कुठल्याही नव्या गोष्टीचा शोध लागला, मग त्याचा हेतू चांगला असला तरी आपापल्या परीने गैरवापर होतच असतो. सोशल मीडिया ही उत्तम सुविधा सामान्य लोकांना अलिकडल्या काळात उपलब्ध झाली आणि मागल्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी व भाजपाने त्याचा यथेच्छ वापर आपल्या प्रचारकामात करून घेतला. मग त्याचा सरसकट गैरवापर सगळेच करू लागले आणि त्याची महत्ता कमी होत गेलेली आहे. त्याच्याही आधी आपल्या देशात मतचाचण्यांचे शास्त्र विकसित झाले होते. आरंभी ते नवे तंत्र होते आणि हळुहळू रुळत गेले. लोकांचा त्यावर विश्वास बसू लागला तसतसा त्याचाही राजकारणात किंवा बाजार मिळवण्यासाठी सरसकट गैरवापर होतच गेला. आता कुठल्याही मतचाचणीची विश्वासार्हता पुर्वीसारखी उरलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्ष आपले अपेक्षित बळ चाचपून बघण्यासाठीही अशा चाचण्या करून घेऊ लागला आहे आणि काही बाबतीत अन्य पक्षांच्या मतदाराला बिथरून टाकण्यासाठीही त्या तंत्राचा गैरवापर सकसकट होऊ लागला आहे. म्हणून तर अशा मतदानपुर्व चाचण्या किंवा मतदानोत्तर चाचण्यांना ठराविक कालखंडात प्रतिबंध घालण्याचे कठोर पाऊन निवडणूक आयोगाला उचलावे लागलेले आहे. मात्र आपल्याच पाया्वर धोंडा मारून घेण्यासाठी कुठला पक्ष वा नेता अशा तंत्राचा कुठे वापर करताना दिसत नाही. मग ते तंत्र सोशल मीडियाचे असो किंवा मतचाचणीचा विषय असो. त्याला एकच अपवाद आहे तो राहुल गांधींच्या कॉग्रेसचा. त्या पक्षाचे अनेक नेते व पाठीराखे अत्यंत निष्ठापुर्वक आपल्याच पक्षाला तोंडघशी पाडण्य़ासाठी अशा तंत्राचा अतिशय खुबीने वापर करतात, असे अनेकदा दिसून येत असते. अलिकडेच त्यांच्या नॅशनल हेराल्ड दैनिकाने बोफ़ोर्स घोटाळ्याची हेडलाईन देऊन तमाशे झाले होतेच. आता आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. ते आगामी निवडणूकीत कॉग्रेस भूईसपाट होण्याच्या भाकिताचे आहे.
सगळ्यांना जरी लोकसभेचे वेध लागलेले असले, तरी त्यापुर्वी या वर्ष अखेरीस तीन विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या असून, त्यात भाजपाच्या यशापयशावर पुढली लोकसभा अवलंबून आहे. म्हणूनच राहुल गांधी व अन्य कॉग्रेसश्रेष्ठी राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात कंबर कसून कामाला लागलेले आहेत. अशावेळी त्यांचे पाठीराखे व पुरस्कर्त्यांनी आपला पक्ष कसा जिंकणार, त्याचे हवाले द्यायचे असतात आणि कार्यकर्त्यांची हिंमत वाढवायची असते. पण नॅशनल हेराल्ड या दैनिकाने अलिकडेच मध्यप्रदेशातील मतदाराची चाचणी घेऊन, धक्कादायक भाकिते वर्तवली आहेत. चेन्नईच्या स्पिक मीडिया नावाच्या कंपनीकडून या कॉग्रेसी दैनिकाने खास मतचाचणी करून घेतली. अर्थात त्यातून मध्यप्रदेशचा मतदार कसा भाजपा सरकारवर नाराज आहे असा निर्वाळा दिला जावा, ही अपेक्षा असल्यास नवल नाही. किंबहूना त्यातून पंधरा वर्षे चाललेल्या शिवराजसिंग चौहान यांच्या कारभाराला वैतागलेली मध्यप्रदेशची जनता कॉग्रेसकडे आशेने बघते आहे, असाही निष्कर्ष काढला जावा असेही अपेक्षित असल्यास गैर काहीच नाही. अन्यथा आपण पराभूत होणार हे निश्चीत करण्यासाठी कुठला पक्ष चाचणी घेणार नाही आणि घेतली तरी त्याविषयी जाहिर वाच्यता करणार नाही. कदाचित त्याचा उपयोग आपली परिस्थिती सुधारण्यासाठीही केला जाऊ शकतो. पण लढतीपुर्वीच आपल्या पराभवाची हमी देणारे निष्कर्ष, कुठला पक्ष जाहिर करणार नाही. किमान त्याचा डंका तरी पिटणार नाही. हे सामान्य बुद्धीच्या माणसालाही कळते. पण कॉग्रेस व तिथे ठाण मांडून बसलले पुरोगामी शहाणे अपवाद आहेत ना? त्यांना इतकी सामान्य बुद्धी नसून असामान्य बुद्धीने पछाडलेले आहे. तसे नसते तर अशी चाचणी घेतल्यावर या दैनिकाने कितीही आघाड्य़ा करूनही कॉग्रेस पराभूत होईल व भाजपाच निसटत्या संख्येने सतेत येईल, असले निष्कर्ष कशाला प्रकाशित केले असते?
