Monday, December 17, 2018

कुमारशास्त्रींले दत्तक‘विधान’



कॉग्रेस पक्षात अतिबुद्धीमान लोकांची वानवा नाही. पण त्यापैकी डोके ठिकाणावर ठेवून बोलणारे खुप मोजकेच नेते आहेत आणि त्यात जयराम रमेश यांचा समावेश होतो. पाच वर्षापुर्वी त्यांनी एक महत्वाचे विधान केले होते. नरेंद्र मोदी हे नुकतेच राष्ट्रीय राजकारणात उतरले होते आणि आजच्या इतकेच देशातले निर्बुद्ध जाणकार त्यांच्याविषयी तुच्छतेने बोलत होते. अशावेळी येऊ घातलेले गंभीर संकट ओळखणारा एक नेता कॉग्रेसमध्ये होता आणि तेच जयराम रमेश. त्यांनी तेव्हाच मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस पक्षासमोरचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे विधान केलेले होते. पण त्यातले गांभिर्य समजून घेण्यापेक्षा पक्षातच त्यांची हेटाळणी झाली. त्यानंतर रमेश गप्प झाले. मात्र अधूनमधून त्यांचा आवाज कुठेतरी ऐकू येत असतो आणि त्यात इशारे असतात. वर्षभरापुर्वी त्यांनी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होत असताना एक सुचक विधान केलेले होते. ‘सल्तनत संपली, पण खालसा झालेले शहाजादे अजूनही शाही इतमामात वावरत आहेत. खरे तर कॉग्रेस पक्षासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे’, असेही रमेश म्हणाले होते. पण लक्षात कोण घेतो? सत्य बोलून नुकसान करून घेण्यापेक्षा चिदंबरम इत्यादी राहुलच्या खुळेपणाला टाळ्या पिटण्यात धन्यता मानत आहेत. रमेश तर कुठेच दिसेनासे झाले आहेत. अशा कालखंडात कोणी तरी कॉग्रेस वा नेहरू गांधी खानदानाच्या पिढीजात साम्राज्याचा वारसा कायम रहावा, म्हणून पुढाकार घेतला पाहिजे ना? घराण्याचा वारसपुत्र त्यात नाकर्ता ठरत असेल तर दत्तकपुत्र घेऊन घराणे पुढे चालवले पाहिजे. तीच जबाबदारी बहुधा आता बुद्धीमान संपादक व विद्यमान राज्यसभा खासदार कुमार केतकरांनी उचललेली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवून त्यांच्या मोदीविषयक ताज्या विधानांकडे बघितले, तर ती विधाने राजकीय असण्यापेक्षा ‘दत्तकविधाने’ अधिक वाटतात.

आपली पत्रकारिता व बौद्धीक प्रांतातील मुलूखगिरी सुरू केल्यापासून कुमार केतकर नेहरूवादी राहिलेले आहेत. ते त्यांनी कधी लपवले नाही, की मान्य करायला नकार दिलेला नाही. पण इतर नेहरूवादी व केतकर यात एक मोठा फ़रक आहे. केतकर हे नेहरू वा त्यांच्या कुणा वारसापेक्षाही कट्टर नेहरूवादी आहेत. कदाचित एकवेळ त्या खानदानाचे कोणी वा नेहरूच दस्तुरखुद्द आपली चुक कबूल करतील. पण केतकर ती चुक मानणार नाहीत. उलट ते नेहरू वा सोनिया-राहुलना दम देऊन नेहरूच कसे बरोबर, त्याचा युक्तीवाद सुरू करू शकतात. सहाजिकच त्यांनी नुकताच नरेंद्र मोदींचा जो उद्धार केला, त्यामागची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्यासाठी कुमार केतकरांच्या मनाच्या अंतरंगात फ़ेरफ़टका मारला पाहिजे. देश-समाज वा अन्य काही बुडाले रसातळाला गेले तरी बेहतर. पण भारतातली नेहरूवादी विचारसरणी आणि त्यानुसार चालणारी सत्ता कायम राहिली पाहिजे, यासाठी केतकर झपाटलेले असतात. सहाजिकच ते काम व्यवहारात कुणा नेहरू वारसाने चालवावे किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या कुणा प्रतिनिधीने करावे, ही केतकरांची वास्तविक अपेक्षा आहे. म्हणून तर दोन दशकापुर्वी सोनिया राजकारणात आल्या, तेव्हा अग्रलेखाच्या गुढ्या उभारून केतकारांनी त्यांचे स्वागत केलेले होते. दहा वर्षे सोनियांच्या तालावर नाचणारा व कुठल्याही घोटाळ्याकडे काणाडोळा करणारा पंतप्रधान केतकरांना आवडला; त्याचे हेच खरे कारण आहे. दरम्यान राहुल मोठे व समजदार होतील आणि घराण्याचा वारसा पुढे घेऊन जातील; अशी सर्वांचीच अपेक्षा होती. त्यानुसार व्यापक नेपथ्यरचनाही झाली होती. पण राहुल मंचावर अवतरले, तेव्हापासून त्यांनी अशी काही धमाल उडवून दिली आहे, की दिवसेदिवस नेहरूवाद मुळापासून उखडून टाकणार्‍या शक्तींना बळ मिळाले आहे. ती घसरण कोणी सावरू शकत नसल्यानेच आता यजमान सोनियांनी कुमारशास्त्री बुवांना राज्यसभेत आणलेले आहे.

