Monday, October 7, 2019

ससा कासवाची शर्यत

Image result for वंचित बहुजन आघाडी स्था

लोकसभेपुर्वी वंचित बहूजन आघाडी स्थापन करून आपल्या राजकीय वाटचालीला वेगळी दिशा देणर्‍या प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यात कुठला डावपेच चालला असेल? तसे बघायला गेल्यास विधानसभेच्या निवडणूकांची तयारी सत्तेत असूनही भाजपाने सर्वात आधी सुरू केली. त्यांचा मित्रपक्ष असूनही शिवसेना देखील तितक्या तयारीने कामाला लागलेली नव्हती. कारण युती होणार की स्वबळावर लढायचे, याविषयी शिवसेनेचे नेतेही अखेरपर्यंत अंधारात होते. उलट भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांना युती आपल्याच अटीवर होणार, आणि नाही झाल्यास स्वबळाचीही सज्जता ठेवायची, ही रणनिती ठरलेली होती. म्हणूनच अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना आंधारात चाचपडत होती, तर भाजपा आपली सज्जता करीत होता. त्यांच्या तुलनेत दुसरा कुठला पक्ष खरीच लढत देण्याच्या कामाला लागला असेल, तर त्याचे नाव वंचित बहूजन आघाडी असेच सांगावे लागेल. कारण त्या आघाडीचे म्होरके प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कुठल्याही सहकार्‍याला अंधारात ठेवले नाही आणि प्रत्येक मतदारसंघाची तयारी चालविली होती. त्यांच्या घोषणा वा गर्जना राजकीय अभ्यासकांना हास्यास्पद वाटल्या वा पोकळ वाटल्या, तरी त्यामागचा हेतू समजून घेतला पाहिजे. गर्जना या आपल्या सहकारी व पाठीराख्यांचा जोश वाढवण्यासाठी असतात. जिंकण्याचा आवेश निर्माण करण्यासाठी असतात. कारण हरण्यासाठी कुठलेही सैन्य सर्वस्व पणाला लावत नाही. त्याला जिंकण्याची आशा दाखवावीच लागत असते. आंबेडकरांची वक्तव्ये किंवा गर्जना, त्याच पातळीवर घेतल्या पाहिजेत. मग त्यांच्या रणनितीचा उलगडा होऊ शकतो. पण तितकी विवेकबुद्धी आपल्या राजकीय विश्लेशक अभ्यासकांपाशी नसल्याने त्यांनाही प्रकाश आंबेडकरांची भाषा पोकळ वा विरोधी मतांचे विभाजन करणारी वाटली आहे. ते सत्य असले तरी त्यात दुरगामी खेळी सामावलेली आहे. यापुर्वी अनेक पक्षांना जी संधी मिळली होती, त्यांनी तिची माती केली. आंबेडकर ती संधी सोडायला राजी नाहीत. म्हणूनच त्यांनी जागरूकपणे विश्लेषकांनी लावलेल्या सापळ्यात अडकायला नकार दिलेला आहे. मग वंचितची नेमकी रणनिती काय आहे? विश्लेषकांचा सापळा कुठला?

