Monday, October 9, 2017

चर्चा तरी कशाला?

Image result for aiyar rahul gandhi

मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा तोंड उघडले आहे. कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण होणार अशी पुर्वी चर्चा व्हायची. आता नवा अध्यक्ष कधी पक्षाचा ताबा घेणार, असा प्रश्न विचारला वा चर्चिला जात असतो. त्यात अध्यक्ष कोण हा प्रश्न कोणाला पडत नाही. कारण सध्या तरी सौदी अरेबियाच्या घराण्याप्रमाणे युवराज निवडलेला वा नियुक्त केलेला आहे. त्याची नियुक्ती आधीपासून इतक्यासाठी करतात की अकस्मात राजाचे निधन झाले, तर सिंहासनाच्या दावेदारांमध्ये तुंबळ युद्ध छेडले जाऊ नये. अलिकडेच तिथल्या सम्राटांनी आधी ठरलेल्या युवराजाला बाजूला करून नव्या वारसाची नेमणूक केलेली आहे. आजवरची प्रथा अशी होती, की जे कोणी सावत्र वा सख्खे भाऊ त्या घराण्यात होते, त्यातला ज्येष्ठ दुसरा असेल त्याचीच अभिषिक्त युवराज म्हणून नियुक्ती केली जायची. तशीच झालेली नेमणूक रद्दबातल करून विद्यमान राजांनी आपल्या पुत्राला म्हणजे पुढल्या पिढीतील वारसाला युवराज म्हणून नेमले आहे. कॉग्रेसची मागल्या दोनचार दशकातील वाटचाल तशीच चाललेली आहे. पुर्वी कोणी उघडपणे बोलत नसे आता सगळेच उघड त्या घराण्याविषयी बोलत असतात. त्यामुळे सोनियांनी आपला वारस म्हणून राहुल गांधींच्या हाती कारभार सोपवावा, अशी अपेक्षा दिर्घकाळ व्यक्त झालेली आहे. त्यासाठीच कधी नव्हे ती उपाध्यक्ष अशी एक जागा निर्माण करण्यात आली आणि २०१३ साली राहुलची तिथे रितसर नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर पुढली प्रगती होऊ शकलेली नाही. दर दोनचार महिन्यांनी राहुल आता अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त येते आणि नंतर विषय मागे पडतो. अशा स्थितीत अकस्मात अय्यर यांना असे बोलण्याची बुद्धी कशाला झालेली आहे? की त्यांना आता घराणेशाही खुपू लागली आहे? कॉग्रेसमध्ये आई किंवा पुत्रच अध्यक्ष होऊ शकतो, असे अय्यर कशाला म्हणाले असतील?

अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायची तर दुसरा उमेदवार उभा राहिला पाहिजे. तसा कोणी उमेदवार नसेल, तर जो पुढे आलेला आहे, तोच अध्यक्ष होणार आणि दुसरा कोणी अध्यक्ष व्हायच्या शर्यतीत उतरणारच नाही, याची अय्यर यांना खात्री आहे. त्यांना अशी खात्री कशाला वाटावी? तर तशी आजच्या कॉग्रेसमध्ये पद्धतच नाही. कॉग्रेस ही नेहरू गांधी खानदानाची वडिलार्जित मालमत्ता आहे, हे मान्य करणार्‍यालाच त्या पक्षात स्थान असू शकते आणि अमान्य असेल त्याची पक्षातून हाकालपट्टी होते. सहाजिकच ज्या घराण्याची मालमत्ता असते, त्याचाच वारस तिथे अध्यक्ष वा मुख्याधिकारी होऊ शकत असतो. हे आजवर अनेक टिकाकारांनी म्हणून झाले आहे. मग तेच सत्य अय्यर यांना बोलून दाखवण्याची काय गरज होती? त्याचे एकमेव कारण त्यांनाही आता अशा बातम्यांचा कंटाळा आलेला असावा. काय ते एकदा राहुल अध्यक्ष व्हावेत आणि उरलीसुरली कॉग्रेस त्यांनी नष्ट करून टाकावी, यासाठी अय्यर उतावळे झालेले असावेत. म्हणजे मग कॉग्रेसच्या भवितव्याविषयी त्यांनाही काही बोलण्याची गरज उरणार नाही. मध्यंतरी अय्यर यांनी आजच्या राजकारणाचे नेमके विश्लेषण केलेले आहे आणि त्यातले कॉग्रेसने नगण्य स्थानही स्पष्ट शब्दात कथन केलेले आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणूकांचे निकाल आल्यावर अय्यर भलतेच खुश होते. त्या दोन्ही राज्यात कॉग्रेसचा बोजवारा उडालेला होता. पण अय्यरना त्याची अजिबात फ़िकीर नव्हती. तेव्हा प्रतिक्रीया देताना अय्यर म्हणाले होते, मुद्दा कॉग्रेस जिंकण्याचा नसून भाजपाला पराभूत करण्याचा आहे आणि त्या दोन्हीही राज्यात भाजपाला यश मिळालेले नाही. ही आजच्या कॉग्रेसची वा त्यातल्या ज्येष्ठांची मनोभूमिका आहे. त्यात स्वपक्षाला विजयी व मजबूत करण्याचा विषयच संपलेला आहे. भाजपाचे नुकसान हाच आमचा फ़ायदा, अशी आता त्यांची मनस्थिती आहे.

