उत्तरप्रदेशच्या दोन लोकसभा पोटनिवडणूका भाजपाच्या एकूण रणनितीतल्या भेगा व भगदाडे स्पष्ट करणार्या आहेत. काही भाजपा नेत्यांनी सारवासारव केलेली आहे. फ़ाजील आत्मविश्वास आपल्याला नडला, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पण ते फ़सवे आहे. प्रत्येक पराभवानंतर हरणारा खुलासे देत असतो. पण त्यामुळे परिणाम वा परिस्थिती बदलत नसते. ती परिस्थिती बदलण्याची कुवत म्हणजे मोठा संघर्ष असतो. यावेळी मुलायमपुत्र अखिलेश व लालूपुत्र तेजस्वी यांनी आपण नुसते पित्यांचे वारसदार नाही, तर तितकेच लढवय्ये असल्याची साक्ष दिलेली आहे. त्यांचे कौतुक करणे भाग आहे. कारण त्यांच्या पित्यांना जमले नाही, त्या मोदी-शहांच्या आव्हानाला या दोन पुत्रांनी समर्थपणे तोंड देऊन विजय संपादन केला आहे. अर्थात त्यावरही स्पष्टीकरण दिले जाईल. पण लंगडे स्पष्टीकरण उपयोगाचे नसते. लालूपुत्र व मुलायमपुत्रांच्या यशाचे सत्य नाकारून भाजपाला २०१९ च्या लोकसभा मोहिमेला सामोरे जाता येणार नाही. म्हणूनच योगी वा अन्य कोणा भाजपा नेत्याने राहुल गांधींची भाषा सोडून सत्याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे. तुमचा प्रतिस्पर्धी जिंकतो, तेव्हा तुम्ही पराभूत झालेले असता आणि म्हणूनच त्याच्या विजयातले दोष शोधण्यापेक्षा, आपल्या पराभवातले दोष हुडकणे व दुरूस्त करण्याला प्राधान्य असले पाहिजे. गोरखपूर व फ़ुलपूर या दोन जागा मुळात भाजपाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या राजिनाम्याने रिकाम्या झाल्या होत्या आणि त्या पक्षासाठी राखण्यात तेच अपयशी ठरले, हे सत्य आहे. त्याच्या परिणामी समाजवादी पक्ष तिथे यशस्वी झाला आहे. तर अरारियामध्ये लालूंच्या अनुपस्थितीत तेजस्वीने लोकसभेची जागा राखून दाखवली आहे. पुढल्या पिढीतल्या या दोघांनी मोदीलाट आपण थोपवू शकतो, याची ग्वाही त्यातून दिलेली आहे. मग या निकालांचे रहस्य काय आहे?
भारतॊय लोकशाहीत सर्वाधिक मते मिळवणारा विजयी घोषित केला जात असतो. त्यामुळे अन्य उमेदवारांमध्ये जितकी मतविभागणी होईल, तितका बलवान पक्षाचा विजय सोपा होत असतो. मागल्या लोकसभेत भाजपाला ३१ टक्के व एनडीएला ४३ टक्के मते मिळाली होती. त्याचा आधार घेऊन ५७ टक्के मते एनडीएच्या विरोधात असल्याचा डंका सतत पिटला गेला. किंवा ६९ टक्के मते भाजपाला मिळालेली नाहीत, असेही सांगितले गेले. हा तेव्हाचा विरोधकांचा फ़सवा युक्तीवाद होता. कारण सत्तर वर्षाच्या इतिहासात देशातला कुठलाही पक्ष वा आघाडी कधीही पन्नास टक्केहून अधिक मते घेऊन सत्तेत आलेली नाही. १९८५ साली इंदिराहत्येनंतरच्या निवडणूकीत कॉग्रेसने ४२५ जागा जिंकल्या होत्या. पण तेव्हाही राजीव गांधींना ५० टक्केचा पल्ला ओलांडता आलेला नव्हता. ४९ टक्के मतांवर त्यांनी ८० टाक्के जागा जिंकल्या होत्या. २००४ सालातही युपीए