Sunday, February 25, 2018

‘रुपकी रानी’ श्रीदेवी

sridevi के लिए इमेज परिणाम

गेल्या पावसाळ्यात चेंबूरला एक महिला मॉर्निंग वॉकला चालली असताना तिच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले आणि आसपासचे लोक धावले. त्यांनी तिला झाडाखालून बाहेर काढण्याचा आटापिटा केला. ती वाचली नाही आणि तिच्या मृत्यूवरून मग किती बातम्या आल्या. महापालिकेवर दोषारोप झाले. रस्त्यातल्या खड्डे आणि एकूण दुर्दशेवरही अग्रलेख लिहीले गेले. पण या सगळ्या बातम्या सांगताना एक चित्रण दाखवले जात होते. त्यात डोक्यावर भाजी वा कसली तरी टोपली घेऊन जाणारा एक विक्रेताही धावलेला आठवतो. एका सेकंदाचाही विचार न करता तो गडी डोक्यावरची टोपली रस्त्याच्या कडेला कुठेतरी ठेवून धावला होता. आपल्या टोपलीतल्या वस्तु कोणी चोरून नेईल वा आपले नुकसान होऊ शकेल, असा कुठलाही आपमतलबी विचार त्याच्या मनाला शिवलाही नव्हता. त्याक्षणी त्या पोटार्थी माणसालाही जी माणूसकी सुचली ना, त्याचे आज स्मरण झाले, तुझ्या निमीत्ताने श्रीदेवी! किती अकस्मात गेलीस तू! सोशल मीडियात आणि इतरत्रही तुझ्या चित्रपटांच्या भूमिका व अभिनयाच्या कहाण्या आता दोनतीन दिवस ऐकाव्या लागतील. तुझ्या सौंदर्याचेही गुणगान वाचावे लागेल. पण तुझ्यातले खरे सौंदर्य किती लोक बघू शकले? किती ओळखू शकले? त्या सामान्य फ़ेरीवाल्या विक्रेत्याशी कोणी तुझी तुलनाही करू शकणार नाही. तो गचाळ, कुठल्याही अर्थाने साफ़सुथरा नसलेला विक्रेता आणि श्रीदेवी? अनेकांच्या भुवया टाळूत जातील. पण ती महिला मृत्यूच्या जबड्यात सापडली असताना तिला दिलासा देण्यातले त्या विक्रेत्याचे निरागस औदार्य तुझ्या सौंदर्याशी तुल्यबळ होते आणि तुझ्या भूमिका व अभिनयसुद्धा त्याच दर्जाचा होता. तो विक्रेता जितका सामान्य बुद्धीचा होता, तितकीच तुही सामान्य अकलेची होतीस. कारण तुम्हा दोघांकडे ‘राजा चुकला’ बोलण्याइतकीही बुद्धी नव्हती.