मणिशंकर अय्यर, चिदंबरम अशा एकाहून एक दिग्गज बुद्धीमंतांना जमले नाही, ते शिवधनुष्य केतकरांना पेलायचे आहे. रसातळाला चाललेला नेहरूवाद त्यांना राहुल गांधींपासून वाचवायचा आहे. कारण त्या नेहरूवादाला मोदींमुळे जितका धोका आहे, त्यापेक्षा अधिक हानी राहुलमुळे पोहोचली आहे. त्यातून वाट काढण्यासाठी केतकरांना पाचारण करण्यात आलेले आहे आणि त्यांनी मनाशी एक निर्णय केला आहे. राहुलनी पक्षाला वा देशाला किती निराश हताश केले ते सोडून द्या. खुद्द कुमार केतकर राहुलविषयी कमालीचे निराश झालेले आहेत आणि त्यासाठीच त्यांनी गांधी घराण्यात जन्मलेला नसला तरी नेहरूवाद किंवा त्यांच्या राजकीय शैलीचा वारसा पुढे चालवू शकेल, असा दत्तक वारस निश्चीत केलेला आहे. त्याला आणुन देशाच्या वा कॉग्रेसच्या सर्वोच्चपदी बसवण्याची अवघड कामगिरी केतकरांनी हाती घेतलेली आहे. आपल्या ताज्या भाषणात त्यांनी ज्या आंतरराष्ट्रीय व्यापक कटकारस्थानाचा मुद्दा ठासून मांडला आहे, त्यामागची खरी चालना अशी आहे. आता हा केतकरांनी निवडलेला दत्तक पुत्र कोण? त्याचे नाव सांगितले तर अनेकांना हृदयविकाराचा झटका येऊ शकेल. पण आपल्या ताज्या भाषणातून केतकरांनी मोदींकडून केलेल्या अपेक्षा बघितल्या, तर कुमार शास्त्रीबुवांना मोदींमध्ये थेट इंदिराजींचा खरा वारस दिसत असल्याची साक्षच मिळून जाते. थोडक्यात इंदिराजी वा नेहरू घराण्याचा भविष्यातील वारस म्हणुन केतकरांनी नरेंद्र मोदी यांची निवड केलेली आहे. त्यात केतकर यशस्वी झाले, तर मोदी कसे वागतील व काय काय करतील, त्याचेच वर्णन केतकरांनी ताज्या भाषणात दिलेले आहे. या भाषणात किंवा व्यापक कारस्थानाच्या तपशीलात केतकर काय काय सांगतात? त्याचे कोणी बारकाईने परिशीलन केले आहे काय? त्या वर्णनात कोणता चेहरा आपल्याला दृगोचर होताना दिसतो? ते जसेच्या तसे इंदिराजींचे़च वर्णन नाही काय? केतकर काय सांगतात?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर २०२४ मध्ये पुन्हा निवडणुका होतील की नाही, याबाबत सगळ्यांनाच संशय आहे. मात्र, २०१९ च्याच निवडणुका होतील की नाही, याची खात्री देता येत नाही. निवडणुका झाल्याच आणि निकाल मोदींच्या विरोधात लागला तर मोदी सहजरित्या सत्तेचे हस्तांतर करतील असे वाटत नाही.’ हे कुमारशास्त्रींनी केलेले भाकित आहे. पण असे यापुर्वी कुठल्या पंतप्रधानाने केले आहे काय? मोदींच्या कुठल्या निर्णयात त्याची साधी झलक तरी दिसली आहे काय? असलेले अधिकारही वापरताना नरेंद्र मोदी सतत डगमगलेले आपण मागल्या चार वर्षात बघितले आहेत. पण हाती नसलेले अधिकार शोधून वा त्यासाठी देशाच्या राज्यघटनेची कशीही मोडतोड करून इंदिराजी नेमक्या तशा बेछूट वागलेल्या आहेत. त्याचे केतकरांना तेव्हाही खुप कौतुक होते आणि आजही आहे. मात्र राहुल त्या कसोटीला उतरणारा वारस नाही. पण तितके बहूमत आणि राज्यसभेत तशी संख्या असती, तर मोदी तसा बेधडक कारभार चालवू शकते असते. याविषयी कोणच्या मनात शंका नाही. अगदी केतकरांच्याही मनात शंका नाही. म्हणून तर त्यांनी मनोमन इंदिराजींचा वारस म्हणून नरेंद्र मोदींची निवड केली आहे आणि त्याच व्यापक दत्तकविधान कारस्थानाचा एक भाग म्हणून परवाच्या ताज्या भाषणातून त्याचे सूतोवाच केलेले आहे. अनेकांना ते मोदींच्या विरोधातले किल्मीष वाटले आहे. तर अनेकांना तो मोदींवर शंका घेण्यासाठी महत्वाचा मुद्दा वाटलेला आहे. पण वास्तवात कुमारशास्त्रींनी शिजवलेल्या एका आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा तो एक भाग आहे. पण त्याकडे जाण्यापुर्वी आपण केतकरांच्या सुक्ष्म कुशाग्र चिकित्सक बुद्धीने ही निवड कशी केली, त्याचाही तपशील तपासून बघायला हरकत नाही. इंदिराजी व राहुल यांची कुठेही तुलना होऊ शकत नाही, पण मोदींची अनेकजण इंदिराजींशी तुलना करीत असतात. केतकरांची मोदींकडून काय अपेक्षा आहे?

