दहा दिवसांपुर्वी म्हणाजे २४ फ़ेब्रुवारी रोजी एक बातमी टाईम्समध्ये आलेली होती. ती धक्कादायक होती. पण त्यातला फ़ारसा तपशील घ्यायला कोणी वार्ताहर तिथपर्यंत पोहोचला नाही, की राष्ट्रीय माध्यमात कोणाला त्याची फ़ारशी दखल घ्यावी असे वाटले नाही. आपल्या देशात ज्यांनी मानवाधिकाराचे टेंडर भरून त्यात ठेकेदारी व मक्तेदारी संपादन केलेली आहे, त्यापैकी कोणाला त्यात नाक खुपसण्याचीही गरज वाटलेली नसेल. कदाचित मृत लोया किंवा तत्सम गोष्टीतून त्यांना इतकी सवड काढता आली नसेल. म्हणून ती बातमी दुर्लक्षित राहिली. ती बातमी होती त्रिपुरातील! उत्तर त्रिपुरामध्ये झालेल्या मतदानात एका महिलेने भाजपाला मत दिले, म्हणून खवळलेल्या तिच्या सासरा व दीराने घरात घुसून दगड काठ्य़ांनी ठेचून तिला ठार मारले. तिचे नाव काय आणि बाकीचा तपशीलही या बातमीत नाही. पण शेजार्यांनी ही घटना पोलिसांना कळवल्याचे वृत्तात म्हटलेले आहे. पुढे सहा दिवसांनी त्रिपुरातील मतांची मोजणी झाली आणि डाव्या आघाडीचा पराभव झाल्यावर एक पुतळा जमावाने बुलडोझर आणुन उध्वस्त केला. त्याची छायाचित्रेही झळकली आणि देशव्यापी चर्चा सुरू झाली. अर्थातच विजयाच्या उन्मादाची चर्चा सुरू झाली. एका निर्जीव पुतळ्यासाठी असलेली ही वैचारिक संवेदनशीलता भारताचे पुरोगामी वैशिष्ट्य आहे. लेनिन हा रशियन कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता म्हणून डाव्यांचे सरकार असलेल्या त्रिपुरात वा अनेक राज्यात असे पुतळे बसवलेले असतात. त्याविषयी आस्था असायला हरकत नाही. पण त्या निर्जीव पुतळ्याइतकी आस्था एका जित्या गृहीणी वा महिलेसाठी नसावी काय? असती तर आज उर बडवणार्यांनी त्या निनावी महिलेच्या हत्याकांडाचे काहुर कशाला माजवले नव्हते? पुतळा उध्वस्त करण्यात अमानुषता शोधणार्यांची माणूसकी त्या महिलेसाठी का पाझरली नाही?
एकदा असा विषय उकरून काढला, मग आपल्याला ती बातमीच ठाऊक नव्हती असा खुलासा येणे स्वाभाविक आहे. पण मुद्दा वेगळा आहे. आताही हा पुतळा उखडला जाण्याची बातमी तुमच्यापर्यंत आलीच नसती, तर तुमची माणूसकी जागली नसतीच ना? म्हणजे अन्य कोणी तरी तुमच्यातली माणूसकी जागवण्यासाठी तशी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवावी लागते आणि तुमच्या माणूसकीला कुंभकर्णाच्या झोपेत ठेवायचे असेल, तर तशा बातम्या झाकूनपाकून ठेवायच्या असतात. अर्थात अशा एका महिलेच्या हत्येचे पांघरून पुतळा पाडण्याच्या घटनेवर घालता येत नाही. तेही चुकच असते आणि असंस्कृत कृत्यही असते. पण तारतम्य शोधायचे, तर कुणाच्या निर्जीव पुतळ्यापेक्षा एका जीवंतपणी ठार मारल्या गेलेल्या महिलेविषयी अधिक आस्था असावी. ही अपेक्षा गैरलागू मानता येणार नाही. पण तिचा आपल्या सार्वजनिक जीवनात कायम दुष्काळ पडलेला असतो. कोण मारला गेला वा काय झाले, याच्याशी कोणाला कर्तव्य नसते. त्या घटनेत कोणाला गोवता येईल वा कोणावर पांघरूण घालता येईल, त्यानुसार आपल्या प्रतिक्रीया उमटत असतात. बाकी आपण असंवेदनशीलच असतो. धर्माचे, जातीचे वा वैचारिक बधीरपण इतके बलशाली झालेले आहे, की आपल्यातला माणूस व त्याच्या उपजत भावनाही अशा परचालीत झालेल्या आहेत. कुणाला हवे म्हणून आपण भावनाशील होतो किंवा कुणाला आवडणार नाही म्हणून आपल्या भावनांचा कोंडमारा निमूट सहन करण्यात शहाणपणा शोधत असतो. तसे नसते तर लेनिनच्या पुतळ्याचे इतके अवडंबर माजवले गेले नसते. भाजपाने त्रिपुरा जिंकला म्हणून तिथे असे झाले आणि म्हणूनच त्याला विजयाचा उन्माद ठरवण्याची पुरोगामी शर्यत सुरू झाली. मात्र मार्क्सवादी सत्ता असतानाच भाजपाला मत देण्यासाठी खुन पाडला गेला, तर नाही दिवा नाही पणती, नाही गणती?
