रविवारी राहुल गांधी पुन्हा निवडणूक राजकारणात उतरलेले बघून समाधान वाटले. मात्र ज्या दोनतीन सभा त्यांनी घेतल्या आणि भाषणे केली त्यातील त्यांचे ज्ञानामृत चाखल्यावर मला भाऊ पाध्ये यांनी चार दशकापुर्वी ‘सोबत’ नामक ग. वा . बेहरेंच्या साप्ताहिकात लिहीलेला लेख आठवला. त्या काळात समाजवादी मंडळी अतिशय उत्साहात प्रत्येक निवडणुकीत उतरायची आणि आवेशपुर्ण भाषणांनी धमाल उडवून द्यायची. त्यांचा आवेश इतका असायचा, की खात्रीपुर्वक दोनतीनदा तिथूनच जिंकलेला कॉग्रेसचा आमदार खासदारही गडबडून जायचा. पण जेव्हा निकाल लागायचे, तेव्हा समाजवादी नेत्याचे डिपॉझीट गेलेले असायचे आणि हजारो लाखो मतांच्या फ़रकाने कॉग्रेसचा तो बदनाम भ्रष्ट वा नालायक म्हणून पेश केलेला उमेदवार आरामात जिंकायचा. पण दरम्यान त्याला घाबरवून सोडण्याचा पराक्रम समाजवादी वाचाळ उमेदवाराने नक्कीच केलेला असायचा. त्यालाच भाऊ पाध्येने नॉन मॅट्रीक असे संबोधलेले होते. योगायोग असा, की राहुल गांधी ज्या दिवशी महाराष्ट्रात प्रचारासाठी अवतरले त्याच दिवशी त्यांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण करणार्या वाहिन्यांनी एक आणखी किरकोळ मुलाखतही दाखवली होती. ती होती विरार वसईत गेली तीन दशके आपला राजकीय दबदबा निर्माण केलेल्या हितेंद्र ठाकूर यांची होती. तिथे यावेळी शिवसेनेने एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त अधिकारी प्रदीप शर्मांना मैदानात आणलेले आहे. त्यांनी आपल्या भागात प्रचाराची धमाल उडवलेली आहे. त्यांच्या तुलनेत हितेंद्र यांच्या बहूजन विकास आघाडी पक्षाचा प्रचार कसा चालू आहे; असा प्रश्न ठाकुरांना विचारला गेला होता. तेव्हा हिंतेंद्रनी दिलेले उत्तर नॉन मॅट्रीक थिअरीला दुजोरा देणारे होते. किंबहूना म्हणूनच राहुल गांधींच्या प्रचारातील भाऊ पाध्येचा मुद्दा पुन्हा आठवला. तसे बघितल्यास कॉग्रेसने ठाकुर यांना सोबत घेतले आहे. मात्र खुद्द ठाकूर कॉग्रेस इतके गाफ़ील नाहीत वा विजय मिळवण्यात वाकबगार आहेत.
प्रचारात बहुजन विकास आघाडी मागे पडली का असा प्रश्न विचारला असता, हितेंद्र ठाकूर उत्तरले, आमचा प्रचार बारमाही चालू असतो. परिक्षा आल्यावर आम्ही जागरण करीत नाही, की अभ्यासाची घाई करावी लागत नाही. लोकांशी सतत संपर्क असतो. लोक जोडलेले ठेवतो. नॉन मॅट्रीकची गोष्ट तशीच आहे. पुर्वी अकरावीला शालांत परिक्षा व्हायची आणि त्यात अनुत्तीर्ण होणार्याला पुढला मार्ग बंद व्हायचा. शेवटची इयत्ता असल्याने शाळेत जाणे बंद व्हायचे आणि पुन्हा परिक्षा द्यायची, तर आणखी नऊदहा महिने प्रतिक्षा करावी लागे. मग ज्या विषयात कमी पडलो त्याचा घरीच बसून अभ्यास करायचा, असा प्रकार असे. त्यात विनोद हा असायचा, की अभ्यासाला बसले मग प्रत्येक विषयाचा अभ्यास झालाच आहे असे वाटायचे आणि आळशीपणाने अभ्यासाचा कंटाळा यायचा. सहाजिकच पालकांचा डोळा चुकवून अशी नॉन मॅट्रीक मुले उनाडक्या करीत. पुढे जसजशी परिक्षा जवळ येत जायची, तशी चिंता वाढायची आणि पोर्शन पुर्ण करण्यासाठी रात्र रात्र जागरणे चालायची. पण त्यात कुठला गंभीरपणा नसल्याने पुन्हा नापास होण्यापलिकडे निकाल वेगळा लागत नसे. अशा उनाड मुलांना नॉन मॅट्रीक संबोधले जायचे. पाध्ये यांनी अशा उनाड मुलांशी तात्कालीन समाजवादी पक्षाची तुलना केलेली होती. मधली पाच वर्षे उनाडक्या करायच्या आणि निवडणूका जवळ आल्या म्हणजे गदारोळ सुरू करायचा. दरम्यान संघटना बांधणी लोकसंपर्क यापैकी काहीही करायचे नाही. पक्ष म्हणून जनतेत जाऊन काही करायचे नाही. आजकाल बाईट देतात, तशी त्यावेळी पत्रबाजी चालायची. ती पत्रके वक्तव्ये वर्तमानपत्रात छापुन आणणे हे राजकीय कार्य असायचे. पण सरकार व सत्ताधारी वर्गावर लोक नाराज आहेत, म्हणजेच त्यांना पाडायला मतदार टपलेलाच आहे, मग अशा गृहीतावर आवेशपुर्ण भाषणे ठोकायची हा खाक्या होता. आजची कॉग्रेस वा तथाकथित पुरोगामी राजकीय पक्ष किंचीत तरी वेगळे आहेत काय? आजही त्यांनी घोषा लावलाय तो सत्तेत बसलेल्यांच्या अपुर्या कामाचा वा चुकलेल्या धोरणांचा. पण आपली धोरणे काय वा कार्यक्रम कोणता, त्याचा मागमूस प्रचारात दिसतो का?
