Sunday, October 13, 2019

अवघे पाऊणशे वयमान

Image result for modi mocks pawar

‘सामान्यांची फसवणूक करून दिलेला शब्द न पाळणारे भाजपचे सरकार घालविल्याशिवाय म्हातारा होणार नाही. मला या वयातही प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याबद्दलचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे; पण त्यांना ठणकावून सांगतो की, मी अजूनही तरुण आहे. म्हातारा तर मुळीच नाही. या सरकारला घालविल्याशिवाय म्हातारा होण्याचा प्रश्नच नाही,’ असे रोखठोक उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले.’

साहेबांचे हे वक्तव्य एका वर्तमानपत्रात वाचले आणि नवलच वाटले. कारण त्यांना अजून तरी कुणा विरोधकाने म्हातारा म्हटलेले नाही. विरोधकाने म्हणजे ज्यांना आपण पवार विरोधक म्हणून ओळखतो, अशा कोणी तसे विधान केलेले नाही आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्षच पवार असल्याने त्यांच्याच पक्षात त्यांचा कोणी विरोधक असेल, हे पटत नाही. निदान दिर्घकाळ त्यांचे भक्त व निष्ठ असलेले शशिकांत शिंदे तरी पवारांचे विरोधक नक्कीच नसावेत. मग त्यांनी आपल्या अध्यक्षांना वयोवृद्ध कशाला म्हटले असेल? नवी मुंबईतील माथाडींच्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी इडीने पवारांवर एफ़ आय आर दाखल केला, तेव्हा त्यांच्या वयाकडे बघून तरी ‘सतावू नका’; अशी जाहिर विनंती तिथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांना केलेली होती. मग शशिकांत शिंदे कोण आहेत? ते नक्कीच विरोधक नाहीत आणि साहेबांविषयी अपप्रचार नक्कीच करणारे नाहीत ना? नसेल तर साहेब असे का खवळले आहेत? साहेबांना सामान्य मतदारानेही अजून वयोवृद्ध मानलेले नाही. म्हणून तर त्यांचा नातू असलेल्या पार्थ पवारला मावळ मतदारसंघात जनतेने ‘अजून लहान आहे’ म्हणून घरीच बसवले ना? नातू तरूण झाला तर आजोबा म्हातारा होतो; अशी सामान्य जनतेची समजूत आहे. सहाजिकच पार्थ भले जन्मतारखेनुसार तरूण झाला असेल. पण आजोबाचे वय लक्षात घेऊन जनतेने त्याला प्रौढ मानायला नकार दिला आणि त्याचे खेळण्याचे दिवस असल्याने इव्हीएम मधूनच सिद्ध केले ना? साहेबांच्या तरूणपणाचा आणखी कुठला पुरावा द्यायची गरज आहे?

आता मुद्दा असा येतो, की साहेबांच्या या तारुण्य़ाचे रहस्य काय? कुठल्याही माध्यमाने वा संपादकाने त्यांना अजून हा प्रश्न कशाला विचारला नाही, याचेही नवल वाटते. राज ठाकरेही इडीच्या चौकशीनंतर गप्प झाले म्हणतात. पण त्यांनाही लाजविल अशा उत्साहात साहेब इडीच्या ऑफ़िसात स्वत:च जायला निघालात. त्यापेक्षा मोठा रसरसत्या तारुण्याचा कुठला पुरावा असू शकतो? पण सुशिलकुमार शिंदे वा शशिकांत शिंदे अशा लोकांना त्याचा थांगपत्ता लागलेला नसावा. अन्यथा एकाने वयोवृद्ध असे वर्णन कशाला केले असते? दुसर्‍याने थकलेला पक्ष अशी विशेषणे कशाला जोडली असती? सार्वजनिक जीवनात सत्कारमुर्ती किंवा उत्सवमुर्ती असा शब्द सरसकट वापरला जातो. साहेबांच्या या उत्साहामुळे भविष्यात उत्साहमुर्ती असा शब्दप्रयोग रुढ होईल अशी खात्री वाटते. कारण जसजसे दिवस वर्षे जात आहेत, साहेबांचा उत्साह कमालीचा वाढतच जाताना दिसतो आहे. उदाहरणार्थ मागल्या सहा दशकातील त्यांची ख्याती काय होती? बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर साहेब तिकडे फ़िरकत नव्हते. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी निवडणुक काळातले दिवस खर्ची घातले जायचे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत साहेब बारामतीत अडकून पडलले होते. अन्यत्र कुठेही भाषणाला गेले तरी रात्रीचा मुक्काम बारामतीत असायचा. यावेळी त्याच्याही पुढे मजल मारली् साहेबांनी! विधानसभेच्या किती उमेदवारांचे अर्ज भरायला जातिनिशी हजेरी लावली ना? मुंब्र्याच्या जितेंद्र आव्हाडांचा तर अशा उत्साहावर विश्वास बसला नाही. तिथे खुद्द साहेबांनी हजेरी लावल्यावर आव्हाडांचे भान इतके सुटले, की त्यांच्या सोबत वाजतगाजत निवडणूक कार्यालयात पोहोचलेले आव्हाड अर्जात अनेक त्रुटी करून बसले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी एकट्याने जाऊन अर्ज दाख्ग्ल करावा लागला होता. याला उत्साह म्हणतात. तरूण आव्हाडही गडबडले. पण साहेब थेट आणखी कोणाचा अर्ज दाखल करायला निघून गेले. ह्याला म्हणतात तरूण! म्हातारे काय कोणीही होतात.

