Tuesday, October 30, 2018

दलित पॅन्थर आणि कम्युनिस्ट

namdeo dhasal raja dhale के लिए इमेज परिणाम

१९७४ चा काळ असावा. तेव्हा दलित पॅन्थर फ़ॉर्मात आलेली संघटना होती. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर एकूणच आंबेडकरी चळवळीला ग्रहण लागलेले होते. त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या कल्पनेतला रिपब्लिकन पक्ष स्थापन होऊ शकला नव्हता आणि त्यांच्या राजकीय वारस व निकटच्या अनुयायांनी आपापल्या राजकीय स्वार्थासाठी त्या कल्पनेतला पक्ष निर्माणही होऊ दिला नाही. कारण त्यांना बाबासाहेबांचा वारसा हवा असला, तरी त्यातले कष्ट नको होते. त्यामुळेच पुढे रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला, तेव्हा कॉग्रेसला देशव्यापी पर्याय बनवण्याची मूळ संकल्पनाच अस्त्ताला गेलेली होती. मग जी काही आंबेडकरी चळवळ होती, तिला प्राथमिक स्वरूपात पक्षात रुपांतरीत करण्यात आले. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून विविध विरोधी पक्ष कॉग्रेस विरोधात एकवटलेले होते आणि त्यातला प्रभावी गट शेड्युल कास्ट फ़ेडरेशन हा होता. त्यालाही त्या समितीच्या राजकारणाचा लाभ मिळाला आणि अर्धा डझनपेक्षा अधिक खासदार लोकसभेत पोहोचले होते. मात्र पुढे त्याचाच रिपब्लिकन पक्ष झाला आणि त्यात नेतॄत्वाची सुंदोपसुंदी सुरू झाली. घाटी कोकणीपासून विविध गटबाजी डोके वर काढत गेली आणि संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्याने विविध घटक पक्षांतही भांडणे लागलेली होती. त्याचा सगळ्यात मोठा फ़टका आंबेडकरी चळवळीला बसला. कारण राज्यात सत्ता कॉग्रेसच्या हाती गेलेली होती आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आपल्या पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवायची होती. त्यांनी विरोधातले उमदे तरूण नेते कॉग्रेसमध्ये खेचण्याचे डावपेच खेळले आणि एकामागून एक रिपब्लिकन नेते त्या आमिषाला बळी पडत गेलेले होते. त्यातून जे नैराश्य आंबेडकरी चळवळीला येत गेले, त्याचा उडालेला भडका म्हणजे दलित पॅन्थर होती. पण त्यात एकही प्रस्थापित रिपब्लिकन नेता नव्हता, की राजकीय संघटना चालविण्याचा अनुभव कोणाच्या गाठीशी नव्हता.

त्याच काळात एकूणच राजकीय जीवनात मोठी उलथापालथ चालू होती. संयुक्त महाराष्ट्र समिती विस्कळीत झाली तरी त्या हेतूने मराठी अस्मितेसाठी एकवटलेला मराठी तरूण कुठल्या पक्षाला बांधील नव्हता. त्याने एकत्र आलेल्या विविध पक्षांच्या समितीसाठी आंदोलनात आपल्याला झोकून दिलेले असले, तरी त्यापैकी कुठल्याही पक्षाशी त्या मराठी तरूणाची वैचारिक बांधिलकी नव्हती. परिणामी समिती फ़ुटल्याने तो तरूण विचलीत झालेला होता. आमदार व नगरसेवक आपापल्या विचारांची बांधिलकी स्विकारून समितीला ठोकर मारून मोकळे झालेले असताना, तोच तरूण मराठी अस्मितेचा झेंडा व नेता शोधत होता. ती गरज ओळखलेले बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’ या आपल्या साप्ताहिकातून पुढे सरसावले आणि त्यांनी त्या तरूणाईला आवाज दिला. त्यातूनच पुढे शिवसेना उदयास आली. ती नुसती एक राजकीय सामाजिक संघटना नव्हती. तर समितीमुळे वैफ़ल्यग्रस्त झालेल्या मराठी माणसाचा तो हुंकार होता. त्याने मुंबईसारख्या महानगरात व देशाच्या आर्थिक राजधानीत मोठी राजकीय उलथापालथ घडवली होती. तोपर्यंत मुंबईत कॉग्रेस विरुद्ध समाजवादी, कम्युनिस्ट वा रिपब्लिकन असे जे राजकारण विभागलेले होते, त्याला शिवसेनेने फ़ाटा दिला. काही वर्षातच मुंबई व आसपासच्या परिसरात कॉग्रेस विरोधातील लोक व मते शिवसेनेच्या बाजूला झुकत गेली. मात्र सेनेच्या रुपाने मराठी अस्मितेला जोपासू बघणारा मतदार व जनता, शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देताना दिसत नव्हती. शिवसेना राजकीय आखाड्यात उतरली तरी तिच्या राजकारणाला मतदाराची मान्यता मिळत नव्हती. हे घडले त्यानंतर अल्पावधीतच दलित पॅन्थरचा अवतार झालेला आहे. म्हणूनच या दोन चळवळींना त्या काळातल्या खर्‍याखुर्‍या मुंबईतल्या युवक संघटना म्हणता येतील. त्या राजकीय वैफ़ल्यातून उदयास आलेल्या होत्या.