राहुल गांधी विनवण्या मनधरण्या केल्यावर महाराष्ट्रात प्रचाराला आलेले आहेत. पण त्यांना निवडणूका कुठल्या वा कशासाठी आहेत, त्याचाही पत्ता नसावा. अन्यथा त्यांनी सहाआठ महिने आधी वाजवलेली घासूनपुसून गुळगुळीत झालेली राफ़ायल वा तत्सम विषयाचीच रेकॉर्ड कशाला वाजवली असती? दोन वर्षापुर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत चीनमधल्या तरूणाच्या हातात ‘मेड इन हिमाचल’ मोबाईल दिसला पाहिजे अशी पुडी सोडलेली होती. मग तीच उत्तरप्रदेश व गुजरातच्याही निवडणूकीत टेप वाजवली होती. जौनपुरच्या पितळ व्यवसायात बनलेली भांडी अमेरिकेच्या अध्यक्षाच्या पत्नीने बिर्यानी बनवण्यासाठी वापरली पाहिजे आणि त्यावर ‘मेड इन जौनपूर’ असे लिहीलेले असावे; असा आग्रहच राहुलनी धरलेला होता. भारतातही कुठल्या कंपनीने अजून ‘मेड इन मुंबई’ वा ‘मेड इन चेन्नई’ असे उत्पादन काढलेले नाही. तर जौनपूर वा हिमाचल असे छाप असलेला कुठला माल जगभर जाऊ शकेल? असे शिक्के छाप कशासाठी असतात, हेही राहूलना ठाऊक नाही. पण त्यांनाच प्रचारासाठी बोलावणे ही कॉग्रेस पक्षाची व उमेदवाराची अगतिकता आहे. राहुल नाही तर आणायचे कोणाला? तशा प्रियंकाही येऊ शकतात. पण त्यांच्या कृपेने असलेल्या चांगल्या जागचेही उमेदवार पराभूत होतात. म्हणून राहुलना पर्याय नाही. आणि राहुलना मागल्या परिक्षेत कशामुळे वा कुठल्या विषयात नापास झालो, त्याचाही थांगपत्ता नसतो. परिक्षा कुठलीही असो, त्यांची उत्तरेही तीच असतात. आताही धारावीत बोलताना त्यांनी चिनी कंपन्यांना एकटी धारावी टक्कर देऊ शकते; असे ‘मेड इन अमेठी’ उत्तर ठोकून दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काय असू शकेल, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. राहुलनी कॉग्रेसला गाळातून बाहेर काढण्यापेक्षा पक्षालाच आपल्यासारखे उनाडक्या करणारे बनवून टाकलेले आहे. परिक्षा आली, मग धावपळ करायची आणि मधल्या काळात उनाडक्या.
