Thursday, May 3, 2018

लेकी बोले सुने लागे

संबंधित इमेज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनराव भागवत अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडत असतात. खरे तर असे म्हणणे काहीसे अतिशयोक्तीचे आहे. कारण त्यांच्या कुठल्याही विधानाला वादग्रस्त बनवण्याची माध्यमांत स्पर्धाच चालत असली, तर त्याचा मोहनरावांना दोष देता येणार नाही. माध्यमातील शहाण्यांपासून शंभर वर्षापुर्वीच्या बुद्धीमंतांपर्यंत असाच खाक्या चालू राहिला आहे. कधीकाळी शाहू महाराजांनीही आपल्या विधानांचा विपर्यास केला जातो, अशी तक्रार केलेली होती. तेव्हा आजच्या इतकी पत्रकारिता विस्तारलेली नव्हती की माध्यमांचा सुकाळ झालेला नव्हता. वाचन संस्कृतीही मर्यादित लोकसंख्येच्या वर्तुळात बंदिस्त झालेली होती. हजाराच्याही संख्येने नियतकालिकांच्या प्रती संपत नव्हत्या. तेव्हा शाहू महाराजांना विपर्यासाचा त्रास झाला असेल, तर आजकाल कुठलेही व कोणाचेही जाहिर विधान वादग्रस्त झाल्यास नवल मानण्याचे कारण नाही. नुसतीच खळबळ माजवण्याचा हेतू असेल तर कोणी काही बोलण्याचीही गरज नाही. असे अमूकतमूक बोलू शकतो आणि म्हणूनच त्याने तसे का बोलावे, यावरही गदारोळ माजवला जाऊ शकतो. सहाजिकच त्या गोंगाटाच्या भयाने कोणी बोलायचा थांबला, तर त्याला संघटना व संस्था चालवताच येणार नाहीत. म्हणून तर कितीही वादंग माजले, तरी सार्वजनिक जीवनातील म्होरके बोलत असतात आणि वादाकडे दुर्लक्ष करीत असतात. भागवतांनी नुकत्तेच केलेले विधान असेच वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे लोक अलिकडे दलितांशी जास्त जवळीक करीत असतात आणि त्यात प्रामुख्याने दलितांच्या घरी जेवायला जाण्याचे सोहळे होतात. त्यावरून कानपिचक्या देताना भागवतांनी आपल्याही घरी दलितांना तितक्याच अगत्याने बोलवा, असे सुनावले आहे. पण त्यांचा रोख खरेच भाजपाकडे आहे, की अन्य दलितप्रेमींना दिलेला इशारा आहे?

राजकारणात पदार्पण केल्यानंतर राहुल गांधी यांनी असले अनेक सोहळे केलेले होते. आता त्याचे कोणाला अप्रुप राहिलेले नाही. बारातेरा वर्षापुर्वी राहुलनी महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्येकडे लक्ष वेधण्यासाठी कलावती नावाच्या विधवेच्या घरी अगत्याने भेट दिली होती आणि नंतर त्याचा उल्लेख संसदेतील भाषणातही केलेला होता. पुढे उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानावर डोळा ठेवून त्यांनी त्या राज्याचा दौरा करताना मुद्दाम दलितांच्या घरात भोजन घेणे वा विश्रांती घेण्याचा परिपाठ तयार केला होता. राहुलनी तेव्हा ते नाटक रंगवण्याचे कारण उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाचे सरकार व मायावती मुख्यमंत्री होत्या. दलिताच्या पक्षाच्या दलित मुख्यमंत्री असून सुद्धा दलित, पिछडे मागास व पिडीत वंचित असल्याचे चित्र तयार करण्यासाठी त्या गरीबांच्या वेदना वापरल्या जात होत्या. सहाजिकच त्यातला धोका ओळखून मायावतींनी देखील त्या नाटकाचा पर्दाफ़ाश केला होता. दलिताच्या घरी भेट देऊन वा जेवून झाल्यावर राहुल गांधी बिसलेरी पाण्याने हातपाय धुतात, असा प्रत्यारोप मायावतींनी केला होता. मतांच्या असल्या राजकारणात ही नाटके नेहमीची झाली आहेत. मग भाजपा त्यापासून कसा दूर राहू शकेल? संघाच्या प्रेरणेने राजकारणात काम करणारा भाजपा दलितांचा शत्रू म्हणून कायम रंगवला गेला आहे. उच्चवर्णिय ब्राह्मण बनियांचा पक्ष ,असा त्याच्यावर शिक्का मारला जात असतो. संघ व भाजपाने प्रयत्नपुर्वक तो ठप्पा पुसलेला आहे आणि त्याला मतदानातून त्याची पावती मिळालेली आहे. तरीही भाजपाचे नेते अशा आरोपांना फ़ेटाळण्यासाठी दलिताघरी भोजनाचे कार्यक्रम योजत असतात. काही महिन्यापुर्वीच कर्नाटकात दलिताच्या घरी भाजपा नेते जेवले. पण तिथले खाद्यपदार्थ हॉटेलातून मागवल्याचा आरोप झाला होता. भागवत यांनी बहुधा अशा मतांसाठी चाललेल्या कसरतीला आक्षेप घेतला असावा.

