Tuesday, February 26, 2019

तामिळनाडूची गुंतागुंत

kamala hassan rajni के लिए इमेज परिणाम

महाराष्ट्राच्या पाठोपाठ भाजपाने तामिळनाडूतही लोकसभेसाठी आघाडी जुळवून घेतली आहे. त्यात अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखाली भाजपा लढणार असून, ३९ पैकी अवघ्या ५ जागा भाजपाच्या वाट्याला आलेल्या आहेत. कारण स्पष्ट आहे. तामिळनाडूत भाजपाचे संघटन तितके शक्तीशाली नाही आणि कॉग्रेसही दुबळीच झालेली आहे. गेल्या अर्धशतकात कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला तिथे पाय रोवून उभे रहाता आलेले नाही आणि हळूहळू राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांच्या वळचणील जाऊन बसलेले आहेत. आरंभी तिथेही कॉग्रेसच सत्ताधारी पक्ष होता आणि डाव्या पक्षांची थोडीफ़ार शक्ती होती. पण कॉग्रेसला पर्याय म्हणून द्रविड मुन्नेत्र कझागम हा पक्ष उदयास आला. स्वातंत्र्योत्तर काळात त्याने प्रादेशिक अस्मितेला खतपाणी घालत आपले बस्तान बसवले आणि १९६७ नंतर तिथून कॉग्रेस पक्ष नामशेष होत गेला. नंतरच्या काळात त्याही पक्षात अहंकार सोकावला आणि फ़ाटाफ़ुट झाली, तेव्हा त्यात आपले डाव साधताना कॉग्रेसने कधी स्वत:चा जिर्णोद्धार करून घेण्य़ाचा प्रयास केला नाही. स्थानिक नेतृत्व उभे केले नाही. परिणामी तामिळी राजकारण पुर्णपणे प्रादेशिक पक्ष व नेत्यांच्या कब्जात गेले. राष्ट्रीय पक्षांना आपले प्रभावी नेतृत्व निर्माण करणे शक्य झाले आणि प्रादेशिक पक्षांशी तात्पुरत्या आघाड्या करताना राष्ट्रीय पक्ष संघटनाही उभारता आलेली नाही. पण यावेळची परिस्थिती अगदी वेगळी आहे. मागल्या अर्धशतकातला प्रादेशिक नेत्यांचा प्रभावही आज अस्तंगत झालेला आहे. लागोपाठ दोन वर्षात करुणानिधी व जयललितांचा मृत्यू झाल्याने तामिळनाडूत आता कुठलाही प्रभावी नेता उरला नाही आणि कर्तृत्वहीन नेत्यांच्या हातात सगळेच पक्ष घुटमळलेले आहेत. त्यामुळे भविष्यातला तामिळनाडूचा नेता कोण, हे ठरवणारी अशीच ही लोकसभेची निवडणूक होणार आहे. सहाजिकच सर्व राजकारण दोन आघाड्यात विभागले गेले असून, त्याचे नेतृत्व प्रादेशिक पक्षांकडे आहे. तर नव्याने नेतृत्वाची पोकळी भरायला निघालेले दोन सुपरस्टार अभिनेते कोणाच्या खिजगणतीतही नाहीत.

मुंबईत अमित शहांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून जगावाटप उरकल्याच्या दुसर्‍याच दिवशी तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी भाजपाची युती पक्की झाली. त्यात पीएमके हा पक्ष सामील झाल्याने द्रमुक वैतागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोदींना पराभूत करणार्‍या प्रत्येक घोषणेत पुढाकार घेणार्‍या द्रमुकच्या स्टालीन यांनी भाजपा आघाडी होताच शिव्याशाप दिलेले आहेत. पण ते अण्णाद्रमुक वा भाजपाला नव्हेत. तर पीएमके या छोट्या पक्षाच्या नावाने द्रमुक शिमगा करतो आहे. त्याचे कारण म्हणजे पीएमके आपल्याच आघाडीत सहभागी होईल असे द्रमुकने गृहीत धरलेले होते. तसे झाले असते, तर ती आघाडी निर्विवाद मोठी व मजबूत झाली असती. कारण या पीएमके पक्षाचे वणियार नामक एका समाजघटकात मोठे वजन आहे आणि जिथे तो पक्ष सहभागी होतो, त्या आघाडीला त्या समाजाची मते हमखास मिळत असतात. ती ठरलेली मते हातून गेल्याचा द्रमुकचा राग आहे. कारण तामीळनाडूच्या उत्तर भागात या समाजाची मते आठदहा मतदारसंघात केंद्रीत झालेली आहेत. ती स्वपक्षाला निवडून आणणारी नसली, तरी ज्या कोणाशी युती करतील त्याला यश देणारी असतात. त्यांच्या अभावी द्रमुक आघाडी त्या आठदहा मतदारसंघात दुबळी पांगळी होऊन जाते. दक्षिण तामिळनाडूत स्टालीन यांचा दुरावलेला व रागावलेला भाऊ अळागिरी याचा प्रभाव पाचसहा जागांवर असून, तोही द्रमुकला दगाफ़टका करायला टपून बसला आहे. त्यामुळेच दिसायला त्या राज्यात ३९ जागा असल्या तरी किमान १५ जागा गोत्यात आल्या आहेत. कॉग्रेसला सोबत घेऊन द्रमुक आघाडीची नौका किनार्‍याला लागण्याची शक्यता त्यामुळे रोडावली आहे. स्टालीन यांनी पित्याच्या पुतळ्याचे अनावरण करताना थेट राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले होते. कारण तोपर्यंत तेच तामिळनाडूचे प्रभावी नेता मानले जात होते आणि पीएमके त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता गृहीत धरलेली होती. तो सगळा खेळ विस्कटला आहे.