पहिली गोष्ट म्हणजे नवा अभिनेता अभिनेत्री आली, की जुन्या पिढीला आपल्या लाडक्या जुन्याच अभिनेत्याची झलक त्यात बघायची असते आणि केतकर त्याला कुठे अपवाद नाहीत. त्यांना मोदी दत्तक म्हणून हवेत. पण त्या मोदींनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाप्रमाणे न वागता जसेच्या तसे इंदिराजींप्रमाणे वागावे, हीच केतकरांची अपेक्षा आहे. नव्हे तर मागणी आहे. केतकरांनाही अघो्षित आणिबाणी असल्याची नेहमी स्वप्ने पडत असतात आणि आपल्या ताज्या भाषणात मोदी त्या आणिबाणीतल्या इंदिरा गांधींप्रमाणे वागतील, ही अपेक्षाही आहे. हे स्पष्ट करताना कुमारशास्त्री म्हणतात, ‘२०१९ च्याच निवडणुका होतील की नाही, याची खात्री देता येत नाही. निवडणुका झाल्याच आणि निकाल मोदींच्या विरोधात लागला, तर मोदी सहजरित्या सत्तेचे हस्तांतर करतील असे वाटत नाही.’ १९७५ सालात इंदिराजी नेमक्या अशाच वागल्या होत्या. अलाहाबाद कोर्टाने त्यांची रायबरेलीची निवड रद्द केली आणि त्यांच्यावर पंतप्रधानपद सोडण्यासाठी दबाव आणला गेला होता. इंदिराजींनी सत्ता सोडली होती का? अजिबात नाही. त्यांनी सरळ देशात आणिबाणी लावली आणि तमाम विरोधी पक्ष नेत्यांना उचलून तुरूंगात डांबले. माध्यमांची गळचेपी केली आणि नंतर येऊ घातलेल्या निवडणूकाही अनिश्चीत काळ रद्द करून टाकल्या होत्या. पराभूत इंदिराजी सत्ता सोडण्याचा प्रसंग आल्यावर जशा वागल्या, तसेच मोदी वागणार अशी केतकरांना खात्री असेल, तर त्यांना मोदी या पंतप्रधानात इंदिराजी दिसतात असेच मानावे लागेल ना? मग इंदिराजी आवडतात आणि मोदी तिरस्कृत असतात, हे कसे शक्य आहे? तो तिरस्कार नसून मोदींच्या रुपात पुन्हा इंदिराजींची सत्ता देशात यावी; म्हणून मनातल्या मनात चाललेला नवस आहे. त्याचा अनवधानाने भाषणा्त उ़च्चार झाला इतकेच. देशातले बहुतांश पत्रकार लेखक बुद्धीमंत तेव्हाच्या गळचेपीने विचलीत झालेले असताना केतकर मात्र कमालीचे सुखावलेले होते. मोदींनी ती़च स्थिती आणावी अशी त्यांची सुप्त इच्छा आहे.

