कुठलाही डॉक्टर तुमच्यावर तेव्हाच उपचार करू शकतो, जेव्हा तुम्ही त्याच्याशी सहकार्य करायला राजी असता. त्याच्याही आधी तुम्ही आपण आजारी आहोत किंवा बाधित असल्याचे मान्य करावे लागते. तरच पुढली प्रक्रीया सुरू होत असते. पण कितीही घातक आजाराच्या विळख्यात सापडलेले असताना तुम्ही सुदृढ निरोगी आहोत म्हणूनच टेंभा मिरवित असाल, तर पुढली प्रक्रीया सुरूच होत नसते. आज कॉग्रेस नेमक्या तशाच आजाराने ग्रासलेली आहे. कारण त्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला आजार जाणवतो आहे आणि चिंता आहे. पण वरीष्ठ नेतृत्व किंवा श्रेष्ठी म्हणून मिरवणार्यांना मात्र पक्षाच्या इतक्या दुर्दशेचे भानही आलेले नाही. म्हणून लोकसभेत दारूण पराभव झाल्यावरही राहुल गांधी राजिनाम्याचा खेळखंडोबा करून बसले आहेत. इतर ज्येष्ठ नेते पर्याय वा उपाय शोधण्यापेक्षा राहुलची मनधरणी करण्यात वेळ वाया दवडत आहेत. अनेक राज्यातले स्थानिक नेते पक्षात भवितव्य नसल्याने अन्यत्र आसरा शोधू लागले आहेत. काही राज्यातले नेते एकमेकांच्या उरावर बसत आहेत आणि दिल्लीतले श्रेष्ठी नेहरू खानदानाच्या राजपुत्राचा रुसवा काढण्यात गर्क आहेत. राहुलच्या जागी प्रियंका गांधींना आणले, तर काही फ़रक पडू शकेल; अशीही काही कॉग्रेस चहात्यांची आशा आहे. पण रायबरेलीत आईच्या विजयासाठी पोहोचलेल्या प्रियंकांनी उधळलेली मुक्ताफ़ळे त्यांच्या गुणवत्तेची वा नेतृत्वगुणांची साक्ष देत नाहीत. उलट ती राहुलची सख्खी बहिण असल्याची खातरजमा होते. त्यांनाही अजून कॉग्रेसी ‘दिग्विजय’ विसरता आलेला नाही. सात वर्षापुर्वी दिग्विजय सिंग यांनी चमचेगिरी म्हणून जे बोललेले होते, ते प्रियंकाचे बाळकडू असल्याचे यातून लक्षात येते. कारण त्यांनी अमेठीसह उत्तरप्रदेशातील पराभवाचे खापर कार्यकर्त्यांवर फ़ोडलेले आहे. तेच तर कॉग्रेसी र्हासाचे मुळ कारण आहे. पण बोलायचे कोणी?
