मोठ्या आवेशात पुढे जाऊन पराभूत होणार्यांचे हिंदीतील वर्णन कसे केले जाते? चौबे नावाचा कोणी छब्बे व्हायला पुढे सरसावतो आणि थप्पड खाऊन मागे येतो, तेव्हा त्याचा दुबे झाला, असे हेटाळणीच्या स्वरूपात म्हणतात. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी यांची वाटचाल बहुधा त्याच दिशेने चालली आहे. त्यांना बंगालपुरते मर्यादित रहायचे नसून, पंतप्रधान पदाचे वेध लागलेले आहेत. त्यात गैर काहीच नाही. पण नुसती नाटके करून वा आक्रस्ताळेपणाने इतकी मोठी बाजी त्यांना मारता येणार नाही. उलट या गडबडीत हातचेही जाण्याचा धोका असतो. हे त्यांच्या आधीच्या बंगाली सत्ताधीश डाव्यांना ममतांमुळेच उमजले आहे. पण तोपर्यंत त्यांचा दुबे होऊन गेलेला होता. आता ममताही त्यांच्याच पावलावर पऊल टाकून तडक दिल्लीला निघालेल्या आहेत. तसे नसते, तर शक्ती वाढवण्याच्या नादात त्या शक्ती कशाला गमावत आहेत? गेल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी असल्याच आक्रस्ताळेपणातून ममतांनी त्रिपुरातील सगळा पक्षच गमावला होता. बंगाल डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय राजकारण खेळता येत नसते. म्हणून तर ममतांच्या त्रिपुरातील सगळ्या पक्षानेच गाशा गुंडाळला व ते भाजपात सहभागी झाले होते. त्याच बळावर भाजपाने त्या विधानसभेत शून्या्वरून थेट बहूमतापर्यंत मजल मारली. त्याचीच पुनरावृत्ती आसामात झालेली आहे. तिथल्या नागरिक नोंदणी यादीच्या निमीत्ताने ममतांनी घेतलेली भूमिका, त्यांच्याच स्थानिक नेत्यांना मान्य नसल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकून, ममतांची साथ सोडलेली आहे. द्विपेन पाठक नावाच्या आसाम तृणमूल कॉग्रेस अध्यक्षाने आपल्या पदाचा व पक्षाचा राजिनामा देऊन ममतांच्या ताज्या भूमिकेचा कडकडीत निषेध केला आहे. त्यांच्या सोबत अनेकांनी तृणमूल कॉग्रेसचा नाद सोडलेला असून, त्रिपुरानंतर ममतांना आणखी एका राज्यात गाशा गुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर विचारांची झिंग चढली मग माणूस केव्हा फ़िदायीन जिहादी होतो, त्याचे त्यालाच कळत नाही. म्हणून तर ममता २००६ साली डाव्यांचा पराभव करून बंगालची सत्ता काबीज करू शकल्या होत्या. पण त्यांना ती सत्ता व बंगालचा मतदार कशामुळे मिळू शकला, त्याचेच आज त्यांना विस्मरण झाले आहे. बांगलादेशी घुसखोरच नव्हेत, तर रोहिंग्या मुस्लिमांनाही आश्रय देण्यापर्यंत त्यांची घसरगुंडी झालेली आहे. आज रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लिमांसाठी देशव्यापी वकीलपत्र घेऊन झुंजणार्या ममता बानर्जी, २००५ सालात कुठल्या भूमिकेत होत्या? त्यावेळी त्यांच्या पक्षाचा लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाला होता आणि त्या एकट्याच तिथे पोहोचू शकलेल्या होत्या. तेव्हा डाव्या आघाडीला बांगलादेशी घुसखोरांचे आश्रयदाते ठरवण्यासाठी ममताचा आटापीटा चालू होता. हे घुसखोर बंगाल गिळंकृत करीत चालल्याचा आरोप ममतांनीच लोकसभेत केला होता आणि त्यासाठी स्थगन प्रस्तावही दिलेला होता. पण मार्क्सवादी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी तो फ़ेटाळून लावला होता. त्यामुळे संतापाने लालबुंद झालेल्या ममता सभापतींच्या दिशेने धावल्या आणि त्यांनी हातातली कागदपत्रे आसनाकडे भिरकावली. मग हे युपीए सरकार व बंगालचे डावे सरकार, बांगला घुसखोरांचे पाठीराखे असल्याचा आरोप करीत, आपल्या सदस्यत्वाचा त्यांनी तडकाफ़डकी राजिनामा फ़ेकला होता. अर्थात तो योग्य स्वरूपाचा नसल्याने स्विकारला गेला नाही. पण संपुर्ण सभागृहात ममता एकाकी पडल्या होत्या आणि रडवेल्या होऊन आपल्या आसनावर बसल्या होत्या. सहाच वर्षांनी त्यांच्या त्या संतापाला बंगाली मतदाराने जोरदार साथ दिली आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातले लोकमत उफ़ाळून येत ममता थेट बंगालच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्या होत्या. आज त्यांना सेक्युलर झिंग चढल्याने आपलीच जुनी भूमिका आठवेनाशी झाली आहे.