ज्या आणिबाणीवर कुमार केतकर खुश होते, ती आणिबाणी चालू असताना अशीच लोकांची समजूत होती. पुढल्या निवडणूका होण्याची काहीही शाश्वती नव्हती आणि विरोधी बाके रिकामी ठेवून इंदिराजी संसदेची अधिवेशने चालवित होत्या. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष देवकांत बारूआ म्हणायचे इंदिरा इज इंडिया, म्हणजे इंदिराजी म्हणजेच भारत. त्यांचा शब्द खोडून काढण्याचीही कोणाची तेव्हा बिशाद नव्हती. वेगळे मत मांडण्याच्या गोष्टी सोडूनच द्या. मात्र त्यावर केतकर फ़िदा होते आणि इंदिरा गांधी राज्यघटना हवी तशी गुंडाळून वाकवून आपल्या एकाधिकारशाहीलाच लोकशाही ठरवित होत्या. इतके सर्व राहुल गांधींकडून होण्याची अपेक्षा केतकरांना उरलेली नाही. म्हणून मग त्यांना पर्यायी इंदिरा वारस हवा आहे. जे कोणी राजकीय चेहरे आज भारतात उपलब्ध आहेत, त्यात मोदी थोडा खमक्या नेता आहे आणि केतकरांची अपेक्षा पुर्ण करू शकण्याची क्षमता त्यांना मोदीत दिसलेली असावी. पण या माणसाला पटवावे कसे आणि नेहरूवादाचा दत्तक वारस बनवावे कसे; याचा मार्ग केतकरांना अजून सापडलेला नसावा. म्हणून त्यांनी आपल्या व्यापक कारस्थानाचा असा ओझरता उल्लेख परवाच्या भाषणात केला. ते दत्तकविधान कधी पार पडायचे ते पडो. केतकरांना आणिबाणी एकाधिकारशाही हवी आहे आणि ती आणायची तर आधी मोदींच्या हाती इंदिराजींच्या इतके प्रचंड बहूमत व बेछूट कारभार हाकण्याला पुरेसे संख्याबळ असायला हवे ना? त्यासाठी मग केतकरांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यात कॉग्रेसच्या पुनरूज्जीवनाचा काही प्रयत्न नसून मोदींच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला नेहरू्वादी पक्ष बनवण्याचे व्यापक कारस्थान आहे. त्याचा एक छोटा भाग म्हणून मोदींच्या विरोधातले काहूर माजवणे व त्यांना जनमानसात सहानुभूतीची मते मिळतील अशी बेगमी करणे, ही नेपथ्यरचना वा योजना असावी. मग यात केतकरांची भूमिका कोणती?

