आपल्या थकित कर्ज किंवा भामटेगिरीचा बोभाटा धनको बॅन्केनेच केल्यामुळे आता आपली बाजारात पत राहिलेली नाही. सहाजिकच इतकी मोठी रक्कम परत फ़ेडण्याची शक्यता संपलेली आहे. छदामही आपण परत करू शकत नाही, असे म्हणे नीरव मोदी याने पत्र लिहून पंजाब नॅशनल बॅन्केला कळवलेले आहे. अनेकांना त्या चोराच्या उलट्या बोंबा वाटल्या आहेत. पण नीरव सत्य तेच सांगतो आहे. आपण ते समजून घेणार नसलो तर नुकसान त्याचे नाही, तर आपलेच म्हणजे सामान्य जनतेचे होणार आहे. कारण मुद्दा एकट्या नीरव पुरता नसून त्याच्या सारख्या किमान दोनपाचशे दिवाळखोर कर्जदारांचा आहे आणि त्यात आणखी काही लाख कोटी रुपये फ़सलेले आहेत. असे इतर नीरव देश सोडून वा लुबाडलेली रक्कम घेऊन परदेशी पळून जाण्यापुर्वी त्यांना कसे रोखायचे त्याचा विचार होण्याची गरज आहे. किंबहूना नीरव तोच इशारा देऊन भारतीय बॅन्का व सरकारला सावध करतो आहे, हे विसरता कामा नये. कर्जफ़ेडीविषयीची असमर्थता व्यक्त करताना त्याने दिलेली कारणे समजून घेतली पाहिजेत. तरच यातली भामटेगिरी लक्षात येऊ शकेल. नीरवला इतक्या प्रचंड रकमेचे कर्ज देताना बॅन्कांनी त्याच्याकडून कुठले तारण घेतलेले होते? ते तारण बॅन्केच्या तिजोरीत बंद नव्हते, तर हिरे बाजारात हिंडत फ़िरत होते. त्याचे नाव आणि बाजारातील पत हेच तारण घेऊन कर्ज दिले असेल, तर त्याची किंमत तिथल्या पत विश्वासावर विसंबून असते. ती पत राखण्याचे काम एकट्या नीरवचे नसून त्याच्या भामटेगिरीत सहभागी होऊन त्याला उधळायला पैसे देणार्या बॅन्केचीही तितकीच जबाबदारी आहे. आपल्या परीने नीरव त्यावर पांघरूण घालून गप्प होता. मग बॅन्केने गुन्हा दाखल केला आणि तारण असलेल्या विश्वासालाच चुड लावली ना? आता नीरव कुठून पैसे देणार? त्याच्यापाशी गहाण ठेवण्यासारखे होते, ते कोणी मातीमोल केले?
मल्ल्याने विविध उद्योग उभारताना बॅन्कांची उचल घेतली. तेव्हा त्याने तारण म्हणून सोनेनाणे गहाण ठेवलेले नव्हते, तर आपल्या कंपनीची प्रतिष्ठा गहाण ठेवलेली होती. त्याच्या किंगफ़िशर कंपनीचे नाव गहाण ठेवलेले होते. त्या नावालाच बाजारात किंमत होती. त्या कंपनीचा शेअर किती रुपयांना विकला वा खरेदी केला जायचा हीच त्याची किंमत होती ना? दिवाळखोरी जाहिर झाल्यावर त्याच्या शेअर प्रमाणपत्रांना कोणी चणेफ़ुटाणे विकणाराही रद्दी म्हणून घ्यायला राजी नसेल, तर नावाची महत्ता काय उरली? आपल्याला करोडो रुपयांची रद्दी भावाने उचल करायला दिल्याबद्दल विजय मल्ल्याने पंतप्रधान अर्थशात्री मनमोहन सिंग यांचे आभार मानणारे पत्र का पाठवले? कारण त्याच्या ज्या शेअरच्या बदल्यात कर्ज मिळण्याची शिफ़ारस सिंग यांनी केली. त्या कागदांना रस्त्यावरचा चणे भेळवालाही विचारत नव्हता. पण बहुमोल ऐवज म्हणून तेच तारण म्हणून स्विकारत, त्याला बदल्यात कर्ज देण्याचा पराक्रम दुसरे अर्थशास्त्री अर्थमंत्री चिदंबरम यांनी केला. याला सामान्य भाषेत झाकली मूठ म्हणतात. ती मुठ झाकलेली असते तोपर्यंत त्यात लाखोचे हिरे असल्याचेही छातीठोकपणे सांगता येते. मूठ उघडली जात नाही, तोपर्यंतच त्याची किंमत असते. एकदा मूठ उघडली मग त्यात काय आहे, त्याचे रहस्य संपते आणि तितके हिरे नसतील तर क्षणात सगळी अब्रु मातीमोल होऊन जाते. मल्ल्या किंवा नीरवची कहाणी अजिबात वेगळी नाही. त्यांच्या झाकलेल्या मुठीवर डोळे झाकून विश्वास ठेवणार्यांनी त्यांना कर्ज दिलेले होते आणि जगालाही डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलेले होते. आज नरेंद्र मोदींना ‘नीरव मोदी कहा है’ असले बाष्कळ प्रश्न विचारण्यापेक्षा राहुल गांधींनी चारपाच वर्षापुर्वी मनमोहन चिदंबरम यांना त्या कर्जासाठीचे तारण कुठे आहे, असा प्रश्न विचारला पाहिजे होता ना?
