"Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the the universe." -Albert Einstein
विश्वाचा पसारा आणि मानवी मुर्खपणा अमर्याद असतात. पण यातील विश्वाच्या पसार्याविषयी मी साशंक आहे, असे वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो. कारण तो माणसांमध्येच जगत होता आणि माणसातील शहाण्यांचा मुर्खपणा सातत्याने अनुभवत होता. जितका माणूस शहाणा होत जातो, तितका तो वास्तवापासून दुरावत जातो, हे त्याचे खरे कारण आहे. जगातले सर्वकाही ज्ञान व शहाणपण आपल्याला आवगत झाले असल्याचा भ्रम झाला, मग मुर्खपणाला कुठलीही सीमा उरत नसते. तसे नसते, तर सार्वजनिक जीवनात बुद्धीमान वा अभ्यासक म्हणून मिरवणार्यांना इतक्या सातत्याने तोंडघशी कशाला पडावे लागले असते? आपला निवडणूकीमध्ये पराभव झाला आहे आणि आजवर चालत आलेल्या पद्धतीनेच मतदान होऊन तो पराभव झाला आहे, हे सत्य बहुतांश विरोधकांना स्विकारणे शक्य झालेले नाही. त्यामुळे त्यांनी मतदान यंत्रावर शंका घ्याव्या किंवा संशय व्यक्त करावा यात नवल नाही. पण त्या खुळेपणाचे समर्थन करताना जे काही मूठभर पत्रकार अभ्यासक विविध वाहिन्यांच्या चर्चेत युक्तीवाद करतात, ते बघितल्यावर आईनस्टाईनचे हे वाक्य आठवते. मतदान होण्यापुर्वीच हार्दिक पटेल वा अनेक कॉग्रेस नेत्यांनी मतदान यंत्रात गडबड होण्याची शंका व्यक्त केली होती. अलिकडल्या काळात त्याचा आरंभ उडाणटप्पू नेता केजरीवाल यांनी केलेली होती. २०१५ सालात दिल्ली विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्यात आली, तेव्हा त्यांनी ट्वीटरवर तशी शंका व्यक्त केलेली होती. पण त्या मतदानात त्यांनाच ७० पैकी ६७ जागा मिळाल्यावर हाच माणूस एक चकार शब्द यंत्राविषयी बोलला नव्हता. मात्र पंजाबात दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी तोच आरोप पुन्हा केला. याला बेशरमपणा खेरीज दुसरा कुठला सभ्य शब्द असू शकत नाही. आता कॉग्रेसही त्याच वाटेने गेलेली आहे.
गुजरात विधानसभेचे मतदान होण्यापुर्वीच कॉग्रेसने आपला पराभव झाल्यास त्याला मतदान यंत्र जबाबदार असतील असा आरोप करून टाकला होता. याचा साधा सरळ अर्थ काय होतो? कुठल्याही स्थितीत कॉग्रेस जिंकणे वा भाजपा पराभूत होण्यावरच मतदान यंत्राचा खरेपणा अवलंबून आहे. म्हणूनच त्याच यंत्राद्वारे पंजाबचे मतदान झाले व कॉग्रेसने बाजी मारली, तेव्हा त्याबद्दल कॉग्रेसच्या मनात शंका नाही. तसाच भाजपाचा गोव्यात पराभव झाला त्यावरही शंका नाही. पण उत्तरप्रदेशत भाजपा जिंकला, म्हणजे गफ़लत झालेली असते. हे कुठले तर्कशास्त्र आहे? ज्यांच्या मनात अशा दुटप्पी शंका वा संशय असतात, त्यांचे समाधान कोणीही कसेही करू शकत नसतो. आपल्या विजयाची इतकीच खात्री असेल तर ते लोक मतदानावर तरी कशाला विश्वास ठेवतात? त्यांनी निवडणूक कायद्यातही बदलाची मागणी करायला काय हरकत आहे? कालपरवा राहुल गांधीही पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि तिथे जी मतदान पद्धती वापरली, तशीच सार्वत्रिक निवडणूकीत वापरली पाहिजे, अशी मागणीही करायला हरकत नाही. राहुल कसे निवडून आले? तर त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरला नाही आणि दुसरा अर्ज नसल्यानेच राहुल बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात तशीच निवडणूक झाली, तर कोण कॉग्रेसला पराभूत करू शकणार आहे? मतदान पत्रिकेची गरज नाही की मतदान यंत्राची गरज नाही. फ़क्त कॉग्रेसचाच उमेदवार उभा असेल आणि अन्य कोणीच समोर नाही म्हणून मतदानाशिवायच त्याला जिंकलेला जाहिर करावा लागेल ना? मग हे आक्षेप घेत बसण्यापेक्षा कॉग्रेसने मूळ मतदान कायद्यातच बदल करायचा आग्रह कशाला धरू नये? भाजपाच काय, अन्य कुठलाही पक्ष निवडणूकच लढवू शकणार नाही, की कॉग्रेसच्या विजयात अन्य कुठला अडथळा येऊ शकणार नाही.
