झुंडींना कुठल्याही प्रश्नाची सोपी उत्तरे हवी असतात. त्यांना कुठल्याही विषय वा गोष्टीतला तपशील नको असतो. त्यामुळेच उत्तरे खरी-खोटी याला अर्थ नसतो. चटकन पटणारी उत्तरे किंवा पर्याय झुंडींना प्यारी असतात. म्हणूनच कुठल्याही विचारवंताला बुद्धीमंताला जनतेचा रोष नेमक्या शब्दात व्यक्त करता येता असला, तरी जमावाचे नेतॄत्व करता येत नाही. संघटना उभारता येत नाही. पण त्याच्याच विचार व विश्लेषणाचा आधार घेऊन कोणी चतुर माणूस समाजावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकत असतो. त्याच विचारांचे विकृतीकरण वा मोडतोड करून चतुर लोक जमावाला प्रश्न सोपे करून दाखवतात आणि त्याची सोपी उत्तरेही देतात. ती उत्तरे अनेकदा धडधडीत खोटी असतात. दिशाभूल करणारी असतात. केजरीवाल यांचे संघटन व चळवळ राजकारण त्याचे उत्तम उदाहरण आहे. लोकपाल आंदोलनापासून केजरीवाल यांनी आपल्या अशा चतुराईने दिल्लीकरांना भारून टाकलेले होते. अन्यथा नवख्या पक्षाला दिल्लीकरांनी पहिल्याच प्रयत्नात सत्तेपर्यंत पोहोचवले नसते. पण गंमत अशी, की त्यांना तेव्हा बहूमत मिळालेले नव्हते आणि कॉग्रेसच्या मुर्खपणाने तीच संधी या भामट्याला मिळून गेली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या नादात कॉग्रेसने केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवले आणि त्यांनी आपल्या नाकर्तेपणाची साक्ष दिलेली होती. त्यांना मग थेट पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडू लागली आणि दिल्लीच्या सत्तेला लाथ मारून त्यांनी देशात चारशेहून अधिक उमेदवार उभे केले. पण दिल्लीतली झुंड म्हणजे देशव्यापी झुंड नव्हती. ती चुक ओळखून केजरीवाल सावध झाले व त्यांनी पुन्हा दिल्ली जिंकण्याचा डाव यशस्वीपणे खेळला. दिल्लीकरांची पुरती निराशा त्यांनी केली नव्हती, म्हणूनच त्यांना मध्यावधी निवडणूकीत प्रचंड यश जनतेने बहाल केले. झुंडी जनमानसावर कशा राज्य करू शकतात, त्याचे हे जितेजागते उदाहरण आहे.
सत्ता मिळाल्यापासून केजरीवाल यांनी कुठलाही चांगला कारभार केलेला नाही. कारण व्यवस्था व कारभार या दोन गोष्टी त्यांच्या स्वभावातच नाहीत. त्यांना झुंडीमध्ये रमायला आवडते आणि नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून जनमानसावर हुकूमत गाजवण्याची अनिवार इच्छा त्यांना भारावून टाकते. म्हणून तर पुन्हा दिल्ली जिंकण्यापर्यंत केजरीवाल शांत होते. आपाल्याच पक्षातील कुणाचाही भिन्न मताचा सूर त्यांनी चेपून टाकला होता. अशा वातावरणात झुंडशाही करणार्या व्यक्ती वा नेत्याला अनेक बुद्धीमान लोकही समर्थन व मदत देत असतात. केजरीवाल यांची हुकूमशाही प्रशांत भूषण व योगेंद्र यादव अशा बुद्धीमान सहकार्यांना दिसत होती. पण त्यांना आपली विचारधारा पुढे रेटण्यासाठी एक संघटना हवी होती. ती केजरीवाल यांच्या तालावर नाचत असल्याने, हे दोन्ही नेते खुश होते. त्यांनी केजरीवालच्या हुकूमशाहीचे सतत समर्थन केले. कारण त्यांचा समज असा होता, की केजरीवाल कितीही हुकूमशहा असला, तरी तो आपल्याच मुठीत आहे आणि त्याबाहेर जाणार नाही. उलट केजरीवाल हुशार होता व आहे. त्याला आपले हेतू पक्के ठाऊक आहेत आणि त्यात उपयुक्त असलेल्या कुणालाही संभाळून घेत त्यांचा वापर करून घेण्याचे व्यापारी कौशल्य त्याने आत्मसात केलेले आहे. यादव आणि भूषण अशा बुद्धीमंतांचा उपयोग असेपर्यंत केजरीवाल त्यांना खेळवत राहिला आणि या मुर्खांना एकूण आम आदमी पक्षाची संघटना आपल्याच विचारधारेच्या मार्गाने चालण्याची आशा होती. प्रत्यक्षात ती संघटना नव्हती, की पक्ष नव्हता. ती एक झुंड होती आणि तिला लोकशाही संघटनेचे स्वरूप दिल्यास आपले नेतृत्व संपुष्टात येईल, हे केजरीवालही ओळखून होता. साहाजिकच जोवर असे लोक उपयुक्त होते, तोवर त्याने त्या शहाण्यांना वापरून घेतले आणि कामात अडचण होऊ लागल्यावर झुंडीला त्यांच्याच अंगावर सोडले.
