हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहां दम था,
मेरी कश्ती वहां डूबी, जहां पानी कम था !
गेल्यावर्षी मे महिन्यात कर्नाटकामध्ये भाजपाचे अल्पमताचे सरकार संपुष्टात् आले आणि तिथे कॉग्रेस सेक्युलर जनता दलाचे सरकार स्थापन झाले्. तेव्हा देशभरातल्या पुरोगामी पत्रकार व माध्यमांना महागठबंधनाचे डोहाळे लागलेले होते. विगरभाजपा पक्षाचे तमाम नेते कुमारस्वामी यांच्या शपथविधीला मंचावर हात उंचावून उभे राहिल्याचे बघून; अनेक राजकीय विश्लेषकांना उचंबळून आलेले होते. आता मोदी सरकार २०१९ मध्ये संपलेच, याची हमीपत्रे लिहून द्यायला अनेकजण उतावळे झाले होते. जणू तिथे देवेगौडापुत्र कुमारस्वामींच्या कॉग्रेस पुरस्कृत संयुक्त सरकारचा शपथविधी होत नसून, २०१९ च्या मे महिना अखेरीसचा राहुल गांधींना पंतप्रधान पदाची शपथ देण्याचाच सोहळा साजरा होत असल्यासारखे, अनेक उतावळे टिव्ही एन्कर भाष्ये करीत होते. अशावेळी मलाही एबीपी माझा या वाहिनीवर आमंत्रण मिळाले होते. ते गठबंधन फ़ारकाळ टिकणार नाही अशी भविष्यवाणी मी केल्यावर तिथला निवेदक प्रसन्ना जोशी कमालीचा कळवळला होता. ‘कशाला भाऊ नवजात अर्भकाच्या नरडीला नख लावता? असा सवाल त्याने मला त्याच चर्चेत केलेला होता. तेव्हा मी त्याला व उपस्थितांना समजावण्याचा माझ्यापरीने खुप प्रयत्न केला. पण समजून घेणे त्यांच्या हाती होते, माझ्या नव्हते. मी त्याला इतकाच खुलासा दिला होता, की अर्भकाच्या नरडीला कोणी बाहेरचा येऊन नख लावित नाही. त्याची जन्मदाती आई, मावशी, आजी किंवा सुईण कोणी असते, तेच ते पापकर्म करतात. इथेही गठबंधनातलेच कोणी त्याच्या सत्तेला नख लावतील आणि आजवर असेच होत आलेले आहे. यावेळीही अपवाद होण्यासारखी स्थिती नाही. तेव्हा माझे शब्द त्यांनी वा इतरांनी समजून घेतले असते, तर त्यांना आजकाल कर्नाटकात रंगलेल्या जीवघेण्या नाटकाचे नवल नक्कीच वाटले नसते. मला तरी यापेक्षा काही वेगळे होईल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. कारण कर्नाटकचा हाच चार दशकांचा इतिहासही आहे ना? सिद्धरामय्या त्यातला खरा सुत्रधार आहे.
काल मंगळवारी विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. भारत न्युझिलंड असा तो सामना होता. पण् हे दोन संघ मुळातच उपांत्य फ़ेरीत कसे काय पोहोचले? आपल्याकडल्या पुरोगामी सिद्धांतानुसार श्रीलंका किंवा बांगला देश, पाकिस्तानही फ़ेरीत पोहोचायला हवा होता. कारण अशा वगळल्या गेलेल्या अन्य सहा संघांच्या गुणांची बेरीज केल्यास ती भारत, इंग्लंड वा न्युझिलंडपेक्षाही अधिक होती ना? ज्याप्रकारे कर्नाटकात गतवर्षी बेरजेला लोकशाही ठरवून सरकारची स्थापना करण्यात आली, किंवा भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यामागचे राजकीय तर्कशास्त्र तयार करण्यात आले होते, त्यानुसार पाकिस्तान वा दक्षिण आफ़्रिकेलाही उपांत्य फ़ेरीत खेळायला मिळालेच पाहिजे ना? कारण अशा पराभूत संघांच्या गुणांची बेरीज एकेकट्या भारत वा न्युझिलंडपेक्षाही अधिक आहे. वास्तवात ही शुद्ध फ़सवेगिरी आहे आणि तीच बंगलोरला चालली होती. त्याचे परिणामही अपरिहार्य होते. ते सरकार आपल्याच भाराने कोसळण्याला पर्याय नव्हता. त्या सरकारच्या नरडीला भाजपाने किंवा येदीयुरप्पांनी नख लावण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा आई सुईण वा मावशी ते काम करतील, त्यांना भाजपाने मदत देण्याची वेळ येण्यापर्यंत प्रतिक्षा करायची गरज होती. खुद्द त्या सरकार स्थापनेतले अर्भक कुमारस्वामीही तेच सांगत होते. आपल्या शपथविधीनंतर राहुल गांधींचे उपकार मान्य करताना कुमारस्वामींनी राहुलना पुण्यात्मा संबोधले होते. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तेच कुमारस्वामी म्हणाले होते, पुढल्या वर्षी लोकसभेचे निकाल लागण्यापर्यंत आपले मुख्यमंत्रीपद शाबूत असेल. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच होता, की निकाल कुठल्याही बाजूने लागले तरी त्यानंतर आपले सत्तास्थान धोक्यात असेल, हे कुमारस्वामींनाही कळत होते. त्यांनी ते बोलूनही दाखवले होते. मात्र गठबंधनाच्या प्रेमात पडलेल्या शहाण्यांना ते कळत नव्हते, की ऐकायचेही नव्हते.