म्हणून सत्ता संपादन करणार्या कॉग्रेसने विरोधात मते मिळवलेल्या डाव्या आघाडीचा पाठींबा घेऊनच सत्ता बळकावली होती. त्यामुळे मोदी यांच्या सरकारला ५७ किंवा ६९ टक्के मतांचा विरोध असल्याचा युक्तीवाद फ़सवा असतो. पण तेही अर्धसत्य आहे. ४३ वा ३१ टक्के मतांवर सत्ता मिळवताना लाभलेले बहूमत, आपल्यावरील निर्विवाद विश्वास असण्यापेक्षा विरोधकांच्या दुबळेपणाचा लाभ असतो, हे भाजपानेही लक्षात घेतलेले नाही. किंबहूना लक्षात घेतलेले असेल, तरीही विरोधकांची फ़ाटाफ़ुट वा मतविभागणी, हेच भाजपा आपले बळ समजून बसला, हा खरा गुन्हा आहे आणि त्याचीच शिक्षा त्याला उत्तरप्रदेश व बिहारच्या पोटनिवडणुकीत मिळालेली आहे. बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या महागठबंधनाने शिकवलेला धडा न शिकण्याचीही ती शिक्षा आहे. प्रतिस्पर्धी दुबळा असणे, तुम्हाला लढतीमध्ये लाभदायक ठरते. पण वास्तवात तुम्ही निर्विवाद बलवान झालेले नसता.
क्रिकेटच्या क्षेत्रात आज भारतीय संघ जगातला अजिंक्य संघ मानला जातो. त्यामुळे दक्षिण आफ़्रिकेत त्याचा सहज विजय होणार हे गृहीत मानले जात होते. पण तसे प्रत्यक्षात घडले नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताचा लज्जास्पद पराभव झाला. तेव्हा विराट कोहलीने सारसासारव केली नव्हती. आमचा खेळ आफ़्रिकनांच्या स्पर्धेतही नव्हता, याची स्पष्ट कबुली त्याने दिलेली होती. पण त्याच कबुलीने त्याला आपल्यातले दोष बघायला प्रवृत्त केले आणि तिसरी कसोटी जिंकण्यापासून त्याने पुन्हा विजयाची मालिका सुरू केली. २०१४ मध्येही भाजपाचा विजय वा मिळालेले बहूमत हे स्वबळाच्या निर्विवाद यशाची साक्ष नव्हती. इतर लहानमोठ्या पक्षांच्या मतविभागणीचा लाभ अनेक जागी भाजपाला मिळालेला होता. त्याचा पहिला दाखला बिहारच्या पोटनिवडणूकीत काही महिन्यातच मिळालेला होता. त्या राज्यातील १० आमदार खासदार झाल्याने पोटनिवडणूका झाल्या. त्यात लालू नितीश यांनी नुसते जगावाटप केले आणि सहा जागा त्यांनी जिंकल्या. यातल्या तीन जागा भाजपाच्या आमदारांनीच राजिनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या होत्या. त्यतून प्रेरणा घेऊन मग लालू नितीश भाजपा विरोधात एकत्र आले आणि विधानसभेत भाजपाचा बोजवारा उडाला होता. हे अंकगणित आहे. दोन दुबळ्यांच्या भांडणाचा लाभ तिसर्याला मिळतो, तसे बहुपक्षीय लोकशाहीचे निवडणूक निकाल असतात. तिथे कायम मतविभागणी याला बळ समजून विजयाची मोहिम राबवता येत नाही. विरोधक कधीतरी एकत्र येतील आणि त्यांची बेरीज आपल्याला पराभवाच्या छायेत घेऊन जाईल, याची जाणिव राखली पाहिजे. किंबहूना त्यासाठीच मतदानातील आपला हिस्सा वाढवण्याच्या प्रयत्नात कायम राहिले पाहिजे. भाजपाने लोकसभा व विधानसभा जिंकल्यानंतर नेमक्या त्याच गोष्टीकडे पाठ फ़िरवलेली आहे. परिणाम समोर आहेत.