वंचित आघाडी किंवा आंबेडकरांचा सगळ्यात मोठा डाव असा, की त्यांनी नेहमीच्य पुरोगामी सापळ्यात अडकायला साफ़ नकार दिलेला आहे. प्रत्येकवेळी कॉग्रेस पक्ष डबघाईला आला, मग त्याला वाचवण्यासाठी जो पुरोगामी वा सेक्युलर सापळा राजकीय विश्लेषक वा पत्रकारांनी लावला त्यात तात्कालीन पुरोगामी पक्ष घुसमटून मेलेले आहेत. उतट त्यांच्या मरणातून कॉग्रेसला नवी संजिवनी मिळत गेलेली आहे. वीस वर्षापुर्वीचा कालखंड आठवा. तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युतीची सत्ता होती आणि साडेचार वर्षे सत्ता उपभोगलेली युती पुन्हा निवडणूकांना सामोरी जात असतानाच शरद पवार यांनी सोनियांचे परदेशी जन्मा़चे निमीत्त शोधून कॉग्रेस फ़ोडली होती. राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून वेगळा तंबू थाटून मतविभागणी केलेली होती. त्याचा लाभ युतीला मिळू शकला नाही आणि दोन्ही कॉग्रेस एकमेकांच्या विरोधात लढूनही युती इतक्याच जागा जिंकलेले होते. पण युतीचे बहूमत हुकतानाच दोन्ही कॉग्रेसही एकत्रित बहूमत मिळवू शकलेल्या नव्हत्या. कारण मधल्या ३०-३५ जागा अन्य पक्ष अपक्षांना मिळालेल्या होत्या आणि त्यांच्यावर सत्तेचे पारडे झुकणार होते. तर दोन्ही कॉग्रेसना एकत्र आणून बसवायला व त्यांच्या सत्तेचे गणित जुळण्यासाठी पुरोगामी पक्षाच्या आमदारांचे पाठबळ कॉग्रेस आघाडीच्या पाठीशी उभे करण्याचे महत्कार्य राजकीय विश्लेषक वा संपादकांनी पार पाडलेले होते. त्यामुळे सत्तेतून युती हद्दपार झाली. पुन्हा एकदा विभागलेली कॉग्रेस सत्तेत आली. पुरोगामी पक्षांच्या पाठींब्यामुळेच ते शक्य झाले. पण युतीला सत्तेच्या बाहेर ठेवण्यात इतकी बहूमोल कामगिरी बजावण्याच्या बदल्यात त्या पुरोगामी पक्षांना काय मिळाले? विविध रिपब्लिकन गट, शेकाप, जनता दल किंवा नगण्य कम्युनिस्ट पक्षांचे काय झाले? हळुहळू दोन्ही कॉग्रेस शिरजोर झाल्या आणि त्यांच्या मस्तीसमोर हे तथाकथित पुरोगामी पक्ष नामशेष होऊन गेले. आज त्यांचे कुठे नामोनिशाण उरलेले नाही. मात्र पुन्हा एकदा दोन्ही कॉग्रेसही एकत्रितपणे भाजपा वा युतीला टक्कर देऊ शकण्याची स्थिती राहिली नाही, तेव्हा कॉग्रेसला पुरोगामीत्व आठवले आहे. त्यासाठीच मग जे कोणी युती विरोधातले पक्ष आहेत, त्यांना पुरोगामीत्वाच्या शपथा घातल्या जात आहेत. मतविभागणी करून युतीला भाजपाच्या विजयाला हातभार लावू नका, म्हणून बजावले जात आहे. पण निदान यावेळी त्या भुलभुलैयाला दाद न देणारा एक मर्द निघाला आहे, त्याचे नाव आहे प्रकाश आंबेडकर.

