दसर्याचा मुहूर्त साधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी तशी घोषणा केलेली असून अजून बहुधा त्यांनी निवडणूक आयोगाकडे तशी पक्षाची रितसर नोंदणी केलेली नाही. पण इतक्यातच त्यांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि आमंत्रणे मिळू लागली आहेत. त्यापैकी आमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी दिलेले आहे. राणे यांनी आपल्या पक्षासह एनडीए आघाडीत दाखल व्हावे, असे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब दिले आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही अपशकुनी भाषा बोलत प्रत्यक्षात राणे यांना आशीवार्दच दिलेले आहेत. राणे यांनी पक्षस्थापनेची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे हजर नव्हते आणि सहाजिकच त्याची प्रत्येक माध्यमाने दखल घेतली. पवारांना यासंबंधी पत्रकारांनी वेगळ्या प्रसंगी प्रश्न केला असता, नेहमीप्रमाणे साहेबांनी त्यावरही मल्लीनाथी केलेली आहे. ज्यांचा सुपुत्र आमदार असूनही त्या पक्षात सहभागी झालेला नाही अथवा राणेंचा कट्टर समर्थक असलेला आमदारही त्यांच्यासोबत आलेला नाही, अशा पक्षाबद्दल काय बोलावे, असे पवारांचे शब्द कोणालाही खोचक वा अपशकुनी वाटतील. बहुधा साहेबांचा हेतूही हेटाळणीयुक्तच असावा. पण आजपर्यंतचा इतिहास असा आहे, की साहेबांनी अपशकुनी भाषा बोलावी आणि तोच आशीर्वाद असल्यासारखी घटना नंतर घडलेली आहे. म्हणूनच कदाचित साहेबांचे हे शब्द ऐकल्यावर राणे यांना मोठा हुरूप आलेला असू शकतो. अर्थात असे कुणा बातमीदाराने म्हटले असते तर नवल नाही. पत्रकाराला खळबळ माजवायची असते. पण पवारांना याची कारणे ठाऊक असतानाही त्यांनी असे विधान करणे, त्यांच्या मुरब्बीपणाला व अनुभवाला शोभा देणारे नाही, त्याचे काय?
नितेश राणे वा कालिदास कोळंबकर हे दोन्ही कॉग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळेच नव्या पक्षाच्या स्थापनेविषयीच्या पत्रकार परिषदेला हजर राहिल्यास त्यांना पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यात पकडले जाऊ शकते. म्हणूनच ते यापासून अलिप्त राहिले, हे राजकारणातील नवख्यालाही समजू शकते. अशी माणसे कायद्याच्या तरतुदी संभाळूनच पक्ष सोडत वा धरत असतात. हे पवारांना अन्य कोणी समजावून सांगण्याची गरज आहे काय? पण खोचक बोलण्याला मुरब्बी शब्द समजले, मग अशी गफ़लत होते. राणे यांच्या पक्षाचे भवितव्य काय असेल, याची सध्या चर्चा चालली आहे. राजकारणात नेमकी खेळी करून आपला डाव साधून घेण्य़ाला प्राधान्य असते. हे राणेंच्या इतकेच पवारांनाही कळते. तसे नसते तर नव्या पक्षाची नुसती घोषणा केल्यावर नोंदणी न झालेल्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी एनडीएत दाखल होण्य़ाचे आमंत्रण दिले नसते. त्यातले डावपेच पवारांना उमजत नाहीत, हे कोण मान्य करील? अमित शहांच्याच आग्रहाखातर वेगळ्या पक्षाची चुल राणे यांनी मांडली, हे लपून राहिलेले नाही. राणे यांना भाजपामध्ये घेण्याविषयी शिवसेनेचा आक्षेप होता. तो डावलण्याच्या स्थितीत भाजपा नसेल, तर ही काढलेली पळवाटच आहे. त्यामुळे राणेंना सत्तेत आणता येते आणि शिवसेनेला अधिक डिवचण्याची संधी भाजपाला मिळते. त्यासाठी काढलेला हा पर्याय आहे. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती अधिक विस्तारीत आहे. आज राणे यांनी पक्ष स्थापन केला वा नोंदवला, म्हणून त्यांच्याकडे आपली आमदारकी बुडवून कोणीही धावणार नाही. पण विधानसभेची मुदत तीन वर्षे संपलेली असून पवारांच्याच अंदाजानुसार नजिकच्या काळात विधानसभेच्या निवडणूका शक्य आहेत. तेव्हाची ही तयारी आहे. तेव्हा अनेकांना पुन्हा निवडून येणार्या गोटात दाखल व्हायचे असते आणि उमेदवारीची हमी हवी असते. ती एनडीएत असलेला पक्ष देऊ शकतो ना?