खरे तर २०१४ सालात देशात सत्तांतर होऊन मोदी पंतप्रधान झाल्यापासून ममतांना देशाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेले आहेत आणि त्यासाठी त्या मोदी विरोधात काहीही करण्यासाठी वाटेल त्या थराला जात आहेत. कुठलीही टोकाची भूमिका घेऊ लागल्या आहेत आणि त्यात मग रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्यापासून बांगला घुसखोरांना पाठीशी घालण्यापर्यंत वाटेल त्या कसरती चालू आहेत. पण त्याच त्यांना क्रमाक्रमाने राजकारणातून उठवणार्या ठरू लागल्या आहेत. त्याची पहिली सुरूवात त्रिपुरात झाली. भाजपाने मागल्या काही वर्षात त्रिपुरातील बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीला विरोध असल्याच्या धारणेला हातभार लावून, आपले हातपाय तिथे पसरले होते. तर मुळात त्याच धारणेने तृणमूलकडे आलेले त्रिपुरावासी भाजपाकडे आकर्षित होऊ लागले होते. कारण बंगालची सत्ता हाती आल्यापासून ममतांनी बांगलादेशी घुसखोरांचे लांगुलचालन सुरू केले होते. सहाजिकच अशा त्रिपुरावासी नागरिकांची तृणमूलमध्ये घुसमट चालू होती. कारण तिथले डावेही स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवून घुसखोरांच्या व्होटबॅन्का बनवण्यात गर्क होते. तेच ममताचे होऊ लागल्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते नेते भाजपाकडे वळत गेले आणि एकेदिवशी त्यांनी तृणमूल पक्ष सगळाच्या सगळा भाजपात विलीन करून टाकला. लौकरच तिथल्या कॉग्रेसचे सगळे आमदार व पक्षही भाजपात सामील होऊन गेला. अशा रितीने त्रिपुरा राज्यात नामोनिशाण नसलेला भाजपा थेट सत्तेवर येऊन बसला. डाव्यांपासून कॉग्रेस आणि तृणमूल घुसखोरांचे समर्थन करणार असतील, तर त्यांच्या नादाला लागून आपली ओळख व अस्मिता पुसून टाकण्यापेक्षा त्या लोकांनी भाजपाची कास धरलेली होती. आता त्याचीच बंगाल व आसाममध्ये पुनरावृत्ती होते आहे. आज बंगालमध्ये भाजपा आपले बळ वाढाताना दिसतो आहे, त्याचे श्रेय म्हणूनच अमित शहांपेक्षाही ममतांनाच द्यावे लागेल.
