Tuesday, July 18, 2017

लालूंची ‘अनुमान’ चालीसा

lalu family cartoon के लिए चित्र परिणाम

अठ्ठावीस वर्षापुर्वी देशाच्या राजकारणात बोफ़ोर्स तोफ़ांनी धडाडत होत्या. त्या तोफ़ांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊन इतका धुरळा उठला, की त्यात ऐतिहासिक विजय संपादन केलेल्या राजीव गांधी, या कॉग्रेस नेत्याचा राजकीय अस्त घडवून आणला. त्याच निवडणूकांनी व बोफ़ोर्स तोफ़ांनी देशाच्या राजकारणातील कॉग्रेसचा पाया पुरता उखडून टाकला. पण त्याचवेळी संपुर्ण राजकारणही गढुळ करून टाकले. विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे नवे पंतप्रधान झाले आणि त्यांच्यापाशी पुर्ण बहूमत नव्हते. पण त्यांना दोन मोठ्या राजकीय गटांनी बाहेरून पाठींबा दिल्यामुळे ते देशाचे म्होरके झालेले होते. त्यात राखेतून पुन्हा उभा राहिलेला भाजपा एका बाजूला होता, तर वैचारिकदृष्ट्या दुसर्‍या टोकाला बसलेली डावी आघाडीही होती. या दोन परस्पर विरोधी टोकाला वसलेल्या वैचारिक शत्रुंच्या पाठींब्यावर, व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले होते. पण अशा विरोधाभासाचा तोल संभाळणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. हे केवळ वैचारिक मतभेद हीच तेव्हाच्या राजकारणाची समस्या नव्हती. नवी घराणेशाही जन्माला आलेली होती. सिंग यांनी आपल्या सरकारमध्ये उपपंतप्रधानाची नेमणूक केलेली होती. ते होते हरयाणाचे वृद्धपुरूष म्हणून ओळखले जाणारे चौधरी देवीलाल! निवडणूका झाल्या, तेव्हा देवीलाल हरयाणाचे मुख्यमंत्री होते आणि आपल्या अनुपस्थितीत हरयाणाची ‘जायदाद’ कोणी संभाळायची; अशी त्यांच्यासमोर समस्या होती. पण त्यांनी आपल्या थोरल्या पुत्राला त्या जागी बसवून ती समस्या चुटकीसरशी सोडवली होती. त्याचा खुप गाजावाजा झालेला होता. कारण हा देशातला पहिला मुख्यमंत्री असा होता, की त्याचा शपथविधी गुपचुप राज्याबाहेर उरकण्यात आलेला होता. आपल्याला आज बिहारच्या लालूंचे राजकारण समजून घ्यायचे असेल, तर त्याची सुरूवात ओमप्रकाश चौताला यांच्यापासून करावी लागेल.

१९८९ सालात देवीलाल यांनी उपपंतप्रधान झाल्यावर हरयाणाच्या राज्यपालाला दिल्लीत बोलावून घेतले आणि तिथेच त्याच्याकडून आपल्या सुपुत्र चौतालाचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून घेतला. त्यासाठी कुठली आमदारांची बैठक झाली नव्हती, की तशी सूचना राज्यपालांना देण्यात आलेली नव्हती. उपपंतप्रधानाचा आदेश मानुन राज्यपालाने चौताला यांचा शपथविधी उरकला होता. पण बातमी जाहिर होताच गदारोळ झाला आणि त्यावर चौधरी देवीलाल यांनी दिलेला खुलासा नंतरच्या काळामध्ये देशात सर्व पातळी्वर रुजलेल्या घराणेशाहीचे बीज असल्याचे आपल्याला लक्षात येऊ शकते. पत्रकारांनी देवीलाल यांना पुत्रप्रेमाविषयी प्रश्न विचारले. तेव्हा चौधरीसाब काय उत्तरले होते? सर्वात विश्वासाचा आपला पुत्रच असतो ना? हरयाणाच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून विधानसभेत बहूमत दिले आणि आता ते पद सोडायचे तर मला माझ्या विश्वासातीलच व्यक्तीला तिथे बसवावे लागणार ना? त्यांचीही चुक नव्हती. त्यापुर्वी तसा पायंडा देशाचे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी पाडलेला होताच. इंदिराजींची हत्या झाल्यावर नव्या पंतप्रधानांची निवड कॉग्रेसच्या संसद सदस्यांनी केलेली नव्हती. अरुण गांधी व अन्य काही सहकार्‍यांनी राष्ट्रपतींना गळ घातली व त्यांनी विनाविलंब राजीव गांधी यांना पंतप्रधान म्हणून शपथविधी उरकून घेतला होता. तर काही पत्रकारांनी हंगामी पंतप्रधान अशी राजीव यांची बोळवण केली होती. पण अशी काही तरतुद घटनेत नसल्याने राजीवच अधिकृत पंतप्रधान असल्याचा खुलासा, तेव्हा अरूण गांधी यांनी केला होता. आईचा मृत्यू झालेला असतानाही तिच्या अंत्यविधीपेक्षा राजसत्तेचा शपथविधी प्राधान्याचा असल्याचा नवा राजकीय पायंडा तेव्हा घातला गेला. पुढे त्याची पुनरावृत्ती देवीलाल व इतरांनी आपापल्या पातळीवर करत नेली. लालू त्याच परंपरेला जपण्याचे राजकारण आज करीत आहेत.

