बंगालच्या बशिरहाट येथे नेमके काय घडले आहे किंवा घडते आहे, असे प्रश्न सध्या देशभरच्या अनेक जागरुक लोकांना पडलेले आहेत. कारण जे काही तिथे घडले त्याची नेमकी बातमी पहिले दोन दिवस तरी लोकांना मिळू शकली नाही. रविवारी त्या मोठ्या गावात हिंसाचाराने थैमान घातले आणि त्यात शंभरहून अधिक दुकाने घरे जाळली गेली. भोसकाभोसकीत एकाचा मृत्यू झाला. पण देशभर गोरक्षकांनी मांडलेल्या उच्छादाच्या बातम्या रंगवणार्या माध्यमांना बशिरहाटच्या बातम्या देण्याची इच्छा झाली नाही. कारण तिथे जाण्यासच माध्यमांना राज्य सरकारने प्रतिबंध घातला होता आणि कोणाला तिथे पोहोचण्याची इच्छाही नसावी. ही अनिच्छा एक गोष्ट स्पष्ट करते. जर माध्यमांना हिंसाचाराच्या विरोधात बातम्या देण्याची इच्छा असती, तर बशिरहाटचा हिंसाचार दोन दिवस गुलदस्त्यात राहिला नसता. पण तो राहिला. कारण बशिरहाट वा हरयाणातील वल्लभगडचा हिंसाचार यात फ़रक नव्हता. दोन्हीकडे जमावाने हिंसा केली होती आणि त्यातही बशिरहाटची हिंसा अधिक व्यापक व भयंकर होती. कारण तिथे शंभराहून अधिक दुकाने घरे जाळली गेली होती आणि चारपाचशे लोकांना जीव मुठीत धरून दडी मारायची वेळ आलेली होती. तुलनेने वल्लभगडचा हिंसाचार किरकोळ होता. सहासात लोकांच्या घोळल्याने दोघातिघा मुस्लिमांना मारहाण केली होती. त्यात एकाचा मृत्यू झालेला होता. पण मारणारे व मरणारे यांच्या धर्माने त्यावरील राजकीय व माध्यमातील प्रतिक्रीयांमध्ये मोठी तफ़ावत केलेली होती. बशिरहाटमध्ये मारला गेलेला हिंदू होता, तर मारणारा जमाव मुस्लिम होता. उलट वल्लभगडमध्ये मरणारा मुस्लिम होता आणि मारेकरी हिंदू होते. त्याचे प्रतिबिंब माध्यमे व राजकारणात वेगवेगळे पडले होते. हिंदू मेला तर बातमी नसते आणि मुस्लिम हिंदूंकडून मारला गेला तर बातमी असते, अशा समजुतीचा हा परिणाम होता.
वल्लभगड येथील चार मुस्लिम तरूणांना धावत्या रेलगाडीत मारहाण झाली. पण निदान तिथे बातमी आल्यावर पोलिस कारवाई सुरू झाली. पण बशिरहाटमध्ये ममता बानर्जी यांनी मुळात दखल घेण्यासारखे काही घडल्याचे मान्य करण्यासच नकार दिला. त्या घटनेचे चित्रण मोबाईलवर करणार्यांनी इंटरनेटवर टाकले व अवघ्या एकाच वाहिनीने त्याची दखल घेतली. तिकडे आपला वार्ताहर पाठवून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पहिली बातमी झळकली आणि एका वाहिनीने ती बातमी लावून धरल्यामुळे इतर माध्यमांना वल्लभगडच्या शिळ्या कढीला ऊत आणायचे सोडून बशिरहाटकडे वळावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बानर्जी व त्यांच्या तृणमूल पक्षाचे खुलासे देताना हाल झाले. इथेही फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. वल्लभगड हरयाणातील मुस्लिम तरूणाची हत्या झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांच्या बातम्या झळकल्या आणि त्यांच्या वेदनाही देशभरच्या माध्यमात येऊ शकल्या. त्या हरयाणात भाजपाचे सरकार आहे. पुरोगामी सरकार तिथे सत्तेत नाही. पण जिथे ममतांचे पुरोगामी सरकार आहे, तिथे बशिरहाटमध्ये बातमी घेण्यासाठी पत्रकारांना प्रवेश नव्हता. पण मृत्यू झालेल्या घोष नामक व्यक्तीच्या नातलगांना भेटण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केल्यावर पोलिसांनी त्यांना पळवून लावलेले होते. हा भेदभाव नाही काय? मुस्लिम पिडीतांच्या वेदना व अन्याय जगाला कळला पाहिजे. पण मुस्लिम जमावाच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदूंच्या वेदना अन्यायाला वाचा फ़ोडली जाऊ नये, याला पुरोगामीत्व म्हणतात काय? नसेल तर ममतां बानर्जींनी बशिरहाटच्या हिंसेत हिंदू पिडीतांच्या बातम्या प्रसिद्ध होण्याला आडकाठी कशाला केलेली होती? त्यावर पोलिस कारवाई करण्याचा विचारही कशाला केला नाही? एकाच देशात मुस्लिम वा हिंदू पिडीतांना असा वेगवेगळा निकष कशाला लावला जातो?