गोष्ट साधीसरळ आहे, भाजपा पुन्हा लोकसभेत जिंकला व कॉग्रेसने मार खाल्ला, तर कर्नाटकातही आपल्याला भाजपा सुखनैव कारभार करू देणार नाही. त्यात आपलेच सहकारी भाजपाला फ़ितूर होतील, हे त्यांना कळत होते. किंवा उलट भाजपां व मोदींनी सत्ता गमावली, तर सत्तेपर्यंत पोहोचलेला कॉग्रेस पक्ष मुजोर होऊन, आपल्याला मुख्यमंत्रीपद सोडायला भाग पाडेल, याचीही त्यांना पुर्ण खात्री होती. म्हणजेच कुठूनही कर्नाटकातले कुमारस्वामी सरकार हा लोकसभा मतदान व निकालापर्यंतचाच खेळ असल्याचे मुख्यमंत्र्यालाही पक्के ठाऊक होते. कारण देशात अशी तत्वशून्य आघाडी वा सरकारे फ़ारकाळ तगलेली नाहीत. आपसातल्या बेबनावाने जमिनदोस्त होत राहिली आहेत, हा इतिहास आहे. बाकीची राज्ये वा केंद्रातली गोष्ट सोडा. कर्नाटकातही त्या इतिहासाचे अनेक अध्याय आहेत आणि देवेगौडा किंवा कुमारस्वामीही त्यातल्या विविध भूमिका पार पाडलेले महान कलावंत आहेत. पण हे सत्य बघायची तयारी असली पाहिजे. डोळे मिटून घ्यायचे आणि कल्पकुक्कूटाच्या आरवण्यानेच सुर्य उगवणार म्हणून प्रतिक्षा करीत बसायचे. यातून सरकारे चालत नाहीत की कुठल्याही सत्याचा अविष्कार होऊ शकत नाही. किंबहूना त्या शपथविधीतच विद्रोहाची बीजे पेरली गेलेली होती आणि तिथे ती साफ़ दिसतही होती. पण गठबंधनाच्या डोहाळजेवणाने आहारलेल्यांना ती बीजे बघायला वेळ कुठे होता? भान कुठे होते? त्यांना शपथविधीच्या मंचावर हात उंचावून उभे असलेले देशभरचे विरोधी नेते दिसत होते. कारण तितकेच बघायचे होते. पण मंचाच्या खाली बसलेला एक सर्वात महत्वाचा त्याच नाटकाला कलाटणी देऊ शकणारा कलाकार कोणी बघितलाच नव्हता. त्याचे नाव होते सिद्धरामय्या. ज्या ७८ कॉग्रेस आमदारांच्या पाठबळार कुमारस्वामी सत्ता उपभोगणार होते, त्यांचा बोलविता धनी मंचावर नसेल, तर नाटक कितीकाळ चालू शकणार होते?