शाझिया इल्मी, कुमार विश्वास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव किंवा कपील मिश्रा असे अनेक ज्येष्ठ सहकारी आता केजरीवालच्या सोबत राहिलेले नाहीत. त्यांनी उघडपणे केजरीवालशी शत्रूत्व घेतलेले आहे. पण आरंभीच्या काळात अश्विनी उपाध्याय नावाच्या एका सहकार्याने केजरीवालांच्या हुकूमशाहीला आव्हान दिले, तेव्हा यापैकी कोणीही उपाध्यायच्या बाजूने उभा राहिला नव्हता. उलट केजरीवालचे समर्थन करताना याच लोकांनी अश्विनी उपाध्यायची शिकार केलेली होती. नंतर शाझिया इल्मी वा अन्य काही लोकांची शिकारही अशाच सहकार्यांनी केली आणि पुढे भूषण व यादव यांची शिकार करण्यासाठी केजरीवालने कपील मिश्रा, आशुतोष अशा लोकांचा वापर करून घेतला. कुमार विश्वास तेव्हा प्रेक्षक बनून राहिला आणि अलिकडे त्याचीही शिकार होऊन गेलेली आहे. थोडक्यात यापैकी प्रत्येक बुद्धीमान शहाण्यांचा केजरीवालने अनेक शिकारीसाठी वापर कररून घेतला आणि तेव्हा त्या शिकारीचे समर्थन करणार्या अशा शहाण्यांना आपण सुपातून जात्यात जाणार, हे सुद्धा समजू शकले नव्हते. जेव्हा त्यांच्याच शिकारीची वेळ आली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. पण वेळ निघून गेलेली होती. हे नेहमीच होते. जिथे झुंडीचे राजकारण वा चळवळी चालतात, तिथे यापेक्षा वेगळे काहीच होत नसते. आपल्या बुद्धीला मुरड घालून काही शहाणे विचारांचीही गळचेपी होऊ देतात व त्याचे समर्थन करतात. तेव्हा त्यांची अपेक्षा असते, की हुकूमशहा आपल्याच इच्छेनुसार चालणार आहे. त्यामुळे पुढल्या काळात पक्ष वा संघटनेचे लोकशाही स्वरूप होऊन विचारांच्या मुठीत झुंडीला राखता येईल, अशी त्यांची खुळी आशा असते. पण तसे कधीच होत नाही. झुंडीवर हुकूमत गाजवणारा नेता कधीच झुंडीला विचारांच्या आहारी जाऊ देत नाही. तो आपल्या भोवती एक प्रभावळ निर्माण करतो आणि बुवा महाराजाप्रमाणे झुंडीला खेळवत असतो. त्यावर कुठलाही विचार वा बुद्धीमान मात करू शकत नाही.
