Tuesday, July 11, 2017

विचारवंत हा कोण प्राणी आहे?



देशात तीन वर्षापुर्वी सत्तांतर झाले, तेव्हापासून एक नवीच चर्चा सुरू झालेली आहे. ती चर्चा विचारवंत कोण असतो आणि तो कुठल्या गोटातला असतो अशी आहे. कारण नरेंद्र मोदी यांना देशातल्या तमाम बुद्धीमंतांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. अनेकांचा असा समज आहे की कॉग्रेस व पुरोगामी पक्षांचा मोदींनी पराभव केला. पण ते केवळ दिसणारे चित्र आहे. वास्तवात मोदींनी देशभरच्या विचारवंताचा पराभव केला. कारण मोदी जिंकले व देशाचे पंतप्रधान झाले; तर देशाचा सत्यानाश होईल, अशी या सर्व विचारवंतांची भविष्यवाणी होती. आता तीन वर्षे उलटून गेल्यावरही देश निदान टिकून आहे. विचारवंतांच्या पलिकडे जे काही विश्लेषक व अभ्यासक शिल्लक उरतात, त्यांचे मत विचारात घेतले तर देशाचे अजून तरी काही बरेवाईट झालेले नाही. मात्र भाकिते करणार्‍या विचारवंतांचे भलतेच बुरे दिन आलेले आहेत. किंबहूना आपल्या पाठींबा वा समर्थनाशिवाय मोदी नावाचा माणूस इतके दिवस सत्तेत कसा टिकून राहिला, याचे कोडे विचारवंताना सतावते आहे. म्हणूनच एक वेगळीच चर्चा अधूनमधून कानी येत असते, उजवे विचारवंत कुठे आहेत? याच संदर्भातला एक लेख १७ जुन २०१७ च्य दैनिक सकाळमध्ये डॉ. सतीश बागल यांनी लिहीलेला आहे. त्याचा आरंभच त्याची प्रचिती आणुन देतो. ते म्हणतात,

‘गेल्या तीन वर्षांपासून भारतात उजव्या विचारसरणीचे बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. मात्र तरीही सरकारला समर्थन देणारे "उजव्या विचारधारे”चे विचारवंत फारसे नाहीत. उलट इंटेलेक्‍चुअल्स (बुद्धिमंत) व भारतीय जनता पक्ष यांच्यात सातत्याने तणावाचे वातावरण असते. हाती सत्ता असूनही भाजप व त्याचे सरकार सातत्याने बुद्धिमंतांच्या विरोधात लढाईच्या मानसिकतेत दिसतात. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी "डेमोक्रॅट्‌स अँड डिसेन्टर्स' या ग्रंथात भाजपला समर्थन देणारे विचारवंत फारशा संख्येने का नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता, तो यासंदर्भात महत्त्वाचा वाटतो.’

