मतचाचण्य़ा हा गेल्या तीन दशकात भारतीय निवडणूकीत घुसलेला नवा प्रकार आहे. अन्यथा त्यापुर्वी निवडणूकांचे वेध लागले मग दोनच मार्गाने निकालाचे अंदाज बांधले जात. त्यापैकी एक गुप्तचर खात्याच अहवाल आणि निकालाविषयी खेळला जाणारा जुगार. त्यात गुप्तचर खात्याचा अहवाल खरा किती खोटा किती, याविषयी निदान जाणकारांना संशय असायचा. कारण गुप्तचर कधी आपला अहवाल किंवा निवडणूकीच्या निकालाचा अंदाज अधिकृतपणे जाहिर करीत नसतात. त्यांचा काही अंदाज असलाच तर तो सरकारच्या प्रमुखाला सादर केला जातो. मग तिथून आपापल्या सोयीनुसार सत्ताधारी पक्ष त्याच्या बातम्या देतो, किंवा सुत्रांकडून म्हणून काही आकडे यायचे. पण असा अहवाल असायचा यात शंका नाही. असे म्हणतात, की आणिबाणी उठवून नजिकच्या काळात मतदान घेतले तर कॉग्रेसला प्रचंड बहूमत मिळू शकेल असा अंदाज गुप्तचर खात्याने दिला. म्हणून इंदिराजींनी आणिबाणी शिथील करून चार दशकांपुर्वी निवडणुका घेतल्या होत्या. त्या अंदाजाचे काय झाले तो इतिहास आहे. दुसरा मार्ग होता निकालाविषयी खेळला जाणारा जुगार. त्यात सर्वात अधिक यशाची खात्री असलेल्या पक्षाचा बाजारभाव कमी असायचा आणि सर्वात कमी विजयाची शक्यता असलेल्या पक्षावर जुगार खेळणार्याला अधिक रक्कम मिळण्याची हमी दिली जायची. आताही कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीचा जुगार सुरू झाला असून, त्यात चाचणीचे आकडे कसेही असले तरी भाजपाला सत्ता मिळण्याविषयी जुगार्यांची खात्री झालेली दिसते. कारण सट्टाबाजारात भाजपाच्या बहूमताला सर्वात कमी भाव लावण्यात आला आहे. तर हमखास अपयशी ठरण्याची खात्री असलेल्या देवेगौडांच्या सेक्युलर जनता दलाचा भाव सर्वाधिक आहे. चाचण्या आलेल्या असताना त्याच्या विपरीत जुगाराचा बाजार कसा चालू शकतो, हे म्हणूनच लोकांना पडलेले कोडे असते.
टाईम्स नाऊ व इण्डिया टुडे या दोन वृत्तसमुहांनी आपापल्या मतचाचण्या घेतल्या असून त्याचे आकडे जाहिर केलेले आहेत. त्यानुसार कुठल्याही पक्षाला बहूमताचा पल्ला ओलांडता येणार नाही, असे निष्कर्ष आलेले आहेत. दिड महिन्यापुर्वी सर्वात प्रथम इंडिया टुडेनेच पहिली चाचणी घेतली होती आणि तेव्हा तर निवडणूकीचा कार्यक्रमही जाहिर झालेला नव्हता. त्यात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नसल्याची चिन्हे दिसत असल्याचा निष्कर्ष काढलेला होता. किंबहूना कॉग्रेस आणि भाजपा या दोन मोठ्या पक्षाच्या लढाईत गौडांचा जनता दलही समान जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती. पण जसजसे दिवस सरकत गेले व मतदानाच्या तारखांपासून उमेदवार जाहिर होत गेले, तसतसा अंदाजाचा तराजू इकडचा तिकडे होऊ लागला आहे. दुसर्या अंदाजात इंडिया टुडेने कॉग्रेसच्या जागा कमी करून भाजपाला जागा अधिक देऊ केल्या आहेत. तर त्यात जनता दलाचीही घट होताना दिसते आहे. आता तिसरा अंदाज टाईम्स नाऊ वाहिनीने आणला आहे आणि त्यात कॉग्रेस व भाजपा जवळपास समान संख्येवर आलेले आहेत. जनता दल आणखीनच खाली घसरलेले आहे. पण या कुठल्याही अंदाजात एका पक्षाला स्पष्ट बहूमत मिळण्याची आशा अंदाजकर्त्यांना दिसत नाही. तरीही आरंभी जितकी कॉग्रेस आघाडीवर दिसत होती, ती आघाडी टिकताना दिसत नाही, हेही लक्षणिय आहे. सहाजिकच अशा अंदाज व मतचाचण्यातून लोकांसमोर जाणारे चित्र सत्ते़ची चावी देवेगौडांच्या हाती जाणर असेच आहे. हे सत्य असो किंवा नसो, पण त्याची चर्चा झाल्याने लोकांना आपल्या मताचा फ़ेरविचार करायला भाग पडत असते. ज्यांना गौडांकडे ओढा आहे, पण आघाडीची अस्थीरता नको आहे, त्यांना मग गौडांचे प्रेम विसरून कुठल्या तरी एका पक्षाला बहूमताकडे घेऊन जाण्याचा मोह होऊ शकतो.
