Monday, April 30, 2018

शत्रुघ्नाचे रामायण

Image result for shatrughan sinha

हिंदी चित्रपट सृष्टीत खलनायकाच्या भूमिका यशस्वी करून आपली ओळख निर्माण करणार्‍या शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे नायकाच्या भूमिका सुरू केल्या. पण आपल्या ठराविक साच्याच्या अभिनयापलिकडे त्याला कधी आपली छाप या क्षेत्रात पाडता आली नाही. योगायोग असा, की त्यांच्याच सोबतीने पडद्यावर आलेल्या विनोद खन्ना व अमिताभ बच्चन अशा कलाकारांनी आपली नुसती ओळख निर्माण केली नाही, तर आपले वेगळे असे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले. त्यामुळेच स्टारडम त्यांना मिळू शकला. पण आपल्या ठाशीव संवादामुळे लोकांच्या लक्षात राहिलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना कधी तितकी लोकप्रियता मिळू शकली नाही. आपल्याच बळावर चित्रपट पेलून जाण्याची किमया साधता आली नाही. असा हा कलावंत पुढे राजकारणात आला. पण त्याला तिथेही आपली मुळची ओळख विसरून काम करता आले नाही, की आपले काही स्थान निर्माण करता आले नाही. वाजपेयीच्या जमान्यात त्यांची वर्णी मंत्रीपदी लागलेली होती. पण त्यामुळे आपण बिहारचे खास नेता असल्याचा भ्रम मात्र या माणसाच्या मनात निर्माण झाला. पण पक्षशिस्त पाळणे वा पक्षाच्या वाढविस्ताराला हातभार लावणे त्याला कधी साधले नाही. पर्यायाने श्रेष्ठी तिकीट देतात म्हणून हा कलावंत लोकसभेत सातत्याने निवडून आला. पण बाकी राजकीय बेरीज शून्य! पण अहंकार व वजाबाकी मोठी आहे. दहा वर्षानंतर भाजपाची दिल्लीत सत्ता आल्यावर आपली वर्णी मंत्रीपदी लागावी, ही त्याची अपेक्षा होती. ती पुर्ण झाली नाही आणि त्यातला मुळचा खलनायक जागा झाला. पण स्वतंत्रपणे आपली काही दादागिरीही त्याला दाखवता आली नाही. कधी नितीशकुमार तर कधी यशवंत सिन्हांच्या मागे मागे राहून त्याने पक्ष नेतृत्वाला हुलकावण्या देण्याचे काम केले. त्यामुळे कधी नव्हे ती त्याच्या नावाची मिमांसा करण्याची वेळ आली आहे. रामायणात शत्रुघ्नचे काय स्थान होते?

जगाला कित्येक शतके व पिढ्यानु पिढ्या भारावून टाकणार्‍या रामायणातील जी महत्वाची पात्रे आहेत, त्यात रामाचा भाऊ म्हणून शत्रुघ्नाचे नाव येते. पण लक्ष्मण व भरताला जसे त्या कथेत महत्वाचे स्थान आहे, तितके कुठे शत्रुघ्नविषयी ऐकायला मिळत नाही. रामाला वनवासात जावे लागले तर त्याच्या समवेत लक्ष्मण राजवैभव सोडून वनवासाला निघून जातो. रामाच्या वनवासामुळे राजवैभव आपल्या पायाशी चालत आले असताना, भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून रामाच्याच नावाने राज्य कारभार चालवतो. पण शत्रुघ्न काय करतो? तो आपल्या थोरल्या भावाशी किती निष्ठावान असतो किंवा रामायणाच्या एकूण कथानकात शत्रुघ्नचे स्थान कोणते? चटकन कुणा अभ्यासकाला विचारले तरी या पात्राविषयी कोणी फ़ारसे काही सांगू शकणार नाही. आधुनिक काळातला हा शत्रुघ्न तर रामाचा भाऊ असण्यापेक्षा बिभीषण म्हणूनच मिरवत असतो. आता त्याने आणखी एक मजल मारली आहे. आपल्याला भाजपातून हाकलून लावण्याचे आव्हान त्याने पक्ष नेतृत्वाला दिलेले आहे. माणसे तिरस्कार व द्वेषाने भारावली, मग किती हास्यास्पद होत जातात, याचा इतका चमत्कारीक नमुना कुठे बघायला मिळणार नाही. आपल्याला पक्षातून हाकलून लावावे, इतकी बेशिस्त आपण करत आहोत, याची शत्रुघ्न सिन्हा यांना किती खात्री आहे, त्याची साक्ष त्यांच्या ताज्या विधानातून मिळते. मात्र इतके डिवचुनही अमित शहा वा मोदी आपल्याला हाकलून कशाला लावत नाहीत, हे त्यांना पडलेले कोडे आहे. अशाच खेळीतून यशवंत सिन्हांनी पक्ष सोडला आणि आता शत्रुघ्न सिन्हा म्हणतात आपण पक्ष सोडणार नाही. आपल्याला हाकलून लावावे. असे काही करण्यासाठी पक्षाध्यक्ष वा नेतृत्वाला विचार करावा लागेल व शत्रुघ्न सिन्हा पक्षाची हानी कुठे करत आहेत, ते शोधावे लागेल. पण तशी शक्यताच नसली, तर तितका तरी वेळ पक्षाने कशाला वाया घालवायचा?

