हे लोक ग्रीक समाजात वा अगदी अलिकडल्या काळात सोवियत वा पाश्चात्य समाजातही दिसतील. उदाहरणार्थ युरोपियन युनियन वा राष्ट्रसंघ म्हणून जगावर आपल्या इच्छा लादणारे नोकरशहा म्हणजे ब्युरोक्रासी असते. आपल्या सोयीनुसार हे लोक व्याख्या वा नियम बदलत असतात व लादतही असतात. अशांना शरण जाणार नाहीत, त्यांना शत्रू वा पापी घोषित करण्याचे अमोघ अस्त्र त्यांनी हाती धारण केलेले असते. ते त्यांना जनतेने दिलेले नसते वा कोणी अधिकृत केलेले नसते. तुमच्या मनातील हळवेपणा वा चांगुलपणाचे भांडवल करून अशी मंडळी कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेवर आपली हुकूमत निर्माण करीत असतात. राजे रजवाडे वा सुलतान बादशहांच्या जमान्यातही तुम्हाला त्यांची असली हुकूमत दिसून येईल. जेव्हा प्रस्थापित राजकीय सत्ता त्यांना झुगारून लावते तेव्हा आपले अस्तीत्व, महत्व टिकवायला हेच लोक कुठल्याही नियमाला वाकवून अर्थ व आशय बदलूनही टाकतात. बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आज प्रत्येक क्षणी कॉग्रेसवाले उठसुट बाबासाहेबांची घटना वा विचारांचे हवाले देताना दिसतील. पण बाबासाहेब हयात असताना त्यांना लोकसभेत निवडून येण्यात सर्वाधिक अडथळे त्यांनीच आणलेले आहेत. मुंबई महापालिकेतर्फ़े बाबासाहेबांचा सत्कार करण्यात हेच मांजर आडवे गेलेले आहे आणि त्यांच्याच स्मारकासाठीचे तात्कालीन प्रस्ताव मुंबई महापालिकेत फ़ेटाळण्याचे पाप कॉग्रेसनेच केलेले आहे. मात्र आज सत्तेसाठी व आपली थोरवी टिकवण्यासाठी तेच कॉग्रेस विचारवंत वा भाट अगत्याने उठसुट बाबसाहेबांच्या वक्तव्ये व विचारांचे हवाले देताना दिसतील. त्यालाच शाहू महाराज ‘ब्राह्मण ब्युरोक्रासी’ म्हणतात. आजच्या जमान्यात तीच सिव्हील सोसायटी असते. जोपर्यंत अशी ब्युरोक्रासी पाठीशी असते, तोवर जनमानसावर हुकूमत राखायला सत्तेला मदत होत असते आणि त्याच ब्युरोक्रासीला संपवल्याशिवाय खरेखुरे परिवर्तन होऊ शकत नसते.
महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली किंवा बंगालमध्ये त्या काळात सिराज उद दौलाची सत्ता निकालात निघाली, तेव्हाही असा वर्ग सर्वात प्रथम नव्या सत्तेला शरणागत झालेला आढळून येईल. मात्र जोवर त्यांना जुनी सत्ता टिकण्याची आशा असते, तोपर्यंत हे त्या कालबाह्य सत्तेला टिकवण्य़साठी आपली बुद्धी पणाला लावत असतात. आता मोदी विरोधात उठणारी वादळे, पुरस्कार वापसी इत्यादी घटना त्याचीच उदाहरणे आहेत. नुसते पुरोगामी पक्ष वा त्यांची विचारसरणी कालबाह्य झालेली नाही, तर सामान्य जनमानसावर असलेली त्यांची हुकूमतही संपुष्टात आलेली आहे. लोक मागल्या मतदानात मोदींच्या मागे गेले, ते नुसती आश्वासने आवडली म्हणून नाही. तर लोकांना कॉग्रेस व तिला मान्यता देणार्या या ब्युरोक्रासीला संपवायचे होते. ते काम अल्पावधीत शक्य नाही. काही प्रमाणात मोदींनी त्याला हात घातलेला आहे. पण पुन्हा मोदी निवडून आले, तर मात्र ही ब्युरोक्रासी संपणार आहे. यापैकी अनेकजण नव्या व्यवस्थेत आपले स्थान पक्के करण्यासाठी वेगवेगळी कारणे व मिमांसा शोधू लागतील. आजही त्यातले बहुतेक कॉग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी झगडत आहेत. त्याचे कारण पुरोगामी विचारसरणी असे काहीही नसून, त्यांना आपले प्रस्थापित स्थान टिकवून ठेवायचे आहे. पण त्याचा उपयोग होणार नाही. २०१९ सालात पुन्हा मोदी सत्ता संपादन करतील, त्यानंतर हळुहळू या प्रस्थापिताला शेवटचे हादरे बसू लागतील. ती नामशेष होत जाईल आणि त्यातले अनेकजण मोदी अर्थशास्त्र, मोदी राज्यशास्त्र वा मोदी विचारधारा यांची नव्याने मांडणी सुरू करतील. सहाजिकच ती नव्या युगाची नवी ब्युरोक्रासी असेल. कुठलीही जुनी व्यवस्था मोडकळीस येऊन संपते, तेव्हा त्याच्याजागी येणारी नवी व्यवस्था प्रस्थापित होत असताना, नवे दुर्गुण घेऊनच येत असते आणि आपोआप प्रतिगामीच होत असते. आज ज्याला पुरोगामी म्हणतात तेच मुळात प्रतिगामी झालेले आहे.