हे वाचल्यावर वाटते, की विचारवंतांच्या समर्थनाशिवाय कुठले सरकार चालू शकत नसावे. तसे असेल तर मोदींनी मोठाच चमत्कार घडवून दाखवलेला आहे. कारण ते सत्तेत आल्यापासून पदोपदी देशातील बुद्धीमंत विचारवंत त्यांना पाण्यात पहाण्यातच गर्क आहेत. खरेतर देशातले व त्यांचे जगभरचे सगेसोयरे मोदींना सत्तेत येण्यापुर्वी अपयशी होण्याचेच शिव्याशाप देत होते. अमर्त्य सेन यांच्यासारख्या नोबेल विजेत्या विचारवंताने तर देश सोडून पळून जायला लागेल, असा इशारा दिलेला होता. यातून मोदी व विचारवंत यांच्यातले नाते स्पष्ट व्हावे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की मोदी सत्तेवर येण्य़ाच्या आधी असे कुठलेही संकट नव्हते. देशात विचारवंत होते आणि ते सरकारचे मस्तपैकी समर्थन करीत होते. ते विचारवंत आणि वेळोवेळी सत्तेवर बसलेले राजकारणी यांच्यात छानपैकी सुसंवाद होता. अशा तमाम विचारवंतांना डावे विचारवंत मानतात. कारण तेव्हाचे सरकार डावे किंवा पुरोगामी होते. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून पुरोगामी सरकारचे समर्थन चालू होते. सरकार कुठलेही असो, त्याचे समर्थन करणारे व त्याच्याकडून आपली भलावण करून घेणारे विचारवंत आवश्यक असावेत. निदान उपरोक्त परिच्छेद वाचला तर तसाच अर्थ निघतो. म्हणून असेल, सदरहू लेखक व रामचंद्र गुहा यांना उजव्या सरकारचे समर्थन करणारे कोणी उजवे विचारवंत दिसत नसल्याने चिंता पडलेली आहे. मध्यंतरी काही अशा लोकांनी आणखी एक आक्षेप घेतलेला होता. उजव्यांचे विचारवंतच नाहीत. उजव्यांनी विचारवंतच निर्माण केले नाहीत, असाही आक्षेप होता. पण मग एक शंका येते, की असा कोणी उजवा किंवा डावा विचारवंत असल्याचे प्रमाणपत्र वा मान्यता कुठून मिळत असते? मुळात विचारवंत हा प्राणी असतो तरी कसा? कुठल्या जंगलात किंवा कुठल्या प्राणिसंग्रहालयात तो आढळतो? त्याला उजवा किंवा डावा कोण घोषित करते?

कौरवांच्या दरबारात तीन मोठे बुद्धीमंत होते. ते वडीलधारेही होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य! त्या दरबारात एक पेचप्रसंग उदभवला होता. जुगारात धर्माने आपली पत्नी द्रौपदी गमावली, तेव्हा त्याला तसा जुगार खेळण्याचा अधिकार तरी होता काय, असा सवाल त्या विदुषीने केलेला होता. आधीच आपले राज्य व कुटुंब जुगारात गमावून दास झालेल्या युधिष्ठीराचा त्यानंतर आपल्या पत्नीवर अधिकार उरतो काय? आणि नसेल तर त्याने पणास लावलेली द्रौपदी कौरवांची दासी कशी होऊ शकते? या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर त्या विचारवंतांनाही देता आलेले नव्हते. त्यांनी मग स्त्रीधर्म वा राजधर्म अशा पळवाटा शोधलेल्या होत्या. कारण ते कौरवांचे आश्रित विचारवंत होते. सत्तेचे आश्रित समर्थक विचारवंत असेच असतात. ते आपल्या मतलबाला झुगारून सत्य बोलू शकत नाहीत. जगाच्या व मानवी इतिहासात विचारवंतांची हीच शोकांतिका राहिलेली आहे. आपल्या स्वार्थाला झुकते माप देऊनच त्यांनी विरोध केला आहे किंवा समर्थन केलेले आहे. बदल्यात त्यांना सत्तेची बुद्धीमंत म्हणून मान्यता मिळत असते. विविध पुरस्कार मिळत असतात. त्या सन्मानासाठी ते सत्ताधार्‍याच्या कुठल्याही पापावर पांघरूण घालून देण्याचे पुण्यकर्म बजावत असतात. अमर्त्य सेन वा तत्सम डावे विचारवंत त्याला अपवा़द असायचे काही कारण नाही. त्यामुळे विचारवंतामध्ये कधीही डावे उजवे नसते. आश्रित विचारवंत आणि स्वयंभू विचारवंत अशी विभागणी झालेली असते. त्यापैकी आश्रित विचारवंत टोळीने जगत असतात आणि आपल्या टोळीत अन्य कुणाला घुसखोरी करू दयायची नाही, यासाठी झटत असतात. स्वयंभू विचारवंतांना कधी कुणाच्या आश्रयाची गरज नसते की कुठल्या सन्मानाची वा पुरस्काराची लाचारी करावी लागत नाही. ते सत्तेच्या चांगल्या कृत्याचे समर्थन जितक्या मन:पुर्वक करतात, तितक्याच प्रामाणिकपणे सत्तेच्या चुकांवर आसूडही ओढत असतात.

