Thursday, July 26, 2018

पाकिस्तानी निकालाचा भारतीय अर्थ

pak polls के लिए इमेज परिणाम

पाकिस्तानात लोकशाही मानणार्‍या मुस्लिम लीग वा पिपल्स पार्टीला लष्करी सत्तेने कसे नेस्तनाबुत केले, त्याचे विवेचन आता होणार आहे. कारण पाकसेनेच्या खास कळसुत्री पक्ष व नेत्याला मोठे यश मिळालेले आहे. इमरान खानचा अनेक वर्षे लोकांनी नाकारलेला पक्ष सर्वात मोठा म्हणून संसदेत निवडून आला आहे, तरीही त्याला स्पष्ट बहूमत मिळालेले नाही. शिवाय इतकी दडपशाही करूनही त्या दोन्ही प्रमुख पक्षांना एकत्रित का होईना, तुल्यबळ मते व जागा मिळालेल्या आहेत. मुळातच कमी मतदान झाले आहे आणि तेही दहशतीखाली हे सांगितले जाईल. पण याच निवडणूकीत सर्वात मोठा दणका बसलेला आहे, तो तोयबाचा म्होरक्या सईद हाफ़ीज याला. त्याने अनेक कोलांट्य़ा उड्या मारून झाल्या व अनेक चलाख्या केल्या. तरी त्याच्या कुठल्याही उमेदवाराला पाकिस्तानी संसदेचा मार्ग खुला झालेला नाही. आपणच सईद हाफ़ीजचे पुरस्कर्ते आहोत, असा ठपका पाकसेनेला नको होता. म्हणून त्यांनी हाफ़ीजच्या पक्षाला मान्यता मिळू दिली नाही. तर त्याने एका जुन्या कट्टर पंथीय पक्षाच्या नावाने आपले उमेदवार पाठीराखे उभे केलेले होते. पण त्यापैकी एकालाही संसदेपर्यंत पोहोचता आलेले नाही. कुठल्याही मतदारसंघात त्याच्या अनुयायाला चांगली म्हणावीत, अशी मते मिळू शकलेली नाहीत. ही निवडणूक पाकिस्तानातली होती, ज्याला आज जग जिहादी दहशतवादाची जननी समजत असते. परंतु पाकिस्तानी जनतेलाही असला कट्टर धर्मवाद नको असल्याची ग्वाही या मतदानाने दिलेली आहे. आपण त्याची तुलना काश्मिरातील हुर्रीयतचे भुरटे वा असाउद्दीन ओवायसी अशा भारतीयांशी करू शकतो. त्यातून भारतातल्या सेक्युलर पुरोगामी पक्षांना खुप काही शिकण्यासारखे आहे. इस्लामी धर्मांधतेची भूमिका पाकिस्तानातील मुस्लिमांनाही नको असेल, तर भारतीय मुस्लिमांच्या ती कशी गळी उतरवली जाऊ शकेल?