एक गोष्ट साफ़ आहे. कॉग्रेसला मरणाच्या वेदना सुरू झाल्या, मग पुरोगामीत्व आठवते. अन्यथा कॉग्रेसनेच कधी पुरोगामी पक्षांचा विस्तार वा वाढ होऊ दिलेली नाही. युती तुटलेली असताना अकारण आघाडी मोडून एकट्याच्या बळावर भाजपाला सर्वात मोठा पक्ष विधानसभेत बनवण्याचे कर्तृत्व आंबेडकरांचे नव्हते; तर राष्ट्रवादी व शरद पवारांचेच होते. तेव्हा कोणा राजकीय विश्लेषकाला मतविभागणीचे सिद्धांत कशाला आठवलेले नव्हते? आज पवारांचा तोच डाव त्यांच्यावरच उलटलेला आहे. तेव्हा पाव शतकाची युती तुटलेली होती आणि अवघ्या दोन तासात पवारांनी कॉग्रेस आघाडी मोडून टाकली. लोकसभेत दारूण पराभव झालेल्या दोन्ही कॉग्रेसने स्वबळावर लढणे, म्हणजे मोदींच्या नावावर भाजपाला महाराष्ट्रामध्ये बलशाली बनवणेच होते. त्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणेच होते. ते काम प्रकाश आंबेडकर वा अन्य कोणा पुरोगामी पक्षाने केलेले नव्हते. ती मतविभागणी करून भाजपाला शिरजोर करण्याचे ‘पवित्र कार्य’ पवारांनी केलेले होते. तेव्हा तमाम राजकीय विश्लेषक कशाला गप्प होते? आज ज्यांना प्रकाश आंबेडकर मतविभागणी करून भाजपाला बळ देतात असे वाटते, त्यांनी तेव्हा पवारांचे कान कशाला उलटलेले नव्हते? पुरोगामीत्वासाठी प्रत्येकवेळी पुरोगामी म्हणवून घेणार्‍या अन्य पक्षांनी झीज का सोसायची? कॉग्रेसने थोडाफ़ार अधिक त्याग कशाला करू नये? उत्तरप्रदेशात मायावती अखिलेशने दोन जागा कॉग्रेसला सोडल्या, पण तितके मतविभागणी टाळण्याचे औदार्य कॉग्रेस दाखवू शकली नाही. मग आज राज्यात आंबेडकरांनी तोटा कशाला सहन करायचा? हा वादाचा विषय होऊ शकतो. पण असे मतविभागणी टाळल्याने पुरोगामीत्व कसे सिद्ध होऊ शकते? बलशाली कसे होऊ शकते? उलट कॉग्रेस राष्ट्रवादीने थोडी झीज सोसून वंचितला अधिक जागा दिल्या, तरी पुरोगामीत्व विजयी होईल ना? त्यावर कॉग्रेसचीच मक्तेदारी असायचे काही कारण नाही. म्हणूनच आंबेडकरांनी या दबावाला झुगारून नवा पुरोगामी पर्याय उभा करायचा निर्धार केला असेल, तर प्रामाणिक पुरोगाम्याने त्याचे स्वागतच करायला हवे.

कॉग्रेस मरू घातली असेल, तर ते त्यांच्या नेतृत्वाचे पाप आहे. त्यामुळे पुरोगामी विचारांचा मतदार मरत नसतो. तो पर्यायी नेता व पक्षाला शोधून आपला वि़चार व भूमिका टिकवायला पुढाकार घेत असतो. दोन्ही कॉग्रेस दुबळ्या वा नाकर्त्या ठरत असताना, लोकसभेत वंचित आघाडीला ४२ लाख मते किंवा सात टक्के मिळालेली मते त्याचीच साक्ष आहे. युतीला लोकसभेत ५२ टक्के मते मिळाली आणि उरलेली ४८ टक्के मते युतीच्या विरोधातली असली म्हणून त्यावर कॉग्रेसचीच मक्तेदारी असायचे कारण नाही. असा मतदार कुठल्याही पुरोगामी पक्षाला पाठींबा देऊ शकतो व त्यातून बिगर कॉग्रेस पक्षही भाजपाला पर्याय् म्हणून उदयास येऊ शकतो. ओडिशामध्ये नविन पटनाईक हा त्याचा पुरावा आहे. महाराष्ट्रात कधी असा पर्याय कॉग्रेसनेच उभा राहू दिला नाही. इतर पक्षांच्या खुळ्या नेतृत्वानेही त्याचा गंभीरपणे विचार केला नाही. म्हणून भाजपा वा शिवसेना हे पर्याय उभे रहात गेले व आज सत्तेत जाऊन बसले आहेत. पारंपारिक पुरोगामी म्हणजे शेकाप, जनता दल वा कम्युनिस्टांनाही तिथपर्यंत मजल मारता आली असती. पण ते पत्रकार अभ्यासकांच्या कॉग्रेस मार्फ़त लावलेल्या पुरोगामी सापळ्यात फ़सत गेले आणि नामशेष झाले. आंबेडकर त्याच सापळ्यात फ़सायला तयार नाहीत. त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच भाजपापेक्षाही कॉग्रेसला पर्याय ठरू शकेल, असा पुरोगामी राजकीय पर्याय उभा करण्याचा चंग बांधला आहे. तो दलित पिडित वंचित यांचा खराखुरा पक्ष असेल आणि राजकीय पर्याय म्हणून समर्थपणे उभा राहिल. त्याला आजच सत्तेत येण्याची घाई नसेल. तर बहूमताला पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली मतांची टक्केवारी पाठीशी आणुन भाजपा वा शिवसेनेचे आव्हान पेलण्यास सज्ज व्हायचे असेल. तर निदान २० टक्के मतांचा गठ्ठा हाताशी असला पाहिजे. त्याला कांशिराम सिद्धांत मानले जाते. त्यांनी दोन दशकांच्या प्रयत्नातून उत्तरप्रदेशात दहा टक्केपर्यंत दलितांच्या मतांची पेढी उभी केली आणि त्याच बळावर इतर लहानमोठे समाज व त्यांचे नेते हाताशी धरून तिथे सत्तांतर घडवण्यापर्यंत मजल मारली होती. थोडक्यात प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात मायावतींचे डाव खेळत आहेत.

