Tuesday, December 19, 2017

चार चोक तेरा

Image result for kureel  cartoon
 एका शाळेत इन्स्पेक्शन होते. सरकारी अधिकारी तिथे वेळेवर पोहोचण्यासाठी गडबडीत असताना अकस्मात त्यांना आपला शाळकरी मित्र भेटला. त्याला सोडून कामाला जाण्याची अधिकार्‍याला इच्छा नव्हती. म्हणून त्याने त्या मित्राला आपल्या सोबत इन्स्पेक्शनला चलण्याचा आग्रह केला. घाईगर्दीने काम उरकून आणि मस्तपैकी कुठेतरी गप्पा हाणत बसण्याचा त्यांचा मानस होता. हा बालमित्रही तयार झाला. दोघे शाळेत पोहोचले आणि त्यांचे उत्स्फ़ुर्त स्वागत झाले. दोघा मित्रांना घाई असल्याने त्यांनी फ़ारसा वेळ दवडला नाही. प्राचार्यांना सांगून अधिकारी थेट एका अर्गात गेले आणि त्यांनी मुलांना काही मोजकेच प्रश्न विचारून काम निकालात काढले. त्यापैकी एका वर्गात त्यांनी एका मुलाला उभा केला आणि विचारले चार चोक किती? त्या मुलाने उत्तर दिले तेरा. बस्स, त्याची पठ थोपटून अधिकार्‍याने तपासणी संपवली आणि नंतर शाळेच्या नोंदबुकात आपला शेरा मारला. शाळेची व मुलांची उत्तम प्रगती चालू असल्याचा तो शेरा बघून बालमित्र थक्क झाला. त्या वर्गातल्या पोराला साधा चारचा पाढाही म्हणता येत नव्हता किंवा कळत नव्हता. मग शिक्षण अधिकारी अशा शाळेला प्रगती उत्तम होत असल्याचा शेरा कसा देऊ शकतो? पण असा प्रश्न तिथल्या तिथे विचारणे शक्य नव्हते. आपली अस्वस्थता तशीच दाबून तो बालमित्र अधिकार्‍यासोबत फ़िरत राहिला व अखेरीस एका शांत निवांत जागी पोहोचल्यावर त्याने आपल्या मनातले दुखणे बोलून दाखवले. चार चोक तेरा म्हणणार्‍या मुलाला उत्तम प्रगतीचा शेरा? कसली कामे करता रे तुम्ही अधिकारी लोक? वगैरे वगैरे, अशी सरबत्ती झाल्यावर अधिकारी महोदय शांतपणे उत्तरले, तू आज आलास मी मागली सात वर्षे इथे या शाळेत येतोय. पहिल्या वर्षी तोच मुलगा चार चोक सात म्हणाला होता आज सहा वर्षांनी तेरा म्हणत असेल तर प्रगती नाही काय? पुढल्या तीन वर्षात तो चार चोक सोळापर्यंत नक्कीच येईल ना?