स्वातंत्र्यपुर्व काळात भारतातही निवडणूका झालेल्या होत्या आणि अकरा प्रांतापैकी कुठल्याही एका राज्यात मुस्लिम लीग या धर्मवादी पक्षाला आपले बहूमत मिळवता आले नव्हते. अगदी तेव्हाच्या बंगालमध्येही मुस्लिमांची बहुसंख्या असून, तिथे मुस्लिम भूमिकेच्या पक्षाला प्रादेशिक विधानसभेत बहूमत मिळवता आलेले नव्हत. तर वायव्य सरहद्द प्रांत हा मुस्लिम पठाणबहूल असूनही तिथे कॉग्रेसप्रणित खुदाई खिदमतगार या संघटनेला यश मिळालेले होते. आज त्याची आठवण येते. पाकिस्तान हा कितीही शेजारी वा शत्रू देश असला, तरी त्याचा आत्मा कसा भारतीय आहे, त्याचीच साक्ष या मतदानाने दिलेली आहे. लष्कराची व दबावाखालील भ्रष्ट न्यायपालिकेची दडपशाही असतानाही पाक मतदाराने सईद हाफ़ीज व जिहादी मानसिकता ठामपणे नाकारली आहे. कितीही मुखवटे लावून जिहादी उमेदवार मैदानात आलेले असले, तरी त्यांना साफ़ नकार देण्याचा हा आशय गंभीर आहे. तो पाकच्या विविध राजकीय नेते व पक्षांना समजू शकला, तरीही त्यांना भारताशी शत्रुत्व पत्करून जगण्याची गरज उरणार नाही. त्यातून पाकिस्तानी मतदार स्पष्ट सांगतो आहे, की त्याही लोकसंख्येला आधुनिक एकविसाव्या शतकाच्या युगात जगायचे आहे. आपली भौतिक भरभराट करून घ्यायची आहे. त्यात धर्मांधतेच्या नावाने कालवले जाणारे विष त्याही जनतेला नको आहे. असा या निकालांचा एक महत्वाचा अर्थ आहे. भारताला त्यातून एक संदेश असा दिला जात आहे, की धार्मिक विभागणी करून राजकारण खेळू नका. इस्लाम खतरेमे असल्या गर्जना डरकाळ्या खोट्या असल्याचाही संदेश त्यात दडलेला आहे. अशा डरकाळ्या फ़ोडणारे कुठल्याही समाजाला रसातळाकडे घेऊन जातात, असेच पाकिस्तानी मतदाराने जगाला सांगितलेले आहे. प्रामुख्याने हुर्रीयतच्या भामटेगिरी व खोटेपणाचे समर्थन करणार्‍यांसाठी हा गंभीर इशारा आहे.

pak polls के लिए इमेज परिणाम

काश्मिरविषयी पाकिस्तानी जनता इतकी संवेदनाशील असती, तर त्यांनी अन्य कुठल्याही पक्षापेक्षा हाफ़ीजच्या पक्षाला प्रतिसाद दिला असता. पाक जनता खरोखर भारताला शत्रू मानत असती, तर सईद हाफ़ीजला मोठे यश मिळाले असते. मागल्या निवडणूकीत नवाज शरीफ़ यांच्या मुस्लिम लीग पक्षाला मोठे यश मिळालेले होते व बहूमतही मिळालेले होते. तर त्यांच्या जाहिरनाम्यातच भारताशी संबंध सुधारणार व मैत्रीपुर्ण करणार, असे सांगितलेले होते. तरीही त्यांना प्रचंड यश मिळालेले होते आणि आजही पुन्हा हाफ़ीजला पाकिस्तानी मतदार ठामपणे नाकारतो. ही लक्षणिय बाब आहे. दुसरीकडे लष्कराने प्रायोजित केलेला नेता म्हणूनच इमरानखान समोर आलेला होता. त्यामुळे त्याला बहूमत मिळालेले नाही, ही सेनादलाच्या दडपशाहीला मतदाराने दिलेली चपराक आहे. बंदुका रोखून व राजकीय हस्तक्षेप करूनही लष्कराला आपल्या पसंतीचा पंतप्रधान सत्तेत आणुन बसवता आलेला नाही. याचा एकत्रित अर्थ असा आहे, की पाक जनता आता लष्कराची अरेरावी आणि जिहादीचा मनमानीपणा, यांना कंटाळलेली आहे. त्यापासून आपल्याला मुक्ती देईल अशा पर्याय वा राजकीय नेतृत्वाच्या शोधात पाक जनता आहे. अशीच स्थिती इजिप्तमध्ये दिर्घकाळ होती व ती जनता रस्त्यावर उतरली, तेव्हा लष्करशहालाही झुगारून देण्यापलिकडे सैनिकांना पर्याय राहिला नव्हता. काहीसे तसेच संकेत पाक मतदाराने दिलेले आहेत. यातून मुक्त व्हायला पाकिस्तानी लोक उतावळे होत चाललेले आहेत आणि तो संकेत ओळखला नाही, तर लष्करी नेतृत्वाला झुगारणारा कोणी दुय्यम सेनाधिकारीही पाकमध्ये सत्तांतर वा बदल घडवून आणू शकेल. जो एकाचवेळी लष्कराचा हस्तक्षेप कमी करून जिहादला वेसण घालायची कृती करील. शेजारी भारताशी लढाईचा पवित्रा सोडून विकासाच्या मार्गाने देशाला घेऊन जाणारा मार्ग चोखाळणारा असेल.