आपल्या पक्षात येण्यासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेतले अनेक आमदार संपर्कात असल्याचे विधान राणे यांनी केलेले होते. त्याची खिल्ली उडवताना पवारांनी राणेंचा सुपुत्रही त्यांच्यासोबत नव्या पक्षात येत नसल्याचे विधान केलेले आहे. पण त्याची आज गरज काय आहे? अजून तरी अशा एकदोन आमदारांची फ़डणवीसांना गरज नाही, की पक्ष स्थापना वा चालवण्यासाठी राणेंना अशा कुणा आमदाराची गरज नाही. एनडीएत दाखल होऊन मंत्रीपद मिळवण्यापुरता त्यांना पक्षाचा मुखवटा हवा आहे. त्यात येऊ शकणार्या आमदार व नेत्यांची चिंता पुढल्या निवडणूका लागतील, तेव्हा निर्माण होणार आहे. अशा स्थितीत किती वेगाने व फ़टाफ़ट आमदार पक्षांतर करतात, हे पवारांना कोणी नव्याने समजावून देण्याची गरज आहे काय? असे इतर पक्षातील वा संघटनातील आमदार पळवण्यातूनच पवारांची दिर्घकालीन राजकारणी कारकिर्द भरलेली आहे. त्यामुळे राणे यांच्या पक्षात कोण आमदार आज येतील वा येणार नाहीत, त्याची चिंता राणे यांनीही केलेली नाही. मात्र त्यांच्या पक्षस्थापनेलाच अपयश मिळाल्याचे जाहिर करून पवारांनी दिलेला आशीर्वाद, राणे यांच्यासाठी बहुमोलाचा ठरावा. कारण आजकाल साहेबांची भाकिते नेमकी उलट्या दिशेने खरी ठरत असतात. कालपरवाच आपण दिल्लीला जाणे कमी केल्याचे कारण साहेबांनी स्पष्ट केले होते. आपले बोट पकडून राजकारणात आल्याचे कोणीही बेधडक सांगतो, म्हणून आपल्याला दिल्लीत जाण्याचे भय वाटते, असा टोमणा साहेबांनी पंतप्रधानांना मारला होता. बारामतीत एका समारंभाला आले असताना मोदींनी पवारांकडूनच राजकारण शिकलो व त्यांचे बोट धरून राजकारणात वाटचाल केल्याचे म्हटलेले होते. त्यावरच साहेबांनी केलेले हे विधान आहे. पण त्याच मोदींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये भाग घेतला, तेव्हा साहेबांनी काय भविष्यवाणी केली होती?
साहेब दिर्घकाळ क्रिडाक्षेत्रात काम केलेले आहेत. म्हणूनच सहा महिने आधीच मोदींनी लोकसभेची मोहिम आरंभली, तेव्हा भविष्य वर्तवले होते. मॅराथॉन धावणारा खेळाडू इतक्या वेगाने पळत नसतो. आपली उर्जा संभाळून ठेवत अखेरच्या टप्प्यात वेगाने दौडू लागतो; अशी भाषा मोदींना शुभेच्छा देणारी नक्कीच नव्हती. किंबहूना साहेबांनी केलेला तो अपशकूनच म्हणावा लागेल. पण अखेरीस निकाल काय लागले होते? खुद्द महाराष्ट्रात त्याच मोदींची लाट इतकी उसळली, की राष्ट्रवादी कॉग्रेसला आपले बालेकिल्लेही सुखरूप राखता आले नाहीत. बारामतीत मोदींनी प्रचाराला येऊ नये अशी विनंती करण्याची पाळी साहेबांवर आलेली होती. ‘धरलेल्या बोटाला जागून’ मोदी महादेव जानकरांचा प्रचार करायला बारामतीकडे फ़िरकले नाहीत. ह्याला म्हणतात साहेबांचा आशीर्वाद! तो दिसायला अपशकून वाटतो, पण प्रत्यक्षात त्यातूनच शरद पवार शुभेच्छा देत असतात. म्हणूनच नारायण राणे यांनी निराश होण्याची गरज नाही. उलट त्यांनी खुश व्हायला हवे. साहेबांनी नव्या पक्ष स्थापनेच्या आरंभीच अशा शब्दात टिंगल उडवली असेल, तर यापेक्षा मोठा शुभशकून असू शकत नाही. कारण एनडीएत नारायण राणे यांचे भवितव्य काय असेल त्याविषयी आज काही सांगता येणार नाही. पण राणे यांनी नवा पक्ष काढून एनडीएत दाखल झाले, तर १६५ जागी जे बिगरभाजपा आमदार आज आहेत, तितक्या आमदार वा इच्छुकांसाठी नवा पक्ष हे नवे भवितव्य ठरण्याची दाट शक्यता आहे. असे इच्छुक प्रामुख्याने भाजपा वगळून अन्य पक्षात असू शकतात. मात्र अशा पक्षांमध्ये आज कुठली महत्वाकांक्षा वा झुंजारवृत्ती असलेला नेताच उरलेला नाही. तुलनेने राणे त्या व्याख्येत बसणारे असल्याने त्यांच्याकडे अशा इच्छुक व आमदारांनी निवडणूकीच्या मोसमात गर्दी करण्याची शक्यता कोणी नाकारू शकत नाही. कारण साहेबांच्या शुभेच्छा कधी खोट्या ठरलेल्या नाहीत.
कडक हाणला भाऊ
ReplyDeleteराणे हे बिगर भाजपा मते फोडायला भजपला मदत करणार आहेत।खास करूण मराठा मते। जी साहेब आपली हक्काची समजतात। महनूण साहेब विचलित झाले असावेत।
ReplyDeleteभाऊ हा लेख काहीसा पोरकटपणाकडे झुकणारा आहे . राणेना खुद्द कोकणातुनच पराकोटीचा विरोध होतोय . हा माणूस फक्त सेनेवर टीका करायला घेत असतील तर डाव उलटल्याशिवाय रहाणार नाही .
ReplyDeleteराणे पितापुत्र त्यांच्या घरच्या मतदार संघतुन तरी निवडुन येतील का ?
ReplyDelete