कुठल्याही राज्यातील वा केंद्रातील आघाडीचा अनुभव चांगला नसल्याने मागल्या दहा वर्षात मतदार क्रमाक्रमाने एकाच पक्षाचा स्पष्ट कौल देण्याकडे हळुहळू वळत गेला आहे. किरकोळ अपवाद सोडल्यास त्यात खंड नाही. बंगालमधील डाव्या आघाडीला सत्तेवरून खाली ओढताना मतदाराने ममतांच्या तृणमूल पक्षाला स्पष्ट बहूमत देऊन टाकलेले होते. त्याचवेळी तामिळनाडूतही मतदाराने जयललितांना आघाडी असूनही एकट्याचे बहूमत दिलेले होते. विजयकांत यांना सोबत घेऊन अण्णा द्रमुकने लोकांकडे कौल मागितला होता. पण बंगाल वा तामिळनाडूच्या मतदाराने ममता वा जयललितांना एकहाती बहूमत दिलेले होते. बंगालमध्ये कॉग्रेसने आडमुठेपणा केल्यावर ममता एकट्या सरकार चालवू शकल्या होत्या आणि तामिळनाडूत जयललितांच्या सरकारमध्ये विजयकांत सहभागीच झाले नाहीत. उत्तर प्रदेशात त्याच्याही आधी बसपा एकटा बहूमतापर्यंत पोहोचला आणि बहुतांश राज्यात त्याचीच पुनरावृत्ती होत राहिली. त्याच दरम्यान कर्नाटकातही आघाडीचे तीन तेरा वाजलेले मतदाराने अनुभवलेले होते. म्हणूनच विधानसभा बरखास्त होऊन मतदान झाले, तेव्हा कानडी जनतेने भाजपाला एकहाती बहूमत दिले. पण त्यांनी कर्मदरिद्रीपणा केल्यावर पुढल्या खेपेस कॉग्रेसला एकहाती बहूमत दिलेले होते. २००८ असो वा २०१३ असो, कानडी मतदाराने सत्तेच्या चाव्या देवेगौडांच्या हाती जाऊ दिल्या नाहीत. कारण त्यांच्या हाती चाव्या गेल्या मग पुत्रप्रेमाने आंधळे झालेले गौडा मुलांना सत्तेशी खेळू देतात, हा कानडी जनतेचा वाईट अनुभव आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर कर्नाटकात तिहेरी लढत असली तर जनता दल मागे कशाला आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. गौडांचे प्रभावक्षेत्र मर्यादित असून कॉग्रेस वा भाजपाशी त्यांचा पक्ष तुल्यबळ नाही. त्यामुळे कमी जागा मिळवूनही ते सत्ता अस्थीर करू शकतात. ते कुठल्याच मतदाराला नको असते.
