Sunday, October 8, 2017

गुजरातच्या गाढवाची गोष्ट

donkeys of gujarat के लिए चित्र परिणाम

गुजरात विधानसभा निवडणूका दाराशी आलेल्या आहेत आणि त्या पुन्हा कशा जिंकणार, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा चिंताक्रांत आहेत. म्हणजे तशा प्रतिक्रीया सतत ऐकू येत आहेत. सोशल माध्यमात आजकाल सर्वात आधी बातम्या येत असतात आणि अन्य माध्यमातही तशा बातम्या झळकत असतात. आणखी दोन महिन्यात गुजरातेत मतदान व्हायचे आहे आणि त्याची फ़िकीर असती तर अमित शहा गुजरात सोडून केरळात जनरक्षा यात्रा काढत कशाला रमले असते? त्यापेक्षा त्यांनी गुजरातेत मोर्चाबांधणी सुरू केली असती. दहा महिन्यांपुर्वी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीचे लोकांना वेध लागलेले होते. पण तेव्हाही शहा किंवा मोदी तिकडे फ़ारसे फ़िरकलेले नव्हते. माध्यमांसह सोशल माध्यमांवर विश्वास ठेवायचा, तर तिथे लोकसभेत मिळवलेल्या यशावर मोदी-शहांनी कधीच पाणी सांडलेले होते. कारण तो काळ नोटाबंदीच्या गदारोळाने गाजत होता. नोटाबंदीने लोक किती हैराण व संतापलेले होते. त्याच्या प्रतिक्रीया रोजच्या रोज माध्यमांना व्यापून टाकत होता. त्यात भाजपाला साधे बहूमतही उत्तरप्रदेशात मिळणे कसे अशक्य आहे, त्याची ग्वाही प्रत्येक जाणता देत होता. आज गुजरात विधानसभा निवडणूकांचे वेध लागलेले असतानाच्या प्रतिक्रीयाही तसूभर वेगळ्या नाहीत. हातून निसटलेला गुजरात टिकवण्यासाठी मोदी दोन दिवस गुजरात दौर्‍यावर आलेत, अशी भाषा आज ऐकू येत आहे. तुलनेने गुजरातची मोहिम राहुल गांधी यांनी खुप आधीच सुरू केलेली आहे आणि माध्यमातून राहुलना मिळालेला प्रतिसाद बघितला तर गुजरातची निवडणूक भाजपा मतदानापुर्वीच हरलेला आहे. तसा भाजपा मतदानापुर्वी दोनतीन महिने आधीच उत्तरप्रदेशाची निवडणूकही पराभूतच झालेला नव्हता का? मग गुजरातमध्ये भाजपाच्या पराभवाला पर्याय उरतो का?

हे असे अंदाज किंवा भाकिताला आता भाजपा सरावलेला नसेल, तरी मोदी-शहा जोडी कमालीची सरावली आहे. त्यांना अशा भाकितांमुळे नवी उर्जा मिळत असावी. अन्यथा त्यांनी गुजरातकडे पाठ फ़िरवून केरळातील जनरक्षा यात्रेला इतके महत्व कशाला दिले असते? एक मात्रे खरे आहे, सोशल माध्यमात ज्यांना मोदीभक्त म्हणून हिणवले जाते, त्यांना अशा बातम्या खुप विचलीत करत असतात आणि तेच अधिक चिंता करीत असतात. काही भाजपातले जाणकारही अशा भाकितांनी घाबरून जात असतात. उत्तरप्रदेश निवडणूकीसाठी राहुल गांधी व कॉग्रेस यांनी प्रशांत किशोर यांच्यासारख्या मातब्बर चाणक्याला कामाला जुंपलेले होते. त्यानेही खुप अभ्यास करून कॉग्रेसला गाळातून बाहेर काढण्यासाठी छानपैकी रणनिती तयार केलेली होती. पण कॉग्रेस गाळातून बाहेर काढणे बाजूला राहुन गेले आणि अखेरीस राहुल, कॉग्रेससोबत समाजवादी पक्षालाही रसातळाला घेऊन गेले. त्यांना प्रशांत किशोर वाचवू शकला नाही. मतदान होऊन निकाल लागले, तेव्हा मात्र अशा तमाम जाणत्यांची वाचा बसली होती. कारण त्यांना निकालाचा अर्थही लावता आलेला नव्हता. सहाजिकच उठलासुटला प्रत्येकजण मतदान यंत्रात गडबड झाल्याचे आरोप करून मोकळा झाला. इतकीच गफ़लत त्या यंत्रात करून निवडणूक जिंकणे शक्य असते, तर मुळातच कॉग्रेसला हरवणे मोदींना शक्य झाले नसते. ज्यांना बेछूटपणे स्पेक्ट्रम वा खाण घोटाळा करता येतो, त्यांनी मतदान यंत्रातली गफ़लत करायचे टाळले असते काय? पण ते कोणाला विचारात घेण्याची गरज आहे? सहाजिकच मोदींचा करिष्मा कसा टिकून राहिलेला आहे, त्याची वर्णने करण्यातच भाकितकार गढून गेले आणि पराभवाची आपलीच भाकिते झाकपाक करण्यात रमून गेले. तेच पुन्हा दोन महिन्यांनी गुजरातच्या मतदान निकालानंतर झाल्यास कोणी नवल मानण्याचे कारण नाही.