चाचणी घेण्यात काही चुक नाही. तिचा उपयोग आपले उमेदवार ठरवण्यासाठी वा आपली लंगडी बाजू सावरून घेण्यासाठी होतच असतो. त्याखेरीज अशा मतचाचणीतून आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या बलस्थानाचा अंदाज येत असतो आणि त्यावरच हल्ला करण्याची रणनिती आखायला मिळत असते. पण आपलाच पक्ष अडचणीत असल्यास ती चाचणी वा तसा निष्कर्ष, आपणच डंका पिटून प्रसिद्ध करायचा नसतो ना? नॅशनल हेराल्डने प्रसिद्ध केलेल्या चाचणीचा निष्कर्ष असा आहे, की कुठल्याही स्थितीत कॉग्रेस मध्यप्रदेशात स्वबळावर लढण्याच्या अवस्थेत नाही. तसे केल्यास शिवराजसिंग चौहान यांना प्रचंड बहूमत मिळून भाजपा पुन्हा सहज सत्तेत येऊ शकेल. म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवून कॉग्रेसने तुलनेने दुबळ्या असलेल्या मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी आघाडी करणे, जागावाटप करणे आवश्यक आहे. तरच कॉग्रेस पक्षाला भाजपाशी तुक्यबळ झुंज देता येईल. पण झुंज देता आली, म्हणून मध्यप्रदेशची सत्ता मिळण्याचे स्वप्न कॉग्रेस आजही बघू शकत नाही, असा हा निष्कर्ष आहे. त्यानुसार कॉग्रेस एकटीच लढली तर २३० मधून भाजपाला १४७ म्हणजे दोन तृतियांश जागा मिळतील आणि बसपाला सोबत घेऊन मतविभागणी टाळली, तरी भाजपा सहज बहूमताच्या पलिकडे जाऊन सत्ता राखू शकतो. असा या चाचणीचा निष्कर्ष आहे. म्हणजेच मतविभागणी टाळणे वा भाजपा विरोधातल्या एकजुटीचा फ़ुगा कॉग्रेसने फ़ुगवला आहे, त्याला त्यांच्याच चाचणीने टाचणी लावली आहे. त्यामुळे काही बिघडत नाही. पण त्याला आपणच प्रसिद्धी देण्याचा पवित्र हेतू अजिबात लक्षात येत नाही. कारण आपण पराभूत होणार असा डंका पिटून कोणी युद्धात वा खेळाच्या सामन्यातही उतरत नसतो. मग कॉग्रेसचे एकाहून एक महान पुरोगामी दिग्गज शहाणे, असला उद्योग कशासाठी करीत असतात? त्यांना आपल्या पराभवाची इतकी ओढ कशाला लागलेली आहे?