२००९ सालात कॉग्रेसला अकस्मात उत्तरप्रदेशात २१ लोकसभेच्या जागा जिंकता आल्या आणि तिथे उथळ प्रचार करणार्या राहुल गांधींना त्याचे श्रेय देण्याची स्पर्धा सुरू झालेली होती. त्या यशाचे विश्लेषण झाले नाही, की मिमांसा करायची गरज कुणाला वाटलेली नव्हती. मग त्याचे श्रेय राहुलना देऊन उत्तरप्रदेशात एकहाती पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या वल्गना सुरू झाल्या. त्यासाठी संघटना व कार्यकर्त्यांची फ़ौज लागते, त्याचे कोणालाही भान नव्हते आणि राहुलही त्यात फ़सत गेले. दिग्विजयसिंग यांच्यासोबत राहुलनी चार पहिने उत्तरप्रदेशात मुक्काम ठोकला आणि प्रचाराची धमाल उडवून दिलेली होती. मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणूका होऊन निकाल लागले, तेव्हाच राहुलसह कॉग्रेसचे पाय जमिनीला लागले होते. कारण २१ खासदार निवडून आलेल्या कॉग्रेसला विधानसभेत २४ जागा कशाबशा मिळाल्या होत्या. अगदी अमेठी व रायबरेलीतही दहातले चार आमदार कॉग्रेसला निवडून आणणे शक्य झालेले नव्हते. पण ते मतदान संपले आणि मतचाचण्यांचे अहवाल समोर आले; तेव्हा दिग्गीराजा काय म्हणाले होते? आठवते कुणाला? उत्तरप्रदेशात कॉग्रेस जिंकली, तर त्याचे श्रेय राहुल गांधींना असेल आणि पराभव वाट्याला आला, तर दोष कार्यकर्त्यांचाच असेल. ही कॉग्रेसची रणनिती आहे. तिथे नेता विजयी होत असतो आणि पराभवाचा धनी कार्यकर्ता असतो. प्रियंकांनी काय वेगळी मुक्ताफ़ळे उधळली आहेत? त्यांनीही अमेठी मतदारसंघात राहुलचा पराभव झाला, त्याचे खापर कार्यकर्त्यांच्या माथी फ़ोडले आहे आणि रायबरेलीतल्या विजयाचे श्रेय मात्र आपल्या मातोश्री सोनिया गांधींना दिलेले आहे. जो नियम अमेठी रायबरेलीला असतो, तोच देशभरासाठी लागू होतो ना? देशभर कॉग्रेसचा धुव्वा उडाला, तर त्याला राहुल गांधी वा नेत्यांना जबाबदार धरता येत नाही. नालायक कार्यकर्ता असतो ना? मग अशा नालायकांनी त्या पक्षात थांबावे कशाला? बहुतेक कॉग्रेसजन अन्यत्र म्हणूनच जात असावेत.
कार्यकर्ता किंवा स्थानिक नेतृत्व हे आपापल्या व्यक्तीगत स्वार्थ किंवा हेतूसाठी एखाद्या पक्षात सहभागी होत असतात. त्यांच्या हेतूला प्राधान्य देणारा पक्ष आपोआपच अशा कार्यकर्त्यांच्या कामातून आकार घेत असतो. काही लोक ठराविक विचारसरणी वा नितीमूल्यांसाठीही अशा पक्षाच्या संघटनेत सहभागी होत असतात. त्यांचे स्वार्थ व हेतूंना पुढे घेऊन जाणारा नेता, त्यांना जवळचा वाटतो आणि आपोआप अशा नेत्याचा पक्ष त्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी आपला पक्ष बनुन जातो. त्यातले व्यक्तीगत स्वार्थ जपले जातात, त्यातून पक्षनेते व पक्षाशी बांधिलकी तयार होत असते. त्यातले कहीजण पुढे वरच्या पायर्या चढत उच्चस्थानी पोहोचतात आणि जितका लोकांचा गोतावळा भोवती अधिक तितकी नेत्याची पातळी उंचावत जाते. ज्या नेत्याच्या मागे अशी गर्दी लोटते, त्याला लोकप्रिय नेता म्हणतात आणि अशाच नेत्याकडे स्थानिक नेते कार्यकर्त्यांचा ओढा असतो. अलिकडे अनेक राज्यातील नेते आमदार वा लोकप्रतिनिधी कॉग्रेस सोडून भाजपात दाखल होत आहेत. त्यामागे तीच कारणे आहेत. त्या नेत्यांना आपले स्वार्थ साधायचे असतात आणि त्याचवेळी स्थानिक हेतूही असतात. लोकसभेच्या संपलेल्या निवडणूकीत बंगालमध्ये भाजपाने मुसंडी मारल्यावर तिथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाला १२८ जागी आघाडी मिळालेली आहे. तिथे आधीच आमदार असलेल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात पराभवाची धडकी भरणे स्वाभाविक आहे. मग ज्या बाजूने वारे वहात असतात, तिकडे असा नेता आमदार वळतो. कारण अशा आमदाराला आपली जागा कायम राखायवी असते. तृणमूलमध्ये राहुन आमदारकी जाणार असेल, तर ममतांवरील निष्ठेसाठी तो आमदार पक्षात थांबत नाही. कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांच्या या गरजा ओळखणार्या वरीष्ठ नेत्यांनाच राष्ट्रीय वा प्रादेशिक नेतृत्व मिळवता येते, किंवा टिकवता येते. ठराविक घराण्यात जन्माला आल्याने प्रियंका थेट नेता झाल्यात त्यांना हे बारकावे ठाऊक असायचे कारण नाही.