कुठल्याही राजकीय नेत्याने लोकांचा विश्वास संपादन केला, मग त्याला राजपद प्राप्त होते, अशी लोकशाहीची कार्यशैली आहे. आपल्याकडे त्या राजपदाचे दैवीकरण झाले असून, तो वारसा हक्क बनवण्यात आला आहे. देवीलाल यांनी आपल्या पुत्राला परास्पर मुख्यमंत्रीपदी बसवले, तेव्हाच बिहारमध्ये लालूप्रसाद यादव नावाच्या नव्या नेत्याचा उदय झाला होता. लक्ष्मीनारायण मिश्रा व जगन्नाथ मिश्रा अशा दोन राजकीय बंधूंच्या मुठीतून मुक्त व्हायला उतावळ्या झालेल्या बिहारने नवख्या जनता दल पक्षाला सत्ता दिली. त्या पक्षाने लालूंना मुख्यमंत्रीपदी बसवले. पुढल्या काही राजकारणाने लालूंची देशव्यापी ख्याती झाली. सरकारला पाठींबा दिलेल्या भाजपाने मग अयोध्येतील मंदिराच्या उभारणीला वेग येण्यासाठी पुन्हा रथयात्रा सुरू केली आणि ती अडवण्याचा पराक्रम बिहारमध्ये सम्स्तीपुर येथे लालूंनी केला. त्यामुळे मग लालू एकदम देशव्यापी झाले. अडवाणींना अटक करून लालूंनी धमक दाखवली असा गवगवा होऊन, त्यांनाच मग पक्षाचे अध्यक्षही बनवले गेले. दरम्यान सरकारे पडत होती आणि बनत होती. मात्र बिहारमध्ये लालूंचे बस्तान पक्के होते. अगदी त्यांच्या निकटवर्तियाने डाव्या आघाडीच्या एका आमदाराचा मुडदा पाडला व डाव्या विद्यार्थी नेत्याची हत्या लालूंच्याच सहकार्‍याने केली असतानाही; डावे पक्ष लालूंच्या पाठीशी ठाम उभे राहिले होते. आपल्या कुणाचा मुडदा पाडणार्‍यांनाही सेक्युलर म्हणून पाठींबा देण्याची ही डावी रणनिती, आज खुप फ़ुलली व फ़ळली आहे. तर त्यामुळे लालूंचा बिहारमध्ये इतका जम बसला, की त्यांना आपल्याच जुन्या सहकार्‍यांची गरज वाटेनाशी झाली. फ़ार कशाला त्यांना पक्षाच्याही कुबड्या नकोश्या झालेल्या होत्या. त्यातून एक वेळ अशी आली, की लालूंनी आपला वेगळा घरगुती कौटुंबिक पक्षही काढला आणि जुन्या समाजवादी चळवळीशी पुरती फ़ारकत घेऊन टाकली. त्यांचे राजकारण घराण्याची मालमत्ता होत गेले.