समरसता मंच म्हणून एक संघाची संघटना या क्षेत्रात काम करते. त्याचा लाभ उठवून भाजपा असले राजकारण करतो. केवळ मतदानासाठी तसा वापर होऊ नये, तर हिंदू समाजातील जातीपातींमध्ये वास्तविक सौहार्द तयार होऊन हिंदू एकवटावा, ही संघाची अपेक्षा आहे. त्यात नुसते मतांचे राजकारण आल्यास हिंदू ऐक्याचे संघाचे उद्दीष्ट बाजूला पडते,. भागवतांचा रोख त्या दिशेने असू शकतो. पण आपल्याच पक्ष व अनुयायांना अशा कानपिचक्या देताना एकूण राजकारणात दलितांना फ़क्त मतांचे गठ्ठे म्हणूनच वापरले जाते, याकडेही लक्ष वेधण्याचा त्यात प्रयास आहे. भाजपाच कशाला, प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने दलितांचा वापर करू बघत असतो. मग त्यासाठी अगत्याने बाबासाहेबांचे स्मूतीदिन जयंती साजरी करायची व दलितांचे लक्ष वेधून घ्यायचे, असे खेळ चालू असतात. मात्र आपापल्या संस्था व संघटनांमध्ये दलितांना सामावून घेताना वा महत्वाचे स्थान देताना हात आखडला जात असतो. संघामध्ये सर्वोच्चपदी दलित कधी येणार, असे विचारणार्‍या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये सहा दशकात कोणी दलित स्थान मिळवू शकलेला नाही. अच्युतानंदन वा के. आर. गौरी यांच्यासारख्या नेत्यांना त्या पक्षात कधी सन्मानाची वागणूक मिळू शकलेली नाही. एकूणच डाव्या मानल्या जाणार्‍या बहुतांश संस्था संघटनांमध्ये नाव दलित न्यायाचे, पण दलितांना खड्यासारखे बाजूला ठेवले जात असते. भाजपाही तशाच औपचारीक समरसतेमध्ये गुंतला तर हिंदू ऐक्याला बाधक ठरेल. म्हणून भागवतांनी ही सुचना दिलेली असावी. पण त्यांचा रोख मार्क्सवादी व अन्य पुरोगामी पक्षांकडेही आहेच. कारण तिथे दलितांच्या घरी जेवणे वा त्यांना औपचारीक स्थान देण्याचे नाटक अधिक चालते. त्या दुटप्पीपंणाकडे दलितांचे लक्ष वेधणे असाही भागवतांचा हेतू नाहीच, असे कोण म्हणू शकतो?

आता हे विधान वादाचे होणार आणि वाहिन्या व माध्यमातून त्यावर चर्चा रंगवल्या जातील. अर्थात अशा चर्चा भाजपाला लक्ष्य करण्यासाठी असतात. पण संघाकडून ही भाषा वापरली जाते, तेव्हा चर्चेत इतरांनाही आपण दलितांना कोणती समान वागणूक दिली, त्याचा खुलासा करावा लागत असतो. परिणामी अन्य पक्षांची लक्तरे उघडी पडत असतात. ज्या संघावर दलित भेदभावाचा सातत्याने आरोप होतो, त्यानेच आपल्या कृतीतून व कार्यक्रमातून दलितांना आपल्यात सामावून घेण्यासाठी पुढाकार दाखवला, तर बाकीच्या पक्षांचे पितळ उघडे पडते. म्हणूनच भागवतांचा रोख भाजपाकडे असला, तरी नेम मात्र पुरोगामी पक्षांवर धरलेला असल्याचे विसरता कामा नये. आपल्या मराठी भाषेत याला लेकी बोले सुने लागे असेही म्हणतात. भाजपाचे कान उपटणारी भाषा आहे. पण ती जशीच्या तशी राहुल व कॉग्रेससह मार्क्सवादी पक्षाला सुद्धा लागू होत असावी, हा योगायोग नाही. आता भागवत असे बोलले मग त्यातून खुसपट काढण्याची हौस असलेल्या वाहिन्या व माध्यमे तुटून पडणार, हे अपेक्षितच आहे. की तेच लक्षात घेऊन भागवत अशी विधाने करीत असतात? कारण अशा कुठल्याही वादातून भाजपा वा संघाला तोटा होताना दिसलेला नाही. पण त्या वादामुळे अन्य पुरोगामी मात्र पदोपदी उघडे पडत गेलेले आहेत. कधीकधी असे वाटते, की संघच भाजपापेक्षा अधिक धुर्तपणे राजकारण खेळत असतो. राजकीय सापळे लावत असतो आणि त्यात पुरोगामी मुर्ख फ़सले, की त्याचा राजकीय लाभ भाजपाला मिळत असतो. आताही माध्यमेच नव्हेतर कर्नाटकच्या निवडणूकीत राहुल गांधी अतिशय बेफ़िकीरीने संघाच्या विरोधात टिकेची झोड उठवायला भागवतांच्या या विधानाचा आधार घेण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर आजवर राहुलनी दलित वस्त्या वा गावात जाऊन काय दिवे लावले, त्याची उजळणी होणार व ती त्यालाच महागात पडणार ना?


2 comments:

  1. Sangh always thinks before talking.
    Congress party will not be able to understand and escape from this trap here and in future as well 😋

    ReplyDelete
  2. Bhausaheb, perfect interpretation of the quote of Hon. Mohanrao Bhagwat!

    ReplyDelete