आपल्या देशातील नामवंत सन्मानप्राप्त विचारवंतांचे इतिहासातील आवडते पात्र रोमन सम्राट नीरो हेच राहिलेले आहे. कुठल्याही बाबतीत सत्तेचा बेतालपणा झाला, मग या विचारवंतांना नीरो अगत्याने आठवतो. रोम जळत असताना नीरो फ़िडल वाजवत होता, हे आपण शेकडो प्रसंगी ऐकलेले वाक्य आहे. त्या निरोविषयी आणखी किती माहिती अशा विचारवंतांनी आपल्याला सांगितली आहे? नीरोचे समकालीन ग्रीक विचारवंत त्याच्याविषयी काय कथन करायचे? ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकात त्याचा तपशील आलेला आहे. विचारवंत एखाद्या टाकावू सत्तेला किती अभय देतात व जनतेच्या माथी मारत रहातात? पर्यायाने लोकांची किती भयानक दिशाभूल करतात? तो तपशील इथे मुद्दाम देण्यासारखा आहे.

‘रोमन साम्राज्य दिर्घकाळ टिकून राहिले त्याचे कारण देखील काही प्रमाणात तरी ग्रीक बुद्धीजीवी मंडळी आणि रोमन राज्यकर्ते या दोघातील घनिष्ठ सख्यत्त्व हेच होय. जित ग्रीकांना वाटत होते की ते जेत्या रोमनांना कायदे व सुसंस्कृततेचे धडे देत आहेत आणि म्हणून बुद्धिजीवी स्वत:वर बेहद्द खुश होते. रोमन सम्राट नीरोचा ग्रीकांनी जो सन्मान केला त्याची लांबलचक वर्णने उपलब्ध आहेत. ती वर्णने एखाद्याने वाचली तर ग्रीकांबद्दल त्याला घृणा वाटेल आणि आश्चर्यही वाटेल. कारण सम्राट नीरो शारिरीक व मानसिक दोन्ही प्रकारच्या व्याधींनी पछाडला असून सुद्धा ग्रीकांमधील चांगली सुशिक्षित मंडळी त्याची स्तुती करीत होती. ग्रीक बुद्धीमंतांनी नीरोचा सत्कार करण्याचे कारण हे होते की तो ग्रीक बुद्धीमंतांचे तोंड भरभरून कौतुक करीत असे आणि त्या कौतुकाची परतफ़ेड म्हणून ते बुद्धीमंत एक अत्यंत बुद्धीमान व कलासक्त राजा म्हणून तोंड फ़ाटेस्तवर त्याची स्तुती करीत होते.’ (पृष्ठ २०४, झुंडीचे मानसशास्त्र)

दिवंगत व्यासंगी लेखक विश्वास पाटिल यांच्या पुस्तकातील हा उतारा आहे. विचारवंत हे सत्तेच्या आश्रयाला गेल्यावर किती निर्बुद्धपणे आपल्या सन्मानासाठी सत्तेचे पाय चाटू लागतात, त्याचा हा दाखला आहे. किंबहूना अशा विचारवंतांना विचार वा विवेकाशी काहीही कर्तव्य नसते. जी सत्ता त्यांना आश्रय देत असते आणि लाभार्थी बनवित असते, तिच्यासाठी वडाची साल पिंपळाला लावण्याचे कौशल्य, हेच मग विचारवंत असण्याची कसोटी होऊन जात असते. नीरोचे कौतुक करणारे ग्रीक विचारवंत आणि लोकसभा निवडणूकीपुर्वी मोदींच्या तुलनेत राहुल गांधींचे गुणगान करणारे अमर्त्य सेन; यांच्यात आपण कुठला फ़रक करू शकतो काय? तात्कालीन परिस्थिती वा राजकीय संदर्भ अशा सर्वांना धाब्यावर बसवून अमर्त्य सेन काय बोलत होते? मोदींना भयंकर संकट ठरवताना राहुल गांधीच्या गुणाचे पठण करणारे डॉ. मनमोहन सिंग बुद्धीमंत उरत नसतात. जेव्हा विचारवंत आश्रित होतो, तेव्हा तो आपली बुद्धी गहाण टाकत असतो. अर्थात सत्तेसमोरच बुद्धी गहाण टाकण्याची गरज नसते. कुठली विचारसरणी, भूमिका वा राजकीय संघटनेची बांधिलकी स्विकारली, मग विचारांचे तारतम्य सोडून द्यावे लागते. त्यातल्या चुका दिसत असूनही बोलण्याचा सांगण्याचा हक्क सोडावा लागत असतो. हाती विचारवंत असल्याची मान्यता असते पण त्यातला आशय हरवलेला असतो. कारण विचारवंत उजवा किंवा डावा असू शकत नाही, विचारवंत सत्याच्या बाजूने समर्थनाला उभा रहात असतो. तो सत्तेच्या वा विरोधाच्या समर्थनाला कधी उभा रहात नाही. आश्रित विचारवंत सत्ताधार्‍याच्या समर्थन करणारा असो किंवा विरोधातला असो. तो सत्याचे अनुकरण किती करतो, यावर त्याच्या विचारांची महत्ता टिकून असते. म्हणूनच उजवे विचारवंत असण्याची काहीही गरज नाही. डावेही असायला नकोत. असे विचारवंत हा समाजाला धोकाच असतो.