१९९६ सालात आपले राजकीय गुरू जॉर्ज फ़र्नांडीस यांनाही लालूंनी धुडकावून लावले. त्यातून त्यांनी एक घोषणाच केली. ‘जबतक रहेगा समोसेमे आलू, तबतक रहेगा बिहारमे लालू!’ त्यांचे शब्द पुढली दोन दशके खरे होत राहिले. १९९६ सालात कॉग्रेसचा पडता काळ सुरू झाला आणि प्रथमच भाजपा लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. पण त्याच्या पाठीशी बहूमत नव्हते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नकारात्मक राजकारणाने देवेगौडा या नगण्य नेत्याला देशाचा मोठा नेता करून टाकले. त्यात मजा अशी होती, की लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला होता आणि इतर सर्व पक्ष आघाडी म्हणून सत्तेच्या बाजूने राहिले होते. त्याच काळात लालूंच्या मागे खरे शुक्लकाष्ट लागले. त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत चारा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे म्हणून पक्षातूनच दडपण आले. तेव्हा देवीलाल यांच्या या वारसाने अवघ्या राजकीय जाणत्यांना चकीत करून टाकले. लालूंनी एका रात्री सत्तेचा राजिनामा देऊन टाकला आणि आता कोण मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा शहाण्यांमध्ये चालू होती. तर लालूंनी आपली गृहीणी पत्नी राबडीदेवी हिचा शपथविधी उरकून घेतला. ज्या महिलेला कधी सार्वजनिक जीवनाचा कुठला अनुभव नव्हता, ती अकस्मात मुख्यमंत्री बनुन गेली. तिला भाषण म्हणून दोन शब्दही बोलणे शक्य नव्हते. पण त्याची काय गरज होती? लोकांनी लालूंवर विश्वास ठेवलेला होता आणि लालूंनी आपला विश्वास राबडीदेवी यांच्यावर व्यक्त केला होता. जिथे डोकी मोजण्याची लोकशाही घटनात्मक आहे, तिथे बहूमताचा आकडा हीच पात्रता होऊन गेल्यास नवल नाही. मग बिहारमध्ये काय काय अराजक माजत गेले त्याचा तपशील इथे देण्याची गरज नाही. पण राबडीदेवी पुढली आठनऊ वर्षे बिहारमध्ये सत्तेत कायम राहू शकल्या. अशी लालूंच्या राजकारणाची पुराणकथा आहे. त्याला लालूचालिसा असेही म्हटले जाते.

लालू आणि बिहार यांची प्रेमकहाणी १९८९ सालात सुरू झाली आणि ती तब्बल सोळा वर्षे चालली. योगायोग असा, की लालू मुख्यमंत्री झाले त्याच दरम्यान १९८९ सालात राबडीदेवींनी आणखी एका सुपुत्राला जन्म दिला होता. दोन माजी मुख्यमंत्र्यांचे हे अपत्य, आज तेजस्वी नावाने ओळखले जाते आणि तोच बिहारचा उपमुख्यमंत्री सुद्धा आहे. खेरीज आणिबाणीत लालू तुरुंगात असताना त्यांना पहिले कन्यारत्न झाले होते. तिचे नावशी लालूंनी त्या राजकारणावर ठेवलेले होते. लालू तेव्हा मिसा या कायद्याखाली स्थानबद्ध होते. म्हणून या पहिल्या मुलीचे नाव मिसा भारती ठेवलेले आहे. ती लालू मुख्यमंत्री असताना वैद्यकीय शिक्षण घेत होती आणि परिक्षेत ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मात्र लालू ऐन भरात असताना यापैकी कोणी वारस समजदार झालेला नव्हता. त्यामुळे लालूंना इतरांवर विश्वास दाखवणे भाग होते. पत्नीला त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवले होते आणि मग इतर जागांसाठी त्यांनी राबडीदेवींच्या भावांना पुढे केले. साधू यादव किंवा अन्य मेहुणे मधली काही वर्षे लालूंसाठी सत्तापेदे उपभोगत होते. लालू चारा घोटाळ्यात फ़सलेले असले तरी त्यांनी कायद्याला दाद दिली नाही आणि आपल्या राजकारणात कॉग्रेससह डाव्यांना ओढून यशस्वीपणे सत्ता मुठीत राखलेली होती. त्यांची सत्ता टिकवायला कॉग्रेसने मदत केली होती आणि पुढल्या काळात त्यांची सोनिया गांधींशी गट्टीच जमली. मग काय लालूंनी कॉग्रेस पक्षाशी अशी सोयरिक केली, की त्यांच्या कौटुंबिक गुन्ह्यातही कॉग्रेस ठामपणे लालूंच्या पाठीशी उभी रहात गेली. २००४ सालात युपीए तयार झाली आणि लालू केंद्रात मंत्री झाले व त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या. कॉग्रेसला त्यांचा उपयोग राहिला नव्हता. म्हणून २००९ सालात ही सोयरिक संपुष्टात आली. पण भाजपा विरोधाच्या राजकारणात लालू अतिशय बिलंदरपणे तमाम पुरोगामी पक्षांना खेळवत राहिले.