मायावतींनी आधी शक्ती गोळा केली. तोपर्यंत निवडून कोण व किती आले, त्याची फ़िकीर केली नाही. आपल्या चिन्हावर किंवा झेंड्याखाली मते गोळा केली आणि त्या मतांची संख्या बघून इतर पक्षांना त्यांची दखल घ्यावीच लागली. पण तशा तडजोडी वा आघाड्या करताना मायावतींनी इतरांच्या अटी मानल्या नाहीत वा त्यांच्या पुढे शरणागती पत्करली नाही. उलट आपल्या हक्काच्या मतांचे भांडवल करून इतर पक्षांना आपल्याच अटीवर राजकारण करायला भाग पाडलेले आहे. इतर पक्षही उगाच मायावतींना शरण जात राहिले नाहीत. मायावतींची शक्ती हक्काच्या मतांत समावलेली होती आणि आहे. प्रकाश आंबेडकर सध्या त्याच दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यांना वंचित आघाडी म्हणजे अमूक टक्के मते, असाच सिद्धांत उभा करायचा आहे. विखुरलेली असतील, पण बारापंधरा टक्के मते म्हणजे तितक्याच तुल्यबळ पक्षासाठी पन्नास शंभर मतदारसंघामध्ये विजयाची हमी असते. जो नेता वा पक्ष आघाडीत घेतल्याने तितकी मते आपले पारडे जड करू शकतात, त्यांच्यासमोर कुठलाही सामर्थ्यशाली पक्ष शरणागत होत असतो. पण पर्यायाने अशा सबळ मित्रपक्षाच्या मदतीने बसपालाही आपली शक्ती वाढवता आली, स्वबळावर उभे रहाता आले. तेच प्रकाश आंबेडकर आता करीत आहेत. आपण सर्व जागा लढवून किती आमदार निवडून येतील, त्याची त्यांना फ़िकीर नाही. तर कॉग्रेससहीत पुरोगामी पक्षाचे किती पराभूत होतात, त्याची चिंता कशाला असेल? त्यांचे लक्ष्य प्रत्येक मतदारसंघात मिळणार्‍या मतांचे आहे. २०-३० जागी जरी त्यांच्या उमेदवाराने तुल्यबळ लढत दिली वा शंभर सव्वाशे जागी कॉग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या पराभवाला हातभार लावला, तरी राजकारणात तो मोठा पल्ला असेल. पुढल्या प्रत्येक निवडणूकीत त्या शे-दिडशे जागी वंचितला दुर्लक्षित ठेवून पुरोगामी पक्ष वा कॉग्रेसला एकही पाऊल उचलता येणार नाही. युती विरोधातल्या राजकारणात ही कुर्मगती रणनिती असेल. पण तिचा दिर्घकालीन परिणाम मोठा असेल. दुरगामी राजकारण समजू शकत नाहीत, त्या विश्लेषकांना त्याचे महात्म्य उमजू शकत नाही. त्यांना ही ससा कासवाची शर्यत वाटेल. पण दुरचे बघू शकतो, तोच राजकारणात टिकतो आणि यशही मिळवू शकत असतो.