मग असा प्रश्न पडतो की ज्या देशात उजवे विचारवंतच फ़ारसे नाहीत वा जवळपास नाहीत, त्या विचारसरणीची सत्ता आलीच कशी? जर इतकी वर्षे या देशात डावेच विचारवंत होते आणि अतिशय प्रभावीपणे काम करीत होते, तर त्यांच्याच विचारसरणीच्या सत्तेचा इतका दारूण पराभव कशामुळे झाला? ज्या विचारांचे विचारवंतच नाहीत, अशी उजवी विचारसरणी उपटलीच कुठून? जी विचारसरणी निर्माण करणारे कोणी विचारवंतच नाहीत, त्या विचारांशी लढण्यात डाव्या विचारवंतांनी आपली सर्व हयात कशाला खर्ची घातली? हे डावे विचारवंत आयुष्यभर कोणाशी लढत संघर्ष करत आले? की ते कुठल्या तरी काल्पनिक भ्रमाशी झुंजत बसले होते? त्याचे उत्तर आपण नीरोच्या स्तुतीपाठकांमध्ये शोधू शकतो. जवाहरलाल नेहरूंनी अशा स्तुतीपाठकांची पोटापाण्याची सोय लावून दिली आणि त्यांनी मग पुढल्या काळात नेहरूव्हियन सोशालिझम नावाची एक भ्रामक संकल्पना उभी केली. तिची घोकंपट्टी करणारी एक शहाण्यांची पिढी निर्माण केली. त्यांच्या आयुष्याचे एकच कर्तव्य होऊन बसले, ते स्तुतीपाठकाचे! मग अशी घोकंपट्टी अस्खलीत बडबडू शकणार्‍यांना विचारवंत म्हणून मान्यता द्यायची. पुरस्कार सन्मान द्यायचे हा प्रघात बनवण्यात आला. त्यातून जे निर्बुद्ध विचारवंत म्हणून मिरवत राहिले, त्यांच्यात जागा व स्थान मिळवण्यासाठी खर्‍याखुर्‍या समाजवादी व कम्युनिस्ट विचारांच्या अगतिकांनी रांग लावली. तेच आपसात डावेपणाची प्रमाणपत्रे छापू लागले आणि वाटू लागले. त्याचा विचार करण्याशी वा वैचारिकतेशी काडीमात्र संबंध राहिला नाही. सरकारी अनुदान हे त्याचे एकमेव उद्दीष्ट बनून गेले. जोवर समाजाला अशी मौजमस्ती व चैन परवडणार होती, तोपर्यंत हा तमाशा खपून गेला. जेव्हा त्याचा बोजा असह्य झाला. तेव्हा समाजाने म्हणजे मतदाराने माथी मारलेले हे ओझे उतरून फ़ेकून दिले. मग यां आश्रितांना जाग येऊ लागली आहे.

