रीपदावर आरुढ होऊन दाखवले. मग त्यांच्या लोकप्रिय नायिका जयललिता सत्तेवर आरुढ झाल्या. त्यांच्या सत्ताकाळात रजनीकांत सुपरस्टार झालेला होता.
१९९१ सालात जयललिता मुख्यमंत्री झाल्या व त्यांच्या सत्तेची इतकी मस्ती झाली होती, की एका दिवशी मुख्यमंत्र्यांसाठी वाहतुक रोखली असताना रजनीकांतची गाडीही वर्दळीत अडकून पडली. त्यामुळे वैतागलेल्या रजनीकांतने आपला संताप जाहिरपणे व्यक्त केला. तेव्हा विधानसभा लोकसभा निवडणूका भरात आलेल्या होत्या. त्यामध्ये रजनीकांतच्या दोन वाक्यांनी चमत्कार घडवला. ‘पुन्हा जयललिता सत्तेत आल्या, तर इश्वरही तामिळनाडूला वाचवू शकत नाही’, अशी ती प्रतिक्रीया होती. त्याचा प्रचंड लाभ द्रमुक व तमिळ मनिला कॉग्रेस यांच्या आघाडीला मिळाला. रजनीकांतचे शब्द तामिळी मतदाराला फ़िरवू शकतात, याची मिळालेली तीच पावती होती. पण त्याने पुढे कधी पुन्हा राजकीय वक्तव्य केले नाही, की आपला राजकीय कल कधीच व्यक्त केला नाही. राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहुन रजनीकांत चित्रपट भूमिका रंगवित राहिला. पण आता करुणानिधी थकले आहेत आणि जयललितांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे तामिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. ती भरून काढू शकणारा कोणी राजकीय नेता समोर येऊ शकलेला नाही. अशावेळी पुन्हा एकदा चित्रपट सुपरस्टारने तामिळनाडूचा मसिहा म्हणून जबाबदारी घ्यावी, असेच अनेकांना वाटत असल्यास नवल नाही. तामिळी चित्रपट कलाकारांच्या चहाते संघटना असतात आणि त्यांच्या शाखाही गावोगाव पसरलेल्या असतात. त्यांची केंद्रीय संघटनाही असते. कलाकारही त्यांच्याशी संपर्कात असतात. अशाच संघटनांच्या माध्यमातून रजनीकांतने आता हालचाली सुरू केल्या आहेत. त्याने लोकसंपर्क आरंभला असून, तीच त्याची राजकीय चाल असल्याचे मानले जात आहे. त्यावरून चर्चा रंगल्या असताना, पुन्हा त्याचे मराठी नाव उजेडात अणले गेले आहे, त्याचा जाणिवपुर्वक उल्लेख सुरू झाला आहे. त्याच्या तामिळी असण्यावरही प्रश्नचिन्ह लावले गेले आहे.
रजनीकांत मुळचा अस्सल तामिळी वा द्रविडीयन नाही, असाही आक्षेप काहींनी घेतला आहे. पण तामिळी जनतेला तसे वाटते काय? रामचंद्रन हे सुपरस्टार व मुख्यमंत्री झाले तरी ते मुळचे द्रविडी नव्हते. त्यांनी द्रविडी अस्मितेचा स्विकार केलेला असला, तरी ते मुळचे श्रीलंकेत जन्मलेले मल्याळी केरळी होते. तरीही त्यांच्या अभिनयावर फ़िदा झालेल्या तामिळी जनतेने, खर्याखुरर्या द्रविडी नेत्यांना धुळ चारून त्यांना सत्ते्वर बसवलेले होते. त्यांचाच वारस म्हणून नंतरच्या काळात जयललितांना तामिळी जनतेने भरभरून मते दिली. त्याही अस्सल द्रविडीयन नव्हत्या. त्यांचा जन्म कर्नाटकातला आणि कलोपासना त्यांनी आंध्रामध्ये तेलगू चित्रपटातून सुरू केली होती. पण त्यांचे कानडी असणे वा बिगरतामिळी असणे, त्यांच्या कलेला वा राजकारणाला आडवे आले नाही. त्यांनीही द्रविडी अस्मिता स्विकारली व जनतेने त्यांच्या अक्षरश: डोक्यावर घेतले होते. आज