पत, प्रतिष्ठा, विश्वास किंवा अब्रु ह्या सर्व झाकलेल्या मुठी असतात. त्या उघडण्याची वेळ कोणी येऊ देत नाही. पण व्यवहारात कधीही झाकल्या मुठीवर विसंबून कोणी पैशाची देवघेव करीत नाही. सोनार सावकारही चोख तपासून वस्तु घेत देत असतात. कारण झाकल्या मुठीचा विश्वास दगा देऊ शकत असतो. ज्यांनी झाकल्या मुठीत हिरे आहेत म्हणून इतके कोटी सहजासहजी दिले, त्यांना म्हणूनच ती उघडण्य़ाचा धोका ओळखता आला पाहिजे होता. कर्जे व पैसे देण्यापुर्वी बॅन्केने व तेव्हाच्या सरकारने मूठ उघडून दाखव म्हणून नीरवला किंवा मल्ल्याना धारेवर धरायला हवे होते. पण तसा आग्रह धरणार्यांना बाजूला सारून झाकल्या मुठीतले हिरे तारण म्हणून स्विकारले गेले. एकदा असे झाकल्या मुठीला कर्ज देऊन झाले, मग ती मूठ झाकलेली रहाणे, ही बॅन्क वा धनकोची जबाबदारी असते. कारण त्याचे पैसे गुंतलेले असतात. ती मुठ नीरव किंवा मल्ल्याची असली तरी मोजलेली रक्कम धनकोची असते. नीरव आपल्या पत्रातून त्याचीच समज देतो आहे. आपल्या कर्जाविषयी बोभाटा बॅन्केने केला आणि आपली बाजारातील पत धुळीला मिळवली, अशी त्याची तक्रार आहे. त्याचा अर्थ असा, की आता आपल्या झाकल्या मुठीवर कोणाचा विश्वास उरलेला नाही किंवा त्यातले हिरे विकत घ्यायला कोणी फ़िरकणार नाही. मनमोहन चिदंबरम यांच्यासारखे महाभागही आता ती झाकली मुठ उघडून दाखव म्हणतील आणि नाही उघडली तर कर्ज वा पैसे देणार नाहीत. मग बिचार्या नीरवने पैसे आणायचे कुठून आणि फ़ेडायचे तरी कसे? जगातल्या अन्य कुणा अर्थशास्त्री शहाण्यांना गंडा घालून झाकली मुठ विकण्याची सुविधाही या बोभाट्यामुळे निकालात निघालेली आहे. असे नीरवला सांगायचे आहे. किंबहूना आपण पहिल्यापासूनच भामटे होतो आणि आणखी काही काळ भामटेगिरी करून पैसे चुकते करू शकलो असतो, असे त्याला म्हणायचे आहे.