लोकपाल आंदोलन वा आम आदमी पक्ष ही अशीच झुंड होती आणि तिने अण्णा ह्जारे वा किरण बेदी यांच्यापासून अनेक चेहरे पुढे आणले, तरी व्यवहारात कुठलीही संघटना तिथे नव्हती. होती ती केजरीवाल यांच्याशी निष्ठावान अशी एक झुंड. त्यात हाक मारताच जमा होणारे आणि छू करतातच अंगावर चाल करून येणारे, काही हजार लोक आहेत. तेच आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप आहे. ती झुंड हाताशी बाळगून व तिला नियंत्रित करणार्या मोजक्या निष्ठावंतांची फ़ौज, ही केजरीवालांची खरी पार्टी वा संघटना आहे. त्यात किरण बेदी, शाझिया इल्मी, प्रशांत भूषण वा योगेंद्र यादव यांना कुठलेही स्थान असू शकत नाही. किंबहूना स्वयंभू विचार करणार्या व्यक्तीला त्या पक्षात व झुंडीत स्थान असू शकत नाही. जेव्हा त्यांनी तसा प्रयत्न केला, तेव्हाच त्यांची उपयुक्त्तता संपलेली होती आणि केजरीवाल यांनी पद्धतशीर त्या लोकांचा काटा काढला. त्यानंतर स्वराज इंडीया वगैरे खेळ भूषण-यादव यांनी करून काय साधले? नंतर त्यात उडी घेतलेले आशुतोष वा आशिष खेतानही हल्ली बाजुला फ़ेकले गेलेले आहेत. झुंड अशीच चालते. मग ती दाऊद वा छोटा राजनची गुन्हेगार टोळी असो, किंवा कुठल्याही स्वयंसेवी संघटनेच्या नावाखाली चाललेली टोळी असो. त्यात हुकूमत गाजवणारा एक म्होरक्या असतो आणि सवडी सोयीनुसार तो विविध शहाण्यांचा वापर करून घेत असतो. अण्णा हजारे, किरण बेदी वा प्रशांत भूषण अशा लोकांचा केजरीवालनीही धुर्तपणे वापर करून घेतला आणि त्याच्याही पुर्वी लोकपालचा मुखवटा पांघरलेला असताता विविध विरोधी पक्ष नेत्यांचाही सढळहस्ते उपयोग करून घेतला. जनरल व्ही. के. सिंग, अरूण जेटली, शरद यादव किंवा रामदेव बाबा अशा अनेकांना लोकपाल व भ्रष्टाचार निर्मूलनाच्या आंदोलनात केजरीवाल घेऊन आलेलेच होते ना? नंतर त्यांनाही आरोपी ठरवण्यात केजरीवालनी कसूर केली नाही.
झुंडशाहीची हीच कार्यशैली असते. त्यात मुठभर निष्ठावंत कट्टर अनुयायी हाताशी असले, की नेत्याला मोठमोठे देखावे निर्माण करता येत असतात. लोकसभेच्या निवडणूकीत केजरीवाल यांनी ऊडी घेतली, तेव्हाचे दिवस आठवा. कुठल्याही शहरात महानगरात केजरीवाल पोहोचत होते आणि त्यांच्या अवतीभवती हजारोंचा घोळका असे. मात्र त्यांच्या मागे तिथे पक्षाच्या उमेदवार वा पदाधिकार्याचा कोणीही समर्थक दिसत नसे. मुंबईत मेधा पाटकर वा बंगलोरमध्ये कोणी बालकृष्णन नावाचे दिग्गज उभे होते आणि त्यांच्या प्रचाराला शंभर दोनशे कार्यकर्त्यांचीही मारामार होती. पण वाहिन्यांवर मात्र केजरीवाल व आम आदमी पक्ष इतक्या जोशात होता, की बहुधा विद्यमान लोकसभेत त्यांचे पन्नाससाठ खासदर निवडून येणार होते. हा देखावा तशा निष्ठावान झुंडीतून उभा करता येतो. केजरीवाल यांनी तेच नाटक देशभर करून बघितले. पण ते करताना दिल्लीतूनही साफ़ व्हायची वेळ आल्यावर त्यांनी बाकी सगळीकडला पक्ष गुंडाळून ठेवला. पुन्हा दिल्लीतला पाया भक्कम करण्याचे काम हाती घेतले. त्यात ते यशस्वीही झाले, पहिले सरकार मोडल्याची माफ़ी मागून, त्यांनी पाच साल केजरीवाल ही घोषणा केली. पण जित्याची खोड इतक्या सहजासहजी जात नाही. म्हणून असेल की दिल्लीची सत्ता पुन्हा मिळाल्यावर अल्पावधीतच केजरीवाल यांची नाटके सुरू झाली. झुंडीवर राज्य करणे ही एक गोष्ट आहे आणि कायदे नियमात बसून राज्यकारभार हाकणे दुसरी गोष्ट आहे. केजरीवाल प्रशासकीय सेवेतून आलेले असले तरी नियमांच्या चाकोरीत चालण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यापेक्षा नियम मोडणे व कायद्यांना आव्हान देणे, हा त्यांचा उपजत छंद आहे. सहाजिकच आधी पक्षातील नेत्यांचे काटे काढले गेले आणि नंतर प्रस्थापित दिल्ली प्रशासनाला धक्के देण्याचा उद्योग त्यांनी आरंभला. त्याची किंमत त्यांना गतवर्षी महापालिका मतदानात मोजावी लागली होती.