7 comments:

  1. दुर्दैवाने पुरोगामित्वाची झूल पांघरलेला प्रकाश आंबेडकर हा प्रत्यक्षात वृत्तीने नक्षलवादी विचारांचा आहे हे वेळोवेळी त्यांनी सिद्ध केलेले आहे त्यामुळे त्यांची वकिली न केलेलीच बरी

    ReplyDelete
  2. प्रकाश आंबेडकर हा खेळ बराच उशिरा खेळत आहेत. त्यांचेही काँग्रेस बरोबर जाऊन झाले आहे. आता काँग्रेस क्षीण असल्याने ते स्वतःचा घरोबा करू पाहत आहेत. ओवैसी बरोबर आघाडी करणे ही तर घोडचूक आहे

    ReplyDelete
  3. "भाजपाची B टीम" असे हिणवून, आपल्यासोबत जबरदस्तीने बांधून ठेवणे यावेळेला जमले नाही.
    बाळासाहेब आंबेडकर यांची देहबोली यावेळी आत्मविश्वासाने भरलेली वाटते आहे. त्यांचे ध्येय निश्चित असावे, नाहीतर MIM ला त्यांनी बाजूला काढून ठेवलं नसतं.
    जे आपण म्हणता त्यात तथ्य आहेच. काँग्रेस, वंचित आघाडी च्या देखील मागे राहील...
    फडणवीसांना तर बहुधा खात्री असावी. तसं ते स्पष्ट म्हणालेच होते, विरोधी पक्ष नेता, वंचित आघाडीचा असेल...

    ReplyDelete
  4. भाऊ, विश्लेषण योग्य पण यांचे वाढणे तेव्हडेच धोकादायक आहे कारण आत्ताची यांची वक्तव्ये बघता पुढे आणखी कडवे होण्याची शक्यता फार आहे.

    ReplyDelete
  5. राज ठाकरे चर्चेतून गायब झाले. लोकांना आठवणही उरली नाही

    ReplyDelete
  6. तुमचा लेख वाचल्यावर मला पूर्वीच्या जनसंघाची आठवण आली.

    जनसंघ म्युनिसीपालिटीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणूका लढवत असे. १ ते १०% जागांवर विजयी होत असे. बहुतेक ठिकाणी डिपॉझिट जप्त होत असे. तरीपण नाउमेद न होता पुढील निवडणूक लढवत असे. अनुभवी लोक थट्टा, टिंगल आणि टवाळी करत असत. परंतू त्यातूनच तो पक्ष वर आला आणि जनता पक्षात विलिन होणाऱ्या पक्षामध्ये प्रमुख पक्ष झाला. आज त्यांची काय स्थिती झाली, हे सर्वांना माहित आहेच.

    मला वाटते की या उदयोन्मुख होऊ इच्छिणाऱ्या पक्षांनी असाच मार्ग अनुसरावा. राज ठाकरे किंवा प्रकाश आंबेडकर यांनी म्युनिसीपालिटी, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यासारख्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करावे.

    ReplyDelete
  7. Excellent analysis. But the fact is these lilliputian leaders are no match to Modiji who is a moving Himalayan man ad these so called leaders pale before him beyond recognition. Maharashtra voter like any other voter is quite a shrewd voter & no body can take him granted

    ReplyDelete