लोकसभा निवडणूकीत उतरल्यापासून नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिलेली होती आणि अमित शहांनी पक्षाध्यक्ष झाल्यापासून त्यासाठी अखंड मोहिम राबवलेली आहे. पण कॉग्रेसला दुबळे करणे, त्या पक्षाचे खच्चीकरण करणे ही एक गोष्ट झाली आणि आपला पक्ष बलदंड बनवणे, ही दुसरी बाब झाली. तिथेच भाजपाची कुठेतरी गल्लत होते आहे. इतर पक्षातले लोक गोळा करून पक्षाला सूज येऊ शकते. पण पक्षाची संघटनात्मक पाळेमुळे रुजवून बलवान होण्यात मोठा फ़रक असतो. इतर पक्षांना दुबळे करणे वा त्यांचे खच्चीकरण ही कॉग्रेसची जुनी रणनिती राहिलेली आहे. त्यामुळेच कॉग्रेस दिर्घकाळ देशाच्या सत्तेत राहू शकली. पण हळुहळू तिचेच संघटनात्मक बळ विस्कळीत होत गेले. त्यात कार्यकर्ते कमी होऊन लाभार्थी म्हणून येणार्यांची संख्या वाढत गेली. परिणामी इतर कोणी कॉग्रेसला नेस्तनाबुत करण्याची गरज राहिली नाही. हायकमांड व त्याचे तोंडपुजे अशीच कॉग्रेस शिल्लक रहात गेली आणि कर्तृत्व गाजवू बघणार्या महत्वाकांक्षी लोकांचा भरणा कमी होत गेला. अशा लोकांनी आपापले स्थानिक पक्ष व संघटना उभारून तिथल्या कॉग्रेसला मागे टाकण्याचे काम हाती घेतले. उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा इत्यादी राज्यात आज कॉग्रेसचे नामोनिशाण म्हणूनच उरलेले नाही. त्याच्या उलट विविध राज्यात भाजपाचे प्रादेशिक व स्थानिक नेतृत्व उदयास आले व त्यांच्यासमोर कॉग्रेसश्रेष्ठींचे मांडलिक टिकू शकले नाहीत. संघटनाही लयाला जात राहिली आणि आज मुठभर राज्यातील प्रादेशिक पक्ष, अशी कॉग्रेसची अवस्था होऊन गेलेली आहे. त्याचे खरे कारण कॉग्रेस १९६० नंतरच्या काळात आपल्या संघटनेपेक्षाही विरोधकांच्या मतविभागणीवर विसंबून रहात गेली. लोकसभा जिंकल्यानंतर भाजपाही काही प्रमाणात विरोधकांच्या त्या दुबळेपणाला आपले बळ समजून बसला आहे. त्याचा फ़टका उत्तरप्रदेश बिहारमध्ये बसला आहे.
बिह्रारमध्ये लालू नितीश यांच्यातल्या भांडणाचा लाभ लोकसभेत मिळाला होता. पण तेच दोघे एकत्र आल्यास तोटा होतो याची चाहुल काही महिन्यात पोटनिवडणुकीत लागलेली होती. तेव्हा लालू नितीश एकदिलाने लढलेले नव्हते. त्यांनी एकमेकांच्या व्यासपीठावर प्रचाराला येणेही टाळलेले होते. त्याचा लाभ त्यांना मिळाल्यानंतर महागठबंधन ही कल्पना आकारास आली. तेव्हा नितीशनी आपले ११२ आमदार असूनही फ़क्त शंभर जागांवर समाधान मानले व लालूंना शंभर जागा देत कॉग्रेसलाही ४० जागा देण्याचे औदार्य दाखवले होते. पण त्यातून मताविभागणी टाळली गेली आणि ४० टक्के भाजपाची मतेही केविलवाणी दिसू लागली. ही चाहुल लागताच भाजपा सावध झाला असता तर त्यांनी आपले संघटनात्मक बळ वाढवण्याचे समिकरण मांडले असते व तशी रणनिती बनवली असती. उत्तरप्रदेश विधानसभेत समाजवादी व कॉग्रेस एकत्र येण्याने फ़ारसा फ़रक पडत नव्हता. तरी भाजपाने आपले बळ मतातून वाढवण्याची रणनिती योजली व तीच यशस्वी झाली. तेव्हाही मायावती अखिलेश एकत्र आले तरी भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखू शकले नसते. कारण त्यांची विविध मतदारसंघातील मतांची बेरीजही भाजपापेक्षा कमी आहे. कारण विक्रमी मतदान ही भाजपाची रणनिती होती. त्यापुढे मायवती अखिलेश यांची बेरीजही कमीच ठरत होती. म्हणूनच बहूमत मिळवण्यात भाजपाला तेव्हाही यश आलेच असते. आजचा पराभव त्यातच सामावलेला आहे. रविवारी मतदान झाले तेव्हाच दोन्ही जागी भाजपाचा पराभव दिसू लागला होता. कारण मतदानाची टक्केवारी लोकसभा विधानसभा यापेक्षा खुपच घटलेली होती. मतमोजणी नंतरचे आकडेही त्याची साक्ष देतात. फ़ुलपूर व गोरखपूर या दोन्ही ठिकाणी २०१४ वा २०१७ च्या मतदानाचे आकडे हिशोबात घेतले तर त्यापेक्षा अधिकची मते मायावती अखिलेश यांच्या मैत्रीला मिळू शकलेली नाहीत.