एक मात्र निश्चीत अण्णाद्रमुकची आज तामीळनाडूत सत्ता असली तरी त्यांच्यापाशी जयललितांची पुण्याई खुप आहे. पण पक्षाला योग्य दिशेने घेऊन जाईल, असा कोणी नेता त्यांच्यापाशी उरलेला नाही. त्यांना अम्माइतका प्रभावी चेहरा निवडणूकीत हवा होता. तो तामिळी नसले तरी मोदींचा चेहरा असू शकतो. अम्मा आणि नरेंद्र मोदी यांचे एकत्रित फ़ोटो आपल्याला मते मिळवून देतील; अशी त्यांची अपेक्षा असावी. पण तेवढ्यावरही त्यांचे समाधान झालेले नाही. म्हणूनच अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाने भाजपासह पीएमकेला सोबत घेतलेले आहे. ३९ पैकी २५ जागा आपल्याला ठेवून १४ जागा मित्रपक्षांना दिलेल्या आहेत. त्यापैकी ७ जागा पीएमके आणि ५ जागा भाजपाला दिलेल्या आहेत. आणखी तीन जागा इतर लहान पक्षांना दिलेल्या आहेत. मग घाईगर्दीने कॉग्रेस द्रमुकने आपले जागावाटप उरकले आहे. कॉग्रेसही भाजपा इतकीच दुबळी असतानाही द्रमुकने दहा जागा देऊ कराव्यात, ह्याला आत्मविश्वास म्हणता येणार नाही. कारण मागल्या खेपेस कॉग्रेसने बहुतेक जागी अनामत रक्कम सुद्धा गमावली होती. खुद्द अर्थमंत्री चिदंबरम यांनी निवडणूकीपुर्वीच माघार घेऊन पळ काढलेला होता. त्यातून आज त्या राज्यात कॉग्रेसची अवस्था किती दयनीय आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. पण दुसर्‍या आघाडीची सज्जता बघितल्यावर घाबरलेल्या द्रमुकची कोंडी करून कॉग्रेसने अधिक जागा आपल्या पदरात पडून घेतल्या आहेत. या सर्व गडबडीत तारांबळ उडाली आहे, ती कमला हासन या अभिनेत्याची. मागल्या वर्षभर त्याने जयललिता व करुणानिधी यांच्या जागी तामिळनाडूचा प्रभावी नेता होण्यासाठी खुप कसरती केलेल्या होत्या. पण त्याची कुठलीही दखल राजकीय पक्षांनी घेतलेली नाही आणि आता एकाकी पडण्याची नामुष्की त्याच्यावर आलेली आहे. उलट त्याच्यापेक्षाही सुमार बुद्धीचा मानल्या गेलेल्या रजनीकांतने शहाणपणा केलेला आहे.

२०१७ च्या अखेरीस रजनीकांत याने आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा केलेली होती. त्यानंतर कमला हासन मैदानात आला. पण संथगतीने पावले टाकत रजनीकांत याने कालपरवाच लोकसभा लढवणार नसल्याचे जाहिर करून टाकले. तर त्यापुर्वीच हासन याने सर्व जागा लढवण्याची आधी गर्जना केली आणि नंतर कॉग्रेसला अटीही घालण्यापर्यंत मजल मारलेली होती. द्रमुकशी मैत्री सोडली तर आपण कॉग्रेसला सोबत घेऊ; असे कमला हासन म्हणाला होता. पण त्याला उत्तरही देणे कॉग्रेसला गरजेचे वाटले नाही आणि आता द्रमुकशी जागावाटप उरकून कॉग्रेसने त्या अभिनेत्याला त्याची योग्य जागा दाखवलेली आहे. नुसते माध्यमात झळकून कोणी लोकप्रिय पुढारी होत नसतो, की निवडणूका जिंकत नसतो. ह्याचा अनुभव या कलाकाराला आता घ्यावा लागणार आहे. तामिळनाडूत त्याचे चहाते अनुयायी थोडे नाहीत. पण रजनीकांत जितका अफ़ाट लोकप्रिय आहे, तितकी क्षमता कमलापाशी नाही. पण आता माघार घेतली तर तो राजकीय जीवनातून संपून जाईल. उलट या निवडणूक मतदानाचे जे आकडे येतील, ते भावी राजकारणाची महत्वाची दिशा दाखवणारे असतील. त्यात करुणानिधी व जयललिता यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पक्षाचे जनमानसातील स्थान मतमोजणीतूनच स्पष्ट होणार आहे. त्यातून तामिळी मतदार प्रादेशिक अस्मितेतून बाहेर पडला किंवा नाही; याचीही प्रचिती येणार आहे. त्यानुसारच रजनीकांन पुढले पाऊल टाकणार आहे. किंवा राजकारणापासून दुर राहिल. कमला हासनची क्षमताही त्यातून समोर येईल. त्यानंतरच निर्णय घेण्याचॊ सुविधा रजनीकांतला उपलब्ध असेल. म्हणूनच त्याने धुर्तपणे लोकसभेपासून दुर रहाण्याचा निर्णय घेतला आहे. उलट हासन याने घाई करून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. लोकसभेची ही निवडणूक स्थानिक राजकारणात प्रादेशिक भविष्याची दिशा ठरवणारी होईल.

