गेल्या महिन्याभरात भारत चीन सीमेवर सिक्कीमच्या भागात बर्याच हाणामार्या सुरू झालेल्या आहेत. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतीय पंतप्रधानांना खास आमंत्रण देऊन अमेरिकेला बोलावले आणि शिखर बोलणी करण्याचा प्रस्ताव मांडला; तेव्हापासून चीनला अकस्मात पोटदुखीचा विकार जडलेला आहे. त्यानंतरच ह्या गडबडी सुरू झालेल्या आहेत. त्यात सीमेवरील भारतीय सेनेचे खंदक उखडून टाकणे व भारतीय सैनिकांशी झोंबाझोंबी करणे; असे अनेक प्रकार चालू आहेत. केवळ सीमेवरच हा प्रकार रंगलेला आहे असेही मानायचे कारण नाही. राजनैतिक व मुत्सद्देगिरीच्या प्रांगणातही चीनने कुरबुरी सुरू केल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब चीनच्या सरकारी इंग्रजी मुखपत्रामधील चर्चेत पडलेले असते. ‘ग्लोबल टाईम्स’ नामक या वर्तमानपत्रात आजकाल मोठ्या प्रमाणात भारताला इशारे देण्याचे काम चालू झालेले आहे. चीनच्या एका प्रवक्त्याने अलिकडेच भारताला १९६२ सालच्या लज्जास्पद पराभवाची आठवण करून दिलेली आहे. तो इतिहास भारताने कधी नाकारलेला नाही आणि त्यातून बाहेर पडण्याची पराकोटी केलेली आहे. त्यानंतरच भारताने पाकिस्तानशी दोन युद्धे जिंकलेली आहेत आणि त्यापैकी एका युद्धात पाकिस्तानचे तुकडे पाडून आशियाचा राजकीय भूगोलही बदलला आहे. पण चीन मात्र अजून १९६२ सालाच्या इतिहासातून बाहेर पडायला राजी दिसत नाही. किंबहूना आपण अलिकडल्या कालखंडात कमालीचा बदलून गेलेला देश आहोत आणि धमक्या देण्य़ाइतकी आपली कुवत राहिलेली नाही, याचेही भान चिनी मुत्सद्दी विसरून गेलेले असावेत. भारताला १९६२ च्या पराभवाची आठवण करून देणार्यांना इवल्या व्हीएतनाम देशाकडून आपल्या महान लालसेनेला माघार कशाला घ्यावी लागली; त्याचे स्मरण उरलेले नाही काय? असते तर त्यांनी भारताला १९६२ ची आठवण करून देण्याचा आगावूपणा केला नसता.
मागल्या तीनचार दशकात आपल्या प्रचंड लोकसंख्येचा कच्चा माल म्हणून वापर करताना चीनने प्रगत पाश्चात्य देश व अन्य ठिकाणच्या कंपन्यांना मायदेशी आणून स्वस्तातली मजुरी उपलब्ध करून दिली. त्यासाठी सरकारच मजुर कंत्राटदार होऊन गेले आणि स्वस्तातल्या मजुरीतलाही काही हिस्सा बळकावून, त्याने भांडवल उभारले आहे. ते जगभर गुंतवण्यातून जे काही आर्थिक औद्योगिक साम्राज्य उभे केले, त्यालाच आजचे चिनी राज्यकर्ते महाशक्ती मानत असावेत. पण वस्तुस्थिती तितकीशी खरी नाही. चीनचा विकास बहुतांश प्रमाणात पुर्वेच्या बाजूला केंद्रीत झालेला आहे आणि पश्चीम भागामध्ये आजही जुनेच दारिद्र्य व गरीबी नांदते आहे. त्या गरीबीची मुस्कटदाबी चालू असल्याने असंतोषाचा ज्वालामुखी दबलेला आहे. संधी मिळाल्यास तो उफ़ाळून येऊ शकतो. अधिक जागतिक महत्वाकांक्षा बाळगताना चीनने जगभर केलेली गुंतवणूक तशी लाभदायक मानता येणार नाही. तात्कालीन लाभ बघूनच अशी गुंतवणूक झालेली आहे. प्रामुख्याने शेजारी पाकिस्तानात केलेली मोठी गुंतवणूक एकूणच जिहादी संकटाने व्यापलेली आहे. अशा स्थितीत भारताला युद्धाच्या धमक्या देण्याच्या परिस्थितीत चीन नाही. कारण तो आता पुर्वीसारखा नुसता कोट्यवधी लोकसंख्येचा देश नसून व्यापक उद्योगक्षेत्र पसरलेला देश आहे. त्याला आपल्या उद्योगांना युद्धाच्या खाईत लोटण्याची हिंमत सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणूनच नुसत्या पोकळ धमक्या देणे किंवा हुलकावण्या देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि १९६२ च्या युद्धाचे स्मरण करून देणे, नुसत्याच वल्गना आहेत. तितक्या शक्तीनिशी युद्धात उतरण्याची सवयही आता चिनी लालसेनेला राहिलेली नाही. दिखावू समारंभात पाय आपटून संचलन करण्याने कोणी युद्धसज्ज सेना होत नाही. त्यापेक्षा कमी साधनातही भारतीय सेना अधिक सज्ज आहे. कारण आपण मागली दोन दशके जिहादला तोंड देत आहोत.