उन्माद वा माजोरेपणा ही कुठल्याही पक्ष, धर्म, जात यांची मक्तेदारी नसते. त्याला सत्तेची मस्ती म्हणतात. पण त्याच्याही पलिकडे एक वेगळी बाजू आहे. झुंडशाहीने जेव्हा कुठल्याही समाज घटकांचा कोंडमारा केलेला असतो. तेव्हा त्याचा विस्फ़ोट भयंकर असतो. आज त्रिपुरातील पुतळा उखडला गेला म्हणून अश्रू ढाळणारे, रशियातही असे कशाला झाले तेही विसरून गेलेत काय? त्रिपुरातील लोकांसाठी लेनिन कोणीच नव्हता. पण रशियनांसाठी तो नक्कीच क्रांतीकारक होता. झारशाहीचे अत्यचारी वा मुजोर शासन उध्वस्त करणार्या लेनिनने रशियनांसाठी मोठे काम केलेले होते. मग तिथेच सात आठ दशकांनंतर त्याच्या स्मारके व पुतळ्यांची विटंबना कशा झालेली होती? रशियनांनीच त्याचे पुतळे फ़ोडून तोडून टाकण्यापर्यंत का अतिरेक केला होता? त्यांनी जे कृत्य केले, ते लेनिनची अवहेलना होती काय? अजिबात नाही. लेनिन वा तत्सम इतिहास घडवणार्यांविषयी कुठल्याही समाजात व देशात कधीही विपरीत भावना नसते. पण जेव्हा त्यांचे चेहरे, पुतळे वा विचार ह्यांना हत्यार बनवून मस्ती सुरू होते आणि त्यांना थोतांड बनवले जाते, तेव्हा हे पुतळे व चेहरे अन्यायाचे प्रतिक होऊन जातात. सोवियत साम्राज्य म्हणून सात दशकांचा जो कारभार झाला, त्यावर लेनिन स्टालीनचा चेहरा हे लेबल होते. म्हणूनच त्या राज्यात झालेल्या प्रत्येक अत्याचार अन्यात्याचे प्रतिक, हे पुतळे होऊन गेलेले होते. ते पुतळे म्हणजे त्या व्यक्तीचे विचार वा कर्तृत्व नव्हते. तर त्यांच्या नावावर पाखंड माजवून लोकांना छळणार्या सोवियत राज्यकर्त्यांचे प्रतिक, म्हणजे हे पुतळे होते. सहाजिकच ते साम्राज्य कोसळते, तेव्हा त्याच अन्याय अत्याचाराच्या विरोधातला भावनिक स्फ़ोट प्रतिकांवर येऊन आदळत असतो. त्रिपुरा असो की मास्कोतला लेनिनचा पुतळा असो. त्याला उध्वस्त करणार्यांना लेनिनचा अवमान करायचा नसतो, तर त्या मुखवट्यातून छळणार्यांना धडा शिकवायचा असतो.
कालपरवा महाराष्ट्रात भीमा कोरेगावचा विषय रंगला होता. त्या निमीत्ताने शनवारवाड्याच्या परिसरात एक मोठा सोहळाही साजरा झाला. त्यात सहभागी व्हायला आज रडणार्यांपैकी अनेकजण अगत्याने हजर होते आणि त्या सोहळ्याला नवा एल्गार असे विशेषण चिकटवण्यात आलेले होते. त्या मंचावर बसलेले कितीजण असेच पुतळे फ़ोडणे व उध्वस्त करण्यातला पुरूषार्थ सांगणारे होते? पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा उखडून नदीपात्रात फ़ेकून देणारे त्या व्यासपीठावर नव्हते काय? किल्ल्यावरील शिवरायांचा कुत्रा म्हणून उभे असलेले शिल्प उखडणारे वा लालमहालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा रातोरात कापून काढणार्यांचा त्या मंचावर कोणी विरोध केला होता काय? पुतळे सगळेच निर्जीव असतात आणि संहिष्णूता एकाच बाजूची दाखवून कोणाला संहिष्णूतेचे मक्तेदार होता येत नसते. झुंडी एकाच बाजूला नसतात. आपल्याला पहिली संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत झुंडी असतात आणि आज त्रिपुरातील दुसर्या झुंडीला शिरजोर होण्याइतकी मते मिळालेली आहेत. आधी जी झुंड सत्तेत होती, ती मतांसाठी जीवंत माणसांनाही दगडांनी ठेचून मरायला मागेपुढे बघत नव्हती. आज दुसरी झुंड त्याच पद्धतीने आपला उन्माद दाखवते आहे. त्यात कोणावर पांघरूण घालण्याची गरज नाही. त्यापैकी आज कोणी दुर्बळ झाला म्हणून त्याने आपणच अत्याचाराचे बळी असल्याचे नाटक रंगवून सहानुभूतीचा वाडगा फ़िरवण्याचे काही कारण नाही. ज्याची सुरूवात करता त्याची कडू फ़ळेही चाखायची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा कुठलेही प्रतिक अन्याय अत्याचार व छळवादाचे प्रतिक होते, तेव्हा त्याला कितीही पावित्र्य चिकटवून वा संस्कृतीची झालर लावून उपयोग नसतो. असली नाटके युक्तीवादात चालतात आणि झुंडी सबळ दुर्बळातली निर्दय निष्ठूर लढाई असते. त्यात वैचारिक लुडबुड चालत नसते. कारण झुंडी निर्बुद्ध असतात.
https://timesofindia.indiatimes.com/city/agartala/tripura-woman-votes-against-cpm-in-laws-kill-her/articleshow/63052150.cms
khray bhau
ReplyDeleteReality
ReplyDeleteमेंदू आजारी पडलाय
ReplyDeleteअगदी खरंय भाऊ. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
ReplyDelete