Monday, April 30, 2018

आता हसावं की रडावं?

saroj khan renuka के लिए इमेज परिणाम

सत्य संपते तिथून संस्कृती सुरू होते. कारण सत्याचा आणि संस्कृतीचा काडीमात्र संबंध नसतो. सत्य निष्ठूर व निर्दयी असते. म्हणून तर ते नाकारण्यातून संस्कृती सुरू होते. जगातल्या अनेक शहाण्यांनी आजकाल भारताला महिलांच्या सुरक्षा संरक्षणाचे सल्ले देण्याचा सपाटा लावला आहे. असे सल्ले देणारे देश व तिथल्या पुढार्‍यांचे वर्तन महिलांच्या बाबतीत किती सोवळे राहिलेले आहे? बिल क्लिंटन हे अध्यक्ष असताना त्यांनी राष्ट्रपती निवासात प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्या तरूणीचे शारिरीक शोषण केल्याची घटना जगभर गाजलेली आहे. इतरही अनेक देशाच्या पुढार्‍यांनी असेच दिवे लावलेले आहेत. जगप्रसिद्ध अशा अमेरिकन चित्रसृष्टीत महिलांच्या लैगिक शोषणाचे किस्से सातत्याने जगासमोर येत आहेत. पण त्याच वर्गातल्या लोकांनी भारताच्या पंतप्रधानाला पत्र लिहून शहाणपणा शिकवावा, ह्याला संस्कृती म्हटले जाते. जी जगभरची वस्तुस्थिती आहे, ती नाकारून सभ्यतेची नाटके रंगवणे म्हणजे संस्कृती. मात्र ते सत्य बोलायची कोणी हिंमत केली, तर असले तमाम शहाणे संस्कृतीवीर त्या सत्यवचनी व्यक्तीचा गळा घोटायला पुढे सरसावत असतात. मग ती बॉलीवुडची नृत्यदिग्दर्शिका सरोज खान असो की राज्यसभेतील कॉग्रेसच्या वादग्रस्त खासदार रेणुका चौधरी असोत. सध्या भारतातल्या मुली महिला व बलात्कार हा चर्चेचा विषय झाला असताना सरोज खान व रेणूका चौधरी यांनी आपली मते व्यक्त केली. त्याविषयी तमाम संस्कृतीवीरांची बोलती बंद झालेली आहे. किंवा त्याच महिलांवर सत्य कथनाच्या विरोधात दबाव आणला जात आहे. पण त्यातला आशय समजून घेण्या्चे वा सत्य स्विकारण्याचे धाडस कोणाला दाखवता आलेले नाही. कारण त्या दोघी सत्य बोलत आहेत आणि ते सत्य अनेकांचे बुरखे फ़ाडणारेच आहे. संस्कृती नेहमी बुरखे मुखवटे लावूनच मिरवत असते. त्यामागे आपला हिडीस चेहरा लपवित असते.

अर्थसंकल्पावर पंतप्रधान राज्यसभेत बोलत असताना मोठ्या आवाजात रेणूकाजी खिदळल्या, तेव्हा मोदींनी केलेली मल्लीनाथी वादाचा विषय झाला होता. रेणूका चौधरी यांनी अकारण त्या भाषणात व्यत्यय आणायचा प्रयास केला होता. तर सभापतीपदी बसलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावर मोदी म्हणाले होते, रेणूकाजींना हसू द्या. रामायण मालिका संपल्यापासून असे हसू ऐकायला मिळालेले नाही. त्या मालिकेत शुर्पणखा राक्षसीण तशी गडगडाट करीत हसते असा प्रसंग आहे. सहाजिकच मोदींनी रेणूकांना राक्षसीण ठरवले, असा निष्कर्ष काढून त्यांना महिला विरोधी ठरवण्याची स्पर्धा चालू झाली होती. कॉग्रेससह अनेक पक्षातले महिला न्यायासाठी झटणारे तात्काळ बोलू लागले होते. त्यापैकी कितीजण खरोखरच महिलांचे पक्षपाती व महिला सन्मानाची कदर करणारे होते? किंवा असतात? विविध क्षेत्रातील महिलांना न्याय मिळावा, संधी मिळावी व सन्मानाने वागवावे; अशी भूमिका हिरीरीने मांडणारे खरोखर किती प्रामाणिक असतात? रेणूकांनी त्या प्रत्येकाचा बुरखा आपल्या ताज्या विधानातून फ़ाडून टाकला आहे. त्याच्याही आधी बॉलिवुडमध्ये कास्टींग काऊच म्हणून जे महिलांचे शोषण चालते, त्याविषयी सरोज खान यांनी आरोप केला होता. कुठल्याही लैंगिक शोषणाशिवाय चित्रसृष्टीत मुली महिलांना संधी मिळत नाही. त्याची शारिरीक किंमत मोजावीच लागते, असे या महिला कलावंताचे म्हणणे होते. पण त्यातला आशय बाजूला ठेवून भलत्याच मुद्द्यावर सरोज खानला आरोपी बनवण्याचा उद्योग सुरू झाला. ती बलात्काराचे समर्थन करते असाही निष्कर्ष काढून तिच्यावर तोफ़ा डागणे सुरू झाले. यालाच गळचेपी म्हणतात. यालाच सत्याचा गळा घोटणे म्हणतात आणि तो घोटणारे संस्कृतीचे मोठे मक्तेदार असावेत हा योगायोग नाही. सरोज खान मुळात काय म्हणाली होती?