मागल्या सात दशकात चीनने किती युद्धे केली आणि किती विजय साजरे केले? त्याची इतिहासात कुठे नोंद नाही. दुसर्या महायुद्धानंतर जगातले अनेक देश स्वतंत्र झाले आणि अनेक देशात कम्युनिस्ट क्रांतीही झाली. त्यातलाच एक देश चीन आहे. आरंभी माओच्या नेतृत्वाखाली जी आक्रमकता चीन दाखवू शकला व त्याने तिबेट घशात घातले, त्याला लालसेनेच्या पराक्रमापेक्षा भारताचे नेभळट नेतृत्व जबाबदार होते. चिनी फ़सव्या मैत्रीत गुंतून पडलेल्या नेहरूंनी भारतीय सेना पांगळी ठेवूनच चिनी सेनेला रेल्वेगाडीतली जागा काबीज करावी, तसा तिबेट खाऊ दिला होता. त्यापेक्षा १९६२ च्या युद्धाची महत्ता अधिक नाही. पण त्याहीपेक्षा चीनची खरी कसोटी व्हीएतनाम स्वतंत्र झाल्यावरच्या संघर्षात लागलेली आहे. त्या इवल्या नवस्वतंत्र देशाला आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयास चीनने लालसेनेला पुढे करून केलेला होताच. त्याचे फ़लित काय होते? अल्पावधीतच लालसेनेला शेपूट घालून व्हीएतनामच्या भूमीतून माघार घ्यावी लागलेली होती. तेव्हा व्हीएतनाम दिर्घकालीन युद्धाने उध्वस्त झालेला देश होता आणि सावरलेलाही नव्हता. तरी त्याच्यासमोर लालसेनेला टिकाव धरता आला नाही. अशा लालसेनेचे कौतुक आज चिनी मुत्सद्दी कोणाला सांगत आहेत? व्हीएतनामच्या तुलनेत भारतीय सेना खुप मोठी व सुसज्ज आहे आणि पाकिस्तानच्या कृपेने सतत प्रात्यक्षिकात राहिलेली आहे. तितकी चिनी लालसेना युद्ध वा तत्सम परिस्थितीला सज्ज राहिलेली नाही. पैसा व संख्या अधिक साधने दाखवून व्हीएतनामला झुकवता आले नाही, ते भारतीय सेनेला फ़क्त हुलकावण्या देतील. बाकी अधिक काही करू शकणार नाहीत. खरे तर चीनला वेसण घालण्यासाठीच अमेरिका भारताशी दोस्ती वाढवते आहे, त्याच्या चिंतेने चीनला घाम फ़ुटला आहे. म्हणून मग सिक्कीम भूतानच्या सीमेवर लपंडाव खेळला जात आहे.
भारताचे हंगामी संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी त्याच दुखण्यावर बोट ठेवलेले आहे. १९६२ आणि २०१७ यात मोठा फ़रक आहे असे जेटली म्हणतात, त्याचा हाच अर्थ आहे. १९६२ इतकी आजची चिनी लालसेना युद्धाला उत्सुक व सज्ज राहिलेली नाही. तेव्हाची लालसेना राजकीय भूमिकेने प्रेरीत होती, ती वैचारिक धारणा आता त्यात राहिलेली नाही. चीनमध्ये आज ते क्रांतीच्या पिढीचे नेतृत्व राहिलेले नाही आणि गरीबीत हाल काढण्याचे अनुभव तिथल्या नेतृत्वापाशी नाहीत. गरीबीत गमावण्यासारखे काही नसते. पण जेव्हा संपती व ऐश्वर्याची साधने गोळा होतात, तेव्हा लढायची हौस कमी होते. नुकसानाची भिती सतावते आणि तडजोडीला प्राधान्य मिळत असते. शक्य तितक्या हुलकावण्या देऊन व दमदाटीने हेतू साध्य करण्याची मुत्सद्देगिरी त्यातूनच येत असते. चिनीची आजची भाषा त्यापेक्षा वेगळी नाही. म्हणूनच तिथल्या मुत्सद्दी मंडळीने १९६२ चा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी आल्यावर आणि त्यांनी बांगला देश युद्ध पुकारल्यावर चिनी नेते आपल्या पाकिस्तानी मित्राच्या मदतीलाही उभे राहिले नव्हते. अशा लोकांनी डरकाळ्या फ़ोडाव्यात. त्यांचा ड्रॅगन चित्रात कितीही भयंकर दिसत असला, तरी व्यवहारात त्याच्या नाकातोंडात धुर केला तर घुसमटू लागणार आहे. ड्रॅगनचे दिवस पुराणकालीन झाले असून सोयीनुसार रंग बदलणार्या सरड्याने ड्रॅगनच्या आवेशात बोलणे सोपे असले, तरी आग ओकण्याची कल्पनाही त्याला सोसणारी नसते. ही आजच्या चीनची वस्तुस्थिती आहे. लढाई नको म्हणून संयमाने वागणार्या भारताला आव्हान देणे चीनच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही. कारण युद्धाची भिती जितकी भारताला आहे तितकीच चीनलाही आहे. दोघांना युद्ध नको असेल, तर एकाने हुलकावण्या देऊन काय साध्य होणार आहे? सीमेवर आट्यापाट्या खेळण्यापेक्षा टेबलवर बसून वाटाघाटी शहाणपणाचा मार्ग असतो.