रायबरेली वा अमेठीसह अनेक मतदारसंघातील मतदार यांच्याशी आपले नाते असल्याचे प्रियंका नेहमी भाषणातून बोलतात. त्याचा अर्थ कसा लावायचा? तर आपण गांधी खानदानात जन्म घेतल्याने नेतृत्व किंवा जिंकण्यासाठीची उमेदवारी करण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असे प्रियंकांना वाटत असते. त्यासाठी तिथल्या मतदार वा कार्यकर्त्याने कुठलीही अपेक्षा न बाळगता आपल्यासाठी राबावे, असेही त्यांना प्रामाणिकपणे वाटत असते. पंधरा वर्षे राहुल अमेठीचे प्रतिनिधीत्व करीत होते आणि तब्बल दहा वर्षे त्यांच्याच हाती देशाची सत्ता होती. तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कुठलीही मोठी योजना राबवली नाही. शरद पवार किंवा अन्य कुठलाही नेता आधी आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणून तिथल्या मतदारामध्ये आपले हितसंबंध निर्माण करतो. कारण त्याला वारंवार निवडून यायचे असते. पण रायबरेली वा अमेठीतल्या लोकांना तसे काही बघायला मिळाले नाही. कारण तिथून कोणी गांधी खानदानाचा वारस उमेदवारी करतो, हेच जणू त्यांच्यावरचे उपकार असल्याची धारणा राहुल वा प्रियंका यांच्यामध्ये असावी. अन्यथा पराभवानंतर प्रियंकानी कार्यकर्ते मतदारावर तोंडसुख घेण्याची हिंमत केली नसती. अमेठी पंधरा वर्षे उजाड राहिल्याची कुठलीही खंत खेद प्रियंकापाशी नव्हता. पण वाराणशीत गंगायात्रा केल्यावरही त्या मोदींनी पाच वर्षात त्या मतदारसंघासाठी काय केले, असा प्रश्न बेधडक विचारत होत्या. त्यातून जनता मुर्ख असल्याचीच खात्रीच त्यांनी व्यक्त केली नाही काय? अशा नेत्याकडून संघटना उभारली जाणे, किंवा चालवली जाणे शक्य नसते. निवडणूकीच्या मुहूर्तावर टपकायचे आणि निकालानंतर गायब व्हायचे; अशा खुशालचेंडू नेतृत्वाकडून असलेला पक्ष जमिनदोस्त होतो. संघटनात्मक काम त्यांच्याकडून होण्याची अपेक्षा कोणी बाळगू शकत नाही. प्रियंकाने म्हणूनच आपण राहुलची सख्खी बहिण असल्याचीच खात्री दिलेली आहे.