त्याचे कारण सोपे आहे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मतांची लाचार असते. आपल्या मतदार गठ्ठ्यांना न्याय दिला जात असतो आणि आपल्या विरोधात जाणारे वा हक्काने मते मागता येत नाहीत, अशा लोकांना वार्यावर सोडून दिले जात असते. त्याला पुरोगामी लोकशाही मानले जाते. त्याचाच हा परिणाम आहे. ममतांना बंगालची सत्ता मुस्लिम मतांच्या गठ्ठ्यामुळे मिळाली अशी एक सार्वत्रिक समजूत आहे. त्यामुळेच तो गठ्ठा आपल्याच पाठीशी रहावा, असा ममतांचा अट्टाहास असतो. त्यासाठी मग त्यांना मुस्लिम आक्रमकता वा गुंडगिरीलाही पाठीशी घालावे लागत असते. कारण ती गुंडगिरीच मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवून देते, असा पक्का समज झालेला आहे. त्याला मुस्लिम व्होटबॅन्क असे संबोधले जाते. दिर्घकाळ डाव्यांनी अशी व्होटबॅन्क जपलेली होती आणि आता त्या व्होटबॅन्केवर ममता बानर्जी यांचा कब्जा आहे. तो तसाच कायम राखायचा असेल तर ममतांनी आपल्या तालावर नाचले पाहिजे, असा त्या व्होटबॅन्केचेव म्होरके आग्रह धरत असतात. यात बंगालचे व देशभरच्या मुल्ला मौलवींचा समावेश होतो. पण ही फ़क्त मुस्लिमांची मते वा व्होटबॅन्क सत्ता मिळवून देते, हा एक भ्रम आहे. पण त्यातून बाहेर पडण्याची हिंमत पुरोगामी नेते व पक्ष हरवून बसलेले आहेत आणि त्यांना मौलवींच्या हातची कठपुतळी म्हणून नाचावे लागते आहे. मागल्या लोकसभा निकालांनी ह्या मुस्लिम व्होटबॅन्केचे पाखंड मोडीत काढले आहे. ती खरेच इतकी प्रभावी असती, तर मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते आणि एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नसताना त्यांना उत्तरप्रदेशात अफ़ाट बहूमत मिळवता आले नसते. पण तसे झाले, कारण मुस्लिम व्होटबॅन्केचा बागुलबुवा खोटा आहे. पण त्या भ्रमातून बाहेर पडणे सोपे नाही. ममता किंवा पुरोगामी मंडळी त्याच भ्रमात रसातळाला चाललेली आहेत. बशिरहाट त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.
मुस्लिम व्होटबॅन्क डाव्यांच्या पाठीशी होती तोपर्यंत ममतांची डाळ बंगालमध्ये शिजली नव्हती. पण सिंगुर व नंदीग्रामच्या जमिन अधिग्रहणाच्या निमीत्ताने मुस्लिमांशी डाव्यांच्या हाणामार्या सुरू झाल्या. तेव्हाही तिथले पोलिस डाव्यांच्या शाखा झालेल्या होत्या. अशा वेळी ते साटेलोटे उघडे पाडायला ममतांनी सिंगूरला धरणे धरले आणि बस्तान मांडले. त्यातून देशभर इतका गाजावाजा झाला, की ममतांचे वजन वाढत गेले आणि डाव्यांपासून मुस्लिम दुरावत गेले. मुस्लिम लोकसंख्येला नियंत्रित करणारे मौलवी मुल्ला ममताकडे वळले आणि ममतांना एकदम मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ मिळाली. पण त्याच्याही आधी ममतांचा एक मोठा मतदार सज्ज होता. तो मुस्लिम गठ्ठा नव्हता वा कॉग्रेस वा अन्य पक्षांच्या बाजूचा तो मतदार होता. पण तो निर्णायक विजय मिळवून देण्यात तोकडा पडत होता. डाव्यांच्या विरोधातील वा डाव्यांच्या मग्रुरीला कंटाळलेला हा वर्ग, ममताच्या बाजूने एकवटलेला होता. पण त्याच्यापाशी विजयाइतके पाठबळ नव्हते. ते पाठबळ मुस्लिम गठ्ठा मताने ममतांच्या पारड्यात आले. तिथे डाव्यांचा पराभव झाला. म्हणून मुस्लिमच सत्ता देऊ शकतात, हे गृहीत फ़सवे आहे. त्या गठ्ठ्याला वजनदार वा निर्णायक ठरवण्यासाठी इतरही मते आवश्यक असतात आणि ती हिंदूंची मते असतात. त्यांना धुडकावून मुस्लिम मतांवर बंगालची सत्ता मिळू शकत नाही की कुठल्याही राज्यात बहूमताचा पल्ला कोणी गाठू शकत नाही. ममतांना त्याचा पुरता विसर पडलेला आहे. म्हणून की काय अलिकडे त्यांनी मोदी विरोधाचे नेतृत्व करताना हिंदूंना वार्यावर सोडून देण्याचा पवित्रा घेतलेला आहे. बशिरहाट हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. यापुर्वी गतवर्षी अशीच मोठी घटना मालदा जिल्ह्यात कालीचक येथे घडली होती. त्यातून दिवसेदिवस ममता आपली हिंदूविरोधी प्रतिमा अधिकधिक ठळक करत चालल्या आहेत.
