राष्ट्रपती निवडणूकीचे मतदान जवळ येऊन ठेपल्यावर कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अकस्मात अंतरात्मा आठवला आहे. आपापल्या अंतरात्म्याला स्मरून प्रत्येकाने या निवडणूकीत मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किमान आपल्या बाजूने असलेल्या वा भाजपा विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या कोणाही आमदार खासदाराने भाजपाच्या बाजूने मतदान करू नये; म्हणून शपथ घातल्यासारखे हे आवाहन आहे. अंतरात्म्याच्या आवाजाशी सोनिया गांधींना कधीपासून कर्तव्य जाणवू लागले? अंतरात्म्याचा आवाज म्हणजे आपल्या विवेकाला स्मरून योग्य, अशा बाजूने उभे रहायचे असते आणि त्यासाठी होईल ते नुकसान सोसण्याची हिंमत बाळगावी लागत असते. तशी हिंमत कोणी दाखवली तर सोनिया त्यांच्या बाजूने ठामपणे समर्थनाला उभ्या रहातील काय? आजवर त्यांनी कधी आपल्याच अंतरात्म्याचा आवाज ऐकून निर्णय घेतला आहे काय? त्यांच्याच पक्षातल्या अनेकांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून सोनियांना अनेकदा साकडे घातलेले होते. त्याची सोनियांनी किती दखल घेतलेली होती? जयंती नटराजन यांनी आपल्यावर पक्षात व श्रेष्ठींकडून अन्याय झाल्याचे सविस्तर पत्र, सोनियांना व राहुलना लिहिले होते. सोनियांनी कधी त्याची दखल घेतली होती काय? पंधरा महिने प्रतिक्षा केल्यावर जयंती नटराजन आपल्या पत्राची प्रत घेऊन माध्यमांसमोर आल्या आणि राहुल गांधींनी आपला राजकीय बळी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाचा खुलासा करावा किंवा त्यानुसार कारवाई करावी, असे सोनियांच्या अंतरात्म्याने त्यांना कधी सुचवलेच नाही काय? की सोनियांना हा फ़क्त शब्द ठाऊक आहे आणि त्याचा अर्थच उमजलेला नाही. ज्यांना स्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांच्या अंतरात्म्याने दिलेला आवाज ऐकू येत नाही, त्यांनी इतर पक्षातल्यांना अंतरात्म्याचे आवाहन करणे, हा विनोद नव्हे काय?
आज राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकू शकत नाही, तेव्हा सोनियांना अन्य पक्षातल्या लोकांचा अंतरात्मा आठवला आहे. पण जेव्हा त्यांच्याच घरात वा पक्षामध्ये अंतरात्म्याचे आवाज उठत होते, तेव्हा सोनिया कुठल्या कापसाचे बोळे कानात घालून बसल्या होत्या? गेल्या वर्षाच्या अखेरीस राहुल गांधी उत्तरप्रदेश विधानसभेच्या प्रचारासाठी फ़िरत होते, भाषणे ठोकत होते. तेव्हा उत्तरप्रदेशच्या माजी कॉग्रेस नेत्या रिटा बहुगुणा यांचा अंतरात्मा जागा झाला होता, टाहो फ़ोडून त्यांनी राहुल पक्षाला उत्तरप्रदेशात बुडवित असल्याचे सांगितले होते. तो आक्रोश सोनियांना ऐकू आलाच नव्हता काय? असे अनेक कॉग्रेसजन अंतरात्म्याचा आवाज ऐकून पक्षाला राहुलपासून वाचवण्यासाठी सातत्याने गदारोळ करीत राहिलेले आहेत. त्यापैकी कितीवेळा सोनियांनी कानातले ममतेचे बोळे काढून पक्षातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची हिंमत केलेली होती? तसे केले असते, तर एकामागून एक निवडणूकात कॉग्रेसचा धुव्वा उडाला नसता, किंवा मोदींना इतक्या सहजपणे लोकसभेची वा अन्य विधानसभांची निवडणूक जिंकता आली नसती. पण अशा कुठल्याही प्रसंगी सोनियांनी आपल्या कानातले बोळे काढले नाहीत, की इतरांच्या अंतरात्म्याचा आक्रोश ऐकला नाही. त्यामुळे आज त्यांना पदोपदी पराभवाचा सामना करावा लागतो आहे. पण तरीही त्यांना प्रामाणिक लोकांच्या अंतरात्म्याचा आक्रोश ऐकण्याची हिंमत गोळा करता आलेली नाही. किंबहूना अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याइतका प्रामाणिकपणाच त्यांच्यापाशी नसावा. म्हणून ही दुर्दशा झालेली आहे. तसे नसते तर मीराकुमार हे नाव त्यांनी खुप आधीच जाहिर केले असते आणि त्यासाठी अन्य विरोधकांशी आधीपासून सल्लामसलत केली असती. कोविंद यांचे नाव जाहिर झाल्यानंतर धावपळ करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती, की अंतरात्मा आठवला नसता.