ज्या कॉग्रेसला भवितव्य नाही वा असू शकत नाही, याची अय्यरना खात्री आहे, त्यात अध्यक्ष कोण होणार याची चिंता त्यांना कशाला वाटणार? आणि अध्यक्ष कोणीही झाला म्हणून त्या पक्षाला भवितव्यही असणार नाही, याविषयीचा आत्मविश्वासच अय्यर यांनी बोलून दाखवला आहे. किंबहूना आई वा पुत्र अध्यक्ष होतील, याचा अर्थ नवे काहीही होणार नाही व पक्ष हळुहळू अस्तंगत होणार, अशी हमीच अय्यर देत आहेत. त्याची कारणमिमांसा मात्र त्यांनी करण्याचे टाळलेले आहे. आता कॉग्रेस पक्षाला नव्याने उभारी घेण्याची इच्छा राहिलेली नाही वा काही करण्याची मनिषाही त्या पक्षातील नेत्यांपाशी नाही. सहाजिकच आपले काही होणार नसेल तर निदान आपल्या कट्टर शत्रूचे नुकसान व्हावे; अशी धारणा असू शकते. मात्र कॉग्रेस नामशेष होत नाही, तोपर्यंत भाजपाला दांडगा पर्यायही निर्माण होत नाही, अशीही समस्या आहेच. कारण देशातला तोच दुसर्‍या क्रमांकाचा राजकीय पक्ष आहे. सहाजिकच सर्व भाजपा विरोधक कॉग्रेसने मोदी विरोधाचे नेतृत्व करावे, म्हणून आशाळभूतपणे कॉग्रेसच्या नेतृत्वाकडे बघत असतात. राहुल गांधी तसे काही करू शकतील अशी आशा कोणालाही उरलेली नाही. पण त्यामुळे़च कॉग्रेस मरगळल्या स्थितीत टिकून आहे. त्यातून भारतीय राजकारणाची सुटका झाली तर भाजपाला पर्याय उभा राहू शकणार आहे आणि अय्यर यांच्यासारख्यांना त्याचीच आस लागलेली आहे. मात्र त्यासाठी राहुलनी लौकर अध्यक्ष व्हावे लागेल. पण ते अध्यक्ष होत नाहीत की सोनिया अन्य काही पर्याय शोधत नाहीत. सहाजिकच भाजपाला पराभूत होताना बघण्याची आपली अंतिम इच्छा पुर्ण होत नसल्याने अय्यर चिरडीला आलेले असतील, तर नवल नाही. एकट्या अय्यर नव्हेतर जयराम रमेश इत्यादींची तशीच काहीशी इच्छा आहे. पण त्यांनी बोलायचे कसे व कोणापाशी?

नवलाची गोष्ट म्हणजे हे प्रकरण मागली चार वर्षे चर्चा करून चोथा झालेले आहे. दरम्यान भाजपाचे तीन अध्यक्ष झाले. नितीन गडकरी व राजनाथ यांच्या जागी अमित शहा अध्यक्ष झाले. त्यांनी पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्यासाठी कष्ट घेतले. उलट अध्यक्ष न होताच पक्षाचे नेतृत्व करताना राहुल गांधींनी एकामागून एक राज्यातील कॉग्रेस पक्ष नामशेष करण्याचा पराक्रमही गाजवला आहे. केवळ कॉग्रेसचीच संघटना व प्रभावक्षेत्र संपवण्यात राहुल वाकबगार नाहीत. त्यांनी त्यांच्या सोबत येणार्‍या अन्य पक्षांचीही प्रतिष्ठा धुळीला मिळवून देण्याचे यशस्वी राजकारण करून दाखवले आहे. बंगालमध्ये डाव्या आघाडीला ममताच्या विरोधात सोबत घेणार्‍या कॉग्रेसने डाव्यांचा कणाही मोडून टाकला होता. सहा महिन्यांपुर्वी समाजवादी पक्षाला सोबत घेऊन उत्तरप्रदेशात मुलायमचाही प्रभाव जमिनदोस्त करून दाखवलेला आहे. अय्यर बहुधा त्यामुळे चिंताक्रांत झालेले असावेत. कारण जिथे म्हणून राहुल गांधी पुढाकार घेतात, तिथे कॉग्रेससह अन्य भाजपा विरोधकांचाही सफ़ाया होत चालला आहे. मग भाजपाला पराभूत करायला शिल्लक तरी कोण राहिल, अशी अय्यर यांना भ्रांत पडलेली असावी. त्यामुळे चिडून त्यांनी आई वा पुत्रच पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, अशी मल्लीनाथी केलेली असावी. सवाल कोण होणार असा नसून कधी होणार इतकाच आहे. पण राहुल अध्यक्ष होतील, तेव्हा पक्ष कितीसा शिल्लक राहिलेला असेल, हा गंभीर प्रश्न आहे. कुठल्या तरी एका राज्यात पक्षाला यशस्वी करून अध्यक्षपदी यायचे, अशी तयारी चार वर्षे चालू आहे. पंजाबात ते घडले तरीही त्याचे श्रेय कोणी राहुलना देत नाही, की राहुल ते श्रेय घेण्याची हिंमत करू शकले नाहीत. म्हणून हा अध्यक्षपदाचा गाडा अडकून पडला आहे. कदाचित गुजरात, कर्नाटक व हिमाचल प्रदेशात पुरता सफ़ाया झाल्यावरच राहुल ते निर्णायक पाऊल उचलतील.

1 comment:

  1. भाऊराव,

    माझ्या मते मणिशंकर अय्यर जे बोलले त्याचा संदर्भ थोडा वेगळा आहे. 'कॉग्रेसमध्ये आई किंवा पुत्रच अध्यक्ष होऊ शकतो' याचा गर्भितार्थ असा की काँग्रेसमध्ये जर कोणी मायलेकरांना बाजूस सारून पुढे यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुडदा पडेल.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete