Tuesday, June 13, 2017

शिया विरुद्ध सुन्नी



इराणची राजधानी असलेल्या तेहरान महानगरात आणि तिथल्या संसद भवनावर घातपाती हल्ला होणे, ही बाब दिसायला किरकोळ वाटत असली, तरी मोठी राजकीय घटना आहे. त्याकडे इसिसने केलेला आणखी एक घातपात म्हणून बघता येणार नाही. त्याकडे इराण-सौदी यांच्यातला संघर्ष म्हणूनच बघणे भाग आहे. कारण ज्याला बाकीचे जग इस्लामी खिलाफ़त म्हणून बघत असते, ती इसिस संघटना ही व्यवहारात सुन्नी वहाबी इस्लामी संघटना आहे. जैश महंमद वा लष्करे तोयबा ह्या नामधारी संघटना आणि त्यांचा खरा बोलविता धनी पाकिस्तान आहे, तसेच इसिसचे स्वरूप आहे. वरकरणी ती बगदादी नावाच्या कुणा घातपात्याची जिहादी संघटना भासवली जाते. पण प्रत्यक्षात ती सौदी राजघराण्याची अनधिकृत फ़ौज आहे. जिथे म्हणून सौदी घराण्याच्या राजकारणाला धार्मिक वा भौगोलिक आव्हान निर्माण होते, तिथे इसिस सौदीसाठी लढणारी अनधिकृत सेना आहे. सहाजिकच इराणी संसदेवरचा हल्ला सौदीच्याच इशार्‍यावर झाला, हे दुर्लक्षित करून त्यातला संकेत समजून घेता येणार नाही. मागल्या काही वर्षात इसिसचा उदभव अकस्मात झालेला नाही. अलकायदा नामशेष होताना ही नवी संघटना उदयास आली आणि तिचा व्याप सिरीया, इराक यांच्यापलिकडे पुर्वेस अफ़गाणिस्तानपर्यंत झाला. तिथे शिया-सुन्नी हा इस्लामिक विवाद कारण झालेला दिसेल. पण त्यात पाश्चात्य देश, अमेरिका व रशिया यांनी उडी घेतल्याने त्याला जागतिक स्वरूप आलेले आहे. त्यात कितीही शक्ती पणाला लावली तरी सौदी व अमेरिका इराणला शह देऊ शकलेले नाहीत. म्हणून असेल आता सौदीने इराणच्या राजधानीलाच हादरा देण्याचा डाव साधलेला आहे. अर्थात हल्ला मोठा व भेदक झाला नसला तरी तो संसद व राजधानीतला असल्याने, त्यातली सुप्त अपेक्षा लक्षात येते.

सिरीया, लेबेनॉन व इराण या देशात शिया सत्ताधीश आहेत आणि तिथे सुन्नी मुस्लिमांना दुय्यम दर्जाने वागवले जाते असा आक्षेप आहे. त्यात तथ्य जरूर आहे. पण असा आरोप करणार्‍या सौदी कंपूतील सुन्नी राष्ट्रांमध्ये शियांनाही तशीच दुय्यम वागणूक मिळत आलेली आहे. किंबहूना दुबई, बहारीन, सौदीमध्ये शियांना कुठलेही अधिकारही दिले जात नाहीत. गुलामी म्हणावी इतक्या खालच्या दर्जाने त्यांना वागवले जात असते. त्याचीच प्रतिक्रीया मग इराण आदी शिया देशांमध्ये उमटत असते. हा प्रकार नवा अजिबात नाही. पण इराणमध्ये शिया धर्मगुरू खोमेनी यांची सत्ता आली आणि त्यांनी हळुहळू आसपासच्या परिसरात शिया वर्चस्व निर्माण करण्यास प्राधान्य दिले. नंतरच हे धार्मिक वैमनस्य आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले. त्यातून सुन्नी नसलेल्या वा सुन्नी इस्लाम काटेकोर पालन करीत नसलेल्या सत्ताधारी राजकारण्यांना सत्ताभ्रष्ट करण्याची मोहिम सौदीने हाती घेतली. त्यातूनच इजिप्त, लिबिया वा अन्य अरब देशात उठाव सुरू झाले. त्यातच सिरीया ओढला गेला. परंतु तिथे बशर अल असद या सत्ताधार्‍याने शरणागतीला नकार दिला व गेली पाचसहा वर्षे त्या देशाला अंतर्गत यादवीने उध्वस्त केले आहे. त्यात अमेरिका व युरोपिय देश, दहशतवाद किंवा मानवाधिकार अशी कारणे देऊन एका बाजूला उभे राहिले. तर रशिया व इराण यांनी असदच्या बाजूने उभे रहात, सौदीच्या राजकारणाला शह दिला आहे. पण त्यातून जे अराजक माजले त्याचा लाभ घेत अनेक लहानमोठे बंडखोर व गनिमी गट उदयास आले. त्यात इसिस हा सौदीप्रणित गट अधिक प्रभावशाली ठरला आहे. कारण त्याला अनेक राज्यकर्त्यांचा छुपा व आर्थिक पाठींबा मिळालेला आहे. या सर्वांचे खरे लक्ष पश्चीम आशियातील समर्थ होत चाललेला शिया इराण हेच आहे. तेहरानच्या हल्ल्याचे खरे कारण असे आहे.