एक गोष्ट नात्र निश्चीत. तामिळनाडू, केरळ किंवा आंध्रप्रदेश अशा साधारण ८०-९० लोकसभेच्या जागी मोठी राजकीय उलथापालथ व्हायची आहे. चंद्राबाबू व स्टालीन अशा प्रादेशिक नेत्यांसाठी ही सत्वपरिक्षेची वेळ आहे. तर भाजपा व कॉग्रेस अशा राष्ट्रीय पक्षांना दक्षिणेत नव्याने मुख्यप्रवाहाचे राजकारण रुजवण्याची महत्वाची संधी यातून मिळालेली आहे. यातले कौतुक अशासाठी आहे, की नेमक्या याच ८०-९० जागा लोकसभेच्या संख्याबळात महत्वाची भूमिका बजावणार असल्याने, या मतदानाला अत्यंत महत्व असणार आहे. खेरीज मागल्या अर्धशतकात तामिळनाडूवर चित्रपट कलाकारांनी गाजवलेले प्रभूत्व संपुष्टात येते की कायम रहाते; त्याचीही कसोटी लागणार आहे,. करुणानिधी व जयललितांची पुण्याई त्यांच्या पक्षांना किती तारून नेते, त्याचाही निकाल लागून जायचा आहे. अवघ्या वर्षभरात तिथे विधानसभेच्या नव्या निवडणूका येणार असल्याने विविध पक्षांना आपापली शक्ती जोखून बघायची आहे. यामध्ये आज तुरूंगात खितपत पडलेल्या जयललितांच्या सखी शशिकला, यांच्याही भवितव्याचा निकाल लागायचा आहे. अम्माच्या नंतर शशिकला नेता झाल्या होत्या आणि त्यांनाच तुरूंगात जायची वेळ आल्यावर अण्णाद्रमुक सैरभैर झालेला आहे. त्यांचा एक दुबळा गट वेगळे राजकारण करू बघतो आहे. त्याच्याही खर्‍या प्रभावाची परिक्षा व्हायची आहे. बहुधा त्याही गटाने अनेक उमेदवार मैदानात असतील. पण आज तरी कोणी त्यांना गंभीरपणे घेताना दिसत नाही. त्यामुळेच मोठी संधी कॉग्रेस व भाजपा अशा राष्ट्रीय पक्षांना असेल. त्यांना आघाडीतून का होईना, चांगले यश मिळवता आले, तर अर्धशतकानंतर तामिळनाडू पुन्हा राष्ट्रीय मुख्य राजकीय प्रवाहात येऊ लागल्याचे चिन्ह मानले जाईल. तशी चाहुल लागली तरी रजनीकांत राष्ट्रीय भूमिका घेणारा प्रादेशिक नेता म्हणून विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्वशक्तीनिशी उतरल्याशिवाय रहाणार नाही.


3 comments:

  1. Very factual analysis. Good information for people who are not well acquainted with TN Politics.

    ReplyDelete
  2. कळघम लिहावे . तमिळ भाषेमध्ये तीन प्रकारचे ळ असून त्यातील एका विशिष्ट ळ ला इंग्रजी मध्ये Zh अक्षरे लिहून दाखविले जाते त्यामुळे बर्‍याच जणांची गडबड उडते

    ReplyDelete
  3. रजनीकांत यांना लोकसभा इलेक्शन बाबत वेळीच आपल्या कुवतीचा अंदाज आला असावा म्हणून वेळीच माघार घेतली.पण एकंदरीत सिने कलावंतांच्या (आंध्र, तमिळनाडू)राजकीय करकीर्द संपुष्टात येतचालली आहे असे वाटते.
    भाजपाला चांगली संधी आहे.आवश्यकता भासल्यास लोकसभेत पाठिंबा राहील.चांगली संधी आहे .

    ReplyDelete