Saturday, December 16, 2017

अय्यर नावाची विकृती

manishankar cartoon के लिए इमेज परिणाम

दिल्लीत एका वाहिनीशी बोलताना माजी मंत्री व कॉग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच किसमका आदमी’ असा केला. पण बारकाईने ज्यांनी ती प्रतिक्रीया ऐकलेली असेल, त्यांना पक्के ठाऊक आहे की अय्यर यांनी कुठेही नीच जातीचा असा शब्द वापरलेला नाही. मग मोदींनी गुजरातच्या प्रचारसभेत नीच शब्दाला जात चिकटवून ते शब्द आपल्या अंगावर ओढवून घेणे कितपत रास्त वा योग्य आहे? कुठल्याही सभ्य सुसंस्कृत वादावादीत तसे करणे नक्की गैरच आहे. पण ज्याप्रकारचे राजकारण व ‘सभ्य’ वर्तन मागल्या पंधरा वर्षात नरेंद्र मोदींच्या वाट्याला आलेले आहे, त्याचा आधार घ्यायचा तर मोदींनी अतिशय ‘सभ्यपणे’ तसा शब्द बदल केला हेही मान्य करावे लागेल. ज्यांना लोकसभा निवडणूकांचा कालखंड आठवत असेल, त्यांना तेव्हा मोदींनी एका ब्रिटीश पत्रकाराला दिलेली मुलाखत नक्की आठवत असेल. त्याने गुजरातची दंगल व त्यात पडलेल्या बळींशी संबंधित प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना मोदींनी आपल्या गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू जरी चिरडून मरण पावले तरी वेदना होतातच ना? अशा शब्दात प्रतिक्रीया दिलेली होती. त्यात दंगलीत मरलेले गेलेले नागरिक वा मुस्लिमांना मोदींनी कुत्र्याचे पिल्लू म्हटलेले नव्हते. ते रुपक होते. पण तेवढे शब्द धरून ज्या सुसंस्कृत विचारवंत पत्रकारांनी व राजकीय नेत्यांनी मोदींवर मुस्लिमांना कुत्रा ठरवल्याचा आरोप केला होता, त्यापेक्षा आता मोदींनी काय वेगळे केले आहे? राजकारणात वा निवडणूकीत काहूर माजवताना शब्दांची हेराफ़ेरी ही ‘सभ्य’ भाषेची झलक असेल, तर मोदींनॊही तितक्या सभ्यपणे शब्दात फ़ेरबदल केलेला आहे. अय्यर यांनी मोदींना नीच जातीचा म्हटलेले नसेल, तरी मोदींनी त्याला जात चिकटवून राजकीय मतलब साधण्यात काय गैर मानता येईल? ती तर भारतीय ‘सभ्य’ वैचारिकतेची पातळीच झाली आहे ना? ती मोदींनी प्रस्थापित केलेली नाही. तर आजही त्यांना शिव्याशाप देणार्‍यांची सभ्यता आहे ना?