कुठल्याही अपेक्षेविना इतकी वर्षे अमेठी-रायबरेली वा अन्य जागी कॉग्रेस वा गांधी खानदानाला लोकांनी पुर्वजांची पुण्याई म्हणून प्रतिसाद दिलेला होता. त्याची कदर करण्याचीही कुवत नसलेली प्रियंका गांधी, ही उत्तरप्रदेशात कॉग्रेसला गाळातून बाहेर काढू शकेल अशी कोणाची अपेक्षा असेल; तर गोष्ट वेगळी. कारण मग योगेंद्र यादव यांची इच्छाच गांधी घराणे पुर्ण करण्याची खात्री देता येईल. निकाल लागल्यानंतर यादव सात्विक संतापाने म्हणाले होते, कॉग्रेस मरावी असेच त्यांना वाटते. अर्थातच ते त्यांच्यासारख्यांचे व्यक्तीगत दुखणे आहे. अशा अनेक पुरोगाम्यांना स्वत: काही करता येत नाही आणि त्यांच्या अपेक्षा दुसर्या कोणीतरी पुर्ण कराव्यात, म्हणून कायम ते आशाळभूतपणे प्रतिक्षेत असतात. भाजपा किंवा संघाला पर्याय होण्याची त्यांच्यात क्षमता नाही, की मेहनतीची तयारी नाही. कॉग्रेससारखा शतायुषी पक्ष त्यांच्यासाठी काही करील, अशीही शक्यता नाही. कारण हेच पाच वर्षापुर्वी झालेले होते. हेमंत विश्वशर्मा हा कॉग्रेसनेता आसाममध्ये कॉग्रेसला पुन्हा उभी करण्याचा आग्रह घेऊन राहुलना भेटायला आला असताना, त्याचे ऐकण्यापेक्षा राहुल लाडक्या कुत्र्याला बिस्कीटे खिलवत बसले. म्हणून हा आसामी नेता पिसाळला. आसाम व पुर्व भारतातून कॉग्रेस नामशेष करण्याचा विडा त्याने उचलला. तेच गोव्यातील विश्वजीत राणे यांच्या बाबतीत झाले. त्यांच्या वेदना राहुलना उमजल्या नाहीत आणि प्रियंकाला आज उत्तरप्रदेशच्या कॉग्रेसजनांचे दुखणे समजत नाही. मात्र त्यांनीच कॉग्रेसचा जिर्णोद्धार करावा असा अट्टाहास आहे. मग दुसरे काय व्हायचे? गांधी घराण्याला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस नसलेल्या पक्षाला मरावेच लागेल. किंवा अन्य कोणाला त्यापासून वेगळे होऊन नव्याने त्या पक्षाला पुनर्जिवीत करावे लागेल. सध्या तरी कॉग्रेसमध्ये तसा कोणी मायका लाल दिसत नाही. नव्याने कॉग्रेस उभी करायची तर पाय जमिनीवर हवेत आणि सोनिया प्रियंका वा राहुलना पाय जमिनीला लावायचेच नसतील, तर कॉग्रेसचे काय व्हायचे?
प्रियंकाची कुवत ती जेव्हा काॅंगरेस वोटकटाउ पक्ष आहे म्हनाली तेव्हाच कळाली लोकांना.नेताच अस म्हनत असेल तर कोण मत देइल?
ReplyDeleteप्रियांका बहुतेक फारच निर्मळ मनाच्या असाव्यात म्हणून असं बोलल्या 😝😝
Deleteफोटोत पण काय प्रकार आहे दिसतच आहे.किती मॅच्युअर आहे ते
ReplyDeleteSonia, Rahul ani aata Priyanka yanni Congress la sampawaychech manapasun tharawale asel tar kon kay karu shakel?
ReplyDeleteWhat is PMP?
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteराष्ट्रवादी काँग्रेस ची वाटचाल आणि इथून पुढचे राजकारण कसे राहील...जेष्ठ नेते शरद पवार ह्यांचा राजकीय वारसा कोण चालवेल ह्याबद्दल आपले विचार ऐकायला आवडेल...
धन्यवाद
"जमिनीवर कधी येणार?" उत्तर सोपे आहे! जामीन रद्द झाल्याशिवाय जमिनीवर येणे शक्य नाही!!
ReplyDeleteअमेठीच्या जनतेला राहुल गांधी पराभव होताच All the best म्हणून झटकतो, तेव्हा त्याला तीन वेळा खासदार करणाऱ्या जनतेची कीव येते. People get the government, they deserve हेच खरे!
ReplyDelete