एकटी कॉग्रेस लढली तर ७३ जागा जिंकू शकते आणि बसपाला सोबत घेऊन मतविभागणी टाळली, तरी दोघांची बेरीज १०३ च्या पुढे जात नाही. तो तसा निष्कर्ष येण्यातून भाजपाची लोकप्रियता अजिबात सिद्ध होत नाही, की शिवराजसिंग चौहान यांच्यावर तिथल्या मतदाराचा अभेद्य विश्वास असल्याचेही ते प्रतिक नाही. त्याचा अर्थ इतकाच आहे, की कॉग्रेस तिथे लढण्याच्या स्थितीत नाही. लोकमत नाराज असेल वा चिडलेले असेल, तरी राज्याच्या सत्तेत बदल करून पुन्हा कॉग्रेसला सत्तेत आणण्याची मानसिकता अजून मत्तदारामध्ये रुजलेली नाही. चौहान वा भाजपाला हटवले, तर त्यापेक्षाही भयंकर अशा राजकीय अस्थिरतेला आमंत्रण दिल्यासारखे होईल, अशा भितीपोटीच मतदार पुन्हा भाजपाला निवडायला तयार आहे. पंधरा वर्षाचा चौहान वा भाजपाचा कारभार उत्तम नसेल, पण कॉग्रेस पक्ष त्यापेक्षाही भयंकर उचापती व भ्रष्टाचार करून पुरता सत्यानाश करून टाकेल, अशी भिती यातून समोर येते. म्हणूनच पंधरा वर्षात तिथे भाजपाला कॉग्रेस सोडून अन्य पर्याय उभा राहिला असता, तर चौहान सरकारला ही निवडणूक इतकी सोपी राहिली नसती. दुर्दैवाने भारताल्या करोडो लोकांना, मतदाराला अजून उत्तम सरकार सत्तेत आणुन बसवणे, किंवा तत्वाधिष्ठीत धोरण चालवणारा सत्ताधीश आणून त्याच्या हाती सत्ता सोपवण्याचे भाग्य लाभलेले नाही. त्यामुळेच सरकार चालवू शकेल व किमान गोंधळ घालणारा सत्ताधीश निवडावा लागत असतो. त्यात भाजपा निवडला जातो. पण हे अतिशहाण्य़ांना कोणी सांगायचे? पर्याय भाजपापेक्षाही चांगला हवा आणि तो कॉग्रेस नक्कीच नाही, असा या चाचणीचा अर्थ आहे. ज्यांना आपल्याच पक्षाचे फ़ायदे समजत नाहीत की तोटे लपवताही येत नाहीत, त्यांच्या हाती राज्यकारभार म्हणजे आत्महत्याच नाही काय? असल्या आत्मघाती फ़िदायीनांपेक्षा रोजचा दिवस ढकलू शकणारेही राज्यकर्ते लोकांना सुरक्षित पर्याय वाटतात.
कदाचित मुद्दाम भाजपला बेसावध करण्यासाठी किंवा काँग्रेस मतदाराला चिडून बाहेर काढण्यासाठी हा सर्वे असा प्रकाशित केला असेल,कि आता थोडा फरक राहिलाय,पण काही उपयोग नाही १५ वर्षे राज्यात आनी ४ वर्षे केंद्रात सत्तेमुळे भाजपची मुळे घट्ट झालीत, मध्यप्रदेश जाऊ दे राजस्थान जास्त सत्ताविरोधी हवा आहे तरी वाटत नाही कि काँग्रेस त्याचा लाभ उठवेल .शाह २०१३ मध्ये युपी मध्ये ठाण मांडले होते यावेळी बंगाल मध्ये मुक्काम आहे या ३राज्याची रणनीती वर्षांपूर्वी केली होती कुणाकुणाला पार्टीत आणणे ,संतांना मंत्री करणे आणि खूप काही केल असेल.
ReplyDeleteमला ही वाटतं की हे मुद्दाम पब्लिश केलं आहे, भाजप ला बेसावध ठेवण्यासाठी. मला नाही वाटतं की काँग्रेस वाले इतके बुद्धू असतील...
Deleteनॅशनल हेराल्ड पेक्षा काँगेस ने पाळलेली lytuens मीडिया त्यात चॅनेल ,पेपर ,वेब,twitteretti इमानेइतबारे सेवा करतात ,बिचारे दिनरात काय काय शोधून काढून मोदींना त्रास देतात ,विनोद दुआ सारखे लोक रिटायर असताना ,फूड business सोडून ,कापऱ्या हाताने wire वर हजेरी लावतात कि राहुल PM होउदे
ReplyDeleteयातही ही काँग्रेसने भाजपाला अंधारात ठेवण्यासाठी ही चाल खेळली असेल असे म्हणनारे पुरोगामी महाभाग सापडले की काँग्रेस चे भविष्य अंधारात हातात असल्याची खात्री पटते
ReplyDeleteकालच थरूर यांनी उत्तरपूर्व राज्यातील शिरोभूषणाविषयी अनुदार उद्गार काढले. हा त्यातलाच प्रकार.
ReplyDeleteकाका मला नाही वाटत कि काँग्रेसी असले तरी ते इतके मूर्ख असतील. मला वाटत हा त्यांचा डाव आहे भाजप नेतृत्वाला बेसावध करण्याचा. येडा बनके पेढा खाओ म्हणतात ते हे असं असावं असं मला वाटत.
ReplyDelete