युक्तीवाद म्हणून असे म्हणता येईल आणि भाजपा वा मोदींचा बचावही मांडता येईल. पण अय्यर यांनी तसे नेमके शब्द वापरले नसतील तरी त्यांची देहबोली व वर्तन बघता, त्यांची शब्दामागची भूमिका मोदी म्हणतात इतकीच स्पष्ट आहे. लोकसभा निवडणूकीपुर्वीही त्यांनी ‘वोह चायवाला’ म्हणत मोदींना हलक्या कामाचा माणूस असेच ठरवण्याचा उद्योग केला होता आणि अय्यर वा तत्सम पुरोगामी जनेयुधारी उच्चभ्रू वर्गाची त्यापेक्षा वेगळी धारणा कधीच नसते. ज्याला अस्खलीत इंग्रजी बोलता येते व जो पाश्चात्य विद्यापीठात उच्चशिक्षण घेऊन आलेला आहे, त्या मूठभर लोकांची दिल्ली या राजधानीत प्रतिष्ठा असते. त्या मूठभरांनी मान्यता वा आशीर्वाद दिलेल्या लोकांनाच दिल्लीच्या प्रतिष्ठीत वर्तूळात स्थान व मानमर्यादा असतात. तेवढे लोक वगळले, मग उरलेले सर्व लोक कमीअधिक नीच वर्गातले असतात आणि त्यांना नीच म्हणूनच वागवण्यात अशा उच्चभ्रू वर्गाचा मोठेपणा सामावलेला असतो. ही एक प्रवृत्ती आहे, जी पुर्वकाळात जातीवर्णामध्ये रुजलेली होती आणि आजकाल पुरोगामी म्हणून त्याच प्रवृत्तीने डोके वर काढलेले आहे. कधीकाळी फ़ुले शाहू आंबेडकरांनी अशा प्रवृत्तीच्या विरोधात बंड पुकारून तिला नामोहरम करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेले आहे. पण त्या महात्म्यांचे दुर्दैव असे, की आज त्यांच्याच नावावर तीच उच्चवर्णिय वंशवादी प्रवृत्ती सामान्य माणसाला सदोदीत खच्ची करण्यात पुढे असते. आपले वर्णवर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी फ़ुले आंबेडकरांच्याच विचारात भेसळ करून टाकलेली आहे. अय्यर त्याचे प्रतिक आहेत. शक्य झाले असते, तर अय्यर यांनी नीच जातीचा उल्लेख ठामपणे केला असता. दोन पेग जास्तीचे मारले असते, तर कॅमेरा समोरही अय्यर थेट मोदींना नीच जातीचा आदमी असेही नक्की म्हणाले असते. कारण तसे यापुर्वी घडलेले आहे. पण आज त्याचा संदर्भही कोणी विचारवंत पत्रकार देणार नाही. ही प्रवृत्ती काय व कोण आहे?

‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना या कृत्रिम सभ्यतेवर आणि कृत्रिम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रिम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकाची कदर करीत, सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र राहायचे असले तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे सर्व दंडक प्रसंगी पाळायचा सतत प्रयत्न करीत असतो.’ (प्रा. में पुं रेगे.- ‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७)

दोन दशकापुर्वीच्या लेखातला हा उतारा अय्यर वा तत्सम पुरोगामी मानसिकतेचे नेमके विच्छेदन करणारा आहे. अय्यर तसे का बोलले आणि त्यांचे पुरोगामी जातीबंधू त्यांच्या समर्थनाला का पुढे आले; त्याचे उत्तर रेगे यांच्या उपरोक्त विवेचनात आढळू शकेल. म्हणूनच त्या चार ओळी काळजीपुर्वक वाचल्या पाहिजेत. त्यातला एक एक शब्द संदर्भासह समजून घेतला पाहिजे. यात अय्यर यांची सभ्यता संस्कृती व वर्तनाची खासियत रेगे सरांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. समाजातला अभिजन वर्ग म्हणजे कोण? पुरस्कार वापसी करणारा. मोदींवर कुठल्याही खोट्या आरोपांची सरबत्ती करून बदनामीची चिखलफ़ेक करणारा. संघ वा हिंदूत्ववादी यांच्यावर बेछूट खोटेनाटे आरोप करणे हा त्यांचा मुळ उद्योग आहे. किंबहूना त्यापेक्षाही एकूण समाजाच्या व सामान्य माणसाच्या मनात स्वत:विषयी न्युनगंड व अपराधी भावना जोपासणे, हा अशा लोकांचा खरा उद्योग असतो. त्यातून त्यांना आपली महत्ता सिद्ध करण्याची सवय लागलेली असते. अय्यर त्याच प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. १७ वर्षापुर्वी खुद्द अय्यर यांनीच कृतीतून त्याची साक्ष दिलेली आहे. पण त्याचा कुठे गाजावाजा झाला नाही. एक चिरकुट बातमी आली आणि विषय गुंडाळला गेला. तेव्हा देशात वाजपेयी यांचे सरकार होते आणि जयललितांना सरकार बाहेर काढण्यातून त्यांचे सरकार पाडले गेले होते. मग सोनिया देशाच्या पंतप्रधान व्हायला निघाल्या. त्याला निमूटपणे मुलायम सिंग यांनी पाठींबा दिला नाही, त्यावर अय्यर यांची प्रतिक्रिया काय होती? मुलायमचे तात्कालीन निकटवर्तिय अमरसिंग यांनीच त्याची साक्ष टाईम्स नामक वर्तमानपत्राला दिलेल्या सविस्तर बातमीत आलेली आहे. इतके होऊनही अय्यर हा विकृत माणूस ज्या दिल्लीकर प्रतिष्ठीत वर्तुळात मान्यवर म्हणून वावरत असेल, तर सभ्यता चुलीत गेली असेच म्हणावे लागेल. म्हणून रेगे सरांची सभ्य अभिजन लोकांची व्याख्या समजून घेणे अगत्याचे आहे.