कुठल्याही व्यवस्थेत तिची प्रबळ बाजू निरूपयोगी ठरू लागली, मग ती बोजा होत असते. त्याचा आधार घेऊन ती व्यवस्था टिकू शकत नसते, तर त्याच बोजामुळे ती व्यवस्था दबून चिरडून जाण्याची स्थिती निर्माण होत असते. आज नेहरूंचे नाव पुसले जाते आहे आणि त्यांच्या कर्तबगारीच्या खाणाखुणा नष्ट केल्या जात आहेत, असा ओरडा सातत्याने ऐकू येत असतो. त्या खाणाखुणा मुळातच कशाला हव्यात, याचा खुलासा कोणी देऊ शकत नाही. कधीकाळी राजेशाही थाट असलेले राजवाडे वा किल्लेही आज अवशेष होऊन राहिले आहेत. त्यांची तशी दुर्दशा कोणी केली? जुन्या पराक्रमाच्या खुणा खरेच इतक्या महत्वाच्या असतील, तर नेहरूपर्वाच्या आधीच्याही इतिहासाची तितकीच जपणूक व्हायला नको काय? पण तशी ओरड करणारी त्या त्या काळातील ब्युरोक्रासी आज शिल्लक नाही. जी ब्युरोक्रासी कशीबशी टिकून आहे, तिला नेहरू युगापेक्षाही आपल्या अस्तित्वाच्या चिंतेने भेडसावून टाकलेले आहे. मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे, असे तेव्हा़च कॉग्रेसनेते जयराम रमेश यांनी म्हटलेले होते आणि पाच वर्षापुर्वी मी तशी स्पष्ट कल्पना माझ्या पुस्तकातून मांडलेली होती. मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणातील पदार्पण किंवा मिळणारे यश, हे नुसते सत्तांतर नसेल, ती नेहरू युगाच्या शेवटाची सुरूवात असेल, असेही मी तेव्हा़च नमूद करून ठेवलेले होते. पण ज्याला नेहरूवादी ब्युरोक्रासी असे मी म्हणतो, त्यांना आपल्या मस्तीतून जाग यायलाही चार वर्षे खर्ची पडलेली आहेत. मोदींना मिळालेले बहूमत हा त्यांना अपवाद, किवा इतिहासातील गफ़लत वाटलेली होती. त्यांच्याच आहारी गेलेल्या कॉग्रेस वा अन्य पुरोगाम्यांनाही म्हणूनच समोरून अंगावर येणारे संकट बघता आले नाही, की समजून घेता आलेले नव्हते. आज दिसत आहेत, ते त्याचे परिणाम आहेत.