डाव्या पक्षांनी मतदाराला निराश केल्याची प्रतिक्रीया शिवसेनेच्या रुपाने प्रकटली होती. त्यात सगळ्या समाज घटकातला मराठी तरूण होता. पण याच दरम्यान काही खेड्यापाड्यात दलित अत्याचाराच्या घटना घडल्या आणि त्याविषयी रिपब्लिकन वा कॉग्रेसमध्ये जाऊन बसलेले पुर्वाश्रमीचे आंबेडकरी नेते मूग गिळून गप्प बसल्याची संतप्त प्रतिक्रीया त्याही समाजात उमटू लागली. त्यातले काही तरूण एव्हाना लेखक कवी म्हणून समोर येत होते आणि अशाच तरूणांनी पुढाकार घेउन आंबेडकरी समाजाला आवाहन करण्याचा चंग बांधला. त्याचेच रुपांतर दलित पॅन्थरमध्ये झाले. त्यात पाचसहा वर्षे गेली. पण पार्श्वभूमी नैराश्याची व वैफ़ल्याचीच होती. त्यातली मोठी घटना गवईबंधूंचे डोळे काढणे व पुण्यानजिक बावडा गावात कॉग्रेसमंत्र्याच्याच भावाने संपुर्ण दलित वस्तीला बहिष्कारात ढकलण्या़चे होते. मुंबईतल्या दलितवस्त्या आतल्या आत धुमसत होत्या. पण त्यांचा आवाज व्हायला कोणी रिपब्लिकन नेता राजी नव्हता. सहाजिकच जो आवाज उठविल, त्याच्या मागे हा दलित तरूण एकत्र येत गेला. ज्यांनी आवाज उठवला ते नेते झाले. किंबहूना त्या धुमसणार्‍या तरुणानेच त्यांना नेता बनवून टाकले. वस्त्यांमध्ये पॅन्थरच्या शाखा होऊ लागल्या, तसतसा दबदबा वाढत गेला आणि बावड्याला जाऊन अशा तरूणांनी धिंगाणा घातला. तेव्हा पॅन्थर या नावाचा धाक निर्माण झाला. राजकीय नेत्यांना व सत्तेसह प्रशासनाला या नव्या आंबेडकरी चळवळीची दखल घेण्यावाचून पर्याय राहिला नाही. मात्र जो अभिशाप रिपब्लिकन पक्षाला लागला होता, त्यातून पॅन्थरची सुटका होऊ शकली नाही. नेत्यांच्या अहंकाराने याही कोवळ्या संघटनेला बाधा केली आणि दोनचार वर्षातच पॅन्थरची शकले उडाली. मात्र तो तो योगायोग नव्हता. त्यामागे राजकीय कारस्थान होते आणि त्या बरहुकूमच पॅन्थरचे तुकडे पाडले गेले होते.