तेहरानच्या संसद भवनाप्रमाणेच तेव्हा या महानगरातील अतिशय प्रतिष्ठेचे व आस्थेचे स्थान मानल्या जाणार्‍या आयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकावरही हल्ला झाला आहे. इराणच्या शिया अभिमानाची प्रेरणा म्हणून खोमेनी यांच्याकडे बघितले जाते. ३८ वर्षापुर्वी इराणमध्ये जुलमी शहाची सत्ता उलथून पाडणार्‍या धार्मिक क्रांतीचे नेतृत्व खोमेनी यांनी केले होते. नंतर जी सत्ता स्थापन झाली, त्यात धार्मिक नेत्याचा अखेरचा शब्द ठरवणारी राज्यघटनाही तयार झाली. इसिसच्या हल्लेखोरांनी खोमेनी यांच्या स्मारक वास्तुपर्यंत मजल मारली, त्यातला राजकीय हेतू स्पष्ट होतो. हा हल्ला किंवा घातपात एका देशाच्या विरोधातला नाही, किंवा लोकांचे हत्याकांड घडवण्याचा हेतू त्यामागे नाही. त्यापेक्षा शिया राजसत्तेमध्ये आपल्याच सुरक्षेची कुवत नाही, हे सिद्ध करण्याचा त्यामागचा डाव आहे. २००१ सालात अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरातील जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळून झालेला हल्ला, अमेरिकेचे नाक कापण्यासाठी होता. तसाच तेहरानचा हा हल्ला आहे. त्यात नुकसान किती झाले वा किती लोक मारले गेले, त्याला महत्व नाही. असा हल्ला तेहरान इराणमध्ये होऊ शकतो, ही गोष्ट जगाला दाखवायची होती. किंबहूना अजून असा कुठलाही हल्ला सौदीच्या कुठल्या मुख्य शहरात होऊ शकलेला नाही, पण इराणच्या राजधानीत होऊ शकतो, हा त्यातला खरा आशय आहे. सुन्नी सत्ताकेंद्र अतिशय प्रबळ असून शिया सत्तेचे मुख्यालय सुद्धा दुबळे असुरक्षित आहे, असे त्यातून दाखवायचे होते. पण तसे धाडस सौदी सत्ताधीश करू शकत नाहीत, कारण त्यांना उघड युद्ध नको आहे. तसे झाल्यास इराण कधीही युद्धाला मैदानात येऊ शकतो आणि सौदीला कुठल्याही जखमेशिवाय युद्ध खेळण्याची खुमखुमी आहे. त्यातून पश्चीम आशिया धुमसत राहिला आहे. अर्थात इराण सहजपणे हा हल्ला पचवून गप्प राहिल, अशी अपेक्षा कोणी बाळगू नये.

येमेनमध्ये आपल्या तालावर नाचणारा सत्ताधीश सौदीने आणुन बसवल्यावर तिथल्या शिया लोकसंख्येने उठाव केला होता आणि त्याला इराणने मदत केली होती. इराक वा सिरीयातही इराणने आपले लढवय्ये गट उभे केलेले आहेत. जगात अजून या शिया लढवय्यांना जिहादी वा दहशतवादी म्हणून फ़ारशी मान्यता मिळालेली नाही. कारण आपल्या प्रादेशिक राजकारणाच्या पलिकडे शिया लढवय्ये जात नाहीत. सुन्नी जिहादी जसे कुठेही एकाकी जाऊन निरपराधांचे बळी घेतात, तशा कुठल्या घटना शिया अतिरेकी करीत नाहीत. म्हणून त्यांचा गाजावाजा होत नाही. पण त्यांनीच येमेनच्या सत्ताधीशाला परागंदा होत सौदीला पळून जाण्याची पाळी आणलेली होती, हे विसरता कामा नये. अशा राजकीय लपंडावात आता तेहरानवरच हल्ला करण्याची आगळीक इसिसकडून झालेली असेल, तर सौदीच्या प्रदेशात काही घडवण्यासाठी इराण पुढे येईल, याविषयी मनात शंका बाळगण्याचे कारण नाही. सौदीची मोठी चलाखी अशी आहे, की त्याने पैसे व साहित्य पुरवले तरी आपल्या सत्तेला व भूमीला कुठलीही झळ बसणार नाही, असा जिहाद चालविला आहे. तेहरानच्या घातपातानंतर सौदीची राजधानी रियाध इराणचे लक्ष्य झाल्यास नवल नाही. तशी भूमिका घेऊन इराणने पुढाकार घेतला, तर तेलाच्या पैशाने सुन्नी वहाबी क्रांतीचे स्वप्न बघणार्‍या सौदीला दणके बसू लागतील. नुसते त्याच देशाचे नुकसान होणार नाही. तर जगभरच्या सुन्नी जिहादी आक्रमकतेचा जोश उतरू लागेल. सौदीचा प्रदेश शिया लढवय्यांनी युद्धभूमी बनवली, तर तेलाचा पैसाही उपयोगाचा उरणार नाही. किंबहूना सौदीचा इराक व्हायला किती वेळ लागेल? म्हणूनच तेहरानच्या या हल्ल्याकडे सुरूवात म्हणून बघावे की सरावाचा खेळ म्हणून बघावे, असा प्रश्न पडतो. तितकाच हा विषय पाकलाही भोवण्याची शक्यता आहे. पण तो विषय वेगळा मांडावा लागेल.

3 comments:

  1. Bhau, khoop chan vishleshan kela aahet..

    ReplyDelete
  2. Too Good. No one has explained so nicely yet. Thank you very much for this wonderful article.

    ReplyDelete
  3. Khupch Chaan Analysis Bhau…

    ReplyDelete