गुरूवारी नाशिकला ‘लेटस टॉक’ असा एक कार्यक्रम योजलेला होता. नाट्य क्षेत्रातले मान्यवर योगेश सोमण आणि अनुभवी पत्रकार म्हणून मला तिथे आमंत्रण होते. अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी, अशा विषयावर आम्हाला बोलायचे होते. दुपारी ४ वाजता नाशिकला पोहोचलो, तेव्हा खुप जुना मित्र कर्नल श्री खाजगीवाले मला न्यायला आलेला होता. किमान २५ वर्षानंतर त्याची माझी भेट झाली आणि खुप आठवणी निघाल्या. कोकणात देवरुखची समाजवादी विचारांची संस्था मातृमंदिर येथील १९७३ च्या दुष्काळी शिबीरात श्रीची माझी ओळख झाली. ते शिबीर अर्धवट सोडून श्री गेला होता. त्याला संरक्षण महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि पुढे सेनाधिकारी म्हणून तो लष्करी सेवेत रुजू झाला. दिर्घकाळ देशाची सुरक्षा करताना काश्मिर, खलिस्तान अशा अनेक मोहिमा त्याला अनुभवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळेच बालाकोटचा हल्ला आणि नंतर उमटलेल्या प्रतिक्रीया इत्यादीविषयी त्याच्याशी संवाद करण्याची अपुर्व संधी मिळाली. पण त्याखेरीज या निमीत्ताने खुप जुन्या आठवणी निघाल्या. राष्ट्र सेवादल म्हटले की शिबीरे अभ्यासवर्ग आणि छानपैकी देशभक्तीची गाणी आलीच. त्या काळात मी विडंबने बडबडगीतेही खुप करायचो. जेट विमानाने हवाई क्षेत्रात मोठी क्रांती घडवल्याचा तो काळ होता आणि भारतातही नव्याने दाखल झालेल्या जंबो जेट विमानाच्या संबंधात मी एक विडंबन बडबडगीत केलेले होते. आजही ते अनेकांना स्मरते आणि तीन पिढ्यांनी ते गुणगुणलेले आहे. श्री खाजगीवालेला सुद्धा आज त्यातल्या अनेक ओळी जशाच्या तशा आठवतात. नाशिक भेटीत त्या आठवणी ताज्या झाल्या आणि मलाही धक्का बसला. ४५ वर्षापुर्वी केलेल्या विडंबनात एक राजकीय भाकित मी विनोद म्हणून केले होते आणि बालाकोट वा जिहादी दहशतवादाच्या निमीत्ताने माझे गंमतीदार शब्द खरे ठरले आहेत. किंबहूना पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांनी खरे करून दाखवले आहेत.
त्या काळात दहशतवाद किंवा विमानांचे अपहरण हे विषय पॅलेस्टाईन पुरते मर्यादित होते आणि अनेकदा ते दहशतवादी माथेफ़िरू प्रवासी विमाने पळवून न्यायचे. आज जसे जगातल्या कुठल्याही जिहादी घातपात्याला पाकिस्तान आश्रयस्थान वाटते, तसा तेव्हा लेबानॉन हा जिहादींचा आश्रयदाता होता. सहाजिकच कुठलेही विमान अपहरण झाले, मग विमान बैरूटला उतरवण्याची सक्ती पायलटवर केली जायची. त्याचाही उल्लेख माझ्या त्या बडबडगीतामध्ये आलेला होता. तो पुढीलप्रमाणे होता.