नामदेव ढसाळ आणि ज, वि. पवार हे तसे मुळचे पॅन्थर संस्थापक. त्यांच्या पुढाकाराने ही संघटना जन्माला आलेली होती. नंतर साधना साप्ताहिकाचा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सवी अंक निघाला. त्यातल्या राजा ढालेच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या वादग्रस्त लेखाने त्याचा गाजावाजा झाला. त्याच्यावर खटला भरला जाण्याची भाषा झाली, तेव्हा रिपब्लिकन नेते गप्प बसले आणि पॅन्थर एकमुखाने राजा ढालेच्या समर्थनाला पुढे आली. हे त्या चळवळीचे महत्वाचे वळण होते. कारण राजा पॅन्थरचा संस्थापक नव्हता की त्यामध्ये आरंभापासून सहभागी नव्हता. साधनेच्या निमीत्ताने तो पॅन्थरच्या जवळ आला आणि एकट्या नामदेवच्या खांद्यावरचा भार कमी झाला. राजा ढाले हा मुळातच सुबुद्ध आणि विचारवंत अभ्यासक. त्यामुळे पॅन्थरच्या प्रचाराला व भूमिकेला धार येत गेली. पण त्यातूनच नेतेपद पचवण्यातली बाधाही पुढे आली. त्या काळात लोकप्रिय इंदिराजी विरोधात राजकारण पेटलेले होते आणि विरोधकांनी त्यात पॅन्थरलाही ओढले. प्रामुख्याने कम्युनिस्ट नेत्यांनी नामदेवला हाताशी धरलेले होते आणि लालभाईंशी जवळीक नको, असा राजाचा आग्रह होता. बाबासाहेब कम्युनिस्ट विचारसरणीचे कट्टर विरोधक असल्याचा राजाचा दावा होता आणि नामदेवला समजूतदारपणाने काम करता आले नाही. त्यातून त्या दोघातली दरी रुंदावत गेली. कॉग्रेस व कम्युनिस्टांनी त्याला खतपाणी घालायचे काम केले. दोन वर्षापुर्वी नेता झालेले हे दोन तरूण आपली जबाबदारी विसरून एकमेकांवर हेत्वारोप करत इतके पुढे गेले, की तिथून माघार शक्य नव्हती. एका कामगार मोर्चात नामदेवने आपण हाडाचे कम्युनिस्ट आहोत असे विधान केले आणि राजा ढालेंनी त्याचे भांडवल केले. पण दोघांनाही आपला नवखा तरूण अनुयायी त्यातून विचलीत होतो आहे, याचेही भान राखता आले नव्हते. परिणामी दोन वर्षातच पॅन्थरची शकले झाली. नामदेव एका बाजूला आणि राजासह अन्य नेते दुसर्‍या बाजूला, अशी विभागणी होऊन गेली.

त्यातून हाती काय लागले, हे इतिहासच सांगतो. पण चळवळ मोडीत निघाल्यासारखी बारगळत गेली. त्या तपशीलात जाण्याची आज गरज नाही. मुद्दा इतकाच आहे, की दलित चळवळीला तेव्हा कम्युनिस्ट विचारसरणीचे वावडे होते. किंबहूना त्यामुळेच नव्या उमेदीने उभी राहिलेली एक रसरसती आंबेडकरी संघटना, बघताबघता मोडून गेली. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे जसे गल्लीबोळात नेते पदाधिकारी होते, तसेच पॅन्थरचे पदाधिकारी प्रत्येक भागात होते, शाखाही होत्या. पण त्या दुभंगल्या होत्या व त्यातला आशय संपलेला होता. जणू त्या चळवळीला विचारधारेला फ़ुटलेला नवा धुमारा पुन्हा सुप्तावस्थेत गेला. बाबासाहेबांच्या हयातीतली एक तरूण पिढी रिपब्लिकन पक्ष उभारणीच्या भांडणात गारद झालेली होती. पॅन्थरच्या सुंदोपसुंदीत त्यातली दुसरी पिढी सुप्तावस्थेत गेली. पण त्याचे कारण आपण कम्युनिस्ट चळवळीशी जवऴ़चे आहोत किंवा नाही, यातला गोंधळ होता. आज जेव्हा प्रकाश आंबेडकर माओवादी वा नक्षली समर्थन करायला पुढे येतात, तेव्हा त्याच कालखंडातील घडामोडींची आठवण येते. आपला अनुयायी वा पाठीराखा कार्यकर्ता असल्या वैचारीक मतभेद व मिमांसेसाठी परिपक्व नसेल, तर नेत्यांच्या नुसत्या बडबडीने चळवळीचे किती मोठे नुकसान होऊन जाते, त्याचा तो इतिहास आहे. पॅन्थर व रिपब्लिकन पक्ष स्थापना व फ़ाटाफ़ुटीचा तो इतिहास घडत होता, तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा राजकीय क्षितीजावर उदय झालेला नव्हता. तेव्हाची पॅन्थर टिकली असती वा रिपब्लिकन नेत्यांमध्ये भाऊबंदकी माजली नसती, तर तीच आंबेडकरी चळवळ आज कुठल्या कुठे सर्वसमावेशक पक्ष म्हणून किती मोठा पल्ला गाठून गेली असती? त्याचा नुसता अंदाज करता येऊ शकेल. जे कांशीराम वा मायावतींनी उत्तरप्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यात करून दाखवले, ते महाराष्ट्रात घडणे अशक्य होते काय? आजच्या आंबेडकरी तरूणांनी ह्याचा अगत्याने विचार केला पाहिजे.   (अपुर्ण)

दिवाळी अंक‘ पारंबी’ २०१८ मधून



No comments:

Post a Comment