‘समाजात जेव्हा एखादा वरिष्ठवर्ग अभिजनवर्ग असतो तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. त्याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाबाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना, ते जाणूनबुजून असभ्यरितीने वागतात.’ असे रेगेसर समाजातल्या अभिजन म्हणजे तथाकथित सभ्य वर्गाचे वर्णन करतात. अय्यर हे त्या अभिजन वर्गातले आहेत. त्यामुळे ते राहुल गांधींच्या खुळेपणाचेही मोकळ्या मनाने कौतुक करताना दिसतील. उलट नरेंद्र मोदी अभिजन वर्तुळाच्या बाहेरचे असल्याने कितीही चांगले काम केले तरी मोदींनी निंदानालस्तीच करताना दिसतील. अर्थात हे फ़क्त अय्यर यांच्याकडूनच होते असे नाही. दिल्लीतले वा देशभर पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या वर्गाचे विचारवंतांचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. ते आपल्या वर्तुळातील वा परिघातील खुळेपणाचे, पापकर्माचेही कौतुक करतील. पण मोदी वा तसा कोणी वर्तुळाच्या बाहेरचा असेल तर त्याच्याशी ‘अतिरेकी असभ्य’ वागताना दिसतील. अय्यर नेमके तसेच वागत होते. कदाचित त्यांना तेव्हा दोन पेग जास्त नशा चढलेली असल्याने कॅमेरासमोर इतके ‘मनातले’ बोलू नये याचे भान राहिलेले नसावे. कारण असाच प्रसंग २००० सालात घडला होता. तेव्हा वाजपेयी यांचे सरकार होते आणि पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार एच. के. दुआ यांच्या कुटुंबातल्या समारंभासाठी मोठी मेजवानी देण्यात आलेली होती. तिथे नशापान करून तराट झालेल्या मणिशंकर अय्यर यांनी समाजवादी पक्षाचे नेते व मुलायमचे निकटवर्ति अमर सिंग यांना गाठले व शिवीगाळ केली होती. प्रसंग इतका हातघाईवर आला की आईवरून शिव्या दिल्याने संतापलेल्या अमर सिंग यांनी अय्यरना तिथेच समारंभात चोपलेले होते. पण बाहेर कुठे माध्यमात वा वर्तमानपत्रात त्याची वाच्यताही झाली नाही. पुढे अमरसिंग यांनीच ही माहिती टाईम्सच्या एका वार्ताहराला दिलेली म्हणून प्रसिद्ध झाली. पण चर्चा मात्र झाली नाही.