आम आदमी पक्ष ही झुंड वा टोळी आहे आणि टोळीला कुठल्याही विचारधारा वा तत्वात अडकून पडायला आवडत नाही. झुंडीला एक निर्णायक नेता व त्याचा आदेश खुप आवडत असतो. सहाजिकच त्या झुंडीला सोपी कारणमिमांसा व कुणावर तरी खापर फ़ोडण्याची हौस असते. ती झुंड नेहमी नेत्याच्या निर्णायकतेवर विसंबून असते. आपला नेता हाच तिच्यासाठी विचार व भूमिका असते. आसाराम बापू वा तत्सम बुवांवरची भक्तांची श्रद्धा आणि केजरीवाल यासारख्या नेत्याविषयी अनुयायांमध्ये आढळून येणारी निष्ठा सारखीच असते. असे नेते वा म्होरके कायम असुरक्षिततेच्या भावनेने पछाडलेले असतात. कोणीतरी आपल्या विरुद्ध कारस्थान शिजवतो आहे. किंवा कुठेतरी आपल्याला संपवण्याचे डाव खेळले जात आहेत, असे भास त्यांना होत असतात. मग तेच भास त्यांना खरेही वाटू लागतात आणि पर्यायाने अनुयायांनाही तेच खरे वाटत असते. आताही दिल्लीच्या कारभाराचा सत्यानाश होऊन गेलेला आहे,. मागल्या साडेतीन वर्षात केजरीवाल यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान व प्रशासनाशी सतत तक्रारी करून झालेल्या आहेत. बारीकसारीक बाबतीत कोर्टात जाऊन केंद्र व राज्यपालांच्या अधिकाराला आव्हान देऊन झालेले आहे. एक केजरीवाल सोडून प्रत्येक रचना, व्यवस्था व निर्णय चुकीचे वा गैरलागू असतात, अशीच त्यांची धारणा आहे. आताही दिल्लीचे प्रशासकीय अधिकारी संपावर आहेत, म्हणून दिल्लीचा कारभार ठप्प झाला आहे, असा आरोप करीत केजरीवाल यांनी राज्यपालांच्या कार्यालयातच धरणे धरलेले आहे. वास्तवात तसे काहीही झालेले नाही. खुद्द अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींनीच पत्रकार परिषद घेऊन आपंण आजही करीत असलेल्या कामाचा गोषवारा जाहिरपणे सांगितलेला आहे. सत्य इतकेच आहे, की केजरीवाल वा त्यांच्या अन्य सहकारी मंत्र्यांच्या घरी वा इतरत्र अधिकारी बैठकीला यायला राजी नाहीत. असे का झाले आहे?