पाकिस्तानी जनता इतक्या दडपशाहीनंतरही ५३ टक्के मतदानाला बाहेर पडली. बंदूका रोखलेल्या असतानाही त्यांनी लष्करप्रणित इमरान खानला निर्विवाद बहूमत मिळू दिले नाही. त्याचवेळी सईद हाफ़ीजला साफ़ नाकारले, याचा साधा अर्थ ती जनता आता सत्तर वर्षातल्या इस्लामी धार्मिक लष्करशाहीला कंटाळलेली आहे. कधीही तिच्या असंतोषाचा स्फ़ोट होऊ शकेल, असाच त्याचा अर्थ आहे. तो स्फ़ोट टाळून क्रमाक्रमाने पाकिस्तानला लोकशाहीच्या मार्गावर आणण्याचे प्रयास नवाज शरीफ़ यांनी चालविले होते. त्यांच्या त्या प्रयत्नातला सावधपणा ओळखून पाकसेनेनेही आवरते घेतले असते, तर अशी वेळ आली नसती. ती आलेली आहे. फ़क्त तिचा स्फ़ोट कधी होतो, त्याची प्रतिक्षा आपण करायची आहे. इमरान खान वा पाकसेनेला हे सत्य वेळीच समजून घेता आले नाही, तर पाकचे तुकडे अपरिहार्य आहेत. ते भारताने करायची गरज नसून, आतूनच धुमसणार्‍या ज्वालामुखीचा स्फ़ोट त्याला कारणीभूत होईल. मात्र त्यातून त्या देशाला कोणी सावरू शकणार नाही. सत्तर वर्षे भारतावर अखंड सत्ता गाजवणार्‍या कॉग्रेसी मानसिकतेला ते ओळखता आले नाही आणि शांततामय मार्गाने मतपेटीतून त्याचा अस्त होत गेला, त्याचीच वेगळ्या मार्गाने पाकिस्तानात पुनरावृत्ती होत आहे. आपण विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात आल्याचे अजून भारतीय उपखंडातील अनेक नेत्यांना अभ्यासकांना उमजलेले नाही. ते अजूनही जैसेथे भूमिकेला घट्ट धरून बसलेले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेलाच पुढाकार घेऊन त्यांना हाकलून लावण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. पाकिस्तानात तो बदल अत्यंत हिंसक मार्गाने होण्याची शक्यता आहे. हा निकाल त्याची चाहुल देणारा आहे. विषय शरीफ़ वा झरदारी व इमरान खानपुरता मर्यादित नाही. पाकिस्तानच्या भवितव्याचा आहे. आणखी दहा वर्षांनी जगाच्या नकाशात हा देश शिल्लक राहिल काय?

3 comments:

  1. हाच हाफीझ सईद भारतातून उभा राहिला तर अनेक जागा जिंकेल अशी सध्या भीती वाटते.

    ReplyDelete
  2. भाऊ-इम्रानखानच्या पार्टीचे एक संस्थापक माजी जनरल हमीद गुल जे आय एस आय चे अनेक वर्षे प्रमुख होते.त्यांच्या अशा अस्तित्वाने त्या पार्टीची धारणा काय असणार हे उघड आहे.असे म्हणतात की त्यांच्या मृत्यू सिरिया मध्ये धुमश्चक्रीत झाला

    ReplyDelete
  3. Quite correct analysis.complete transformation might take time but there seems to be beginning. However implications of this change in international relations need to be seen

    ReplyDelete