वाजपेयी सरकार एका मताने १९९९ सालात पराभूत झाल्यामुळे मध्यावधी निवडणूका घ्याव्या लागलेल्या होत्या. त्यावेळी सोनियांनी राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदावर दावा केला होता आणि त्यात समाजवादी पक्षाचा पाठींबा गृहीत धरला होता. पण मुलायमला विचारलेही नव्हते. सहाजिकच चिडून मुलायमनी तो पाठींबा नाकारला आणि मग सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या स्वप्नात बाधा आली. त्याची माध्यमात घोषणा अमरसिंग यांनी केली होती. तर तोच धागा पकडून मेजवानीत अय्यर अमरसिंगला शिव्या मोजत होते. ‘तू पक्का वंशवादी आहेस. सोनिया परदेशी असल्याने तुम्ही तिला पंतप्रधान होऊ दिले नाही.’ अमरसिंग यांनी अय्यर यांची समजूत काढण्याचा खुप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. पुढे जाऊन अय्यर म्हणाले ‘तुझा तो मुलायमसिंग माझ्यासारखाच दिसतो. कारण त्या काळात माझा बाप उत्तरप्रदेशात होता. हवे तर मुलायमच्या आईला जाऊन खात्री करून घे.’ इतके झाल्यावर अमरसिंग यांना संयमाने शिवीगाळ ऐकणे शक्य राहिलेले नव्हते. त्यांनी अय्यरची कॉलर पकडून त्याला बडवण्यास आरंभ केला आणि एकूण मेजवानीचा पुरता विचका होऊन गेला. मात्र तिथे एकाहून एक ज्येष्ठ पत्रकार व संपादक विचारवंत हजर असताना कोणी त्याची जाहिर वाच्यता केलेली नव्हती. आपल्यातल्या एका नालायकाची पापे झाकणे म्हणजे अतिरेकी सभ्यपणे वागणे असते. पण हेच बेशरम लोक मोदींनी लग्नानंतर पत्नीशी संसार कशाला मांडला नाही, म्हणून प्रश्न विचारणार. मुख्यमंत्री असताना मोदींनी कुठल्या तरूणीवर चोरून नजर ठेवली किंवा काय, याची बौद्धीक चर्चा करणार. ह्यात कोण कोणाशी अतिरेकी सभ्य वागतो आणि तोच उच्चभ्रू अन्य कोणाशी किती अतिरेकी असभ्य वर्तन करतो, हे स्पष्ट होते. म्हणूनच अय्यर यांनी जे शब्द वापरले, ते कितीही आक्षेपार्ह असते तरी त्यात जात शब्द नव्हता असले युक्तीवाद सुरू झाले. मोदींनी त्याचा प्रचारसभेत वापर केला म्हणून आक्षेप घेतले गेले.

ही आजच्या पुरोगामी सेक्युलर वा तथाकथित विचारवंतांची सभ्यता व सुसंकृतपणा आहे. फ़ुले शाहू आंबेडकरांनी त्यालाच वर्णवर्चस्ववाद म्हणून झिडकारले होते आणि त्यांचा वारसा सांगणारे शरद पवार किंवा मायावती इत्यादी नेते साहित्यिक, अय्यरसारख्यांच्या पापावर सोवळ्याचे पांघरूण घालताना दिसतील. हेच लोक तरूण तेजपाल या संपादकाच्या विनयभंगाच्या प्रकरणात कसे बोलत होते, हे आजही आपण तपासू शकतो, आठवू शकतो. बलात्कार असो किंवा कुठलाही गुन्हा असो, तो वर्तुळाबाहेरच्या कोणी केलेला असेल, तर गुन्हा असतो आणि यांच्या परिघातील कोणी केलेले तेच पापकर्म सभ्यतेचा नमूना असतो. शरद पवारांना दिल्लीत किंमत दिली जात नाही वा देवेगौडांना पंतप्रधान म्हणून प्रतिष्ठा मिळू शकली नाही. कारण ते अशा दिल्लीकर उच्चवर्णिय अभिजनांच्या वर्तुळातले नव्हते. नरेंद्र मोदी त्यांच्या वर्तुळातला नसणे, हे खरे दुखणे आहे. आणि तेही अमरसिंग यांना अय्यरनी दारूच्या नशेत साफ़ स्वच्छ शब्दात तिथेच सांगितलेले आहे. तुझ्या मुलायमची लायकी काय? त्याला दोन इंग्रजी शब्द बोलता येत नाहीत की समजत नाहीत. त्याला आपल्या मनातले विचार इंग्रजीत मांडता येत नाहीत. अमरसिंग तू उद्योगपतींचा दलाल आहेस, तू अंबानीचा कुत्रा आहेस. ही अय्यर यांची भाषा होती आणि या उच्चभ्रू मेजवानीत कोणी त्यांच्या बरळण्याला रोखण्याचा प्रयत्नही केला नाही. ही दिल्लीतल्या महान विचारवंत, संपादक वा अभ्यासक, प्राध्यापकांची सभ्यता व संस्कृती असते. पुढे जाऊन अय्यरने सुनावले, ‘आम्ही ऑक्सफ़र्ड व केंब्रिजमध्ये शिकलेले लोक देश चालवतो.’ याचा अर्थ काय होतो? मोदी वा मुलायमनी निवडणूका जिंकल्याने फ़रक पडत नाही. दिल्लीत वास्तव्य करणारे तथाकथित मूठभर उच्चभ्रू जोवर मान्यता देत नाहीत, तोवर तुमच्या विजयाला वा यशाला काडीमात्र किंमत नसते. मोदींवर दिल्लीकरांचा रोष काय आहे, त्याचे उत्तर यात सामावलेले आहे.