सोनियांना वा राहुल यांच्यासह अंतरात्मा नावाची पोपटपंची करणार्यांना, तरी खराखुरा अंतरात्मा कसा असतो आणि कसा बोलतो, हे ठाऊक आहे काय? असते तर त्यांनी उत्तराखंड राज्यात आपला इतका बोर्या वाजवून कशाला घेतला असता? तिथे मागल्या खेपेस बहूमत मिळाल्यावर हरीश रावत यांना मुख्यमंत्री करावे, अशीच आमदारांची आंतरीक इच्छा होती. तर त्यांना बाजूला ठेवून कुठलाही अनुभव नसलेल्या विजय बहुगुणा नावाच्या नेत्याला लोकांच्या माथी कशाला मारले असते? त्याने पक्षाला तिथे बुडवल्यानंतर काही आमदारांचा अंतरात्मा जागा झाला आणि त्यांनी हरीश रावत यांच्या विरोधात बंड पुकारले. तर सोनिया व त्यांचे एकाहून एक मोठे वकील कोर्टात जाऊन त्या आमदारांची पात्रता रद्द करण्याची लढाई लढत कशाला बसले होते? ज्यांना पक्षातून बाहेर पडायचे होते, त्यांना श्रेष्ठीचा आदेश अमान्य करण्याचे स्वातंत्र्य तेव्हाही देता आले असते. कारण तो त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज होता. पण त्या अंतरात्म्याची गळचेपी करून सोनियांनी काही महिने उत्तराखंडात आपल्या पक्षाची सत्ता टिकवण्याची कसरत केलेली होती. तीच कहाणी अरुणाचल विधानसभेच्या बाबतीत सांगता येईल. तिथे त्यांच्याच पक्षाच्या आमदारांचा अंतरात्मा कॉग्रेसची सत्ता बदलायला उत्सुक झालेला होता. सोनियांनी त्याचा आवाज ऐकला होता काय? कोर्टापासून अनेक कसरती करून, मुख्यमंत्री बदलून सत्ता टिकवण्याने काय साध्य झाले? अखेरीस सगळेच आमदार बाजूला झाले व पक्षाने तिथली सत्ता गमावली. हे सर्व अंतरात्म्याच्या आवाजाचे किस्से आहेत. त्यात सोनिया कधी अंतरात्म्याला प्रतिसाद देताना दिसल्या नाहीत. जेव्हा आपला वा स्वपक्षीयांचा अंतरात्मा बोलत होता, तेव्हा सोनिया कायम कानात बोळे घालून बसल्या होत्या. पण आज त्यांचा अंतरात्मा पराभवाची ग्वाही देतो आहे, तेव्हा त्यांचा इतरांचा अंतरात्मा आठवला आहे.
कोळसा खाण घोटाळा वा टुजी घोटाळा असे एकाहून एक घोटाळे समोर आणले जात होते, तेव्हा सोनियांनी कुंभकर्णाने बनवलेल्या खास गोळ्या खाऊन झोप काढली होती. स्वपक्षातील कोणाचा आंतरात्मा जागा झाला, तर त्याची गठडी वळून त्याला पक्षाबाहेर हाकलण्याचे निर्णय सोनिया कुणाचा आवाज ऐकून घेत होत्या? तुमच्या पक्षातल्या कोणी अंतरात्म्याचा आवाज ऐकला व त्याचा नुसता प्रतिध्वनी काढला, तरी गुन्हा असतो ना? मग इतरांना आज सोनिया गुन्हा करण्याच प्रोत्साहन देत आहेत काय? उत्तरप्रदेशच्या कोणा पदाधिकार्याने आपल्या सोशल मीडियात अंतरात्म्याला भावलेला शब्द म्हणून, आपला लाडका नेता राहुल गांधी यांचे ‘पप्पू’ नावाने कौतुक केले. त्याच्या अंतरीच्या कळा कधी सोनियांना जाणता आल्या होत्या काय? अंतरीच्या कळा वा अंतरात्म्याचा आवाज ही अस्सल भारतीय संकल्पना आहे, याची जाणिव सोनियांना कशी असावी? पण आज अकस्मात त्यांना कोणी शहाण्याने भाषणात शब्द लिहून दिला, म्हणून अंतरात्मा नावाचे काही असल्याचे उमजलेले असावे. त्यांनी बिनधास्तपणे इतर पक्षाच्या लोकांना अंतरात्म्याचा आवाज ऐकून राष्ट्रपती निवडण्याचे आवाहन केले. पण इतर पक्षांपेक्षा त्यांच्याच पुरोगामी गोटातल्या अनेकांचा अंतरात्मा खडबडून जागा झाला आणि त्यांनी पुरोगामी युपीए पाखंडाला लाथाडून भाजपाच्या कोविंद यांना मत देण्याचा पर्याय स्विकारला. थोडक्यात जे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जमले नाही, ते अन्य पक्षातले व युपीएतले खासदार आमदार कोविंद यांच्या पाठीशी आणुन उभे करण्याचे महत्कार्य सोनियांनी अंतरात्म्याला जागवून केलेले आहे. अन्यथा ऐन मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी, तृणमूल वा समाजवादी पक्षातल्या अनेकांनी भाजपाच्या उमेदवाराला कशाला मतदान केले असते? या लोकांनी पक्षाची भूमिका झुगारत मीराकुमारना विसरून कोविंद यांना कशाला मते दिली असती?
Chhan lekh, pan khup jast antaratma zala
ReplyDelete