आज पाक समस्या काय वा चीन काय नेहरू ंमुळे निर्मान झाल्या आहेत.व त्यांनी पोसलेले डावे लोक आजही तेच तेच उगळत आहेत.बन मोदीजी विचारत नाहित
ReplyDeleteभाऊ अत्यंत समर्पक लेख..
ReplyDeleteव भारतीयांचे (रेसीडेंट नाॅन इंडियन सोडुन (म्हणजे जे केवळ मालिका क्रिकेट सामने हस्य मालिका व परिवार सुखात मश्गुल आहेत) मनोधैर्य वाढविणारा लेख..
गेल्या पंचवीस वर्षात खुप मोठा प्रदेश चिनी लोकांनी बळकावला व अरुणाचल केवळ नाम मात्र भारतात आहे. कारण भारताच्या सुमार नेतृत्वाने कधी आरे ला कारे कधीही म्हटलं नाही. व चिनी मुजोरी करत राहीले. व विदेशी विकाऊ मिडियावाल्यांनी कधी जनतेला समजण्यासाठी हे ठळक पणे चर्चेत आणले नाही. त्यामुळे जनतेला काही कळले नाही तरीही सोशल मिडिया मुळे काही देशवासी याची चर्चा करत होते.
सोनिया गांधी कडे राजीव गांधीचे निधन झाल्यावर आलगद देशाची सुत्रे हातात आली व भारताच्या मुळ ढाच्याला तडे घालवले गेले.
काश्मिर मध्ये सुध्दा पंडीताना परागांदा व्हायला लागले व सरकार मुक पणे बघत राहिले व त्यावर मीठ म्हणुन पंडीताना तुटपुंजी नुकसान भरपाई दिली. त्यामुळे काश्मिरी पंडीता बरोबरच काश्मिरी मुसलमान खवळले.
याच बरोबर 2014 लोकसभा निवडणूकी आधी सोनिया गांधी का चीन दवर्यावर का गेल्या हे पण आमच्या सारख्या सामान्य माणसाला विचार पडला.
या दोवर्यात खर काय साध्य केले हे कधी समजणार नाही..
मोदी सरकारला हे बाहेर काढायला लागेल. तरच देशात काय विरोधी कारस्थान चालवलेले होते हे समजेल.
गेल्या पंचवीस वर्षांत भारताची लष्करी खर्चात एकदम थोडी वाढ झाली व एअरच फोर्स तर कमकुवत झाले कारण लढाऊ विमान खरेदी करण्या कडे जाणुन बुजुन दुर्लक्ष केले गेले..
या सर्व फ्रंटवर केवळ पाच वर्षात मोदी सरकारला प्रगती करण अशक्य प्राय आहे..
मग विकऊ मिडियावाले जस जशा लोकसभा निवडणूका तस तशे काय केले म्हणुन कोल्हेकुई करतील..
मोदी ही सर्व आवाहने कशी पेलतात व परत सत्तेत कशे येतात हे पाहाणे आपल्या हातात आहे.
धन्यवाद भाऊ खूप छान माहिती देणारा वास्तववादी लेख
ReplyDeleteभारतीय सेनेची मनोधैर्य ची बरोबरी कोणतेच देशाची सेना करू शकणार नाही
आर्थिक मुस्कटदाबी कुठल्याही राष्ट्राची होत असेल तर ते गप्प नाही राहू शकणार, चीन हा धूर्त आहे आणि त्यांचे सामर्थ्य पाहता ते आर्थिक मुस्कटदाबी ला बळ वापरून उत्तर देऊ शकतात, युद्ध दोन्ही देशांना परवडणारे नाही सध्यस्थीती मध्ये, पण चीन ला दबाव तंत्र हाच एक मार्ग असू शकतो, जे की अमेरिका भारत करत आहेत
ReplyDelete