साधी सरळ गोष्ट आहे, १९ फ़ेब्रुवारी रोजी केजरीवाल यांनी मुख्य सचिवांना आपल्या निवासस्थानी बैठकीला बोलावले आणि त्या अपरात्री त्या बैठकीमध्ये केजरीवाल यांच्या सहकार्यांनी धक्काबुक्की व मारहाण केली. त्याचा पोलिस तपासही सुरू आहे. त्या घटनेनंतर अशा बैठका व गोतावळ्यात यायला अधिकार्यांनी नकार दिलेला आहे. त्यातून हा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. गेले आठ दिवस किंवा तीन महिने माध्यमांनीही लपवलेले हे सत्य आहे. त्याच्या ऐवजी केजरीवाल यांच्या थापेबाजीला प्रसिद्धी मिळत राहिली. वास्तवात केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाचा खरा चेहरा कधीच दिल्लीकरांच्या नजरेस आला आहे. कितीही मॊठे घोळके समोर आणून वा मोदी विरोधाची हाक देऊन दिल्लीकर, या पक्षावर विश्वास ठेवणार नाहीत. दिल्ली चिकनगुणया वा डेंगीने ग्रासलेली असताना केजरीवाल व त्यांचे सर्व मंत्री सहकारी दिल्लीतून बेपत्ता होते. हा अनुभव ज्या दिल्लीकराने थेट घेतलेला आहे, त्याला आज माध्यमातून कितीही थापा मारल्या गेल्या, म्हणून दिशाभूल होणार नाही. कारण आपण एका झुंडशाहीला मते देण्याने कसे फ़सलो आहोत, त्याची जाणिव दिल्लीकरांना पुरती झालेली आहे. पाचपैकी तीन मंत्र्यांना आक्षेपार्ह कृत्यासाठी निलंबित करावे लागल्यानंतर केजरीवाल यांनी असले कांगावे थांबवणे अगत्याचे होते. पण त्यासाठी शांत डोक्याने विचार करावा लागेल आणि प्रामाणिकपणे चुका कबूल कराव्या लागतील. तो केजरीवाल वा कुठल्याही झुंडशहाचा स्वभाव नसतो. तो सतत कांगावा करूनच जगत असतो आणि आपल्या भ्रमालाच सत्य समजून लोकांच्या गळ्यात बांधण्यात धन्यता मानत असतो. जनता आणि झुंड यातला फ़रक तो विसरून गेलेला असतो. त्याच्या झुंडीपेक्षाही लोकसंख्या मोठी व निर्णायक ताकद असते. याचे भान जनता उठाव करून उलथून पाडते, तेव्हाच येत असते. महापालिका मतदानाने तो धडा दिलेला आहे. पण झुंडशहा कधी धडा शिकतात?
मुळात जनलोकपाल हे पन एक थोत्ंडच आहे भुषन वगेरे मंडळीनी राजकरनात प्रवेश करण्यासाठी एक पिलु सोडुन दिल होत तेव्हा काॅगरेसच्या भ्रष्टाचारामुळे ते चालुन गेल तेव्हा पन मिडिया खर दाखवत नव्हता आजही नाही पन काही चॅनेलना कळलय ठराविक चॅनलच दाखवत होती
ReplyDeleteभाऊ, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, केजरीवाल ही एक वृत्ती आहे. यांच्यावर दिल्लीकर भाळले. आता मात्र अशी चूक परत करणार नाहीत ही आशा आहे. मागच्या आठवड्यातील आंदोलन हा तर केवळ भामपकपणा होता. अधिकारी तुमच्याकडे येत नाहीत तर तुम्ही त्यांच्या कडे जाऊन विचाराना ! हे अगदी लहान मुलासारखे झाले.तुमचा बाळू मला सारखा आउट करतो म्हणून बाळूच्या घरी केलेला हट्ट ! सगळा बलिशपणा !
ReplyDeleteभाउ सहज म्हनुन इथल्या पुरोगामी लेकांचे fb चेक केले तर १० दिवस उपोषन तेवढ्या पोस्ट आहेत त्यात पुन्हा केजरीवालची बाजु घेत मोदींना तर रतीब घातलायच पन काॅंगरेस पवारांनाही सोडलेले नाही यातुनच यांची फरपट कळते इथे लोकसभेला काही आप लढणार नाहीये दिल्ली पंजाब मध्ये ते एकत्र वा वेगवेगळे लढले तरी हे काय लिहीनार काय माहित?
ReplyDelete