सपा बसपा एकत्र आल्यानेही त्यांची मते वाढलेली नसतील, तर त्यांच्या पदरात विजयाचे दान कशाला पडले? त्यांचे जे कोणी मतदार आहेत त्यांना मतदान केंद्रात घेऊन जाण्याची मेहनत त्या दोन्ही पक्षांनी घेतलेली आहे. उलट भाजपाचे कार्यकर्ते व नेते मोदींची व योगींची लोकप्रियता आपल्याला विजय मिळवून देणार असल्याच्या मस्तीत मशगुल राहिले होते. त्यामुळे त्यांच्याशी निष्ठावान असलेला मतदार घराबाहेर पडला नाही, ही एक बाजू झाली. दुसरी गोष्ट नेत्यांनी एकजुट केली म्हणून खाली कार्यकर्ता वा मतदार एकमेकांच्या पक्षाला मतदान करीत नाही, हे आणखी एक गृहीत भाजपाला महागात पडलेले आहे. सपा बसपा यांनी आपल्या एकेक मतदाराला बाहेर काढण्याची मेहनत घेतली. म्हणूनच महागठबंधन हा धोका नसून भाजपाच्या आळशीपणाने धोका दिलेला आहे. पक्षाची संघटना मजबूत करून निवडणूकीच्या वेळी आपल्या मतदाराला घराबाहेर काढण्याची क्षमता, ही भाजपाची खरी शक्ती आहे. तिथे त्याला आळस महागात पडलेला आहे. त्याचे प्रतिबिंब मतमोजणीतही समोर आले आहे. लोकसभा वा विधानसभा अशा दोन्ही मतदानात सपा व बसपा यांनी याच दोन्ही जागी बेरीज भाजपाला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होती. याहीवेळी त्या़ पक्षांना मिळालेली मते त्या बेरजेपेक्षा अधिक नाहीत. मात्र भाजपाला यापुर्वी दोनदा मिळालेल्या मतांपेक्षा कमी मते पडलेली आहेत आणि तितक्याच प्रमाणात मतदानातही घट झाल्याचे आकडेच सांगतात. हा दोष मतदाराचा नाही तर भाजपाच्या कार्यकर्ते व नेत्यांचा आहे. दोन विजयांनंतर आपण विरोधी पक्षांना नामोहरम करून टाकल्याचा जो भ्रम भाजपाच्या कार्यकर्ते नेत्यांमध्ये रुजला आहे, त्यानेच त्यांच्याशी दगाफ़टका केला आहे. मायावती अखिलेशची मते तितकीच असूनही त्यांनी बाजी मारलेली आहे. कारण भाजपाची जितकी क्षमता होती, तितक्या कुवतीने त्यांनी लढत दिलेली नाही.