योगायोग असा, की जेव्हा सोनिया राजकारणात येऊन दोन वर्षे झालेली होती, तेव्हाचा हा प्रसंग आहे आणि त्यात अय्यर काय म्हणतात? अमरसिंग व मुलायम वंशभेदी आहेत. परदेशी म्हणून त्यांनी सोनियांचा मार्ग रोखला. देशावर हुकूमत कोणाची चालते? ऑक्सफ़र्ड वा केंब्रिज शिकलेले देशात सत्ता राबवतात. बाकी इथल्या जनतेने व लोकशाहीने निवडून दिलेल्या नेत्याला वा पक्षाला किंमत नाही. ज्याला हे मूठभर अभिजन मान्यता देतील, तोच राजा होऊ शकतो. जो त्यांना जुमानणार नाही, त्याला हे सुसंकृत लोक अतिरेकी असभ्य वागणूक देणार. मागल्या साडेतीन वर्षात मोदींच्या विरोधात साहित्यिक, विचारवंत, कलावंत वा पत्रकार संपादक नोकरशहा कशामुळे आहेत, त्याचे उत्तर सतरा वर्षे जुन्या अय्यर यांच्या नशेतल्या वक्तव्यातून स्पष्ट होते. त्याचीच प्रचिती अधूनमधून चायवाला वा नीच अशा शब्दातूनही येत असते. रेगेसरांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. यात फ़रक कसा व कधी पडतो? ही भंपक व बिनबुडाची संस्कृती व सभ्यता बदलते कशी? तर काही काळ असभ्य मानल्या गेलेल्या गोष्टींचा अभिजन स्विकार करतात आणि त्याच असभ्य गोष्टींना सभ्यता म्हणून मान्यता देतात. पुरोगामी विचार वा भूमिका कधीच गैरलागू नव्हती. पण जेव्हा फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना रोखता येणार नसल्याची खात्री झाली, तेव्हा अशा बदमाशांनी त्यांना मान्यता देऊन भेसळ करून टाकली. त्याच महात्म्यांच्या नावावर आपले पाखंड व बुरसटलेले वर्चस्ववादी जातीय विचार पुरोगामी वेष्टनात गुंडाळून भारतीयांच्या माथी मारलेले आहेत. त्याचे पितळ दिवसेदिवस उघडे पडत चाललेले आहे. अय्यर त्याचा एक नमूना आहे. दिल्लीतले मुठभर व त्यांच्या अशीर्वादाने देशभर पसरलेल्या अशा पुरोगाम्यांचा मुखवटा त्यातून गळून पडलेला आहे. संस्कृती व सभ्यतेच्या त्या फ़ाटलेल्या मुखवट्यातून खरे अय्यर व दिग्विजय आपले हिडीस चेहरा अधिक काळ लपवू शकणार नाहीत.

16 comments:

  1. ही भंपक व बिनबुडाची संस्कृती व सभ्यता बदलते कशी? तर काही काळ असभ्य मानल्या गेलेल्या गोष्टींचा अभिजन स्विकार करतात आणि त्याच असभ्य गोष्टींना सभ्यता म्हणून मान्यता देतात....Mhanunach aata Pappu Mandirat darshan ghet sutlay.

