Tuesday, October 3, 2017

सत्याची ‘जबानी’

karnatak home minister reddy के लिए चित्र परिणाम

कानडी पत्रकारितेतील एक ज्येष्ठ लेखिका गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाला आता महिन्याचा कालावधी झाला आहे आणि त्यांची हत्या ज्याच्याशी जोडली गेली, त्या डॉ. नरेंद्र दाभोळकर या पहिल्या हत्येला पन्नास महिने उलटून गेले आहेत. पण या तथाकथित हत्या मालिकेतील एकाही प्रकरणाचा खटला अजून सुरू होऊ शकलेला नाही. किंबहूना त्यातील एकाही हत्येचा परिपुर्ण तपास होऊ शकलेला नाही. मात्र त्याचे निमीत्त साधून अनेक उत्साही ‘आनंद सोहळे’ नित्यनेमाने पार पाडले जात असतात. या मृतांच्या नावाने आक्रोश करणार्‍या कोणीही कधी त्यांचे खरेखुरे मारेकरी शोधले जावेत, यासाठी अजिबात प्रयत्न केलेले नाहीत, की त्यासाठी आग्रह धरलेला नाही. उलट या निमीत्ताने आपल्या राजकीय विरोधकांना बदनाम व आरोपी ठरवण्याची संधी त्या हत्याकांडात शोधलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर कर्नाटकचे गृहमंत्री रेड्डी यांनी केलेले एक जाहिर विधान, यातल्या क्रुर विरोधाभासावर नेमके बोट ठेवणारे आहे. मंगळवारी चिक्कबल्लापूर येथे पत्रकारांशी बोलताना रामलिंग रेड्डी म्हणाले, गौरीच्या हत्याकांडातील मारेकर्‍यांची ओळख पटलेली असून, अतिशय सज्जड पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. निव्वळ आरोप करून भागत नाही. हाताशी असलेले पुरावे भक्कम असावे लागतात. पुरावे तितके निर्विवाद नसले तर खटलाही चालवता येणार नाही, की खटला उभाही करता येत नाही. त्या राज्याच्या गृहमंत्र्याचे हेच विधान अतिशय बोलके आहे आणि त्याचा अर्थही वाहिन्यांवर बाष्कळ बडबड करणार्‍यांना लागलेला नाही. कारण रेड्डी यांनी असे म्हणताच त्यांच्यावर टिकेचा वर्षाव सुरू झाला. पण त्याचा अर्थ उलगडून बघण्याची इच्छाही कोणाला झाली नाही. रेड्डी काय सुचवत आहेत? अन्य तीन हत्याकांड तपासाचा जसा चुथडा झाला, तसा होऊ नये अशी आपली इच्छा आहे, म्हणूनच याविषयी आता काही जाहिरपणे सांगता येणार नाही.

अशा घटना घडतात, तेव्हा त्यावरून काहुर माजवण्याला प्राधान्य दिले जाते आणि प्रत्यक्षात गुन्हेगार मारेकर्‍यांना पकडण्याला दुय्यम स्थान मिळते. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या बाबतीत हेच झाले आणि तपास बाजूला पडून त्यावर यथेच्छ राजकारण रंगवले गेले. गौरी लंकेश यांच्याही हत्येनंतर विनविलंब भारतातील  राजकीय उजव्या गटाकडे बोट दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली. पण खर्‍याखुर्‍या आरोपींचा शोध घेण्याचा केव्हाही आग्रह धरला गेला नाही. दोन दिवसात बंगलोरमध्ये मोठा उत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला व त्यात हिंदूत्ववादी व अन्य उजव्या संघटनांच्या नावाने शंख करण्याचा समारंभ थाटात पार पडला. या सोहळ्यात जमा झालेल्या कोणालाही गौरीच्या हत्येविषयी काडीमात्र आस्था नव्हती, तर तिच्या मृत्यूचा जणू आनंद झालेला होता. कारण त्या निमीत्ताने राजकीय विरोधकांवर टीका व शिव्याशापाचा वर्षाव करण्याची अपुर्व संधीच अशा लोकांना मिळालेली होती. दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्याकांडानंतरही असेच ‘आनंद सोहळे; धमाक्याने साजरे झाले. पण मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा कुठलाही धागादोरा पोलिस तपासाला मिळवून देण्यासाठी यापैकी एकही हौश्या नवश्या पुढे आलेला नव्हता. नेमक्या त्याच गोंगाटामुळे तपासाचा विचका होऊन गेला होता. अशाच उत्सवी लोकांचा समाधानासाठी समानत संस्थेच्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढे त्यांच्यावर साधे आरोपपत्रही दाखल करणे पोलिसांना शक्य झालेले नाही. खटला चालवणे ही खुप दूरची गोष्ट झाली. तो विचका का झाला व कोणी केला, त्याचेच स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिले, असे आता म्हणता येईल. कारण त्यांनी थोडी सांकेतीक भाषा त्यासाठी वापरली आहे. भक्कम पुरावे नसतील, तर आरोपपत्र दाखल होत नाही की खटला उभाही राहू शकत नाही, असेच रेड्डी म्हणाले आहेत.