कुमारस्वामी यांच्या त्या शपथविधीने किंवा राज्यरोहणाने सर्वाधिक दुखावलेला कानडी नेता तेव्हा तरी येदीयुरप्पा अजिबात नव्हता. कारण त्याचे मुख्यमंत्रीपद गेलेले असले तरी संख्येअभावी ते आपल्याला आताच मिळू शकत नाही, ह्याविषयी त्याच्या मनात शंकाच नव्हती. पण सेक्युलर जनता दलाच्या खात्यात आपल्या निम्म्याने आमदार नसतानाही त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याने निराश व प्रक्षुब्ध असलेला एकच नेता होता, तो त्या क्षणापासून सत्ता गमावलेला सिद्धरामय्या. कुठल्याही राजकीय आघाडीत अधिक संख्या असलेल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळत असते. चौदा वर्षापुर्वी म्हणून तर लहान पक्ष असलेले सिद्धरामय्या जनता दलातर्फ़े उपमुख्यमंत्री झालेले होते. मग त्याच निकषावर आताही त्यांचाच सत्तेवर अधिकार होता. पण् तेव्हा उपमुख्यमंत्रीपद हिरावून घेणार्या कुमारस्वामीने आता मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलेले बघताना सिद्धरामय्या खवळलेले असतील, तर नवल कुठले? पण त्यांच्या जखमा चाटण्याकडे बघायला दिपलेल्या पुरोगामी डोळ्यांना सवड कुठे होती? सगळे कुमारस्वामींच्या डोहाळजेवणात रंगलेले होते आणि मंचाखाली बसून सिद्धरामय्या घातपाताची योजना मनोमन आखत होते. ती योजना अंमलात आणण्यासाठी त्यांना वर्षभराची व लोकसभा निकाल लागण्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली आहे. पण ‘अपना टाईम आयेगा’ अशी प्रतिक्षा करीत बसलेल्या सिद्धरामय्यांनी अखेरीस सूड घेतला आहे. एकट्या कुमारस्वामी वा देवेगौडाच नव्हेत तर राहुलसह कॉग्रेस पक्षालाही कर्नाटकात नाक खाली घालायची वेळ आणलेली आहे. कारण तिथे रंगलेल्या नव्या नाटकाची पात्रे भलतीच दिसत असतील. पण त्याचा खरा सुत्रधार सिद्धरामय्याच आहेत. याक्षणी येदीयुरप्पा मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती कॉग्रेसच्या याच माजी मुख्यमंत्र्याने आणलेली आहे. विश्लेषक मात्र ऑपरेशन कमल म्हणून उर बडवित बसले आहेत. कारण त्यांना इतक्या उथळ पाण्यात गठबंधनाची बौका कशी बुडाली, त्याचा पत्ता लागलेला नाही. मग बुडवणारा तरी कसा समजवा? (अपुर्ण)
नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे...
ReplyDeleteराहुल बाबा हेच खेळला...
सिद्धरामय्या हेच खेळतोय...
एवढेच कशाला, वरील फोटो मधील सगळे, हेच तर खेळले आहेत.
म्हणून तर जनतेने मोदींना संधी दिली.
क्रिकेटचे उदाहरण अफलातून भाऊ !
ReplyDeleteशेवटी रामय्यानं सिद्धी दाखविलीच
When you take name of ABP Joshi ,we loose our calm and want to kick him for his antinational and anti Hindu views.H should be next Wagle
ReplyDeleteसर्वात अधीक जागा जिंकलेल्या आणि बहुमत नसलेल्या पक्षाला सत्ता न देण्यासाठी केलेली आघाडी आपल्याकडे अनेक झालेल्या आहेत. 1989 मध्ये काँग्रेसला सर्वाधीक जागा असून बहुमत नसल्यामूळे विपि सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल+भाजप+डावी आघाढी मिळून राष्ट्रीय आघाडी (Natonal Front) लोकसभेत स्थापन झाली होते. त्याआधी 1967 च्या विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि बिहार येथे अशाच आघाड्या केल्या होत्या. त्या आघाड्यांचे नाव पण लोक विसरून गेले आहेत. त्यानंतर लोकसभेत भाजपला दूर ठेवण्यासाठी 1989 मध्ये देवेगौडा+गुजराल यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडी स्थापन झाली होती. 2013 मध्ये दिल्लीमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी आप+काँग्रेस अशी आघाडी झाली होती. यातल्या किती आघाड्या 2 वर्षापर्यंत टिकल्या आहेत. या आघाड्यांची नावेपण शोधून काढावी लागतात. एक बदल झाला आहे की पूर्वी सेल्फी काढायची सोय नव्हती. जी आता आहे.
ReplyDeleteअशा घटनांकडे दूर्लक्ष करून कर्नाटकमध्ये आघाडी झाल्यावर ज्या राजकिय विश्लेषकांना उच॔बळून आले, अशांनी स्मृतीदोषाकरता उपचार घेणे आवश्यक आहे.
100% बरोबर
ReplyDeleteखरंय भाऊ. ७८ आमदार जर सिध्दांरामय्यांनी निवडून आणले असतील तर ते त्यांनाच लॉयल राहणार , सर्व जण भाजपला नवे ठेवतायत कि ते आमचे सरकार पाडतायत
ReplyDeleteलोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस व विरोधी पक्षात इतकी बेदिली झालीय कि कुणाचा कुणाला पायपोस नाही ,कोणीही काहीही करतेय कर्नाटकातपण काय करावं हे फोटोत हात उंचावणाऱ्या एकालाही कळेना.
ReplyDeleteविश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. भारत न्युझिलंड असा तो सामना होता. पण् हे दोन संघ मुळातच उपांत्य फ़ेरीत कसे काय पोहोचले? आपल्याकडल्या पुरोगामी सिद्धांतानुसार श्रीलंका किंवा बांगला देश, पाकिस्तानही फ़ेरीत पोहोचायला हवा होता. कारण अशा वगळल्या गेलेल्या अन्य सहा संघांच्या गुणांची बेरीज केल्यास ती भारत, इंग्लंड वा न्युझिलंडपेक्षाही अधिक होती.... हे भारी आवडलं.
ReplyDeleteभाऊ, विश्वचषक स्पर्धेचे उदाहरण फारच भारी !
ReplyDelete