ज्या नावावर युपीए सरकारने इतके कोटी कर्ज दिले, तेच नाव इतरांना तशाच रुबाबात विकून पंजाब नॅशनल बॅन्केचे कर्ज फ़ेडायचे होते. म्हणजे तोच ब्रान्ड वा नाव अन्य कुणाला विकून पैसे काढायचे आणि तुमचे कर्ज फ़ेडायची मल्टी मार्केटींग योजना होती. ही बाजारातील पत मोठी गंमतीशीर बाब असते. मकबुल फ़िदा हुसेन चार फ़राटे मारतो आणि घोडे वगैरे रंगवतो. त्याची लाखो रुपये किंमत कोणी ठरवली? शाळकरी पोरांनी चितारलेल्या कागदापेक्षा त्यात अमोल असे काय असते? कोणातरी जाणत्याने त्याला अमोल ठेवा मानले आणि पैसेवाले लाखो रुपये मोजून हुसेनची चित्रे विकत घेऊ लागले. ज्याला कलाक्षेत्रात पाय रोवून उभे रहायचे आहे, त्याला मग तोंड फ़ाटेस्तोवर हुसेनच्या चित्रांचे कौतुक करण्याला पयाय रहात नाही. त्या चित्रापेक्षा नीरवचे जवाहिर वा दागदागिने किती वेगळे असतात? मल्ल्याच्या कंपनीचे शेअर किती मूल्यवान असतात? हा सगळा देखावा असतो आणि त्याला भुलण्याला जाणकार मान्यवर प्रतिष्ठीत मानले जात असते. यात उच्चपदस्थ वा राजकारण्यांना खेचून घेतले, मग देशावर सहजगत्या बिनबिभाट दरोडा घालण्याचा मार्ग सुकर होत असतो. नीरवला चोर म्हणायचे तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल व सोनिया गांधी यांनी काय व्यवहार केलेले आहेत? सगळा कागदांचा खेळ आहे. नोदी व खाडाखोडीतून करोडो रुपयांची उलथापालथ होऊन जात असते. बाजारात नावाची चलती असते व तिला पत म्हणतात. ती झाकली मुठ असते. दोन्ही बाजूंनी ती झाकलेली राहिल याची काळजी घेण्यावर गुंतलेल्या अब्जावधी रुपयांचे भवितव्य अवलंबून असते. मग नीरव पत्रे लिहून वेगळे काय सांगतो आहे? त्याच्या पत्राचा आशय एका साध्या वाक्यात कथन करता येईल. ‘गड्यांनो मी एकटाच कुठे गुंतलोय? तुम्ही सगळेच त्यात भागिदार आहात आणि झाकली मुठ तुम्हीही जपायचा वादा विसरून गेलात, तर किंमतही तुम्हीच मोजा.’
कोणत्याही भागीदारीचे मर्म आपण सांगितलेत.जेव्हा बॅंका पैसे देतात त्याचवेळी त्या भागीदार असतात आणि त्यांनी भागीदारीचे अलिखित नियम पाळावयाचे असतात.बॅंकेकडे किंवा तिच्या कर्मचाऱ्यांकडे तेवढी व्यावसायिकता नसावी.
ReplyDeleteप्रकरणाचा निकाल लागेलही पण बराच वेळ जाईल.
भाऊ,निरव ला letter of understaning देण्याची चूक बँकांची आहे, मग त्यात दोष कुणाचा, त्याच्या बद्दल मोदी सरकारला काही वर्षांपूर्वी कळवलं तर केस close झाली असे उत्तर मिळाले, ह्यात चूक कुणाची, कर्ज बाहेर च्या बँकेचे आणि चुकवणार pnb म्हणजे हे सगळं कसं बरं. दोन्ही सरकार दोषी आहेत असं वाटत नाही का, मोदींची त्याच्याशी असणारी जवळीक, इथे तर मोदींनी नक्कीच त्याला अभय दिले, आणि अप्रत्यक्षपणे पळून लावण्यात मदत
ReplyDelete"मकबुल फ़िदा हुसेन चार फ़राटे मारतो आणि घोडे वगैरे रंगवतो. त्याची लाखो रुपये किंमत कोणी ठरवली? शाळकरी पोरांनी चितारलेल्या कागदापेक्षा त्यात अमोल असे काय असते? कोणातरी जाणत्याने त्याला अमोल ठेवा मानले आणि पैसेवाले लाखो रुपये मोजून हुसेनची चित्रे विकत घेऊ लागले. ज्याला कलाक्षेत्रात पाय रोवून उभे रहायचे आहे, त्याला मग तोंड फ़ाटेस्तोवर हुसेनच्या चित्रांचे कौतुक करण्याला पर्याय रहात नाही"...
ReplyDeleteएकदम मार्मिक उदाहरण आहे ... आणि खर सांगायच तर हे वाचून एवढं हसू आलं ते इथं शब्दात सांगता येत नाही।।।
लोग चलते गये और काँरवा बनता गया... कुणालाच माहित नाही कुठं जायचं ... कशासाठी जायचं ..काही हुशार लोक चालत आहेत , हुशार चालतोय म्हणून मीही त्याच्या पाठोपाठ चालतोय, कारण माझे एक गृहितक आहे कि हुशार माणुस कधीही चुकणार नाही .शास्त्रीय स़गित , चित्रकला यातले १0 % लोकांना काही समजत नाही पण १० % लोक चांगले म्हणतात म्हणून मी पण वाहः वाहः करतो .
ReplyDelete