भाजपाने असे का करावे? तो पक्ष इतका गाफ़ील का राहिला? सत्ता मुळातच माणसाला गाफ़ील करते. खेरीज विरोधकांना दुबळे समजण्यातूनही एक गाफ़ीलपणा येत असतो. कॉग्रेसचा मागल्या तीनचार दशकात त्यामुळेच र्हास झाला. विरोधक एकत्र येत होते आणि विभक्त होत राहिले. त्यामुळे कॉग्रेसला सातत्याने मतविभागणीचा लाभ मिळत राहिला. संघटना कमकुवत झाल्यावरही पुरोगामी सेक्युलर असली नाटके करून वा अन्य पक्षाचे मोहरे आपल्यात घेऊन, कॉग्रेस सत्तेचा पल्ला गाठत राहिली. परिणामी त्या पक्षाला आपल्या विस्कळीत होणार्या संघटनेची डागडुजी करण्याची गरज कधी वाटली नाही. त्याचाच लाभ भाजपाने उठवला होता. जिथे आपले बळ कमी आहे, तिथे स्थानिक लहानमोठ्या प्रभावी पक्षाला सोबत घेऊन भाजपाने मतविभागणीचा लाभ कॉग्रेसला मिळू नये, अशी रणनिती राबवली. अधिक आपलेही बळ अधिकच्या मतदानातून वाढवत नेले. त्याचे परिणाम सत्तेतून दिसले आहेत. पण जो धोका पुर्वी कॉग्रेसला होता, तोच आता भाजपालाही आहे. विरोधकांची एकजुट वा मतविभागणी टाळली जाण्याने भाजपाला पराभूत करणे शक्य आहे. तेच लालूपुत्र व मुलायमपुत्राने घडवून दाखवले आहे. त्यामुळे २०१९ भाजपाची सत्ता जाणार अशा भ्रमात विरोधक राहिले, तर तो मोदी शहांचा मोठा विजय असेल. पण या एकजुट व मतविभागणी टाळण्याच्या डावपेचाला अधिकचे मतदान घडवून भाजपा शह देऊ शकतो. किंबहूना गोरखपूर फ़ुलपूर येथेही त्याच पद्धतीने पराभव टाळता आला असता. पण सत्तेच्या मस्तीतल्या भाजपा नेतृत्वाला त्याचे भान राहिले नाही आणि बुवा बबुवा अशी आघाडी योगींना पाणी पाजून गेली. आपण अजिंक्य झालेलो नसून १९७०-८० सालातली कॉग्रेस झालो आहोत, इतका जरी धडा भाजपाच्या नेतृत्वाने यातून घेतला, तरी त्यांना पराभवातून सावरणे शक्य आहे. फ़ाजील आत्मविश्वासाची सारवासारव उपयोगाची नाही.
मी माझ्यावर कोणत्याच पक्षाचे लेबल कधीच चिकटवून घेतले नाही, पण वयाच्या 14व्या वर्षा पर्यंत मी संघीष्ट होतो, कसबा पेठेतल्या अभिमन्यू या संघस्थानावर नियमित जात होतो, त्याचसुमारास महाराष्ट्र विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या, या निवडणुकात माझे काका आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे उमेदवार म्हणून जाहीर झाले, माझे व आचार्य अत्रे यांचे नाते संघ शिक्षकांस माहीत होते,निवडणुका जाहीर झाल्यापासून शाखेत मला मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडू लागला, बौद्धिकबैठकांपासून मला दूर ठेवण्यात येऊ लागले, तो पर्यंत खरेतर मॅक्सया हातून कोणतीच आगळीक घडली नव्हती, नियमित पणे OTC कॅम्प,दसर्याच्या मिरवणुकीत भाग घेत होतो, पण निवडणूकीदरम्यान आमच्या शाखेत असे वातावरण तयार केले गेले की,मला शाखेत जाऊच नये असे वाटू लागले, माझ्यावर संघाने खूप छान संस्कार केले होते, माझेही संघावर प्रेम होते, आहेही,इतकेकी आज वयाच्या 65 वर्षापर्यंत मी शाखेची काळी टोपी जपून ठेवली आहे, पण गेल्या 4 वर्षांपासून मी संघापासून खूप दूर गेलो आहे, आणखी आठवणी पुन्हा कधीतरी
ReplyDeleteमी सहमत आहे
ReplyDeleteToch Toch pana khup yetoy bhau tumchya pan likhanat ref detana..raag nasava
ReplyDeleteKahi vela saral ganit asatana, ugacha ch Tyachi ulat tapasani karu naye asa vatat
Baki sagalya goshti yogi ni spashta kelya ahet ch
नेमके लिहीलात . अर्थातच भगतांना पटणार नाहीच .
ReplyDelete