लालूंच्या या सापळ्यात शेवटचा फ़सलेला राजकीय नेता म्हणून आपण नितीशना पाहू शकतो. मोदींच्या विरोधाचा अतिरेक करताना लालू विरोधात नावारूपाला आलेल्या नितीशनी अखेर तीन वर्षापुर्वी लालूंना शरण जाण्याचा निर्णय घेतला. त्याला पर्यायही नव्हता. मोदींनी लोकसभेत बाजी मारली होती आणि स्वबळावर मोदींना पराभूत करणे, नितीशच्या आवाक्यातले नव्हते. म्हणूनच त्यांनी आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्याची नामुष्की आल्यावर लालूंशी आघाडी केली. त्यात कॉग्रेसला सहभागी करून घेतले. आज भारतीय राजकारणात त्या आघाडीला महागठबंधन म्हणून ओळखले जाते. पण अशा सर्व घडामोडीत कुत्र्याचे शेपूट नळीत घातल्याने सरळ होईल, असला आशावाद खुळा असतो आणि तेच आता नितीश नव्याने शिकत आहेत. मोदी विरोधात जाऊन एनडीए आघाडी सोडण्याची किंमत त्यांनी लोकसभेत मोजली होतीच. पण ती त्यांची कमजोरी समजून लालू नितीशना सतत खेळवत राहिले. आपल्या दोन्ही पुत्रांना मंत्रीमंडळात घ्यायला भाग पाडून, लालूंनी पुन्हा बिहारमध्ये आपली दहशत माजवलीच. पण विविध घोटाळे करून ठेवले. अर्थात घोटाळे करायचे नसतील तर सत्ता हवी कशाला आणि सत्तेत आपल्याच कुटुंबातले सगेसोयरे तरी हवे कशाला? हा लालूंचा बाणा आहे आणि त्याचीच झळ आता नितीश यांना बसू लागली आहे. लालूंनी माजवलेले अराजक संपवण्यातून नितीश भाजपाच्या मदतीने बिहारमध्ये आपली राजकीय प्रतिमा उभी करू शकले होते. त्यावर लालूंच्या संगतीने आधीच प्रश्नचिन्ह लागलेले होतेच. आता लालूंचे पुत्र कन्या यांच्या भानगडी चव्हाट्यावर आल्या आहेत आणि त्यांच्यामागे विविध तपास चौकशा लागलेल्या असल्याची फ़िकीर लालूंना नाही. पण अशा लोकांच्या संगतीत बसल्याने नितीशच्या चारित्र्याला कलंक लागतो आहे. त्यातून आता बिहारचा नवा पेचप्रसंग उभा राहिला आहे. नितीश किती सहन करणार आणि महागठबंधनाचे भवितव्य काय?

लालू ज्यांचा वारसा आजच्या काळात चालवित आहेत, त्याच वाटेने घटनाक्रम चालला आहे. १९८९ सालात ज्या लाडक्या पुत्राला चौधरी देवीलाल यांनी हरयाणाची सत्ता सोपवली होती, ते ओमप्रकाश चौताला आज गजाआड जाऊन पडलेले आहेत. त्यांच्या पुत्रालाही मोठी शिक्षा शिक्षक भरती प्रकरणात झालेली आहे. लालूंची कथा कितीशी वेगळी आहे? लालू स्वत: चारा घोटाळ्यात दोषी ठरले असून त्यांना निवडणूका लढण्यावरही प्रतिबंध लावला गेला आहे. जामिनावर ते मुक्त आहेत आणि आता त्यांची कन्या मिसा भारती व जावई सीबीआय व आयकर खात्याच्या चौकशीत फ़सलेले आहेत. तिथे त्यांची कसून चौकशी चालू आहे आणि अनेक मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आले, तेव्हा लालू कुटुंबाने त्याचा साफ़ इन्कार केलेला होता. पण मालमत्ता जप्त झाल्या व चौकशीला हजेरी लावावी लागली तेव्हा त्यांची तोंडे बंद झालेली आहेत. आता उपमुख्यमंत्री तेजस्वी यानेही त्याच्यावरील आरोपाचा साफ़ इन्कार केला आहे. त्याला गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी म्हणतात. लालूंनी तरी आरंभी आपला चारा घोटाळ्यातील संबंध कुठे मान्य केला होता? पण त्यात शिक्षा झाली असताना ते आपले भ्रष्ट कर्तव्य सोडून बसले नव्हते. नवनवे घोटाळे करीतच हो्ते. किंबहूना सत्ता व राजकारण भ्रष्टाचार व लूटमार करण्यासाठीच असते, असा ठाम विश्वास असल्याशिवाय त्यांना इतकी मोठी मजल मारणे शक्यच नव्हते. पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवला की शहाणेसुर्तेही आपल्या बौद्धिक समर्थनाला उभे रहाणार, असा आत्मविश्वास नसता तर लालू कुटुंबिय असे धाडसी बेछूट घोटाळे करू शकले नसते. संपत्ती व सत्तेची लालूंची लालसा जन्मजात असावी. त्यात कुठल्याही पुराणकथेला लाजवील इतकी उपकथानके आहेत. भविष्यात कोणी त्यावर हनुमान चालिसा असते तशी लालूचालिसाही लिहून काढील. आज मात्र आपण त्यावर अनुमान काढून व्यथापुराण सांगू शकतो.

2 comments:

  1. समोसेमे आलु है, बिहार में लालू है,अभी लेकिन पैरो के नीचे खिसक रही वालू है।

    ReplyDelete
  2. अरुण गांधी नसून ते अरुण नेहरू होते

    ReplyDelete