गौरी लंकेश यांना कोणी मारले असेल, त्याचा अंदाज म्हणून तपास यंत्रणेला काही लोक संशयीत वाटलेले असतील. पण ते नुसते संशय आहे म्हणून गुन्हेगार ठरू शकत नाहीत. किंवा न्यायालयात त्यांचा गुन्हा सिद्ध होत नसतो. तिथे कायद्याच्या कसोटीवर सिद्ध होणारे व स्विकारले जाऊ शकणारे पुरावे सादर करावे लागतात. वर्तमानपत्रे वा माध्यमात चर्चेसाठी कुठलेही बिनबुडाचे आरोपही पुरावे असू शकतात. पण कायदा व न्यायालये अशी बिनबुडाच्या पुराव्यांवर वा आरोपांवर चालविली जात नाहीत. म्हणूनच तिथे भक्कम निर्विवाद पुरावे सादर करावे लागतात. रेड्डी म्हणतात, अजून साधे आरोपपत्र दाखल करावे, इतका सज्जड पुरावा हाती लागलेला नाही. सहाजिकच तितक्या ठिसूळ आधारावर पुढे जाता येत नाही. तसे केल्यास खटला उभाही राहू शकणार नाही. नेमकी तीच गोष्ट अन्य तीन हत्याकांडात झालेली आहे. की जाणीवपुर्वक तशी परिस्थिती काही हितसंबंधितांनी निर्माण केलेली आहे? पोलिस तपास नेमक्या व योग्य दिशेने जाऊ नये व तपासात खरेखुरे पुरावे पोलिसांच्या हाती लागू नये; याची उत्सवी मंडळींनी काळजी घेतलेली आहे काय? सनातनच्या अमूकतमुकाला पकडा, कधी पकडणार; असे सवाल करून जे काहुर माजवण्यात आले, त्यामागे कोणता हेतू असेल? दाभोळकर पानसरे हत्याकांडानंतर सतत काहुर माजवण्यात आले व अशा गदारोळाला शांत करण्यासाठी बिनबुडाची धरपकड झाली. मात्र त्यांच्या विरोधात कुठलाही कोर्टात सिद्ध होणारा पुरावा पोलिसांना गोळा करता आला नाही. काहुर माजवणार्‍यांनी सज्जड पुरावा मिळू नये यासाठीच इतका कल्लोळ केलेला होता का? सुदैवाने कर्नाटकचे विद्यमान सरकार व गृहमंत्री तशा गदारोळाला बळी पडलेले नाहीत. त्यामुळेच वास्तविक दिशेने गौरी हत्याकांडाचा तपास होऊ शकेल, अशी शक्यता वाढलेली आहे. किंबहूना तसे झाले तर उर्वरीत तिन्ही हत्याकांडांचेही रहस्य उलगडले जाऊ शकेल.

पण या निमीत्ताने रेड्डी यांनी जे सत्य सांगण्याचे धाडस केले आहे, त्याला महत्व आहे. नुसते आरोप व गदारोळ कामाचा नसतो. कोर्टात खटला भरण्यासाठी व खटला चालवण्यासाठी भक्कम पुरावे आवश्यक असतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचा दुसरा अर्थ आधीच्या तिन्ही हत्याकांडात तसे पुरावे गोळा करण्यालाच बगल दिली गेली आणि अजून त्यात कुठलीही प्रगती होऊ शकलेली नाही. वरकरणी ज्या गोष्टी सोप्या व सहज वाटतात, तितक्या त्या सरळ नसतात. हत्याकांडासारख्या गुन्ह्यात अनेकांकडे हत्येची कारणे वा हेतू असू शकतो. पण म्हणून त्याला गुन्हेगार ठरवता येत नाही. त्याच्या आधारे तपास करता येत असतो. तो अनेक दिशेने भरकटत जाऊ शकत असतो. त्यातल्या नुसत्या शंका व संशयाच्या आधारे न्यायनिवाडे होत नसतात. म्हणूनच कोर्टात जाण्यापुर्वी सज्जड व सिद्ध होऊ शकणारे पुरावे व साक्षीदार जमा करावे लागतात. नुसता साक्षीदार आहे म्हणूनही काही सिद्ध होत नाही. त्या साक्षीदाराची कोर्टात उलटतपासणी घेऊनही त्याला खोटा पाडला जाणे शक्य असते. म्हणूनच त्या सत्वपरिक्षेला सामोरा जाऊ शकेल असाही साक्षीदार मिळवावा लागतो. हे पत्रकारितेचे वा संशयाचे बुडबुडे उडवण्याचे काम नाही. काटेकोरपणे गुन्हा सिद्ध करण्याची सज्जता त्यासाठी आवश्यक असते. गौरीच्या तपासात त्या दिशेने ठामपणे वाटचाल सुरू असल्याचे दिसते. कारण त्यात सावधानता पाळली जात असल्याचे गृहमंत्र्याच्या विधानावरून स्पष्ट होते. पोलिस तपास हा बातम्या रंगवण्यासाठी होत नसतो, तर गुन्हा शोधून तो सिद्ध करण्यासाठी तपासकाम चालते, याचे भान या गृहमंत्र्याला असल्याचा हा दाखला म्हणूनच स्पृहणिय आहे. समविचारी मुर्खांना खुश करण्यापेक्षा कर्तव्याला रेड्डी महत्व देत असतील, तर त्यांचे स्वागतच करायला हवे. कारण यातले रहस्य उलगडल्यास आधीच्या तिन्ही खुनांचेही गुढ सैल होऊ लागेल.

2 comments:

  1. पानसरेंच्या हत्येआधी काही दिवस त्यांचे नांव रोज बातम्यांत असे, टोल tax विरोधी आंदोलनांत. चांगलीच जनजागृती केली होती आणि त्या बातम्यांत त्यांना येणाऱ्या धमक्यांबद्दलहि ते बोलत असतं पण त्याची पर्वा करत नाही असेच. मात्र ते मारले गेल्यावर कोणीही त्याबद्दल ब्र न काढता सरळ हिंदुत्ववाडी संघटनांवर खापर फोडले गेले .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरे सर्. नुसताच धुरळा उडवला गेला. तपासात त्याचा उपयोग शून्य. पण तथाकथित पुरोगामीचा उद्देश साध्य झाला.

      Delete