    ReplyDelete
  2. जबरदस्त विश्लेषण भाऊ। मस्त।

    ReplyDelete
  3. भाऊ सर खूप काही शिकवलं या एका लेखात तुम्ही...धन्यवाद.��

    ReplyDelete
  4. Nokarshaha modi ji chya virodhat nahit. Modi's regime is golden age for all honest officers.

    ReplyDelete
  5. भाऊ मानलं पाहिजे तुम्हाला किती स्पष्ट विचार मांडता आणि लिहिता

    ReplyDelete
  6. मेपुं सरांचा हा उतारा ह्यापूर्वी हि तुमच्या ब्लोगवर वाचला होता. तेव्हां दिल्लीचा एकजण होता त्याच्याबरोबर योगायोगाने ह्याच विषयावर बोलणं झालं. त्याला म्हणालो "आप अगर 'ओए' कहना बंद कर दें और 'आप' कहकर ही बुलाएँ तो देखिये कितना फर्क पड़ेगा." त्याने माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहिलं, मान हलवली आणि खिशातून मोबाईल काढून आलेला call घेतल्याचं नाटक केलं, आणि बोलत बोलत निघून गेला. त्यानंतर संधी असुनाहीन त्याने कधी संपर्क ठेवला नाही. दोघांचंहि संपर्कावाचून काही अडलं नाही, पण हा एक प्रकर्षाने दिसणारा फरक आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ
    एवढ्या विकृत स्वभावाची माणसं आपले मंत्री असतात. धन्य आहे तो पक्ष.

    ReplyDelete
  8. दिग्विजय दिसत नाहीत अशात , कुठे गायब झाले

    ReplyDelete
  9. असे फुटके मनी (शिवसेनेचा शब्द ) जो पय्रंत काँग्रेस मधे आहेत ; काँग्रेस ला भवितव्य नाही . हा फुटक्या तोंडाचा माणूस पाकिस्तानात जाऊन मोदी व देश विरोधी बरळला होता . अशा कृत्याना भलेही बुध्दीजीवी सपोर्ट करत असतील पण हे सर्व सामान्य लोकांच्या पचन शक्ती बाहेरचे आहे . हर शाखपे उल्लु बैठा है ; काँग्रेस कि बात छोड दो , देश का क्या होगा .

    ReplyDelete
  10. Ayyar is most hypocratic germ.Sawarkar is beyond his perception,we can understand his level.Excellent write up Bhau keep it up.

    ReplyDelete
  11. भाऊ तुमचे लेख म्हणजे एक झणझणीत मेजवाणीच असते....

    ReplyDelete
  12. अंजली कार्लेकरDecember 18, 2017 at 2:19 PM

    मणिशंकर खरंच फार विकृत आहे. पातळी किती खाली आणावी स्वतःची याला काही मर्यादाच नाही. ना जनाची ना मनाची !

    ReplyDelete
  13. मणी शंकर,अहमद तथा बाबूभाई पटेल,कपिल सिब्बल ही मंडळी यू.पी.ए.सरकारमधील कर्तेधर्ते होती.कॉंग्रेसचा अध्यक्ष बदलताना यांच्या स्थानाला जोरदार झटका बसणार हे निश्र्चित.मग एवढ्या पराभवांत आणखी एकाची भर पडली तर काय बिघडले असा विचार ते नक्की करू शकतात.अहमद पटेल राहूल गांधी ची नोंद गैरहिंदू रजिस्टर मध्ये करून भाजपला मुद्दा पुरवतात,कपिल सिब्बल राममंदिर २०१९ नंतर कोर्टासमोर यावे अशी कोणीही न केलेली मागणी करतात आणि मणी शंकर अय्यर नीच असा उल्लेख करतात.हे सगळं पडद्याआडून मोदींना मदत करण्याचा प्रकार होता.हरलेले अहमद पटेल जिंकावेत म्हणून दोन आमदार शाळकरी पोरांसारखीमतपत्रिका फडकावून दाखवतात,हे इतकं साधं होतं?या मदतीची परतफेड पटेलांनी केली.अय्यर आणि सिब्बल हेसुद्धा सी.बी.आय.पीडित असावेत आणि कारवाई टाळण्यासाठी पुढे आले असावेत.

    ReplyDelete