जंबो जेट जंबो जेट झुईऽऽऽऽऽऽऽऽ
सारं होतं शांत शांत, विमान होतं आकाशात
त्यात होता माथेफ़िरू, त्याचं काम झालं सुरू
तो म्हणाला पायलटला, विमान वळव बैरूटला
सारे प्रवासी ठेवतो ओलिस, आता काय करील पोलिस
विमान उतरव त्या शेतात, पिस्तुल आहे या हातात
त्यात आहेत सहा बुलेट, जंबो जेट जंबो जेट झुईऽऽऽऽऽऽऽऽ
एक प्रवासी समाजवादी, त्याच्या अंगावरती खादी
त्याला झाला भलता खेद, त्याने केला तीव्र निषेध
पत्रक काढून म्हणतो त्यात, छे छे हा तर अध:पात
रोजच घडती असे प्रकार, बदलो बदलो ये सरकार
माथेफ़िरू अन समाजवादी, कॉग्रेसला पर्यायी आघाडी
बनवू जॉइन्ट कॅबिनेट, जंबोजेट जंबो जेट झुईऽऽऽऽऽऽऽऽ
हे तेव्हा मी गंमतीने म्हणत वा लिहीत होतो. कारण सरकार कायम कॉग्रेसचे असायचे आणि सत्ताधार्यांच्या नावाने नुसते शिव्याशाप देण्यापलिकडे विरोधी पक्ष वा प्रामुख्याने समाजवादी, बोटे मोडण्यापलिकडे काही करीत नसत. कुठल्याही मोठ्या वा किरकोळ घटना घडल्या, मग सरकार बदलण्याच्या डरकाळ्या फ़ोडल्या जात. त्यासाठी कुठल्याही पक्षाशी हातमिळवणी करायला समाजवादी लोक एका पायावर सज्ज असायचे. अर्थात अशा आघाड्या वा युती मैत्री निवडणूकीच्या काळापुरत्या मर्यादित असायच्या. मतदान संपून निकाल आले, मग हेच समाजवादी असलेली वा गुण्यागोविंदाने चाललेली आघाडी मोडावी कशी, या कामाला लागायचे. ती संयुक्त महाराष्ट्र समिती असो, किंवा जनता पक्ष असो. जुळवायचे आणि मोडायचे, हा समाजवादी राजकीय छंद होता. मोडायला अनेक पक्षांची आघाडी नसेल तर ही मंडळी आपल्याच पक्षाचे तुकडे पाडायला कायम सज्ज असायची. त्यातले काहीजण कंटाळून स्थीर राजकारण करायला कॉग्रेसमध्ये दाखल व्हायचे आणि नव्याने भरती झालेले समाजवादी, तितक्याच आवेशात आघाडी करून कॉग्रेसला सत्तेबाहेर हाकलण्याच्या डरकाळ्या फ़ोडत रहायचे. आजकाल त्यांच्या विविध फ़ांद्या डहाळ्या जनता दल वा तत्सम नावाने वळवळताना दिसतील. फ़रक इतकाच पडलेला आहे, की चारपाच दशकापुर्वी कॉग्रेसमुक्त राजकारणाचे हे व्रतस्थ लोक, आता देशाला भाजपामुक्त करण्यासाठी कुठल्या कसल्याही आघाड्या बनवून आपले अस्तित्व टिकवण्याच्या विवंचनेत असतात. मग त्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करायला त्यांना किंचीतही धाकधुक वाटत नाही. ह्याच विरोधाभासामुळे त्या काळात मी माझ्या गीतामध्ये ‘माथेफ़िरू अन समाजवादी, कॉग्रेसला पर्यायी आघाडी’ अशी अतिशयोक्ती केली होती. पण आज भाजपा विरोधात ही मंडळी माझे शब्द साक्षात खरे करायलाही कटीबद्ध झाली आहेत ना? तसे नसते तर त्यांनी इमरान खान, जिहादी दहशतवादी वा पाकिस्तानची वकिली त्यांनी कशाला केली असती?
ज्या समाजवादी मंडळींनी बालपणी सेवादलात जाज्वल्य देशप्रेमाची गीते म्हणून राजकीय वाटचाल सुरू केली; त्यांना आज देशभक्ती, राष्ट्रवाद हे शब्द शिवी वाटायला लागले असतील, तर माझी अतिशयोक्ती खरी ठरली म्हणायची ना? तेव्हा जिहाद वा दहशतवाद आजच्या इतका बोकाळला नव्हता, की माथेफ़िरू कारवाया इथे चालू नव्हत्या. उलट तात्कालीन मार्क्सवादी वा कम्युनिस्टांच्या परदेशी (रशिया-चीन) निष्ठेवर पहिली शंका घेणारे समाजवादी असायचे. आज त्यांचेच वंशज जेव्हा दहशतवाद किंवा जिहादींचे समर्थन करण्यापर्यंत देशहितालाच चुड लावायला मागेपुढे बघत नाहीत, तेव्हा माझी अतिशयोक्ती खरी करतात ना? फ़रक इतकाच, की तेव्हाचे समाजवादी कॉग्रेसचा पराकोटीचा द्वेष करून त्यासाठी कोणाशीही हातमिळवणी करायला सज्ज असायचे. मुंबईत