आता एक प्रश्न त्या कर्जत जामखेडच्या मतदाराला आता पडला आहे. आजोबाच इतके तरूण असतील, तर रोहितचे काय करायचे? तो तरूण आजोबांचा नातू असेल, तर वयाने विधानसभेत आमदार व्हायला योग्य आहे काय? अजून त्याचेही वय कोवळेच असेल ना? त्याला विधानसभेत धाडावे की घरी बसवावे? अर्थात अनेकांना घरी बसवायचे असल्याने पवार म्हातारे व्हायला राजी नाहीत, हे उपरोक्त वक्तव्यातून ध्यानात आलेलेच आहे. पण कोणाकोणाला घरी बसवायचे आहे? त्यांच्या या तरूण रहाण्याने पार्थ आधीच घरी बसला आहे. मावळातून त्याला लोकसभेत जायचे होते. पण आजोबा इतका उत्साही तरूण बघून मावळकरांनी पार्थाला दिल्लीत पाठवण्यापेक्षा घरी बसवले. मग आताही अनेकांना घरी बसवायचे आहे. असे म्हटल्यावर अनेकांचे लक्ष आपोआप रोहित या नातवाकडे जाणार ना? एक मात्र खरे आहे. इतरांना घरी बसवणयातच हयात गेल्यावर स्वत:ला घरी बसून रहाता येत नाही. आपल्या घराकडे दुर्लक्ष होऊन जाते. आपल्याला मुळात घरात बसून चालत नाही. घराबाहेर पडावेच लागणार ना? लोकशाहीतले मतदान व सत्ताधारी पक्षाची निवड करताना जनतेला अनेकांना घरी बसवण्यात फ़ारसा रस नसतो. सामान्य मतदाराला कोणी तरी ‘घर चालवणारा’ शोधावा लागतो. घराची घडी बसवणारा आवश्यक असतो. बहुधा त्यामुळेच साहेब इतरांना घरी बसवित असताना लोक मात्र साहेबांनाच घरी बसवण्याच्या प्रयत्नात असतात. भाजपाने शब्द पाळला नाही, म्हणून त्यांना घरी बसवण्याचा साहेबांचा निर्धार वाखाणण्यासारखा आहे. पण तो वाचल्यावर एक पाच वर्षे जुनी गोष्ट आठवली. तेव्हाही भाजपाला युती मोडल्याने घरी बसायची वेळ शिवसेना व उद्धव ठाकरे यांनीच आणलेली होती. बहूमत हुकल्याने भाजपाला घरीच बसावे लागले असते. पण तशी नुसती शक्यता दिसली आणि पवारांनी घाईगर्दीने पृथ्वीराज चव्हाण यांना नेवून कराडच्या वडिलोपार्जित घरी बसवले. ते अजून त्या गावच्या घरातून बाहेर पडायला किती धडपडत आहेत, ते सातारकरांनी बघितलेले आहे़च. त्यामुळे असे आणखी कोण कोण साहेबांच्या यादीत समाविष्ट आहेत, त्याचाही खुलासा करायला हवा होता ना?

