रामायणात एक मजेशीर कथा आहे. लंकेत पळवून नेलेल्या सीतामाईला भेटायला व श्रीरामाचा निरोप द्यायला पवनपुत्र हनुमान मारुती जातो. त्याला अशोकवनाच्या जवळ रावणाचे हस्तक पकडतात. मारुती हा कितीही देव असला तरी तो माकड होता. त्याचे ते रुप बघून या राक्षसांना गंमत करायची इच्छा होते. ते त्याच्या शेपटीला लांबच लांब चिंध्या बांधून ती पेटवून देतात. शेपटीला चटके बसले मग ते माकड कसे किंचाळते आणि उड्या मारते, त्याची गंमत त्यांना बघायची असते. इथे त्यांनी कोणती चुक केली ते लक्षात यायला खुप उशीर होतो. कारण पेटलेल्या शेपटीनिशी मारुती लंकेतल्या इमारती व वस्त्यांमध्ये धुमाकुळ घालत फ़िरू लागतो आणि एकामागून एक वस्त्यांमध्ये आगडोंब उसळू लागतो. जेव्हा अवघी लंका धडधडा पेटू लागते तेव्हा मजा संपलेली असते आणि मारुती शांतपणे आपली पेटलेली शेपटी पाण्यात विझवून ती होळी बघू लागतो. अवघ्या लंकेत हलकल्लोळ माजतो. यातून अर्थातच मारुतीचे कौतुक रामलिला सांगते. पण ती झाली पुराणकथा. आजच्या युगात अशा कथांमधला आशय वा बोध घ्यायचा असतो. मारुती कितीही देव वगैरे असला तरी ते माकड असते आणि त्याच्यातले माकड जागवणे, म्हणजे आपल्यालाच संकटात लोटून देणे असते. असा विचार माणसाने करायचा असतो. तो केला नाही, मग लंकादहनाला पर्याय नसतो. मारुतीचे शेपूट पेटवण्यात गंमत शोधणार्यांनी त्याचा आधी विचार करायचा असतो. तसा विचार तेव्हा झाला असता, तर रामायणात लंकादहनाची गोष्ट आलीच नसती. पण तेव्हाच्या शहाण्यांना ती अक्कल नव्हती की आजच्या कलियुगातल्या शहाण्यांनाही ती अक्कल नाही. म्हणून आजही लंकादहनाच्या कथा पुराणे ऐकावी लागत असतात, अनुभवास येत असतात. म्हणून तर त्रिपुरातील पुतळ्याचे दफ़न होत असताना दक्षिणेत आजची श्रीलंका दहनाच्या वेढ्यात सापडलेली आहे.
आजची श्रीलंका ही रामायणातली उरलेली नाही. तिथे आज तितके कोणी रामभक्त वा रावणभक्त शिल्लक उरलेले नाहीत. अशा श्रीलंकेत मध्यंतरी तीन दशके तामिळी वाघांनी खुप धुमाकुळ घातला. जितका म्हणून त्यात मानवतावादी शहाण्यांनी हस्तक्षेप केला, तितकी लंका अधिकाधिक आगडोंबात लोटली गेली. अखेरीस राजपक्षे नामे एका राजकीय नेत्याला भान आले आणि त्याने सर्वप्रथम आपल्या जनतेचा कौल घेतला. निष्ठूरपणे तामिळी वाघांच्या दहशतवादाची नांगी ठेचून काढण्याचे काम हाती घेतले. त्याने बोलणी वगैरे थांबवून जाफ़नातील वाघांना व तिथे वसलेल्या तामिळींना अखेरचा इशारा दिला. अमूक तारखेपर्यंत जाफ़नातून बाहेर पडून सरकारने उभारलेल्या शिबीरे छावण्यात दाखल व्हा. मुदत संपली, मग उरलेल्या प्रत्येकाला तामिळी वाघ समजून त्यांचे निर्दालन केले जाईल असा तो इशारा होता. तो अंमलात आला आणि मागल्या सात वर्षात श्रीलंकेत कमालीची शांतता नांदत होती. त्यात व्यत्यय आणु बघणार्या मानातावादी संघटनांना व त्यांच्या म्होरक्यांना राजपक्षेंनी आपल्या देशात पाय ठेवायला बंदी केली. अन्यथा त्यांनी पुन्हा एकदा मारुतीचे शेपूट पेटवलेच असते. अर्थात त्यामुळे शांत झालेल्या श्रीलंकेत आता पुन्हा लंकादहनाची स्थिती निर्माण झालेली आहे. तिथे आश्रित म्हणून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या कृपेने बौद्ध मुस्लिम दंगलीचा भडका उडालेला आहे. सुदैवाने आजही तिथे समंजस सत्ता असल्याने त्या सरकारने तात्काळ आणिबाणी घोषित केली आणि लष्कराला पाचारण करून शांतता प्रस्थापित करण्याचे काम सोपवले आहे. पण शांतता प्रस्थापित करायची असेल तर आधी पेटलेले मारूतीचे शेपूट पुर्ण विझवले पाहिजे आणि त्या शेपटाचे नाव आहे रोहिंग्या. कारण त्याच निर्वासित मुस्लिमांमुळे आपल्याला धोका असल्याची स्थानिक बौद्धांची भिती या दंगलीचे कारण झालेले आहे.