कम्युनिस्टांना हरवण्यासाठी शिवसेनेशी आघाडी करणारा पहिला पक्ष प्रजा समाजवादी पार्टी व नेता मधू दंडवते होते. पुढल्या काळात कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर तेच समाजवा़दी कम्युनिस्टांच्या समर्थनाला उभे ठाकले. कॉग्रेसची सत्ता घालवण्यासाठी नंतर त्यांनी अनेकदा संघप्रणित जनसंघ वा भाजपाशीही हातमिळवणी केली. आता तर घटना व देश धाब्यावर बसवणार्या पाकिस्तानवादी हुर्रीयत वा आझादी बोलणार्यांशीही हातमिळवणी करण्यापर्यंत मजल गेली आहे. फ़रक फ़क्त कॉग्रेसच्या जागी भाजपचा द्वेष सुरू झाला आहे. तेव्हा ज्या कॉग्रेसला पर्याय म्हनून राजकारण चाललेले होते, त्याच कॉग्रेसला आता भाजपा़चा पर्याय बनवण्यासाठी त्या समाजवाद्यांचे वंशज धडपडत आहेत. मग प्रश्न पडतो या लोकांचे जगण्यात ध्येय तरी कुठले आहे? त्याचेही एक समाजवादी गाणे आहे. ‘समाजवादी साथी गाती एका आवाजात’, अशा या गीतामध्ये एक ओळ म्हणते, ‘ध्येय आमुचे हे ठरले, कार्य दुसरे ना उरले’. थोडक्यात तेही शब्द खरे ठरले आहेत, ध्येय ठरले की काम उरले नाही, म्हणून आळस करायचा. कधीकाळी एसेम, लोहिया, नरेंद्र देव अशा दिग्गजांची ही आजची पिढी इतकी भरकटून गेलेली दिसली मग खंत वाटते. आजही महागठबंधन म्हणून तेच चालू नाही काय? थोडक्यात महागठबंधन म्हणजे काय?
माथेफ़िरू अन समाजवादी, भाजपाला पर्यायी आघाडी
समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. तरीही माझ्याकडून थोडासा प्रयत्न:
ReplyDelete१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
ReplyDelete१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८० ते १९८७ दरम्यान कधीतरी देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की.
या समाजवादी (आणि डाव्यासुध्दा) विचारांच्या पक्षांची मजाच वाटते. स्वातंत्र्यानंतर पहिली अनेक वर्षे काँग्रेसविरोधी जवळपास सगळी जागा या पक्षांनी व्यापली होती. जनसंघ हा एक मार्जिनल पक्ष होता.पण काँग्रेसला विरोध करणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने (त्याच्यावर कितीही विश्वास नसेल तरी) आपल्यावरच टाकली आहे असा स्वत:च गैरसमज करून घेतल्याने सुरवातीला काँग्रेसला रोखायला म्हणून जनसंघ आणि नंतर भाजपशी हातमिळवणी करण्यात यांना काही गैर वाटले नाही. १९६७ मध्ये राममनोहर लोहियांनी जनसंघाला काँग्रेसविरोधी आघाडीत घेतले. त्यापूर्वी लोकसभेत ३,४ आणि १० जागा मिळविणारा जनसंघ १९६७ मध्ये एकदम ३५ वर गेला. अनेक राज्यात सरकारमध्ये जनसंघ सामील झाला. १९७० च्या दशकात जयप्रकाश नारायणांनी परत तीच चूक केली. जनसंघाला त्यांनी इंदिराविरोधी आंदोलनात नुसते सामील करून घेतले नाही तर जनसंघ फासिस्ट असेल तर मी पण फासिस्ट आहे असे ते जाहीरपणे म्हणाले.
ReplyDeleteसमाजवाद्यांचा जन्म गेला एकमेकांशी भांडण्यात. समाजवादी विचारांच्या पक्षांमध्ये आतापर्यंत किती वेळा फूट पडली असेल आणि ते किती वेळा एकत्र आले असतील याची मोजणी करणे कोणाही मर्त्य मानवाला शक्यच नाही. आणि काँग्रेसविरोधाच्या नावावर ज्या जनसंघ-भाजपशी हातमिळवणी केली तो पक्ष मात्र केडर बेस्ड आणि एकजिनसी. सतत भांडून भूस पाडणाऱ्या पुरोगाम्यांपेक्षा जनतेला जनसंघ-भाजप विरोधी पक्ष म्हणून अधिक विश्वासार्ह वाटले असतील तर त्यात काहीही आश्चर्य नाही. त्यातून झाले असे की या पुरोगाम्यांनी जनसंघ-भाजपचा उंट आपण होऊन आपल्या तंबूत घेतला आणि स्वत:लाच तंबूबाहेर पडायची वेळ त्यांच्यावर आली.