हा अधिकारी बहुधा पुरोगामी असावा, असेच त्या बालमित्राला लक्षात आले. म्हणून त्याने तो विषय सोडून दिला आणि या अधिकार्‍याला गुजरातच्या निकालाविषयी मत विचारले. त्यानेही त्याच आवेशात गुजरातमध्ये कॉग्रेसचा व पुरोगामी विचारांची कशी झकास प्रगती चालू आहे, त्याचा युक्तीवाद ऐकवला. गेल्या दोन दिवसात गुजरात विधानसभा निकालानंतर असे पुरोगामी युक्तीवाद आपण सगळीकडून ऐकत आहोत. त्यातला सर्वात मोठा युक्तीवाद मतमोजणीपुर्वी सुरू झाला होता. निकाल कसेही लागोत, राहुलने मोदींबा घाम फ़ोडला. तिथूनच कॉग्रेस बहूमत मिळवणार नसल्याची ग्वाही मिळालेली होती आणि तशी अपेक्षाही करणे गैरलागू होते. विस्कळीत दुबळ्या कॉग्रेस पक्षाला असलेल्या जागाही टिकवणे अशक्य वाटत असताना राहुलनी जितक्या आवेशात प्रचाराची धुरा संभाळलेली होती, तोच एक पराक्रम होता. पण त्यामधून भाजपाची सत्ता गुजरातमध्ये संपुष्टात आणण्याची अपेक्षा बाळगणे निव्वळ मुर्खपणा होता. लोकांमध्ये भाजापाविषयी नाराजी होती आणि जोर लावला असता, तर तिथे भाजपाची सत्ता उलथून पाडणे अशक्य अजिबात नव्हते. राजकीय पंडितांना ममतांनी बंगालमध्ये कशी हुलकावणी दिलेली होती? मग त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये कशाला अशक्य असू शकेल? पण फ़रक मोठा होता. ममता बंगालमध्ये पिकनिक करायला जात येत नव्हत्या. त्यांनी आधीच्या दहा वर्षात तिथे ठाण मांडून डाव्यांच्या सरकार व राजकारणाच्या विरोधात काहूर माजवलेले होते. प्रत्येक आंदोलन व लढ्यात त्या आघाडीवर राहून नाराज लोकांचे नेतृत्व करीत होत्या. ऐनवेळी निवडणूकीत बंगालमध्ये टपकत नव्हत्या. केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी कोलकात्यात बसूनच कारभार केला. पण बंगालची भूमी अत्यावश्यक नसेल तोपर्यंत सोडलेली नव्हती. राहुल गांधी यापैकी काय करताना दिसलेले होते?

गुजरातच्या निवडणूका लागल्यावर त्यांनी दोन महिने तिथे तळ ठोकला. जेव्हा पाटीदार आंदोलन भडकलेले होते, तेव्हाही तिथे राहुल गेलेले नव्हते, की उनाच्या दलित मारहाणीचा विषय ऐरणीवर आला, तेव्हा राहुल तिकडे फ़िरकलेले नव्हते. म्हणजेच निवडणूकीची पिकनिक यापेक्षा राहुलचे योगदान मोठे नव्हते. गेल्या तेरा वर्षात राहुल राजकारणात आल्यापासून त्यांनी पिकनिकमध्ये सहभागी होण्यापेक्षा कोणते काम केलेले आहे? म्हणून मग त्यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसची प्रगती त्या शाळेतल्या विद्यार्थ्यापेक्षा किंचीतही वेगळी नाही. म्हणून गुजरात निकालानंतर मागल्या सात विधानसभा निवडणूकीचे आकडे पुढे करून भाजपाची घसरगुंडी दाखवणार्‍या पुरोगामी शहाण्यांची कींव करावीशी वाटते. २००२ सालात भाजपाच्या १२७ जागा होत्या आणि कॉग्रेसच्या ५१ असे दाखवून मागल्या चार निवडणूकात त्यात किती मोठा बदल झाला आहे, त्याला हे लोक प्रगती म्हणत आहेत. मध्यंतरी पंधरा वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. १९८५ सालात कॉग्रेसने शेवटची निवडणूक गुजरातमध्ये जिंकली तेव्हा त्या पक्षाला ५० टक्के मते व १४० जागा मिळाल्या होत्या. त्याला ३२ वर्षे उलटून गेली आहेत. भाजपाला अजून तितका पल्ला एकदाही गाठता आलेला नाही. पण १९९० सालात कॉग्रेसने बहूमत गमावल्यापासून त्यांना पुन्हा बहूमताच्या जवळपासही सात निवडणूका फ़िरकता आलेले नाही. सात निवडणूका ही राजकीय शहाण्यांना गंमत वाटते काय? तेव्हा बहूमत मिळवणारे माधवसिंग सोलंकी आज हयात नाहीत आणि त्यांचा पुत्रच कॉग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. चिमणभाई पटेल, केशूभाई पटेल, शंकरसिंग वाघेला, अमरसिंग चौधरी असे एकाहून एक दिग्गज राजकारणाच्या बाहेर फ़ेकले गेले आहेत. भाजपा सहाव्यांदा बहूमत मिळवतो आहे आणि कॉग्रेसला सातव्यांदा बहूमताला वंचित रहावे लागले आहे. याचे काही तारतम्य शहाण्यांच्या मेंदूत शिरते की नाही?