खुळेपणाला मर्यादा असतात. तुमचा खुळेपणा तुमच्या पक्षात मुक्तपणे चालू शकतो. तुम्हाला राहुल गांधी महान ज्ञानवंत असल्याचे भासण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण त्या खुळेपणाला घटनात्मक संस्था वा व्यासपीठावर आणले, मग घराणेविषयक निष्ठेने काम चालत नाही. तिथे नियम, तर्क व बुद्धीनुसारच निवाडे होत असतात. म्हणून तर कॉग्रेसचे नेता व वकील अभिषेक मनु सिंघवी यांचे दात कोर्टाने घशात घातले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत किमान २० टक्के मतांची व्हीव्हीपॅट द्वारे मोजणी करावी, अशी खुळी मागणी त्यांनी सुप्रिम कोर्टाकडे नेलेली होती. तिथे सूर प्रतिकुल निघताना बघून सिंघवी यांनी आकडा १० टक्केपर्यंत खाली आणला. पण या खुळेपणाने विचलीत झालेल्या खंडपीठाने याचिकाच फ़ेकून देण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा अब्रु झाकण्यासाठी सिंघवी यांना अर्ज मागे घेण्यापर्यंत नामुष्की पत्करावी लागली. म्हणजे फ़ेटाळला जाण्यापेक्षा अर्ज मागे घेण्याची परवानगी कोर्टाकडे मागावी लागली. त्यांच्याच भाटगिरीने राहुल सोनिया खुश होऊ शकतात. पण कोर्टात असे काही चालत नाही. तिथे बसलेल्या न्यायाधीशांना जनतेचा कायदा व न्यायावरील विश्वास जपण्याला प्राधान्य देणे भाग असते. म्हणून सिंघवी व पर्यायाने कॉग्रेसला कोर्टाने हाकून लावले म्हटल्यास वावगे ठरू नये. पण या निमीत्ताने कॉग्रेस आम आदमी पक्षाच्या पोरकटपणापर्यंत घसरली, हेच सिद्ध झाले. केजरीवाल आपल्या बेताल वागण्याबोलण्याने प्रसिद्धी पावलेले आहेत. अलिकडे त्यांनी शांत रहाण्यात धन्यता मानलेली असताना बहुधा राहुल गांधीनी तोच वसा घेतलेला असावा. म्हणूनच ते दोन महिने अतिशय बेताल व बेछूट बकवास करीत आले. पाळलेले काही पत्रकार व पक्षातले हक्काचे भाट त्यांचे कोडकौतुक करताना दिसले, तरी त्याचा सार्वजनिक जीवनात विपरीत परिणाम होत असतो. म्हणूनच भाजपासाठी जी निवडणूक सोपी नव्हती, ती राहुलच्या खुळेपणाने अतिशय सोपी करून टाकली. राहुलनी त्यात ढवळाढवळ केली नसती, तर कदाचित भाजपाला आज शक्य दिसते तितके सोपे यश नक्कीच मिळाले नसते.