पक्षाच्या कामात विघ्न आणून व उचापती करूनही कोणी शत्रुघ्न यांना जाब विचारत नाही, की त्यांच्यावर कारवाई करीत नाही. कारण हा माणूस पक्षातच नव्हेतर एकूण राजकारणातच अदखलपात्र आहे. भाजपात राहून उचापती केल्याने त्या पक्षाचे कही नुकसान होत नाही की विरोधी पक्षांना शत्रुघ्नच्या उचापतींनी कुठलाही फ़ायदा होताना दिसलेला नाही. म्हणून तिथले कोणी शत्रुघ्नची दखल घेत नाहीत की भाजपा त्यांना हाकलून लावत नाहीत. घरातल्या एखाद्या किरकिर्‍या पोराने रडून रडून उच्छाद मांडावा, त्यापेक्षा या कलावंताचे काम अधिक उरलेले नाही. त्या रडक्या मुलाची अपेक्षा असते की आपल्या रडण्याकुढण्याने इतरांना त्रास व्हावा आणि विचलीत होऊन तरी त्यांनी आपली दखल घ्यावी. पण कितीही रडून ओरडून झाले तरी कोणी दखलही घेत नाही, मग असे पोर केविलवाणे होऊन जाते आणि आपल्यालाच काही इजा करून घेण्यापर्यंत जाऊ लागते. शत्रुघ्न सिन्हांची तशीच काहीशी दुर्दशा झालेली आहे. रामायणातल्या शत्रुघ्नला थेट रामाचा भाऊ म्हणून महत्वाचे स्थान होते, तरी त्यापेक्षा अधिक काही महत्व नव्हते. तेवढ्यावर समाधान मानून त्याने आपल्या भूमिका पार पाडल्या होत्या. ही आपल्या नावाची पार्श्वभूमी ओळखून आजचा शत्रुघ्न वागला असता, तरी त्याच्या वाट्याला इतकी नामुष्की आली नसती. पण शत्रुघ्न असताना त्याला कैकयीपेक्षाही जास्त मत्सराने ग्रासलेले आहे. आपल्याला रामाचा भाऊ म्हणतात, पण भरत लक्ष्मणाच्या तुलनेत आपल्याकडे साफ़ दुर्लक्ष होते, म्हणून हा हातपाय आपटत बसलेला आहे. बाकीचे रामायण उभे करण्यात गुंतलेल्यांनी मग याचे चोचले पुरवायचे की रामायणाची कथा पुढे सरकण्याला प्राधान्य द्यायचे? नावानेच नाही तर स्वभाव कर्तॄत्वानेही आपण भरत वा लक्ष्मण नाही, इतकेही ज्याला समजत नसेल, त्याच्याकडे बघण्यात कोण वेळ वाया घालवणार?

आपल्याला पक्षातून हाकलायचे तर आहे, पण पक्षाला अजून मुहूर्त सापडलेला नाही. बिहार विधानसभा निकालापासून त्यासाठी मुहूर्त शोधला जात आहे, पण अजून तितकी हिंमत पक्षनेतृत्वाला झालेली नाही, असा टोमणा शत्रुघ्न सिन्हांनी मारला आहे. यशवंत सिन्हांनी आपल्या पक्षत्यागाची घोषणा केली, त्याच मंचावर शत्रुघ्न बसलेले होते आणि त्यांनाही त्यागाचे विचारले जाण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी हाकालपट्टीची पळवाट काढली. त्यांना पक्षत्याग परवडणारा नाही. कारण यशवंत सिन्हा पक्षाचे कोणी खासदार वा आमदार नाहीत. शत्रुघ्न यांना पक्ष सोडायचा आहे. पण खासदारकी सोडण्याची हिंमत होत नाही. उलट पक्षाने त्यांना हाकलून लावले तर खासदारकी अबाधित रहाते. याचा अर्थ असा की शत्रुघ्न सिन्हांना भाजपात रहायचे नाही. पण पक्षासोबत खासदारकी गमवावी लागेल, म्हणून ते अगतिकपणे पक्षात टिकून आहेत. म्ह्णून ते पक्षाने हाकलावे असे आव्हान देत आहेत. ते आव्हान नसून अगतिकता आहे. रामाचा पदस्पर्श होऊन अहिल्येचा उद्धार झाला होता, तसा आपल्या खासदारकीचा उद्धार होण्यासाठी पक्षाने लाथ मारून बाहेर काढावे, अशी काहीशी या कलाकाराची अपेक्षा आहे. ती अगतिकता पक्षनेतृत्वाने ओळखलेली असेल, तर त्यांनी लाथ कशाला मारायची? लाथ मारल्याचा आरोप अंगावर घ्यायचा आणि लाभ मात्र शत्रुघ्नचा व्हायचा. इतके नेतृत्वाला पक्के ठाऊक आहे. म्हणून त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या गळ्यात पक्ष सदस्यत्वाचा पट्टा बांधून तसेच अडकवून ठेवलेले आहे. हिंमत नेतृत्वाने दाखवायची नसून गळ्यातला पट्टा तोडून फ़ेकून देण्याचा पुरूषार्थ या कलावंताने दाखवायचा आहे. पण ते शक्य नाही. रामायणापासूनच शत्रुघ्नला कथानकात महत्वाचे स्थान व भूमिका नसेल, तर यांच्याकडून कोणी कसली अपेक्षा बाळागावी? शत्रुघ्न रामायणातला असो की बॉलिवुडमधला असो.

1 comment:

  1. भाऊ, खूप छान समजावून सांगितले तुम्ही. मला तर प्रश्न पडला होता की हा अजून पक्षात कसा?

    ReplyDelete