गुजरात हा नरेंद्र मोदी व अमित शहांचा पाया आहे आणि तो ठिसूळ झाला, तर आपण देशात व पक्षात शिल्लक उरणार नाही, हेही त्या जोडगोळीला नेमके ठाऊक आहे. ही जोडगोळी म्हणजे राहुल व अहमद पटेल अशी जोडी नाही. आपल्या पायाखाली काय जळते आहे, त्याचा चटका बसेपर्यंत राहुल-पटेलांना अंदाजही आला नव्हता. म्हणून हक्काची मते व आमदार हाताशी असतानाही त्यांना एक राज्यसभेची जागा टिकवताना नाकी दम आलेला होता. ‘शेपटावर निभावले’ अशी स्थिती मतमोजणी चालू असताना झाली, त्यालाच ज्यांनी महान दिग्विजय म्हणून मिरवले, त्यांना कोणी लढाईचे भवितव्य सांगावे? आता तर नवे आमदार निवडून आणायचे आहेत. पण दोन महिन्यांपुर्वी पक्षाचे असलेले आमदार टिकवणे व त्यांच्याकडून राज्यसभेसाठी पक्षाच्या उमेदवाराला मतदान घडवून आणणे भाग होते. तिथेही ज्यांची तारांबळ उडाली, ते दोन महिन्यानंतर मोदींना पराभूत करण्याच्या गमजा करीत आहेत. त्या करायला काहीही हरकत नाही. असलीच भाषा याच वर्षाच्या आरंभी मायावती व अखिलेशही करीत होते. तशाच मस्तीत राहुल गांधी उत्तरप्रदेशात मिरवत होते. त्यांच्याविषयी मोदी-शहांनी चकार शब्द उच्चारला होता काय? मोदींची खिल्ली उडवताना अखिलेशने तर मोदींना गुजरातचे गाढवही म्हटलेले होते. इतकी अपमानास्पद उपाधी शिरसावंद्य मानून मोदींनी त्याचेही स्वागत केलेले होते. आपण गाढवच आहोत, गाढवासारखे अथक काम करतो ना? असे म्हणत मोदींनी त्या शिव्याही स्विकारल्या होत्या. कारण निकालातून गाढव कोण, ते सिद्ध करण्याला महत्व होते आणि मतमोजणीने तेच सिद्ध केले होते. विषय इतकाच आहे, की जी गुजरातची गाढवे उत्तरप्रदेशात दौडून मातब्बर घोड्यांनाही मागे टाकतात, त्यांना त्यांच्याच कर्मभूमीत पराभूत करणे हा पोरखेळ नसतो ना? पण अकलेचे घोडे दामटण्यार्‍यांना कोणी कसे समजवायचे?

अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांची गुजरातची ओळख पद्धतशीर मोहिम राबवून निवडणूका जिंकण्यासाठीची होती. मागल्या तीन वर्षात त्यांनी आपण देशातल्या अन्य प्रांतातही स्थानिक नेत्यांना पाणी पाजून दाखवतो, अशी ख्याती प्राप्त केली आहे. म्हणून ते अजिंक्यवीर असल्याचे मानायचे कारण नाही. त्यांच्या जिंकण्याचे रहस्य व गुढ उकलणे आवश्यक आहे. ते उकलले तर त्यांना त्यांच्याही प्रांतात हरवणे अजिबात अशक्य नाही. पण त्याकडे कोणी ढुंकूनही बघायला राजी नाही. लोक नाराज व निराश असल्याचे माध्यमातून उठवायचे आणि मग त्या प्रचाराला बळी पडून लोकही सरकारच्या वा मोदी विरोधात आपोआप मतदान करतील; अशा काहीशा भ्रमात मोदी विरोधक मागल्या तीन वर्षात जगत आलेले आहेत. त्याच्या उलटी स्थिती भाजपा किंवा अमित शहांच्या पक्ष संघटनेची आहे. पक्षाची ताकद कितीही जबरदस्त असली, तरी त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यातही क्षणभर गाफ़ील रहायचे नाही, असा विडा उचललेला आहे. दिल्ली महापालिका जिंकताना त्यांनी सर्वच्या सर्व विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना बंडखोरीचा धोका पत्करला व विजय प्राप्त केला होता. उत्तरप्रदेशातही डरकाळ्या फ़ोडण्याचे अधिकार निर्विवाद विरोधाकांना देऊन, या जोडगोळीने मतदानात आपली मक्तेदारी सिद्ध केली. त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक इतकी अवघड असेल काय? १५० हून अधिक आमदार निवडून आणण्याचे उद्दीष्ट आधीच निश्चीत केलेल्या पक्षाध्यक्षाने त्यासाठी काय सज्जता केली आहे, त्याचा तरी अभ्यास कोणी करणार आहे काय? नसेल तर गुजरातमध्येही उत्तरप्रदेश झालेला दिसला तर नवल नाही. ते निकाल लागतील, तेव्हा अनेकांचा उमर अब्दुल्ला झालेला असेल. उत्तरप्रदेश निकालानंतर उमर अब्दुल्ला काय म्हणाले होते? कोणाला आठवते काय? कशाला आठवणार? त्यांनाही आपले शब्द आज स्मरत नसतील.

7 comments:

  1. दोन दिवस शहापुत्राच्या वरुन असाच सोशल मिडिया वर धुरळा उडतोय.पुरोगामी पत्रकार ट्विट ची लडी लावतायत.पन केजरीवाल कुणाला आठवेना,अशीच वाह्यात बडबड करणार्या केजरावालचा काटा त्यांच्या च कपिल नावाच्या वहानेने शहांनी काढला होता हे अरविंदला पन कळले नव्हते.तशीच गत गुजरात नंतर काॅंगरेस इतरांची होणार आहे

    ReplyDelete
  2. bhau ekdum barobar

    ya veli bjp aat parynt chya sarvat jast seats jinkel

    ReplyDelete
  3. काका मोदी नीती चा इतका अभ्यास करीत आहेत.. न जाणो कांग्रेस वाले सल्लागार म्हणून घेतील...
    मोदींना कसे हरवायचे ते सांगा म्हणून..

    ReplyDelete
  4. काल इंडिया टीव्ही वर मोदींच्या वडनगर चा सभेवेळी एक रिपोर्टर गुजरात मधील भाजप ची तयारी सांगत होता.. गुरातमधे बूथ लेव्हल चा पुढे पेज प्रमुख तयार केलेत ७ लाख हा आकडा आहे.. ह्या वरून जय्यत तयारी लक्षात येते .

    ReplyDelete
  5. True fact. No one know real conditions and who drive the people's opinion.

    ReplyDelete
  6. भाऊ तुम्ही मोदी शहा जोडीबद्दल फारच CONFIDENT आहात...
    अर्थात हा तुमचा अभ्यास आहे... पण जर का गुजरात मध्ये भाजपा चा पराभव करण्यात काँग्रेस यशस्वी झाली...तर त्याचं विश्लेषण जागता पहारा कसा करेल याचं मला फार कुतूहल आहे...!

    ReplyDelete
  7. विजयाचे एवढी गोडी लागलीय कि कधी भाजपा हरतो याचीच वाट बघतोय....

    ReplyDelete