काही नतद्र्ष्ट मंडळी साहेबांना समजूनही घेत नाहीत आणि अनेकांना घरी बसवायचे म्हणजे काय, त्याची टवाळी करतात. सत्तेत बसलेल्यांना घरी बसवायचे याचा इतका साधा अर्थ लोकांना कळत नाही. सत्तेत येऊन लोकांना दिलेला शब्द पाळत नाहीत, त्यांना घरी बसवायलाच हवे. पण असा कुठला शब्द भाजपावाल्यांनी पाळला नाही? आणि जो शब्द जनतेला दिला, तो जनतेच्या लक्षात नसताना साहेबांच्या कसा लक्षात राहिला? कारण जेव्हा भाजपावाले जनतेला शब्द् देत होते, तेव्हाच साहेबही लोकांना शब्द देतच हो्ते की! मग लोकांना पवारांनी दिलेला शब्द कशाला मानवला नव्हता? भाजपावाल्यांनी जनतेला कुठला शब्द दिला माहिती नाही. पण विधानसभेचे निकाल पुर्ण होण्याआधीच साहेबांनी भाजपाला शब्द दिलेला होता, त्याचे काय झाले? पुन्हा मुदतपुर्व निवडणूका महाराष्ट्राला परवडणार्‍या नाहीत, म्हणून पवारांनी भाजपाला पाठींब्याचा शब्द दिल होता ना? त्याचे काय झाले? पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष राहिला बाजूला आणि बिचार्‍या उद्धव ठाकरेंना पाच वर्षे पुन्हा निवडणूका नकोत म्हणून फ़डणवीस सरकार चालवावे लागले. फ़डणवीस वा भाजपाने शब्द पाळणे बाजूला राहू दे. साहेबांनी तरी भाजपाला दिलेला शब्द किती पाळला? राजकारणात शब्द द्यायचे असतात, पाळायचे नसतात, ही साहेबांचीच शिकवण नाही का्? भाजपाचे सोडूनच द्या. वसंतदादांना दिलेला शब्द तरी किती पाळला? त्यामुळे शब्द पाळण्याच्या गोष्टी कशाला हव्यात? भाजपाचे सरकार घालवण्यासाठी कंबर कसून उभे राहिलात हे ठिक आहे. पण त्याच भाजपाला बहूमत नसताना सत्तेत आणुन बसवण्याचे श्रेय सुद्धा तितक्याच आवेशाने घ्यायला काय अडचण आहे? की पाच वर्षानंतर भाजपा सरकार हटवायचे असेल, तर ते आधी सत्तेत आणून बसवले पाहिजे; अशी साहेबांची धुर्त चाल २०१४ साली होती? साहेब आपण किती दुरगामी विचार करता, ते बघून अनेक संपादक विश्लेषक अचंबित होऊन जातात. पाच वर्षानंतर भाजपाला सत्तेतून घरी बसवायचे, तर आधी भाजपाला सत्तेमध्ये आणून बसवावे लागेल, हे पवारांच्याही पक्षातल्या अनेक धुरीणांना कुठे उमजले होते?