याखेरीज आणखी एक संदर्भ लक्षात घेण्यासारखा आहे. मागल्या विधानसभेत भाजपा दुभंगलेला होता आणि त्यात येदीयुरप्पा वेगळा तंबू थाटून भाजपाला पराभूत करायला मैदानात उतरलेले होते. त्याचा लाभ कॉग्रेसला मिळालेला होता. भाजपाची मते घटली नव्हती तर विभागली गेली होती. यावेळी ती एकत्र आहेत आणि गेल्या लोकसभेच्या वेळीही एकत्र होती. तेव्हा मोदींच्या प्रभावाने एकजुट झालेल्या भाजपाने २८ पैकी १७ लोकसभा जागा जिंकल्या व ४३ टक्के मतेही मिळवली होती. पण त्याच मतदानात भाजपाने २२४ विधानसभा जागांपैकी १३२ जागी मताधिक्य मिळवलेले होते. हे असे संदर्भ जुगारी लोक हिशोबात घेत असतात. राजकीय विश्लेषक मतदाराचे मन ओळखू बघत नाहीत, तर राजकीय तत्वज्ञान व कार्यक्रमाच्या आधारे आपले निष्कर्ष काढत असतात. तर जुगारी लोक मतदाराच्या मनाचा ठाव घेऊन, पक्षांच्या उमेदवार व नेत्यांच्या लोकप्रियतेच्या आधारावर अंदाज काढत असतात. लोकसभेत मोदीलाटेने मिळवलेली १३२ जागांची आघाडी जुगार्यांना भुरळ घालते, तर विश्लेषक अभ्यासकांना मागल्या दोन वर्षात सिद्धरामय्यांनी खेळलेला राजकीय डाव वजनदार वाटत असतो. त्यामुळे मग निष्कर्षात फ़रक पडू लागतो. म्हणूनच सगळ्या चाचण्य़ा कॉग्रेसला सर्वात मोठा पक्ष ठरवित असताना सट्टाबाजार मात्र भाजपाला झुकते माप देतो आहे. त्याचे आणखी एक मोठे कारण दहा वर्षापुर्वीच्या निकालामध्ये दडलेले आहे. २००८ सालात भाजपाला एकहाती बहूमत मिळाले, तरी मते मात्र कॉग्रेसपेक्षा एक टक्का कमीच होती. पण भाजपाचे प्रभावक्षेत्र मर्यादित असल्याने मोजक्या जागी मतांचे गठ्ठे विजयाकडे घेऊन जातात आणि मोजक्या जागी अनामत रक्कमही जप्त होते. कॉग्रेसची मते एक टक्का अधिक असली तरी राज्यभर सर्वत्र सारखी परसलेली आहेत आणि म्हणूनच जागा जिंकताना अनेक ठिकाणी हाती धुपाटणे येते.
आताही विविध चाचण्या व सट्टा बाजाराचा अंदाज लक्षात घेतला, तर कॉग्रेस व भाजपा तुल्यबळ स्पर्धक दिसत आहेत. पण एका चाचणीवरील चर्चेत अभ्यासकाने खरी कळीची जागा दाखवली. हा अंदाज जसजसे दिवस जात आहेत तसा कॉग्रेसला खाली आणतो आहे आणि अजून भाजपाचा विराट कोहली मैदानात आलेला नाही, असे त्या अभ्यासकाचे विधान खुप आशय सांगणारे आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या पर्वात मोदी प्रचाराला येतात आणि राजकीय वार्यांची दिशाच गडबडून टाकतात, हे त्यातले रहस्य आहे. आज दोन मोठे पक्ष समान लढतीमध्ये असतील आणि शेवटच्या टाप्प्यात ख्रिस गेल वा विराट वा धोनी यांच्यासारखा फ़लंदाज मैदानात आला, तर धावफ़लक उलटापालटा करून टाकतो. राजकीय निवडणूक मैदानात मोदींनी तेच स्थान प्राप्त केले आहे. थोडक्यात ज्या चाचण्या झाल्या व आकडे आलेले आहेत, ते मोदींच्या आगमनापुर्वीचे आहेत. येत्या दोन दिवसात मोदी प्रचाराला उतरतील व दोन आठवड्यांनी मतदान व्हायचे आहे. तेवढ्या अवधीत मोदींनी दोन अडीच टक्के मते जरी फ़िरवली, तरी निकालाचे पारडे कुठल्या कुठे बदलून जाऊ शकते. कॉग्रेसच्या १५-२० जागा कमी झाल्या व भाजपाच्या तितक्याच वाढल्या तर एकहाती बहूमत भाजपाला मिळू शकते. देवेगौडांनी आपण प्रसंग आला़च तर कॉग्रेसला पाठींबा देण्याची घोषणा आधीच केलेली असल्याने कदाचित त्यांची काही मते थेट कॉग्रेसलाच गेली, तर कॉग्रेसही बहूमताच्या धक्क्याला लागू शकते. पण त्यासाठी राहुल व सिद्धरामय्यांना अथक मेहनत घ्यावी लागेल. मोदींना तर पाच वर्षात निवडणूक प्रचारातून रजा सुद्धा घेता आलेली नाही. हे चटकन राजकीय मेंदूला न दिसणारे मुद्दे सट्टा बाजाराने विचारात घेतलेले असू शकतात. म्हणून मतचाचण्या व सट्टा बाजाराचे आकडे परस्परांना छेद देणारे आहे्त. काही़चे विरोधाभास निर्माण करणारे आहेत. दोन आठवड्यात सत्य समोर येईलच.
No comments:
Post a Comment