जगाच्या आरंभापासून म्हणजे बाबा आदमच्या जमान्यापासून महिलांचे शोषण चालू आहे. चित्रपटसृष्टीत आज नाही फ़ार पुर्वीपासूऩच महिलांचे लैंगिक शोषण सुरू आहे, बलात्कारही होतात. पण इतरत्र जसे बलात्कारीतेला वार्‍यावर सोडून दिले जाते, तसा इथे चित्रसृष्टीत अन्याय होत नाही. तिला शोषणानंतर रोजीरोटी वा संधी तरी नक्की मिळते. हे सरोजचे मुळ विधान आहे. तर तिलाच बलात्काराची समर्थक ठरवून आरोप सुरू झाले. तिने चित्रसृष्टी व अन्यत्रचे शोषण यातला फ़रक कथन केला होता. त्याचे समर्थन केलेले नाही. पण मुद्दा सत्यकथनाचा होता. अर्थात सरोज खान तितकेच बोललेली नाही. तिने पुरूषी प्राबल्य असलेल्या आजच्या जगातील प्रत्येक क्षेत्रात मुलींचे शोषण कसे होत असते, त्याचा हिडीस चेहरा स्पष्टपणे मांडलेला आहे. त्याकडे साफ़ पाठ फ़िरवण्यात आलेली आहे. ‘आयुष्यात कुठे ना कुठे मुलीवर पुरूष हात साफ़ करून घेतोच’. हे सरोज खानने सांगितलेले सर्वात दाहक सत्य आहे. त्याविषयी सगळे संस्कृतीरक्षक गप्प आहेत. प्रत्येक मुलीला बलात्कार वा लैंगिक शोषणाचेच बळी होण्याची गरज नसते. विविध प्रकारे तिच्या शरीराचे व अब्रुचे लचके तोडायला टपलेली श्वापदे चहुकडे पसरलेली असतात. कुणी गोड बोलून तर कोणी जबरदस्ती करून तिचे शोषण करीतच असतो. थोडक्यात सरोज खान हिने दुखर्‍या वास्तवावर बोट ठेवलेले आहे. जितक्या आवेशात आज महिलांच्या शोषणाचा गवगवा केला जात आहे, ते जणू नव्यानेच सुरू झाल्याचा आव आणू नका. आपल्या आसपास कुठल्या तरी स्वरूपात गरजू वा दुबळ्या मुली महिलांचे लैंगिक शोषण चाललेले आहे आणि तिकडे बघूनही काणाडोळा केला जात असतो. तो काणाडोळा वा दुर्लक्ष करणारेच मग आवेशात येऊन महिलांच्या न्यायाच्या गप्पा करीत असतात. सरोज खानला हेच सांगायचे आहे. त्यासाठी एकट्या बॉलिवुडकडे बोट दाखवू नका इतकाच तिचा आक्षेप आहे.

गेल्या काही महिन्यात हॉलिवुडच्या कोणा अभिनेत्रीने आपल्या लैंगिक शोषणाचा बभ्रा केला. एका खास व्यक्तीकडे तिने अंगुलीनिर्देश केला होता. त्यानंतर हॉलिवुडच्या अनेक महिला कलाकार त्याला दुजोरा देण्यासाठी पुढे सरसावल्या. नामवंत दिग्दर्शक व निर्माते आपल्या वासना भागवण्यासाठी नवोदिता व इच्छुक अभिनेत्रींकडून थेट लैगिक सुखाची मागणी करतात. ती नाकारणार्‍यांना संधी मिळू शकत नाही. एका महिलेने हे सत्य बोलण्याची हिंमत केली आणि अनेकजणी पुढे आल्या. पण हॉलिवुड वा बॉलिवुड पुरताच हा मामला मर्यादित नाही. जगातल्या कुठल्याही क्षेत्रात महिलांना समान वागणूक मिळत नसते. प्रत्येक क्षेत्रात पुरूषी वर्चस्व असल्याने तिथे महिलांनी फ़क्त प्रवेश मिळवतानाही शारिरीक किंमत मोजण्य़ाची अपेक्षा केली जाते. कधी उघडपणे व कधी त्यांच्या गरजांचा गैरलागू फ़ायदा उठवून हे चालते. गुंड शारिरीक बळ वापरून बलात्कार करतो, तर उच्चभ्रू आपले सामाजिक वा आर्थिक बळ वापरून गरजू महिलेला अगतिक करतो. शरणागत व्हायला भाग पाडतो. आमिष दाखवून वा परिस्थितीचा दबाव निर्माण करून, हे शोषण चालते. त्याची खातरजमा करायला कुठली समिती वगैरे बसवण्याची गरज नाही. डोळसपणे आसपासचा घटनाक्रम बघितला तरी साध्या डोळ्यांना दिसणार्‍या या गोष्टी आहेत. तरूण तेजपाल नावाच्या शोधपत्रकाराचे प्रकरण काय होते? तेव्हा आजचे पोपट कशाला गप्प बसलेले होते? उलट यापैकी अनेकांनी त्यात संगनमताने अशी घटना घडल्याचाही युक्तीवाद केला होता. तेजपालची त्या मुलीला लिहीलेली इमेल अतिशय बोलकी आहे. पत्रकारिता वा उच्चभ्रू व्यवहारात असे चालतेच ना? असे तेजपाल तिला लिहीतो, हे कशाचे लक्षण आहे? प्रतिष्ठीत समाजातले व महिलांच्या न्यायाच्या गप्पा ठोकणार्‍या वर्गातले लोक असे म्हणत असतील, तर तळगाळातले सामान्य गुंडपुंड कुठे वेगळे असतात?