सर्वात कहर म्हणजे राहुलनी या निकालावर दिलेली विनोदी प्रतिक्रीया होय. कॉग्रेसने भाजपाला गुजरातमध्ये दणका दिला आणि शेवटी कॉग्रेसचाच नैतिक विजय झाला असे राहुलनी म्हटलेले आहे. अशा नैतिक विजयाला भाजपाने कधी नकार दिला होता? मोदी वा भाजपाला राहुलनी विनंती केली असती, तर त्याही पक्षाने आधीपासून कॉग्रेसचा नैतिक विजय मान्य करण्यात कसूर केली नसती. कॉग्रेसने निवडणूका लढवायचे सोडून त्याच्या बदल्यात भाजपाकडून नैतिक पराभवाची कबुली लिहून मागितली तरी त्यांनी लिहून दिली असती. राहुलना इतके मंदिर मंदिर फ़िरावे लागले नसते आणि मोदींनाही ३०-३२ सभा घ्याव्या लागल्या नसत्या. विश्लेषकांना इतके खुळे युक्तीवाद करावे लागले नसते, की हार्दिक वगैरेंना आटापिटा करावा लागला नसता. नैतिक विजय राजकारणात कवडीच्या किंमतीला कोणी विकत घेत नाही. तसे दावे करण्यात निव्वळ मुर्खपणा असतो, हेही ज्यांना कळत नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी एकत्र येणार असतील, तर मोदी शहा ही जोडगोळी अनैतिक विजय साजरा करायला मोकळीच असणार ना? राहुल कशाला, शहा मोदीच प्रत्येक देवळात जाऊन कॉग्रेसला सतत नैतिक विजयच मिळावा म्हणून नवस करतील ना? पुरोगामी खुळेपणाला आता मर्यादा राहिलेली नाही. ते सूर्यात चंद्र बघू शकतात, विजयात पराभव आणि भिंतीवरच्या पालीतला हत्ती दाखवू शकतात. म्हणूनच चार चोक तेरा, ही प्रगती असते. सहा विधानसभांचे आकडे दाखवून भाजपाचे अपयश व कॉग्रेसचे यश सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या वाटेने जाताना आणखी दोनतीन दशकात नरेंद्र मोदी व भाजपाचा देशात व गुजरातमध्ये सहज पराभव करता येऊ शकेल. फ़क्त तेव्हा कदाचित मोदी वा आजचे राजकीय विश्लेषक हयात नसतील इतकेच. कारण त्या प्रगतीला कोणी अडवू शकणार नाही. जिओ धन धना धन!

14 comments:

  1. भाऊ
    खरंच तुम्ही
    जीओ धन धना धन

    ReplyDelete
  2. bhau
    tyana dar electionla ase naitik vijayach milot.

    Te hi sukhi aani Desh hi.

    ReplyDelete
  3. एक क्रिकेट मैच चल रहा था। बाउंडरी बहुत बड़ी थी 91 मीटर की थी।

    बैट्स्मन ने लगातार 5 छक्के मार दिए थे।
    पाँचवा छक्का उसने 115 मीटर का मारा था।

    छठी गेंद पर उसने फिर से 99 मीटर का छक्का मार दिया।

    अब कुछ दर्शक कह रहे है
    गेंदबाज की जीत हो गयी ..?

    गुजरात_चुनाव

    ReplyDelete
  4. व्वा भाऊ!
    सणसणीत चपराक!तुमचा आईन्स्टाईनचा quote इथे चपखल लागू पडतो.काँग्रेसी मूर्खपणाला सीमा नाही!