आम्ही ऐकून होतो, की तू चेंबुरला रहायचीस. तिथलीच ही घटना आहे. तेवढ्यासाठी तुझी त्या विक्रेत्याशी तुलना केली नाही, श्रीदेवी! रहात्या घरात तुला ही दुर्घटना कळायलाही काही तास गेले असतील. कदाचित दुसर्‍या दिवशी तुला ती बातमी मिळाली असेल. पण जे काम त्या ओंगळवाण्य़ा पेहरावातील फ़ेरीवाल्याने त्या प्रसंगात केले, तेच तर तू पडद्यावरच्या अभिनयातून करत होतीस. खरे तर ती महिला झाडाखाली सापडून चेंगरली गेली, तेव्हाच अखेरचा श्वास घेत होती. त्यातून ती बचावणे जवळपास अशक्य होते. पण ते तिचे अखेरचे क्षण व अखेरचा श्वास वेदनामय होऊ नये, इतकीच मदत धावलेले लोक करू शकत होते. त्या यातनांवर फ़ुंकर घालण्याची तेव्हा गरज होती. शहाणा बुद्धीमान माणूस काय म्हणाला असता? आता काय उपयोग आहे? ती महिला तर काही क्षणांची धनी आहे. उगाच वेळ व प्रयास कशाला वाया घालवा? हेच त्या विक्रेत्याला वा तुझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना कळत नाही. निरागसपणे अजाणतेपणी तुम्ही अशा कोणाच्या मदतीला धावता, जेव्हा त्यांना त्या वेदना यातना सुसह्य झाल्या तरी देव मदतीला आल्यासारखा भास होत असतो. त्यातले औदार्य बुद्दीमान लोकांना उमजत नाही. त्यातले जीवन सौंदर्य कठोर बुद्धीला भावत नाही. त्यातला मुर्खपणा ओळखण्याइतकी त्यांची बुद्धी कुशाग्र असते. त्या बुद्धीला फ़ेरीवाल्याचा ओंगळपणा समजू शकतो आणि तुझ्यातले स्त्री सौंदर्य भारावून टाकते. पण दोघातली निरागस कर्तव्यबुद्धी कधी उमजू शकत नाही. अन्यथा तो फ़ेरीवालाही अशा प्रसंगी महापालिका, शासन वा प्रशासनावर दुगाण्या झाडत बसला असता आणि उघड्या डोळ्यांनी त्या महिलेला मरताना बघून त्यानेही सेल्फ़ी घेण्याइतकी हुशारी दाखवलीच असती. कारण ‘राजा चुकला’ बोलण्यात बुद्धी सामावलेली आहे. पण चुकीचे परिणाम भोगावे लागणार्‍यांसाठी कोणी उरलेला नाही ग श्रीदेवी!

तीन दशकापुर्वीचा तुझ्या तो मोगॅम्बोला खुश करणारा ‘मिस्टर इंडिया’ आठवतो. त्यातला तुला भावलेला तो गबाळा अनील कपूर, असाच सामान्य बुद्धीचा नायक होता ना? अनाथ बालकांना गोळा करून त्यांचे घर उभे करणारा. त्यासाठी किराणा मालाची उधारी चढवूनही त्यांचे पालनपोषण करणारा. देशाच्या उरावर बसलेल्या मोगॅम्बोशी दोन हात करणारा. तसे बघितले तर किती पोरकट कथानक होते ना? कुठल्याही शहाण्या माणसाला डोके बाजूला ठेवूनही बघताना मनस्ताप व्हावा, अशीच गोष्ट होती. असा कोणी मोगॅम्बो नसतो आणि त्याचे कुठले कारस्थान देशाला उध्वस्त करू शकत नसते. हे बुद्धीकौशल्याने नेमका तर्क मांडूनही सांगता येईल. पटवता येईल. त्यावर व्याख्यानेही देता येतील. त्या व्याख्यानातून श्रोतृसमुदायाला भारावूनही टाकता येईल. पण त्या पोरकटपणात तू सहभागी झाली होतीस. कारण तुझ्यापाशी मोठी बुद्धी नाही की विचारसरणीला तू बांधलेली नाहीस. म्हणून तू किंवा तो गबाळा अनील कपूरही, ‘राजा चुकला’ असे सांगण्यापेक्षा आपल्या अर्धवट अकलेने मोगॅम्बोशी दोन हात करायला पुढे सरसावलात. आम्ही असतो तर अग्रलेख लिहीले असते, वाहिन्यांवर चर्चा केल्या असत्या. किंबहूना तुमची खिल्लीही उडवली आम्ही तेव्हा! कारण असा कोणी मोगॅम्बो नसतोच. तर त्याच्याशी काल्पनिक लढण्यातून काय साध्य होणार होते? पण हा मोगॅम्बो नीरव मोदी वा विजय मल्ल्या होऊन देशाचे अर्थकारण पोखरत होता. त्याला कोणी बुद्धीमंत वा राजकीय अभ्यासक बघूही शकलेले नव्हते. तर त्याला रोखण्याची वा पकडण्याची इच्छा तरी कुठून निर्माण व्हायची? त्यापेक्षा आम्ही ‘राजा चुकला’ बोलण्यात रमून जात असतो आणि तु त्या गबाळ्या अनील कपूरसह पोराटोरांना हाताशी धरून भासमात्र मोगॅम्बोशी लुटुपुटूची लढाई करीत होतात. त्यातून सामान्य माणसाला आपल्यासाठी कोणीतरी लढणारे आहेत, असा दिलासा तर देत होता ना?