रेणूका चौधरी यांनी राजकारणातही त्याचे वावडे नसल्याचे म्हटलेले आहे. अगदी संसद भवनात वा विविध अधिकारपदे वाटली जात असताना, लैंगिक किंमत मोजण्याची अपेक्षा बाळगली जात असते. रेणूका चौधरी कशाची साक्ष देत आहेत? आज राजकीय क्षेत्रात महिलांचा मोठा भरणा झालेला आहे. त्यात येउन पोहोचलेल्या महिलांची संख्या चकीत करणारी आहे. तिकीट मिळवण्यासाठी आपल्याकडून शारिरीक सुखाची मागणी केली गेल्याच्या तक्रारी नव्या नाहीत. यापुर्वी अनेक पक्षात व व्यवहारात अशा तक्रारी आलेल्या आहेत. पण रेणूकांच्या पातळीवर पोहोचलेल्या कुणा मोठ्या महिला नेत्याने त्याचा जाहिर उल्लेख केलेला नव्हता. म्हणूनच मुद्दा गंभीर आहे. कुणाला तरी लक्ष्य करून वा कुठल्या तरी पक्षावर नेमबाजी करून ह्या विषयाचे राजकारण कामाचे नाही. त्यातून महिलांचे शोषण थांबण्याची शक्यता नाही, की मोदी सत्तेत आल्यापासून ह्या घटना सुरू झालेल्या नाहीत. पुरूषी मानसिकता त्यातला खरा धोका असून स्त्री उपभोग्य वस्तु असल्याची मानसिकता त्यातली खरी समस्या आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन विकृत असेल, तर नुसत्या संस्कृतीच्या गप्पा उपयोगाच्या नाहीत. बालपणापासून त्या विकृतीतून मुलांना बाजूला काढण्याचे आणि मुलांच्या मनात स्त्रीविषयक समानतेची धारणा रुजवण्याची गरज आहे. कुणा एकाला फ़ाशी देऊन ती मानसिकता बदलणार नाही की संपणार नाही. कोणी कोणाला शहाणपणा शिकवण्याची गरज नसून आपण आपल्या भोवतालाकडे डोळसपणे बघितले पाहिजे. कुठल्याही पातळीवर होत असलेले कुणाही मुली महिलेचे शारिरीक शोषण वा तसा प्रयत्नही हाणून पाडण्यातला सामान्य माणसाचा पुढाकार, हा त्यातला एकमेव जालीम उपाय आहे. बाकी आंदोलने, खलिते, पत्रके वा मेळावे वादविवाद कामाचे नाहीत. तितके आपण प्रामाणिक असतो, तर सरोज खान वा रेणुका काय म्हणाल्या ते समजून घेण्याचा प्रयास झाला असता. त्यांनाच उलटे प्रश्न विचारले गेले नसते. कांगावखोरी झाली नसती. या दोघींनी दुखण्यावरच बोट ठेवले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्हायला हवे आहे.

3 comments:

  1. संभावितांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घातलेत भाऊ.

    ReplyDelete
  2. मला नाही वाटत सरोज खान इतकं उदात्त बोलली असेल." बॉलीवूड निदान रोटी तरी देतं" आशा अर्थाच जोर देऊन केलेलं विधान होतं ते. मग बोलीवूडच काय, सर्वच क्षेत्रात हवस भागवण्याची संधी देणारीला positively फायदा मिळतच असतो. त्याबरोबर नव्या संधीची कवाडे खोलण्याचे सामर्थ्य ही त्या कृतीत असते.
    तुमच्या लेखातील अन्वयार्थ चुकीचा नाहीय. पण घेतलेली पात्र त्या अर्थानेच बोललीत का? हा चर्चेचा विषय ठरू शकतो.

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    आज स्त्रीपुरुष समान असल्याचं ठसवलं जातंय तेच मुळातून चुकीचं आहे. जर बायका पुरुषांच्या क्षेत्रात जाऊ लागल्या, तर त्यांचं शोषण होणारंच. कारण की बायका जात्याच (= जन्मामुळेच) पुरुषांहून कमी बलवान असतात. मग स्त्रीपुरुष समानतेला काय अर्थ राहिला? विचारमंथन होणं आवश्यक आहे.

    आपला नम्र,
    गामा पैलवान

    ReplyDelete