कुठल्याही कारस्थानाचा महत्वाचा भाग म्हणजे शत्रूगोटात घुसखोरी करून दगाफ़टका करणे,. त्याच हेतूने केतकर कॉग्रेस पक्षात शिरलेले आहेत. त्यांनी आतूनच कॉग्रेस पोकळ करायची आणि मोदींनी बाहेरून हल्ले करून नामशेष करायची; असा त्यातला खरा कारस्थानी भाग असावा. तसे नसते तर केतकरांनी नेहरू खानदानाच्या खर्‍या वारसांच्या हत्याकांडाचा जो घटनाक्रम आपल्या भाषणातून पेश केला; तो सोनियांविषयीच संशय निर्माण करणारा कशाला होता? संजय गांधी, इंदिराजी व राजीव गांधी या खर्‍या नेहरू वारसांचे अनैसर्गिक मृत्यू सोनियांना कॉग्रेसच्य शीर्षस्थानी घेऊन आले. याविषयी त्यांचे शत्रूही कधी बोलले नाहीत. पण केतकरांनी पद्धतशीरपणे त्या घटनाक्रमांचा आलेख मांडून सोनियांवर संशयाचे ढग आणुन उभे केले आहेत. त्यात सोनिया गुरफ़टल्या, की कॉग्रेसची उरलीसुरली लोकप्रियताही रसातळाला जाईल आणि नंतरच्या राजकारणात मोदींना एकाधिकारशाही गाजवण्याइतके प्रचंड बहूमत मिळून जाईल, हा हेतू आहे. त्याचा पहिला अंक म्हणून केतकरांनी आपल्या ताज्या भाषणातून नेहरू वारसांच्या संशयास्पद हत्याकांडांचा घटनाक्रम मांडला. तोही सोनियांच्या वाढदिवसाचे निमीत्त शोधून. मग त्याचा बचाव खुद्द कॉग्रेसी प्रवक्त्यांनी करावा आणि हळुहळू जनतेच्या मनात सोनियांविषयी संशय निर्माण होऊन राहुल-सोनियांची सद्दी संपुष्टात यावी. त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी नेहरू घराण्याचे दत्तकवारस म्हणून देशातला नेहरूवाद अबाधित करावा. उतारवयात राहिलेली ही इच्छा पुर्ण करून घेण्यासाठीच बहुधा केतकरांनी मोक्य़ाच्या वेळी हा बार उडवून दिला आहे. मात्र तो या कटकारस्थानाचा पहिला अंक आहे. पुढे उलगडत जाणार्‍या नाट्य व कथानकात केतकर आणखी काय काय धक्कादायक खुलासे करतात, ते बघणे व समजून घेणे महत्वाचे असेल. अर्थात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी कितपत नेहरूवादी होतील वा इंदिराजींचा वारसा चालवतील, याविषयी माझ्या मनात शंका आहे. एका चहावाल्याच्या पोराला इतका मस्तवालपणा शक्य नाही. त्यासाठी नेहरू राजघराण्यातच जन्म व्हायला हवा ना? पण ‘दत्तकविधानाच्या’ पौरोहित्यासाठी उतावळे झालेल्या कुमार शास्त्रीबुवांना कोणी आवरायचे आणि कसे रोखायचे?

21 comments:

  1. भाऊ, किती उघडं करून माराल केतकरांना 😂😂 केतकर म्हणतील झक मारली आणि भाऊंच्या रडारवर आलो😂😂

    ReplyDelete
  2. सुमार केतकरांना आपल्यासारख्यांनी खरेतरं अनुल्लेखाने मारायला हवे.तोर्सेकर माझ्यावर लिहितात, याचेसुद्धा भांडवल करतील, हे भांड लोक!

    ReplyDelete
  3. भाऊ,
    केतकरांवर एवढी शाई व वेळ वाया घालवायची खरच गरज आहे का?

    ReplyDelete
  4. कुमार केतकर हे केवळ फुटेज खाण्यासाठी अशी वक्तव्ये करीत असावेत किंवा त्यांना वास्तवाचे भान नसावे. इतिहास हा अभ्यासासाठी असतो, रमण्यासाठी नसतो हे देखील त्यांना सांगावे लागेल.
    कॉंग्रेसने त्यांना, त्यांच्या कामगिरीची बिदागी म्हणुन राज्यसभेवर नेले आहे हे स्पष्ट आहे. आता बिदागी मिळाल्यानंतर देखील "नाच" का सुरु आहे कळत नाही .

    ReplyDelete
  5. तुमचे लेख वाचतो म्हणून कळाले केतकर नावाचा कोणी माणूस आहे

    ReplyDelete
  6. भाऊ केतकर यांची एवढी दाखल घ्यायची गरज नाही. कधी एकेकाळी हा मनुष्य असेल मोठा पण त्याच्या मोठेपणाचा आजच्या जमान्यात कुठे टिकाव लागतो? लोक विचारात नाहीत म्हणून असं काहीतरी बरळून चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे. बाकी मागे या विद्वांनांनी Neharu's Elite नावाचा लेख इंग्रजीत लिहिला होता. मोदींनी लेखकांना-विचारवंतांना ठेवून घ्यावं अशी विनंती फक्त त्या लेखात नव्हती बाकी रड तीच होती. हे आश्रित लोक स्वतःचे स्वतः कष्टाने कमवून खाणाऱ्या लोकांना कसं समजून घेणार?