बारा वर्षे ममतांनी बंगालमध्ये डाव्यांशी झुंज दिली, तेव्हा त्यांना मते देणार्यात मुस्लिम मतांची संख्या मोठी नव्हती. पण झुंज देण्याइतकी हिंदू मते त्यांच्या पाठीशी आलेली होती. आता त्याच बिगर मुस्लिम मतदाराचा ममतांविषयी भ्रमनिरास होत चालला आहे. बशिरहाट येथे हिंसचार झाल्यानंतर दोन दिवसांनी तिथे हिंदू रस्त्यावर आले आणि न्यायाची मागणी करू लागले. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा सूर ममतांसाठी धोक्याचा इशाराच आहे. इथे बंगालमध्ये पोलिस फ़क्त मुस्लिमांचे व मुस्लिम गुंड टोळ्यांचे पाठीराखे आहेत. आम्हा हिंदूंना कोणी तारणहार राहिलेला नाही, अशा त्या प्रतिक्रीया ममता हिंदू मतदारांपासून दुरावल्याची खुण आहे. आपण मुस्लिम गुंड व त्यांचे आश्रयदाते मौलवी यांच्या आहारी गेल्यामुळे हिंदू मतदार दुरावला, तर पुन्हा निवडणुका जिंकणे अवघड आहे, हे आता ममतांच्याही लक्षात आले आहे. पण म्हणून त्यांना आता आपला पवित्रा बदलणे सोपे राहिलेले नाही. ममताचे सरकार म्हणजे आपल्याला मोकाट रान, अशी समजून मुस्लिम मौलवी व त्यांच्या टोळ्यांनी करून घेतलेली आहे. सहाजिकच त्यांना पोलिस व कायदेशीर कारवाईने रोखण्याचा प्रयास जरी ममतांनी केला, तरी त्याकडे मुस्लिमांवर अन्याय म्हणून बघितले जाईल. मग हेच मौलवी ममता विरुद्ध दंड थोपटून उभे रहातील. त्याच भयाने ममता आजकाल बेजार झालेल्या आहेत. म्हणूनच त्यांनी बशिरहाटच्या हिंदूंना पोलिस सुरक्षा देण्यापेक्षा सगळे खापर भाजपावर फ़ोडण्याची कांगावखोरी केलेली आहे. त्यातून मुस्लिमांना चुचकारण्याचा खेळ केलेला आहे. पण त्यातून हिंदूंचा कैवार फ़क्त भाजपाला आहे, बाकी कोणी हिंदूंसाठी लढत नसल्याचेच चित्र निर्माण होते आणि भाजपाला तर तेच हवे आहे. त्यातून अधिकाधिक हिंदू भयभीत होऊन भाजपाच्या मागे एकजुट होत चालला आहे. तर त्याला रोखणेही ममताच्या हाती उरलेले नाही.