    ReplyDelete
  5. मला वाटते माधवसिंग सोळंकी हयात आहेत. ते वृध्दापकाळामुळे राजकारणात सक्रीय नाहीत. ते आणि केशुभाई पटेल हे दोघेही माजी मुख्यमंत्री नव्वदीत आहेत.

    ReplyDelete
  6. भाऊ
    मस्त.राहुल गांधी यांच्या निवडणुकी नंतरच्या कॉमेंट्स म्हणजे तीन चौक तेरा .

    ReplyDelete
  7. पुरोगामी खुळेपणाला आता मर्यादा राहिलेली नाही. ते सूर्यात चंद्र बघू शकतात, विजयात पराभव आणि भिंतीवरच्या पालीतला हत्ती दाखवू शकतात. म्हणूनच चार चोक तेरा, ही प्रगती असते
    -अगदी बरोबर वर्णन...

    ReplyDelete
  8. हिन्दुस्थानात हिन्दुच हिंदू चा शत्रू मानतात. हेच बघा हिन्दुच्या नेत्यांना हिंदू लोकच किमंत देत नाहीत. हिंदूनां मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाइ नेता असेल तर त्यांची चाटुगिरी करायला फार धन्यता वाटते. पण हिंदू म्हणून हिन्दु सत्ता या हिन्दुस्थान मधे असावी असे नाही वाटत १०००.वर्षे गुलामगिरी केलेली रक्तातुन जाता जात नाही. ७० वर्षात व्ही.पी. सिंग, शास्त्रीजी वाजपेयी व आता मोदी हेच हिंदू सभ्यता माणनारे पंतप्रधान लाभले. बाकी सगळे एका खाणदाणाचे हुजरेच होते..

    ReplyDelete
  9. भाऊराव,

    २०१२ च्या निवडणुकींची पक्षवार मतप्राप्ती इथे आहे : पीडीएफ पान क्रमांक १२ - http://eci.nic.in/eci_main/StatisticalReports/SE_2012/Reports_Index%20Card_ECIApplication_GujaratState_CEO.pdf

    तर २०१७ सालचे आकडे इथे आहेत : http://eciresults.nic.in/PartyWiseResult.htm

    काँग्रेसची फक्त अडीच टक्के मतं वाढूनही जागा ६१ च्या ७७ वर गेल्या आहेत. याउलट भाजपची मतं अर्ध्या टक्क्याने वाढूनही जागा ११५ च्या ९९ वर आल्या आहेत. यावरून गुजरातेत प्रस्थापितविरोधी वातावरण आहे हे निश्चित. मात्र राहुल गांधी या प्रवाहाचं मतांत रुपांतर करण्यात अपयशी ठरले आहेत.

    थोडं अंदाजांकडे वळतो. तुमच्या इथल्या लेखात ( http://jagatapahara.blogspot.co.uk/2017/11/blog-post_52.html ) लिहिल्याप्रमाणे 'मेघनिर्घोष'चं कोष्टक पाहता ६८ % मतदानातून भाजपला १३० जागा अपेक्षित होत्या. मात्र प्रत्यक्षात ९९ च मिळाल्या. तर या ३१ जागांचं गणित कोणी बिघडवलं, असा प्रश्न आहे. मेघनिर्घोष चा स्रोत भाजपचा आंतरिक गोट असणार आहे. तर भाजप श्रेष्ठींचं चुकलं कुठे? जमल्यास यावर भाष्य करावं, ही विनंती.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ, वर म्हंटल्याप्रमाणे 31 जागा कोठे गेल्या हे जरा विस्ताराने सांगावे. मते वाढून सुद्धा जागा कमी होतात हे कळावे असे वाटते. तूर्तास मला हे समजले नाही म्हणून तुम्हाला विनंती. तसेच गुजरातच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी पण खालावली होती, याचा परिणाम कोठे दिसत नाही. भाऊ प्लिज सांगा.

      Delete
  10. भाऊंचा नाद न्हाई करायचा.

    ReplyDelete