    ReplyDelete
  7. भाऊ ........शेवटी तुमचे अनुभवाचे बोलच आम्हा सर्वांच्या मनातले बोलून जातात. तुम्ही योजलेले ' शब्द प्रयोजन ......... एकदम ' झकास ' ..........' मनाच्या अंतरंगात फ़ेरफ़टका ' / दत्तक विधान ..!! केतकरांना खरेतर ' खांग्रेस ' ने नेहरू ' खानदान प्रतिनिधी ' ही उपाधीच द्यावयास हवी. तरी बरे अजून केतकरांनी नेहरूंची वेशभूषा का बरे अजून उचलली नाही...? केतकर किती छान दिसतील नेहरूंच्या त्या वेशात आणि वर खिशाला ' गुलाबाचे फुल ' .......................भाऊ .......या लेखातून तुम्ही केतकरांच्या मनातील ' व्यापक कटाची ' व्याप्ती ' एवढी वाढविली आहे की हा आता एका कटांतर्गत दुसरा कट ? हा ' व्यापक कट ' ही एवढा रंजक होत चाललाय की काय बोलायची सोय नाही.

    ReplyDelete
  8. यालाच आपण Loyal than The King किंवा राजापेक्षा राजनिष्ठ असेच म्हणतो ना?

    ReplyDelete
  9. टीआरपी संपुष्टात आलाय त्यांचा ....माफ करा त्यांना 😀😀

    ReplyDelete
  10. एकच शब्द.सणसणीत!!!

    ReplyDelete
  11. बाटगा जास्त कडवा असतो तशी या सुमार केतकरची कथा आहे


    ReplyDelete
  12. By making this man Ketkar a member of Rajyasabha Congress has bought him and therefore it is natural that he strongly critisizes Modi.

    ReplyDelete
  13. भाऊ ,माझ्या आठवणी प्रमाणे आदरणीय कुमारशास्त्री ह्यांनी काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात एक भन्नाट लेख लिहिला होता. त्यात एक असे विधान केले होते की १९७४-७५ ह्या वर्षात कै . जयप्रकाश नारायण ह्यांनी केलेल्या आंदोलनाला सी आय ए चे आर्थिक सहाय्य होते आणि ते आंदोलन एका सी आय ए च्या व्यापक कटाचा भाग होता. त्याच लेखात त्यांनी काई.इंदिरा गांधी ह्यांची आणीबाणी बद्दल वारेमाप स्तुती केली होती. नावाप्रमाणेच हे कुमार बुद्धीचे असून हे नवे नाही. मूळ साम्यवादी ( कम्युनिस्ट)विचारसरणी कडून दुसरे काय अपेक्षित असावे

    ReplyDelete
  14. इतक्या लाचार, विकाऊ आणि धर्मभ्रष्ट माणसाची दखल न घेण चांगल...
    चिखलात दगड मारल्याने आपल्याच अंगावर घाण ऊडते

    ReplyDelete
  15. इतर सगळ्या मांदियाळीत कुमार केतकर हे अभ्यासू पत्रकार म्हणून अस्मादिक समजतात.त्यांचे मांडणी उद्भोधक असते. त्यांचे विचार पटत नसले तरी त्यांचे म्हणणे ऐकावेसें वाटते. शिवसेनेवर त्यांनी केलेले भाष्य यूट्यूब वर आहे. ते खोटे कधीच बोलत नाहीत. तर्क प्रत्येकवेळी पटेलच असे नाही. त्यांचे नेहरू वादी विचार उघडपणे व्यक्त केले असतात. त्यांच्या बोलण्यात कुठेही कपटीपणा किंवा आक्रस्ताळेपणा नसतो. आपले म्हणणे ते ठाशीव पद्धतीने मांडतात. आताच्या काळात असा व्यासंगी पत्रकार लाभणे दुर्मिळ.

    ReplyDelete