इब्न खालदून इतक्यासाठीच महत्वाचा आहे. तो म्हणतो, मनगटी बळावर कर्तॄत्वावर साम्राज्य उभे करणार्यांनी एकदा प्रस्थापित होण्याचा पवित्रा घेतला, मग क्रमाक्रमाने त्यांच्यातली लढायची वृत्ती संपत जाते आणि ऐषाराम व मुजोरी त्यांना घेरू लागते. त्यातून येणारे शैथिल्य त्यांना आळशी बनवत जाते आणि इतरांच्या पराक्रमावर आपली सत्ता व हुकूमत टिकवण्यासाठी त्यांना अगतिक व्हावे लागते. तशा इतरांनी साथ दिली नाही वा पाठ दाखवली, मग त्यांचा क्षय अटळ असतो. कॉग्रेस त्याच दिशेने अनेक वर्षे वाटचाल करीत होती आणि ही ब्युरोक्रासी नेहरूंच्या वारसाला गादीवर बसवून पुन्हा साम्राज्याला सुवर्णकाळ येईल, म्हणून आशाळभूतपणे आजही अपेक्षा करीत आहेत. ही सिव्हील सोसायटी वा इंटेलेक्चुअल्स वा शाहू महाराज म्हणतात, ती ‘ब्राह्मण ब्युरोक्रासी’ नेमकी नजरेसमोर आणायची असेल, तर सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ चित्रपटाचे कथानक आठवावे. तिकडे कंपनी सरकारची तैनाती कवायती फ़ौज अवध संस्थान ताब्यात घेण्यासाठी चाल करून येत असते आणि त्याच नबाबाचे खंदे सरदार सक्तीच्या लढाईला चुकवून दुर कुठल्या खेड्यात बुद्धीबळाचा फ़ड रंगवायला पळून गेलेले असतात. ते राज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यापासून पळ काढत असतात आणि त्याचवेळी घरातल्या कुठल्याशा कुरबुरीचा संशय व भांडणातून एक्मेकांवर तलवारी उपसून अंगावरही जात असतात. बंगलोर येथील कुमारस्वामींच्या शपथविधीला हात उंचावून अभिवादन करणारे तमाम पुरोगामी सरदार सुभेदार त्यापेक्षा किंचीत वेगळे आहेत काय? त्यांच्या विजयाच्या वल्गना करीत मोदी-शहांच्या कवायती सैन्याला शाब्दीक आव्हाने देणारे बुद्धीजिवी पुरोगामी म्हणूनच अधिक केविलवाणे होऊन गेलेले आहेत. कारण त्यांना आपला अपरिहार्य अंत त्यांना दिसू लागला आहे आणि काहीही करू शकत नसल्याचे वैफ़ल्य अधिक सतावू लागलेले आहे.
‘आम्ही शहरी नक्षलवादी’ असले फ़लक गळ्यात अडकवून बसलेले गिरीश कर्नाड वा अन्य कोणी तत्सम तमाशे करतात, तेव्हा म्हणूनच दया येते. त्यांनी भले कितीही बंडखोरीचा आव आणावा. पण त्यापैकी कोणीही बंडखोर वा परिवर्तनवादी नसून ते जैसेथेवादी आहेत. ते असलेली कालबाह्य व्यवस्था टिकवण्यासाठी आटापिटा करणारे प्रस्थापित आहेत. बंड हे कधीही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात होत असते. अमेरिकेत हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या, त्याचे हेच कारण होते. त्यांनी भले बंडखोरीचा आव आणलेला होता. पण तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या त्या प्रतिनिधी होत्या. गेल्या कित्येक दशकात अमेरिकेत दुर्लक्षित राहिलेला जो वर्ग आहे, त्याला असल्या ढोंगाचा कंटाळा आलेला होता. इथेही लक्षात येईल, की राहुल गांधी हे बंडखोर नाहीत. मोदी हा दिल्लीच्या प्रस्थापित वर्तुळाच्या बाहेरचा चेहरा आहे. प्रस्थापित म्हणजे सरकार नसते, तर त्या सत्तेला बळ देणारा वा आपल्या इच्छेनुसार वाकवणारा जो वर्ग असतो, त्याला प्रस्थापित म्हणतात. जे कोणी आज गळचेपी वा मुस्कटदाबीचा आरोप सातत्याने करीत असतात, ते सत्तर वर्षातल्या लोकशाहीचे सर्वात मोठे मुजोर लाभार्थी आहेत. सोशल मीडियापासून वाहिन्यांवर बोलणार्यांपर्यंत, जे अच्छेदिन कुठे आहेत असा सवाल करतात, त्यांच्यासाठी बुरे दिन कधी व कुठले होते? हे चर्चा बघणार्या वा ऐकणार्याला तात्काळ कळते. बॅन्केच्या रांगेत नोटाबंदीच्या काळात गेलेले राहुल गांधी पुर्वी कधी बॅन्केत गेले तरी होते काय? मग अकस्मात त्या रांगेत उभे राहिलेले राहुल सामान्य माणसाला ढोंगी वाटणे स्वाभाविक असते. इतरही असले काहीतरी बोलणारे हे सर्वच्या सर्व लाभार्थी असतात. त्यांच्या अशा ढोंगाविषयीच्या तिटकारा व तिरस्कारातूनच मोदी या यशापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याना कालबाह्य खेळी व डावपेच खेळून पराभूत करता येणार नाही आणि बाजारबुणग्यांच्या आवाक्यातली ती गोष्ट नाही.