इथे प्रत्येक कॉग्रेसवाला अगत्याने ३७० कलमाचा महाराष्ट्राच्या समस्यांशी संबंध काय, म्हणून अमित शहांना प्रश्न विचारतो आहे. खुद्द राहुलच असे प्रश्न उपस्थित करतात. चंद्रावर यान पोहोचल्याने गरीबाच्या पोटाला भाकर कशी मिळणार? हा त्यांचाच सवाल आहे. मग राफ़ायलचे तुणतुणे वाजवून ती भाकर कशी मिळू शकते, त्याचाही खुलासा करायला नको काय? तर त्याचा खुलासा त्यांनाही ठाऊक नसतो. चोक्सी वा नीरव मोदी यांच्या नावाची जपमाळ ओढून राहुल गरीबांना भाकर व बेरोजगारांना कामधंदा कसा देऊ शकणार आहेत? त्यांच्याखेरीज अन्य कोणापाशी त्याचे उत्तर आहे काय? महापालिका, विधानसभा वा लोकसभा कुठलीही निवडणुक असली तरी राहुल गांधी ‘नवनीत’मधली उत्तर जशीच्या तशी आहेत आणि मग परिक्षक ती चुकीची ठरवुन कॉग्रेसला नापास करीत असतात. अर्थात त्यामुळे राहुल विचलीत होण्याची शक्यता नाही. त्यांनी अगोदरच मतदान यंत्रावर ठपका ठेवलेला आहे. सहाजिकच राहुल वा अन्य पुरोगामी नापास झाले, तर ते परिक्षा मंडळालाच गुन्हेगारही ठरवून निश्चींत झालेले आहेत. आजही शालांत परिक्षेत गुणपत्रिकेत वा निकालात गफ़लत वाटली, तर फ़ेरतपासणी मागता येते. पण त्यासाठी परिक्षा मंडळावर विश्वास ठेवावा लागतो. हितेंद्र ठाकुर यांनी कधी यंत्रावर अविश्वास दाखवला नाही. तर आपल्या बारमाही जनसंपर्कावर आत्मविश्वास व्यक्त केला आहे. कारण दोन निवडणूकांच्या मधल्या काळात ते थायलंड वा परदेशी जात नाहीत किंवा उनाडक्याही करीत नाहीत. राहुलच कशाला राज्यात गेल्या पाच वर्षात विरोधकांनी काय केले? पवारांपासून विखेंपर्यंत प्रत्येकजण इडीच्या नावाने शंख करीत राहिला. पण दुरावलेल्या मतदाराला जवळ घेण्यासाठी हातपाय हलवले नाहीत. आज गावगन्ना फ़िरणारे शरद पवार मधल्या पाच वर्षात किती जनसंपर्कात होते? त्यांनी आत्मपरिक्षण किती केले? चुका शोधून किती दुरुस्त्या केल्या? म्हणून तर नॉन मॅट्रीक मास्तरांच्या क्लासमधली पोरे अलिकडेच फ़डणवीसाच्या क्लासमध्ये प्रवेश घ्यायला धावत सुटली ना?
सुपर भाउ
ReplyDeleteअप्रतिम दुसरा शब्दच नाही
ReplyDeleteपरीक्षा कुठलीही असो...उत्तरे तीच असतात!एकटी धारावी चिनी कंपनी ना टक्कर देणार! या वाक्यांवर मोबाईल हातातून पडला हसताना....
ReplyDeleteभाऊ तुम्ही राहुल गांधींवर अविरत लिहीत रहा...
Stress buster च काम करतात असे लेख!
भाऊ, अप्रतिम !!!!
ReplyDeleteखरं आहे भाऊ.शेवटी असा प्रश्न पडतो की हे आम्हा मतदारांना मूर्ख समजतात की काय?? असो ते निवडणुकांचे निकाल लागले की कळेलच
ReplyDeleteअप्रतिम लेख भाऊ खरंच एकदम मस्त
ReplyDeleteआमच्या वेळेस मॅट्रिकची परिक्षा असायची व तुम्ही लिहिल्याप्रमाणे नापास झालेल्या विद्यार्थ्याने कधीही पुन्हा मन लावून अभ्यास केलेला आठवत नाही. तो विद्यार्थी ऑक्टोबर/मार्च च्या वार्या करत रहायचा व नंतर नॉनमँट्रिकच लेबल पडायचे.अगदी तशीच परिस्थिती सध्या काही पक्षांची आहे. त्याना पुन्हा अभ्यास करावयाचा कंटाळा आहे आपण कोठे चुकलो हे पहायचे नाही आहे.
ReplyDeleteअगदी तंतोतंत वर्णन आपल्या लेखात दिसते आहे.
भाऊ समाजवादी पक्षाबद्दलच विश्लेषण अत्यंत मार्मिक । मला आठवतंय 1989 किंवा 1990 च्या लोकसभेच्या निवडणुकीत एक अतुर संगतानी म्हणून समाजवादी चे उमेदवार पुण्यातून लोकसभेला उभे होते । त्यावेळी समाजवादी पक्षाची घोषणा होती जी मला आजही आठवते 'एक अतुर बाकी सगळे थातूर मातूर' परंतु निवडणुकीच्या निकालात मला जर बरोबर आठवत असेल तर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉसीट जप्त झाले होते।
ReplyDeleteकपडे काढणारं विश्लेषण
ReplyDeleteभाऊ हाच न्याय राज ठाकरेंनाही लागू होतो ना??
ReplyDeleteअचुक लिहितात भाऊ आपण नॉन मैट्रिक उनाडक्या मारणारे राहुल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे वाक्य "म्हणून तर नॉन मॅट्रीक मास्तरांच्या क्लासमधली पोरे अलिकडेच फ़डणवीसाच्या क्लासमध्ये प्रवेश घ्यायला धावत सुटली ना?"
ReplyDeleteनेत्यांनी आत्मपरीक्षण वगैरे करायचेच नाही असे ठरवलेच आहे त्याला काय करणार? आपणही करमणुक म्हणून पहायचे. पण कुठेतरी उद्विग्नता येते सगळे पाहून 😔😔
ReplyDelete