राहुलनी भाजपा व मोदींना कसा घाम फ़ोडलाय त्याची वर्णने आपण मागला दिड महिना अखंड वाचलेली आहेत. त्याचे राजकीय विश्लेषण व जातीय मांडणीची गणितेही आपण ऐकलेली आहेत. मात्र एक्झीट पोलचे आकडे समोर आल्यावर सर्वात प्रथम माध्यमातील अभ्यासक व जाणकारांची झिंग उतरली. निकालानंतर आपण अगदीच खुळे वेडे ठरू नये, म्हणून बहुतेकांनी आपापल्या भूमिका बदलून मोदी करिष्मा वगैरे शब्दांची पेरणी सुरू केली. किंबहूना आपल्या खोटेपणाची अस्पष्ट कबुली देण्यापर्यंत काहींनी माघारही घेतली. पण अशा भाट अभ्यासकांच्या शब्दावर विसंबून आक्रमक पवित्रा घेतलेल्या कॉग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना माघार घेणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मतदान यंत्रातील हेराफ़ेरीचा बागुलबुवा चालविला आहे. त्यात काही नवे नाही शेकडो पिढ्यांच्या अनुभवातून आपल्या पुर्वजांनी अशा दिवाळखोर शहाण्यांविषयी मोजक्या शब्दात विश्लेषण करून ठेवलेले आहे. त्यालाच नाचता येईना अंगण वाकडे म्हणतात. कॉग्रेसची अवस्था मोदीयुगात तशीच झालेली आहे. या राजकीय वादळाला सामोरे जाण्याची हिंमत व कुवत नसल्याने कॉग्रेसला अशाच अन्य गोष्टीवर टिकाटिप्पणी करणे भाग आहे. मतदान, निकाल वा यंत्रावर शंका घेणे भाग आहे. पण मतदार तितका खुळा नाही. उद्या आपल्या मतापेक्षा वेगळा निकाल लागल्याची नुसती शंका आली, तरी मतदार म्हणजेच सामान्य जनता प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर येऊ शकते. त्यासाठी कोर्टाचे दार ठोठावण्याची अजिबात गरज नाही, झिंबाब्वे देशात मतदानात गफ़लत झाल्यावर तशी प्रतिक्रीया उमटलेली आहे. तशी उचापतखोरी करणार्या मुगाबेना टिकून रहाणे शक्य झालेले नाही. यंत्रातल्या गडबडीने निकाल फ़िरवणे शक्य असते तर गोव्यासारख्या इवल्या राज्यात भाजपाचा पराभव झाला नसता आणि बंगाल वा तामिळनाडूतही भाजपाला चांगले यश मिळवून दाखवता आले असते. पण हे शहाणपण कॉग्रेस व त्यांच्या भाटांना कोणी समजवायचे?
कॉंग्रेस किवा अन्य कोणी ( पराभूत) आपण भाजप कडून हरलो हे मान्य करायला तयार होत नाहीत.
ReplyDeleteत्यामुळे evm मध्ये गडबड हा आरोप ठोकून द्यायचा अर्थात मोदी यांच्या कडे ढुंकूनही पाहत नाहीत.
Bhau
ReplyDeleteCongrats to Modi, Shah, BJP & All True Indians.
Its really a great victory for BJP as they are winning successive 4th time in Gujarat which is not a joke.
Again There are massive decisions taken By Modi Govt those are not really popular & that too in Gujraat like Note Ban, GST & The Patidar Issue that was raised so strongly.
Again Cong has put all of it energy / money / strategy & what not to win this. N no. of sold TV Channels , Print media & Presstitutes were doing their life time best attempts to make it for cong this time.
However
However
However
The common man of this Country has given Mandate to truth/ to transparency & to the Honesty of a Man called MODI & no one can neglect it now.
This was the most crucial period for BJP / Modi & they made it to success.
I salute all voters of Gujraat who didnt get mislead by Media & caste their Vote in favor on country & National Interest as we know Pakistan & China also were very interested to see BJP loosing in Gujraat & which was never in favor of us as an Indian.
Sau Sunar ki, Ek Lohar ki.
Jai Hind