आजवर सत्ता भोगलेल्या अनेक पक्षातील एकएक नेता व तसा लाभार्थी, गुपचुप आपले संस्थान व प्रभावक्षेत्र टिकवण्यासाठी उठून भाजपात दखल झाला आहे. पुर्वीच्याही काळात हेच होत राहिले. आपल्या क्षेत्रात आपलीच सत्ता कायम राखण्यासाठी तेव्हाचे पाटील, देशमुख वा महसुलदार वर्ग क्रमाक्रमाने मुघल वा विविध सत्तांना सहभागी होत गेला. पेशवाईला बाजारबुणग्यांनी बुडवले आणि पुरोगामी कंपूलाही तशाच बाजारबुणग्यांच्या खोगीरभरतीने रसातळला नेलेले आहे. आपल्यासाठी कोणीतरी लढावे व आपल्याला सत्तेची गोमटी फ़ळे चाखता यावीत, अशी अपेक्षा बाळगणारे आशाळभूत कुठले साम्राज्य वाचवू शकत नाहीत, की टिकवू शकत नाहीत. ते बोलघेवडे असतात आणि शब्दांचे सामर्थ्य जनमानसावर टिकण्यापर्यंतच त्यांची सद्दी असते. त्यांनी कुणा लेच्यापेच्याला सेनापती बनवले वा त्याचे कितीही पोवाडे गायले, म्हणून पुरूषार्थ उदभवत नसतो. त्यांना हवे असलेले साम्राज्य रसातळाला जाण्यापासून वाचवू शकत नसतो. प्लासीची लढाई म्हणूनच एक उदबोधक उदाहरण आहे. पुरोगाम्यांची स्थिती आज बाजारबुणग्यांची खोगीरभरती अशी झालेली आहे. त्यांच्यापाशी बौद्धीक वा नैतिक सामर्थ्य शिल्लक राहिलेले नाही, की मनगटी सामर्थ्य त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. कारण त्यांच्या शब्दात वा बुद्धीतही ती प्रेरणा शिल्लक उरलेली नाही. त्यातला पोकळपणा चव्हाट्यावर आलेला आहे. जादू संपलेल्या तंत्रानेच त्यांना काहीतरी चमत्कार घडण्याची खुळी आशा खुणावत असते. ती फ़लद्रुप होण्याची बिलकुल शक्यता नाही. बाजारबुणगे लढाया मारू शकले असते, तर ब्रिटीशांची सत्ता इथे शिरकाव करून घेऊ शकली नसती, की भारताचा इतिहास आज दिसतो तसा घडला नसता. एक मात्र मान्य करायला हवे, की बाजारबुणग्यांचा आवाज व गर्जना मोठ्या असतात. पण त्या निष्फ़ळच ठरणार्या असतात.