नंतर भाजप मोठा झाल्यावर भाजपला रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने केवळ आपल्यावरच टाकली आहे असा गैरसमज परत एकदा पुरोगाम्यांनी करून घेतला आणि भाजपविरोधात काँग्रेसशी बिनदिक्कत हातमिळवणी केली. १९९६ मध्ये काँग्रेसला १४० जागा होत्या तर संयुक्त आघाडीतील सर्वात मोठ्या जनता दलाला ४५. अशावेळी काँग्रेसला सरकार स्थापन करायला लावून यांना बाहेरून पाठिंबा देता आला नसता का? पण कुठचे काय. भाजपला रोखणे ही केवळ आपलीच जबाबदारी असा गैरसमज करून घेऊन हे सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग लावून तयार होतेच. नंतरच्या काळात यांच्या मर्यादा उघड झाल्या पण काँग्रेस मात्र बऱ्यापैकी एकजिनसी पक्ष होता. त्यामुळे पूर्वी यांना मिळणारी भाजपविरोधी मते झपाट्याने काँग्रेसकडे गेली आणि यांच्या हाती धुपाटणेही आले नाही.
सुरवातीला काँग्रेसविरोधात जनसंघ-भाजपशी हातमिळवणी करून या पुरोगाम्यांनी आपले प्रमुख विरोधी पक्ष हे स्थान गमावले. आता भाजपविरोधात काँग्रेसशी हातमिळवणी करून हे पुरोगामी आपल्या राजकारणातील स्थानावरच घाला घालत आहेत. पूर्वी स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांचा परिणाम म्हणा की समाजवाद या अफूच्या गोळीचे आकर्षण भारतीयांना पहिल्यापासून होते या कारणाने म्हणा हे समाजवादी लोक राजकारणातून पूर्ण हद्दपार झाले नव्हते. पण आता परिस्थिती बदलली आहे. यापुढे हे लोक राजकारणातून पूर्ण नामशेष झाले तरी आश्चर्य वाटू नये.
🙏
DeleteGirish Sir, Well done. Excellent
ReplyDeleteजंबोजेट हे गाणे आम्ही सेवादलात असताना (१९७७-२०००) आमचे आवडते गाणे होते. आजही माझ्या कुटुंबियांच्या संमेलनात/सहलीला हे आवर्जून म्हणले जाते.
ReplyDeleteमात्र त्यातील 'समजावादी' लोकांवर असलेले कडवे मला आजच कळले. सेवादलात ते म्हटले जात नसे.
गिरीशभाऊ,
ReplyDeleteतुम्हाला
_/\_
समाजवादी फक्त आपल्या देशातच नष्टप्राय होत आहेत असे अर्धसत्य आहे. सर्व जगात हीच स्थिती आहे. आता नाव घेण्यासारखा समाजवादी विचारवंत अथवा बहुसंख्य लोकांना हवा असलेला समाजवादी राजकीय नेता जगात नाही. मग त्यात आपला देश अपवाद नाही. दुसऱ्या महायुध्दानंतर युरोपातील अनेक देश समाजवादी झाले. त्या सर्वांनी आता समाजवादाचा तिलांजली दिली. महाराष्ट्रातील समाजवाद्यांना स्वतःचा पक्ष उरला नाही. जनता दल सेक्युलर हा कानडी व्यक्तींना प्राधान्य देणारा आहे. मराठी समाजवादी राजकारणात कुठेही नाही. मुलायम+अखिलेश चा समाजवादी पक्ष हा नावाने समाजवादी आहे.
ReplyDeleteComments by Girish are detail and realistically true.
ReplyDeleteगिरीष जी छान माहिती दिलीत... धन्यवाद
ReplyDeleteसमाजवाद्यांची पद्धत George Orwell च्या Animal Farm मध्ये वर्णन केलेल्या प्राण्यांच्या पद्धतीसारखी आहे.
ReplyDeleteज्या पक्षाचा जन्मच प्रतिक्रियावादातून झाला त्यांनी हा प्रतिक्रियावाद टोकाला नेऊन ठेवला आहे. जनसंघ आणि भाजपमध्येही प्रतिक्रियावाद सापडे, पण तो आपद्धर्म म्हणून आला होता. मुळात जन्म प्रतिक्रियावादातून झाला नव्हता. मोदींनी विशेष करून प्रतिक्रियेचे मुद्दे back burner वर नेले आणि विकासवाद विशेषत्वाने front burner वर आणला.
ReplyDelete