ममताच्या पाठोपाठ आजपर्यंत बंगालमध्ये प्रभावी असलेले दोन पक्ष म्हणजे डावी आघाडी व कॉग्रेस होय. त्या मानाने भाजपा अगदीच नवा पक्ष आहे. सहाजिकच अशा राजकीय स्थितीचा लाभ उठवण्याच्या दृष्टीने तिथे तेच दोन राजकीय गट प्रभावी होते. पण आपण हिंदूंच्या न्यायासाठी उभे राहिलो, तर मुस्लिम आपल्याकडे पाठ फ़िरवतील, अशी चिंता त्यांना ग्रासते आहे. ममताकडून दुरावलेले मुस्लिम पुन्हा आपल्याकडे येतील अशा आशेवर हे दोन राजकीय गट विसंबून आहेत. उलट आधीपासून हिंदूत्वाचा शिक्का बसलेल्या भाजपाला ती अडचण नाही. म्हणूनच भाजपा अतिशय आक्रमकपणे हिंदूंच्या अशा तक्रारींना दाद देतो आहे. त्यासाठी आवाज उठवतो आहे. तर मोठ्या संख्येने हिंदू मतदार विचलीत असूनही डावे किंवा कॉग्रेस ममताच्या मुस्लिम लांगुलचालनावर अवाक्षर बोलायला राजी नाहीत. टाळाटाळ करीत आहेत. सहाजिकच भाजपाला विचलीत व पिडीत हिंदूंमध्ये आपले हातपाय पसरण्यास मोकळिक मिळालेली आहे. दुसरीकडे ममताचीही विचित्र कोंडी झालेली आहे. मागल्या दोन वर्षात मोदी विरोधाचे राष्ट्रव्यापी नेतृत्व मिळवण्यासाठी झटणार्या ममतांना, देशभरच्या मुस्लिमांचा गठ्ठा हवा आहे. त्यासाठी त्या मुस्लिमांच्या आक्रमक वागण्याला खतपाणी घालत राहिल्या. आता त्याचे दुष्परिणाम समोर आल्यावर त्यांना माघारी फ़िरणे अशक्य झाले आहे. कारण या दोन वर्षात त्यांनी हिंदूंना इतके दुखावलेले आहे, की मोठ्या संख्येने हिंदू मतदार भाजपाच्या आहारी गेलेला आहे. तो माघारी वळण्याची शक्यता कमीच आहे. पण तसा नुसता प्रयत्न केला तरी अजून त्यांच्या बाजूने असलेला मुस्लिम मात्र बिथरून जाऊ शकतो आणि डावे किंवा कॉग्रेसच्या बाजूने जाऊ शकतो. म्हणूनच ममतांना धो्का दिसत असूनही हिंदू मतांकडे पाठ फ़िरवणे भाग आहे. बशिरहाट हे त्याचे जितेजागते उदाहरण झालेले आहे.
एव्हाना ममतांनी मागचे दोर कापून टाकलेले आहेत. त्यांना हिंदू व मुस्लिम यांना समान न्यायाने वागवणे शक्य नाही आणि त्यासाठी मुस्लिम दंगेखोरीला पायबंद घालणे केवळ अशक्य आहे. ममता आता मुस्लिम मौलवी मुल्लांची किती कठपुतळी झाल्या आहेत, त्याची अनेक उदाहरणे देता येतील. एक हिंदू देवस्थानाच्या विश्वस्तपदी त्यांनी बरकती नावाच्या धर्मांध मुस्लिम मौलवीला आणून बसवले आहे. संघाच्या व हिंदूंच्या कुठल्याही जाहिर कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कोर्टाकडून अशा परवानग्या मिळवाव्या लागत आहेत. एका प्रकरणात तर हायकोर्टानेही ममतांनी मुस्लिम लांगुलचालन कमी करावे, असे ताशेरे झाडलेले आहेत. त्यातून ममतांचा मुस्लिम धार्जिणेपणा उघड होऊ शकतो. सहाजिकच आता त्यात थोडी कसर केली तरी मुस्लिम मौलवी ममतांवर दुगाण्या झाडायला कमी करणार नाहीत. पर्यायाने त्यातून मुस्लिम मते गमावण्याचे भय ममतांना सतवते आहे. सहाजिकच आता त्या अधिकाधिक मुस्लिम मतांवर विसंबून राजकारण करत चालल्या आहेत. त्याची प्रतिक्रीया म्हणून मुस्लिम टोळ्या आक्रमक झालेल्या असून हिंदू अधिकाधिक भयभीत होत भाजपाच्या आश्रयाला चालले आहेत. अलिकडे झालेले बशिरहाट प्रकरण त्याची साक्ष आहे. मोदी विरोधाच्या आहारी जाऊन ममतांनी केलेला अतिरेक त्यांना दिल्लीतल्या केजरीवाल यांच्या वाटेने घेऊन चालला आहे. त्याचे परिणा्म लगेच दिसत नसतात. दिल्लीकराने मतदानाचा दिवस येण्यापर्यंत कळ काढली आणि केजरीवालना महापालिका मतदानात भूईसपाट करून टाकले. मग ममतांचे भवितव्य काय असेल? बशिरहाट वा तत्सम घटना हे ममतांनी स्वत:साठीच रचलेले सापळे आहेत. त्यातून निसटण्याची जितकी धडपड त्या करतील तितक्या त्याच त्यात गुरफ़टत जातील. जसे डावे बंगालमधून बघता बघता नामशेष झाले, त्याची पुनरावृती नव्याने होऊ घातली आहे. बशिरहाट हा ममतांचा सिंगूर नंदिग्राम ठरला तर नवल वाटण्याचे कारण नाही.
खुप सुंदर विश्लेषन.
ReplyDeleteरोखठोक विचार
ReplyDeleteIn 2019 Bangal will repeat the same story what was happened in UP in 2014 Loksabha elections in favour of BJP
ReplyDelete