कुठलीही कालबाह्य सडलेली व्यवस्था संपुष्टात येण्याला पर्याय नसतो. जोवर असा पर्याय उभा रहात नाही, तोवर कितीही नासलेली व्यवस्थाही चालत रहाते. म्हणून तीच व्यवस्था योग्य वा सुसंगत मानण्यात अर्थ नसतो. जेव्हा असा पर्याय उभा रहातो, तेव्हा बघता बघता जुनी व्यवस्था ढासळून पडू लागते. सोवियत युनियन हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ती कोसळल्याने रशिया संपला नाही, की तो देश रसातळाला गेला नाही. त्याला तिथेच पर्याय निर्माण झाला. कॉग्रेस वा पुरोगामी भूमिका हाही कालबाह्य झालेला विषय आहे आणि ती निरूपयोगी झालेली मूल्यव्यवस्था आहे. ती व्यवहारात १९९१ सालातच मुक्त अर्थकारणाने निकालात काढलेली होती. पण तितक्या वेगाने नवा बदल पुढे रेटणारा राजकीय व नेतृत्वाचा पर्याय समोर आला नाही. म्हणून २०१४ साल उजाडावे लागले. त्यामुळे भारतात राजकीय सत्तांतर झाले, तरी व्यवस्थेतले स्थित्यंतर मात्र रेंगाळत पडून राहिले होते. मोदींच्या रुपाने तसा राजकीय पर्याय उभा राहिला आणि शासकीय पातळीवर त्या बदलाला गती आली. तर अमित शहांच्या रुपाने संघटनात्मक नेतृत्व उभे करू शकणारा पर्याय समोर आल्यावर उरलीसुरली कॉग्रेस व पुरोगामी व्यवस्थेला सुरूंग लागलेला आहे. त्यावर शेवटचा घाव आगामी लोकसभेत घातला जाईल आणि देशातले स्थित्यंतर वेगाने पुढे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. त्याची गती आता बाजारबुणगे झालेले पुरोगामी नेते व पक्ष रोखू शकणार नाहीत. जितके ते एकत्र येऊन मोदींना रोखू बघतील, तितके अधिक पाठबळ मिळून मोदींच्या पारड्यात मतदार अधिक मतांची भर घालत जातील. सिराज उद दौला ज्या कारणास्तव प्लासीची लढाई जिंकू शकला नाही, त्याच कारणास्तव पुरोगामी आघाडी वा त्यातले बाजारबुणगे पुरोगामी पक्ष मोदींना रोखू शकत नाहीत. इतिहासाची अशी पुनरावृत्ती होत असते. ती ओळखता व समजून घेता आलॊ पाहिजे इतकेच.
(चपराक दिवाळी २०१८ अंकातून)
नं १ भाउ
ReplyDeleteGreat analysis Bhau!
ReplyDeleteअप्रतिम भाऊ
ReplyDeleteभाऊ खरच चपराक,संपुर्ण विश्लेषण केले.. वाचण्यात इतका मग्न झालो की संपलेलं कळलंच नाही ..मला वाटते आतपर्यंत वाचलेल्या ऊत्तम लेखांपैकी ह्या लेखाचा क्रमांक कुठतरी वरचा लागतो..👌👌👌👍😊
ReplyDeleteसहमत आहे
ReplyDeleteभाऊ
ReplyDeleteमी ऐकलं आहे कि भगवान शंकरांना तिसरा डोळा असतो जो उघडला कि दुष्ट प्रवृत्तीचा भस्म होऊन संहार होतो
शंकरांनी बहुतेक तुम्हांला ही तिसरा डोळा दिला असावा
ज्या गोष्टी कडे बघता त्यातील दृष्ट प्रवृत्ती, जमाते पुरोगामी व खांग्रेसी सैतान नागवे होऊन जनतेपुढे येतात
टिप:- मी आपणालाही "अवतार" म्हणतो
ही माझी वैयक्तिक आपल्या वरील भक्ती असु शकते
उगाचच मोदीं प्रमाणे "खांग्रेसीचमचे" तुमच्यावरही नसलेले आसुढ ओढायला नकोत
Apratim. Ani achuk vishleshan.
ReplyDeleteGood analysis people should understand fact
ReplyDeleteगूड एनालीसिस
ReplyDeleteअवाक करणारा लेख... 👏👏👌
ReplyDeleteभाऊ २०१४ नंतर पासुन तुमच्या ब्लॉग वर भारतीय राजकारणाचं जे विश्लेषणात्मक लेख प्रसिध्द केलेत त्या सर्व लेखांचं हे नेमक्या भाषेत केलेला अर्कच म्हणावं लागेल.....संग्रही ठेवण्यासारखा...आपला आभारी आहे..येणार्या निकालाची तुमची भाकितं खरी ठरोत ही सदिच्छा....
ReplyDeleteखूप अप्रतिम भाऊ, मी स्वतला नशीबवान समजतो अशे लेख वाचले की
ReplyDeleteएकेकाळी ब्युरोक्रासी मध्ये ब्राह्मण लोकांचे प्राबल्य होते म्हणून त्या काळात ( शाहू महाराजांच्या ) ब्राह्मण ब्युरोक्रासी म्हट्ले असावे. सध्या आरक्षण व अन्य कारणाने ब्राह्मण लोक नगण्य प्रमाणात या क्षेत्रात येताना दिसतात. म्हणूनच ब्राह्मण न म्हणता केवळ ब्युरोक्रासी म्हणणे संयुक्तिक ठरेल.
ReplyDeleteLOL
Deleteखूप काही शिकायला भेटतय भाऊ तुमच्या लेखांतून, धन्यवाद! ☺️
ReplyDelete