आपल्याला लोकांनी का नाकारले? आपण कुठे आहोत? आजचे नवे सत्ताधीश आपले चोचले कशाला पुरवित नाही? अशा चिंतेने भेडसावलेल्या लोकांना दुसरे कोणी तिथे आश्रित म्हणून स्विकारले गेलेत काय, याची चाचपणी करावी लागते आहे. म्हणून प्रश्न विचारला जात आहे की आजच्या सत्ताधीशांचे आश्रित विचारवंत कोण आहेत? त्यासाठी कोणती पात्रता आहे? मोदी वा नव्या सत्तेने यांना थोडे चुचकारले व आश्रित बनवण्याची नुसती खेळी केली, तरी यातले अनेकजण विनाविलंब उजवे विचारवंत व्हायला धावत सुटतील. अशा आश्रित मनोवृत्तीच्या लोकांचे वैचारिक परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही. ही विचारवंतांची घालमेल केवळ आपली अनुदाने तशीच चालू रहावित यासाठी आहेत. पुरस्कार वापसी वा अन्यप्रकारे सरकारपाशी विचारवंतांची कमी बोलण्यामागे इतर कुठलाही हेतू नाही. आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या उजव्या विचारांना डावी फ़ोडणी घालून देऊ; असे त्यातले आवाहन आहे. कारण विचारवंत वा विचार कधी डावा किंवा उजवा नसतो. विचारवंत हा समाजाला व पर्यायाने समाजहिताला बांधिल असला पाहिजे. विचार हा समाजहिताला बांधिल असतो. आजचा विचार उद्या कालबाह्य होऊ शकतो. जेव्हा कुठलाही विचार एका व्याख्येत बंदिस्त होतो, तेव्हा त्याच्यात बदल अशक्य होऊन जातो. त्याची विचारसरणी बनते आणि ती प्रगल्भतेला कुंठीत करीत असते. विचाराचा प्रवाह रोखून धरत असते. आताही स्वत:ला डावे विचारवंत वा पुरोगामी म्हणवून घेणारे जे कोणी लोक आहेत, ते कालबाह्य झालेल्या संकल्पनांना कवटाळून बसलेले आहेत. त्यांचे विचार व त्यांची विचारसरणी अंधश्रद्धेची एक समजूत होऊन बसली आहे. थोडक्यात उजव्या विचारवंतांचा कुठेही दुष्काळ पडलेला नसून डावे विचारवंत म्हणून मिरवणार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळलेली आहे. त्याच्या परिणामी अशी कुजबुज सुरू झाली आहे. अर्थात त्याला मोदी बळी पडले तर त्यांच्यावरही गाशा गुंडाळण्याची जादू असले डावे विचारवंत सहज करून दाखवू शकतील. कारण ते विचारवंत नसतात, तर सत्तेच्या वळचणीचे आश्रित असतात.

18 comments:

  1. लॅटिन भाषेतून इंग्रजीत अनेक शब्द रूळले आहेत. त्यातीलच एक शब्द आहे--"मॅग्नम ओपस". या शब्दाचा अर्थ एखाद्या कलावंताची/ लेखकाची सर्वोत्तम कलाकृती.

    मी भाऊंचा ब्लॉग अगदी दररोज वाचतो. एखाद्या दिवशी नवीन लेख आला नाही तर नवा लेख कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतो.भाऊंचा हा लेख म्हणजे या ब्लॉगवरील आतापर्यंतचा "मॅग्नम ओपस" आहे. त्याशिवाय या लेखाविषयी लिहायला माझ्यासारख्या सामान्याला शब्दही सुचत नाहीत.

    अर्थातच हा लेख आतापर्यंतचाच "मॅग्नम ओपस" आहे. यापुढेही असेच एकाहून एक जबरदस्त नवेनवे "मॅग्नम ओपस" असलेले लेख वाचायला मिळतील ही खात्री आहेच.

    ReplyDelete
  2. भाऊ,रोज भेटत रहा हो,खूप चुकल्यासारखं वाटत राहतं,तुमचा ब्लॉग दिसला नाही तर.आमची उजव्या विचारांची भूक भागत नाही तुमचं लेखन वाचल्याशिवाय.