त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याच नावाने व चेहरा दाखवून अण्णाद्रमुक पक्षाला वाटचाल करावी लागते आहे. इतके स्पष्ट असूनही आज कोणी रजनीकांत यांच्या कानडी प्रदेशातील मराठी असण्याची खोट काढत असेल, तर त्याला द्रविडी जनतेची मानसिकता उमजलेली नाही, असेच मानावे लागेल. पण तरीही एका गोष्टीचा फ़रक लक्षात घ्यावा लागेल. रामचंद्रन असोत किंवा जयललिता असोत, त्यांनी नुसती तामिळी अस्मिता पत्करलेली नव्हती. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीसाठी द्रविडी राजकीय भूमिकेचा झेंडा खांद्यावर घेतला होता. तिथे रजनीकांत अजिबात वेगळी गोष्ट आहे. तामिळी न्याय व अस्मितेसाठी सतत आघाडीवर असलेल्या रजनीकांतनी, कधीही कुठल्या द्रविडी पक्षाशी जवळिक केलेली नाही. त्यांच्याशी हातमिळवणी केली नाही. उलट त्यांचा कल कायम राष्ट्रीय प्रवाहातील नेते व अस्मितेशी राहिलेला आहे. सध्या त्यांच्या ओढा भाजपाकडे असल्याचे मानले जाते.
जयललितांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या आरके नगर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहिर झाली व तिथे भाजपानेही उमेदवार उभा केला होता. त्याला अगत्याने आपल्या घरी बोलावून रजनीकांत यांनी शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्याचा आपल्या सोबतचा फ़ोटोही त्यांनी ट्वीटरवर टाकला होता. दुर्दैवाने ती निवडणूक पुर्ण झाली नाही. पण त्यातून रजनीकांत यांचा राजकीय कल स्पष्ट झाला आहे. आताही त्यांच्या राजकीय आगमनाचा सुगावा लागल्याच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात हा सुपरस्टार बहुधा भाजपात सहभागी होईल, असेच बोलले जात आहे. त्यामुळे तमाम द्रविडी पक्ष व राजकीय नेते गडबडले आहेत. पन्नास वर्षापुर्वी द्रमुकच्या विजयानंतर सत्तांतर झाले होते आणि पुढे कधीही तिथे राष्ट्रीय पक्षाला आपले डोके वर काढता आलेले नाही. तसा कुठलाही प्रयत्न द्रविडी अस्मितेने सतत हाणून पाडला आहे. या स्थितीत रजनीकांत भाजपात सहभागी झाल्यास लोकमतावर काय परिणाम होऊ शकतो? मध्यंतरी या अभिनेत्याने श्रीलंकेतल्या आपल्या चहात्यांना भेटण्यासाठी जाण्याची तयारी केली होती. पण द्रविडी राजकारण्यांनी काहूर माजवून त्याला माघार घ्यायला लावली होती. त्यानंतर रजनीकांतने अशा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच आता हा सुपरस्टार द्रविडी अस्मितेच्या राजकारणाला सुरूंग लावत राजकारणात प्रवेशण्याची दाट शक्यता आहे. ‘युद्धाला सज्ज व्हा’ अशी हाक देत त्याने आपल्याच चहात्यांना इशारा दिलेला आहे. युद्ध कोणाशी? अर्थातच दिर्घकाळ प्रादेशिक अस्मितेच्या बुरख्याखाली सामान्य जनतेला खेळवणार्या स्थानिक नेते व पक्षांशीच आपले युद्ध असल्याचा हा अस्पष्ट संकेत आहे. द्रविडी पक्षांसाठी हा इशारा असून, एकविसाव्या शतकातला शिवाजी गायकवाड पुन्हा दक्षिण दिग्विजय करीत या प्रदेशाला भारतीय मुख्य प्रवाहात आणायला कटीबद्ध होत असावा, असा हा संकेत आहे.
Kadak....
ReplyDelete