रस्त्यातले खड्डे, बॅन्कातल्या अफ़रातफ़री, मोठे आर्थिक घोटाळे, दहशतवाद, सामुहिक बलात्कार, बोकाळलेले जातीय सामाजिक तणाव; असे कितीतरी मोगॅम्बो मागल्या कित्येक वर्षापासून आपल्या भारतीय समाजाला भेडसावत आहेत. त्यातून समाजाला, लोकांना सुरक्षित करण्याचे काम सरकारचे वा राजाचे आहेच. पण त्यात कसुर झाली तर बळी पडणार्‍याने नुसत्या यातना भोगत, असह्य वेदना सोसत डोळे मिटावे काय? असहाय अगतीक होऊन निराश मनाने जगाचा निरोप घ्यावा काय? अशा वेळी त्याला वाचवता येत नसले, तरी त्याच्या दुखण्य़ाचे वा मरणाचे विवेचन दुय्यम आणि त्याला दिलासा देणारी फ़ुंकर घालण्याला प्राधान्य असते. तुझ्या सर्व चित्रपटातून वा अभिनयातून तू लोकांच्या असह्य यातनांवर फ़ुंकर घालत गेलीस. भले तुला त्याचा मोठा मोबदला मिळालेला असेल. पण राजकारणावर राजकारण्यांवर टिकेचे आसूड ओढण्यात तू आपली कला वाया दवडली नाहीस. राजाच्या चुकांनी होणार्‍या जखमा व वेदनांवर फ़ुंकर घालण्यासाठी शक्य तितका प्रयत्न केलाच. अगदी त्या सामान्य फ़ेरीवाल्यासारख्या निरागसपणाने तू करोडो सामान्य लोकांच्या दयनीय वेदनामय जीवनावर फ़ुंकर घालत राहिलीस. तुलाही ते माहित असेल की नाही देवजाणे! पण श्रीदेवी, तुझ्यासारख्या निरागस सामान्य बुद्धीच्या कित्येक कलावंतांनी या दुर्घर नित्यजीवनात किती अवघड प्रसंगांना सुसह्य केले, त्याची गणती नाही. आजसुद्धा असे अनेक प्रसंग येतात, की त्यातून निभावून जाण्याचा कुठला मार्ग नसतो आणि वेदना असह्य असतात, तेव्हा जुन्यानव्या चित्रपट नाटकातील गाणी, संवाद किंवा अभिनय आठवून लोक आपली दु:खे विसरून जातात. नव्या उर्जेने संकटाशी सामना करायला पुन्हा उभे रहातात. ‘राजा चुकला’ म्हणून जखमेवरची खपली काढणे बुद्धीचे काम असेल. पण दुखर्‍या जखमेवर फ़ुंकर घालण्यातले औदार्य व सौंदर्य कधीच मरत नाही. तू आमच्यासाठी पडद्यावर होतीस, आभासमान होतीस आणि म्हणून तूझ्यासारखी आशा कधीच मरत नाही, श्रीदेवी! तुझ्याच चित्रपटाचे नाव होते ना? रुपकी रानी चोरोंका राजा?


https://www.youtube.com/watch?v=eQYFQ97Mkcg

6 comments:

  1. सुंदर अभिनेत्रीवर लिहिलेला तितकाच सुंदर मृत्युलेख.

    ReplyDelete
  2. भाऊ.. लेखाचा मतितार्थ कळला नाही असं नाही.. पण 'राजा चुकला' च्या अतिउल्लेखामुळे लेखाला श्रद्धांजली म्हणून पचवणं जड जातंय..

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही असेच वाटले

      Delete
  3. Bhvu tumhch lihane kadhi kadhi dokyabhaer jat pn kharch chan

    ReplyDelete
  4. वरच्या प्रतिक्रियेशी सहमत.. यात आज तुम्ही राजकारण आणायला नको होत असं वाटतं.

    ReplyDelete
  5. भाऊ तुम्ही चुकलात:)

    ReplyDelete