    ReplyDelete
  3. भाऊ! आपण खूपच योग्य लिहिलं आहे

    ReplyDelete
  4. भाउ एकदम मस्तच.तो सकाळमधला लेख वाचुन चीड आली होती कोन उजवे नी काय डावे यांना कोनी अधिकार दिला? यावर तुमचा लेख सणसणित चपराक आहे ति हवीच होती. धन्यवाद

    ReplyDelete
  5. अतिशय योग्य विश्लेषण!

    ReplyDelete
  6. भाऊ, एकदम परखडपणे आणि सणसणीत चपराक दिली आहे , आश्रित विचारवंतांना....

    ReplyDelete
  7. मार्मिक आहे भाऊ तुमचा लेख ,विश्लेषण सुद्धा सुंदर रित्या केले ....👌👌

    ReplyDelete
  8. भाऊ मस्तच... काय जादू आहे लिखाणाची
    सतत वाचत रहावे

    ReplyDelete
  9. भाऊ,सध्या प्रशासकीय अधिकारी असलेले विश्वास पाटील यांच्या कारकीर्दीतील शेवटच्या पर्वात दाखवलेली कार्यक्षमता चर्चेचा विषय बनली आहे.हे तेच आहेत ना,जे लेखक म्हणून मान्यता पावले आहेत? त्यांचा लेखात चुकून दिवंगत असा उल्लेख आपण केला आहे.चूकभूल क्षमस्व.

    ReplyDelete
    Replies
    1. Donhi Vishwas Patil vegale aahet.Bhaunchya yapurvichya eka lekhat divangat vishwas patil yancha ullekh yeun gela aahe ani tyanche Panipat kar Vishwas patil yanchyapeksha vegalepanhi lekhat aahe hote

      Delete
  10. दिवंगत व्यासंगी लेखक विश्वास पाटिल?

    ReplyDelete
  11. भाऊराव,

    एके दिवशी एका देशातल्या भिकाऱ्यांची सभा भरली. तिच्यात जोरदार चर्चा झाली. अनेकांच्या युक्तिवादानंतर असं ठरलं की राजाकडे भिकेसाठी कटोरा नसल्याने त्याची हालत आपल्याहून खराब आहे. त्यामुळे सहानुभूतीदाखल सर्व भिकाऱ्यांनी आपापसांत वर्गणी काढून राजाला नवा कोरा करकरीत कटोरा नजर करायचा ठराव पास केला.

    सुज्ञांस अधिक सांगणे नलगे.

    आ.न.,
    -गा.पै.

    ReplyDelete
  12. एकदम मार्मिक संकल्पना आहे 'आश्रित विचारवंत'..! परिस्थितीवर अत्यंत योग्यपणे भाष्य करणारी संकल्पना.

    ReplyDelete
  13. एक नंबर....
    ".............चिंतेने भेडसावलेल्या लोकांना दुसरे कोणी तिथे आश्रित म्हणून स्विकारले गेलेत काय, याची चाचपणी करावी लागते आहे. म्हणून प्रश्न विचारला जात आहे की आजच्या सत्ताधीशांचे आश्रित विचारवंत कोण आहेत? त्यासाठी कोणती पात्रता आहे? मोदी वा नव्या सत्तेने यांना थोडे चुचकारले व आश्रित बनवण्याची नुसती खेळी केली, तरी यातले अनेकजण विनाविलंब उजवे विचारवंत व्हायला धावत सुटतील...."
    झकास
    ".......आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या उजव्या विचारांना डावी फ़ोडणी घालून देऊ; असे त्यातले आवाहन आहे......."

    ReplyDelete
  14. "विचारवंत हे सत्तेच्या आश्रयाला गेल्यावर निर्बुद्धपणे आपल्या सन्मानासाठी सत्तेचे पाय चाटू लागतात"
    वाह! वा!
    या शतकातील शाश्वत सत्य!!

    ReplyDelete
  15. कविता:-
    धर्मनिरपेक्ष देश का
    कट्टर धार्मिक उपराष्ट्रपती http://mangeshpainjane.blogspot.com/2017/08/blog-post_11.html

    ReplyDelete