आपल्या देशात म्हणजे भारतात कुठल्याही मुस्लिम तक्रारीला संघ वा हिंदूत्ववाद चिकटवण्याची राजकीय फ़ॅशन झालेली आहे. ते बोलणार्या शहाण्यांना सिरीया, इराक वा श्रीलंकेत संघ वा हिंदूत्ववादी संघटना नसल्याचे भान नसते. श्रीलंकेत आता जे वातावरण तापलेले आहे, त्याचे नेतृत्व बौद्ध धर्मगुरू करीत आहेत. कारण रोहिंग्यांची लोकसंख्या श्रीलंकेचे सामाजिक संतुलन बिघडवत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. असे निर्वासित म्हणून मुस्लिम येतात आणि त्यांची वस्तीमध्ये बहूसंख्या झाल्यावर इतरांना तिकडे फ़िरकू देत नसल्याची मूळ तक्रार आहे. म्यानमार हा देश बौद्ध बहुसंख्येचा असून तिथे चार वर्षापुर्वी बौद्ध धर्मगुरूंच्या पुढाकाराने मुस्लिमांच्या विरुद्ध हिंसक आंदोलन याच कारणास्तव सुरू झाले. तेव्हापासून पुर्वेकडील अनेक देशातले बौद्ध विचलीत झालेले आहेत. अनेक देशात मग मुस्लिम विरोधी हिंसाचाराला आरंभ झाला. त्याला मुख्यत: सौदी अरेबियातून आयात झालेल्या प्रशिक्षित इमामांची चिथावणी होती. त्यांनी स्थानिक मुस्लिमांना कट्टरतेकडे नेण्यात पुढाकार घेतला आणि स्थानिक बौद्ध व मुस्लिमातले वितुष्ट पराकोटीला जाऊ लागले. सर्वसाधारण अशी स्थिती येते तेव्हा आपल्यावर धार्मिक अन्याय होत असल्याचा कांगावा मुस्लिमांनी करावा हा राजकीय डाव असतो. पण म्यानमारमध्ये लष्करी सत्ता होती व त्यात बौद्धांचाच भरणा असल्याने लष्करानेही मुस्लिम विरोधात पवित्रा घेतला. तेव्हा दंगली माजवणार्या जिहादी रोहिंग्यांना परागंदा व्हायची पाळी आली. पण त्यांना मदत करणारे सामान्य मुस्लिम मात्र बौद्धांसह लष्कराच्या रोषाचे बळी ठरले. त्यांनाही मग जीव मुठीत धरून पलायन करावे लागले. शेजारच्या अनेक देशात असे रोहिंग्या पोहोचले आणि त्यात आपला खरा चेहरा लपवून जिहादी रोहिंग्याही आश्रित म्हणून या देशात गेले. त्यांच्याच चिथावणीने मग अनेक देशात दंगली सुरू झाल्या. श्रीलंकेतील ताजी घटना त्याचाच नमूना आहे.
कॅन्डी हे श्रीलंकेतील मोठे शहर असून त्याच्या एका उपनगरात चार मुस्लिमांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली. त्या जखमांनी त्याचा मृत्यू झाला. त्याचे खापर मग एकूण मुस्लिमांवर फ़ोडले गेले आणि आधीच बौद्धांच्या मनात असलेल्या पुर्वग्रहाला चुड लावली गेली. तिथल्या बौद्धांना मुळातच रोहिंग्या नको होते आणि तरीही त्यांना आश्रय दिला गेला होता. तो राग उफ़ाळून आला आणि अल्पावधीत बौद्धांचे घोळके मुस्लिम वस्त्यांवर हल्ले करीत जाळपोळ करू लागले. हा प्रकार असा फ़ैलावू लागला की सरकारला थेट लष्कर आणुन संचारबंदी जारी करावी लागली. मुळात तिथे रोहिंग्यांना आश्रय दिला नसता, तर ही स्थिती आली नसती. ज्यांना मायदेशीच गुण्यागोविंदाने अन्य समाज व धर्मियांशी जगता येत नाही, ते परक्या देशात इतरांशी काय जुळवून घेणार होते? पण राष्ट्रसंघात व अम्नेस्टीत बसलेल्या शहाण्यांना मारुतीचे शेपूट पेटवून गंमत बघण्याची भारी हौस! त्यांच्याच आग्रहाखातर अनेक देशांना रोहिंग्यांना आश्रय द्यावा लागला आहे आणि जिथे असा आश्रय दिला गेला आहे, तिथे मारुतीचे शेपूट आगी लावत फ़िरते आहे. काही महिन्यांपुर्वी काश्मिरात घातपाती हल्ल्यात रोहिंग्यांचा चेहरा सापडला होता. पाकिस्तानच्या जिहादी छावण्य़ात रोहिंग्या प्रशिक्षणाला जात असल्याच्याही बातम्या आलेल्या होत्या. इतिहास तपासला तर म्यानमारच्या याच रोहिंग्यांचा तेव्हाचा पुर्वजांनी महंमद अली जिना यांनाही आपल्या म्यानमारी प्रदेशाला पुर्व पाकिस्तानशी जोडून घेण्याची मागणी केली होती. जिनांनी ती फ़ेटाळून लावली होती. हे लंकेला जाळणारे शेपूट किती जुने आहे, त्याचा यातून अंदाज येऊ शकतो. शांतता ही मारुतीचे शेपूट पेटवणार्यांमुळे भंग पावते, इतकाच त्यातला आशय आहे. एकदा ती पेटवण्याचा मुर्खपणा केला, मग त्याचे चटके बसले म्हणून रडण्यात अर्थ नसतो. त्यालाच साध्या भाषेत माकडाच्या हाती कोलित असेही म्हणतात.
No comments:
Post a Comment