मध्यंतरी ममतांनी भाजपा व संघाच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना बंगालमध्ये हिंदूंना जगणेही अशक्य करून टाकलेले होते. त्यातूनच मागल्या दोन वर्षात तिथे हिंदू लोकसंख्येत भाजपाचे प्रस्थ वाढत गेलेले आहे. त्यातच आता आसामच्या प्रश्नावर बाकीचे आसामी एकत्र येत असताना, ममतांनी पुन्हा बांगलादेशी घुसखोरांच्या संरक्षणासाठी घेतलेला पवित्रा त्यांना फ़क्त आसाम नव्हेतर बंगालमध्येही महागात पडणार आहे. कारण आज बंगालमध्ये भाजपाने जी भूमिका घेतलेली आहे, ती मुळात तृणमूल व ममतांची २००५ सालातली भूमिका आहे. त्याच भूमिकेने (मा माटी मानुष) ममतांना सत्तेपर्यंत आणून ठेवले होते. पण आपला हक्काचा मतदारच ममतांनी भाजपाकडे पळवून लावण्याचा चंग बांधला असेल, तर अमित शहांनी त्याला दरवाजे बंद करावेत, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? असे घुसखोर आपल्याला पुन्हा सत्ता व बहूमत मिळवून देतील, ही ममतांची अपेक्षा फ़ोल ठरणार आहे. कारण त्यातच आसाम कॉग्रेसने गमावला आहे आणि त्याच कारणाने डाव्यांना त्रिपुरातून पराभूत व्हावे लागलेले आहे. मग ममता असा आपल्याच पायावर धोंडा कशाला पाडून घेत आहेत? त्या प्रश्नाचे कुठलेही तार्किक उत्तर मिळत नाही. त्याचे उत्तर म्हणूनच मग अन्यत्र शोधावे लागते. ते उत्तर डाव्यांच्या पुरोगामी सेक्युलर झिंग चढण्याखेरीज दुसरे काही असू शकत नाही. यातली गंमत अशी असते, की पुढल्यास ठेच मागला शहाणा असे म्हटले जाते. पण मागला अतिशहाणा असला मग तो आधीच्या चुकांमधून काही शिकत नाही. आधीच्याने केला तसाच मुर्खपणा करून बाजी मारण्याचा जुगार खेळतोच. ममता त्याला अपवाद नाहीत. अन्यथा त्यांनी कॉग्रेस वा डाव्यांनी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती कशाला होऊ दिली असती? अर्थात त्यांच्या समर्थक वा भक्तांना तितकीच पुरोगामी नशा चढलेली असल्याने, आज दाखवलेला धोका कळणार नाही. याची प्रचिती कपाळमोक्ष झाल्यावरच येत असते. पण वेळ निघून गेलेली असते ना? चौबेने छब्बे होण्याच्या नशेत दुबे व्हायला मग पर्याय कुठे असतो?
ममता ने 2011 साली डाव्या चा पराभव केला 2006 नव्हे
ReplyDeleteवाह! उत्तम मुद्देसूद लेख. हा लेख वाचता असं वाटतंय की ममता might be playing double or quits. A dangerous approach to any situation. प्रचंड force पुढे माघार घेण्याची कला एका पॉइंट नंतर जमतच नाही का?
ReplyDeleteआणि हीच मनस्थिती अन्य विरोधकांची सुद्धा असावी असा संशय येतोय. 2019 ही आरपार चीच लढाई होणार याचेच हे संकेत. आणि ते तुमच्या लेखनातून उत्तम पणे समोर येतात. अभिनंदन आणि धन्यवाद. 👍🙏
अफलातून..
ReplyDeleteनक्षा उतरवला ममताचा..
भाऊ द ग्रेट...
Hats off
ReplyDeleteमोदींनी त्यांना आव्हान ठरणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कस संपवतात याच उत्तम उदा. आणि तेही ट्रॅप मध्ये पकडून ,२०१४ साली काँग्रेस चा सफाया झाल्यावर २०१६ साली बंगाल व तामिळनाडूंत भाजपला ममता जयललितांनी रोखलं होत,तेव्हपासूनचं शह द्यायची चाल सुरु झाली ,तमिळमध्ये अनाथ अण्णा डीएमके ला मोदींनी जवळ केलं ,आंध्र मध्ये नायडूंना जगन च्या जाळ्यात अडकवलं ,ममताच मुख्य प्रतिस्स्पर्धी राहिल्या होत्या ,nrc वर हीच भूमिका त्या घेणार हे माहीतच असणार ,त्यांना इतकं viable केलंय कि त्या काहीही बोलत सुटल्यात ,भाजप ला हेच हवय
ReplyDelete