आताही अशी एक बातमी कानावर आलीय, की देवेंद्र फ़डणवीसांनी कुठल्याशा देवाकडे नवस केलाय. शरद पवारांना म्हातारे करू नको म्हणून. अगदी आतल्या गोटातली बातमी आहे. तेवढ्यासाठी म्हणे देवेंद्र नवसाला पावणार्‍या प्रत्येक गणपतीला व देवस्थानाला भेटी देऊन आलेत. त्यांचा असला नवस ऐकूनही अनेक पुजारी व देवस्थानांचे ट्रस्टी थक्क झालेत. पवारांना तरूण ठेवण्यासाठी भाजपाचा मुख्यमंत्री नवस कशाला करतो? असा प्रश्न पुजार्‍याला पडू शकतो, पण कुठल्या राजकीय विश्लेषकाला पडू शकत नाही, इतके आपले विश्लेषक प्रगल्भ झालेले आहेत. ‘मी परत येतोय’ असे फ़डणवीस इतक्या छातीठोकपणे कसे सांगू शकतात? हाही अनेकांना सतावणारा प्रश्न उगाच झालेला नाही. त्याचे उत्तर शरद पवारांच्या तारूण्यात सामावलेले आहे. हे कोणाला माहिती आहे? कारण जितके दिवस आणि वर्षे पवार तरूण रहातील किंवा म्हातारे होणार नाहीत, तोपर्यंत ते कोणाला तरी घरी बसवित रहाणार आणि तितकी मुख्यमंत्र्याची खुर्ची सुखरूप रहाते ना? कारण साहेब जितके कोणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत, त्यांना परस्पर घरी बसवणार असतील, तर फ़डणवीसांचे काम सोपे होते ना? गेल्या वेळी म्हणजे २०१४ सालच्या विधानसभेत उद्धव ठाकरे स्पर्धेत होते. सेनेने ‘उठा’ १५० ची मोहिम हाती घेतली होती, तेव्हा आघाडी मोडून साहेबांनी उद्धव नाहीतर कोणाला घरी बसवले होते? त्यातही आडवे येण्याची शक्यता असलेल्या पृथ्वीराज चव्हांणांना तर मतदानापुर्वीच पाठींबा मागे घेऊन कोणी घरी बसवले होते? आपल्यासाठी पवार साहेब इतकी मेहनत घेतात आणि अखंड महाराष्ट्रभर फ़िरतात, तरीही त्यांचे आभारही मानता येत नाहीत, याची फ़डणवीसांना खंत असल्याचेही म्हणतात. पण राजकारणात असे तरूणांना ‘तरुणांनीच’ मदत करण्याचे व्रत घेतले नाही, तर महाराष्ट्र तरूणांचा कसा होईल? हे जितके साहेबांना कळते तितके फ़डणवीसांनाही समजते. मधल्या मध्ये बिचारे रोहित, पार्थ वा पृथ्वीराज हकनाक बळी जातात.

9 comments:

  1. Bhau kharach khup Chan vishleshan ahe

    ReplyDelete
  2. मोजकी, मापात आणि समर्पक टिंगल. फारच थोड्याना जमत असेल अशी!!��

    ReplyDelete
  3. याचा अर्थ असा घ्यायचा काय कि रोहित ला सुद्धा पार्थ सारखेच घरी बसावे लागेल

    ReplyDelete
  4. WOW. Too good to be true. Hats off to you Bhau

    ReplyDelete
  5. अजुन एक भाऊ,राज सुध्दा ३७० चा महाराष्ट्राशी समंध काय? असच विचारतो आहे.मग शिवसेनेला भाजप चे राज्य यावे म्हणून इतकी वर्ष मत देत होतो.मग यावेळी शिवसेनेला मत द्यायचा अजिबात विचार नाही कारण bjp स्वबळावर येणारे आणि राज असा पाक धार्जिणा बोलतो वंचित नक्षल वाद्यांना धर्जिणी, आता मत तरी कुणाला द्यावे?? राषट्रवादी आणि काँग्रेस ला मत द्यायचा तर विचारही नाही!!! यावर आमच्या सारख्या लटकलेल्या त्रिशंकू मतदारांनी काय करावे त्यावर लिहाल का??? की मत नोटा ला द्यावे???

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. मला वाटते कि तुम्हाला मनसे, वंचित, काँग्रेस-राष्ट्रवादी ह्यातल्या कोणालाही मत द्यावेसे वाटत नसेल, आणि फक्त शिवसेनेचा म्हणजे युतीचा उमेदवार उभा असेल, तर "युती" खातर तुम्ही त्याला मतदान देणे योग्य ठरेल असे मला वाटते.
      सहज एक गम्मत म्हणून सोशल मीडियावर वाचलेली पोस्ट सांगतो. "उमेदवार आवडले नाहीत म्हणून NOTA ला मत देणे म्हणजे समोर असलेल्या चड्ड्या न आवडल्याने नागडे फिरण्यासारखे आहे." त्यामुळे त्यातल्या त्यात बरी वाटणाऱ्याला मत द्यावे. NOTA ला देऊन ते वाया घालवू नये.

      Delete
  6. भाऊ, काकांच्या कारनाम्यांचं इतकं समर्पकविश्लेषण आपणच करू शकता!

    ReplyDelete