Thursday, December 26, 2019

उस्तादोंके ‘वस्ताद’

Image result for uddhav pawar

कमी आमदारांत सरकार कसं बनवायचं हे पवारांनी शिकवलं, हे सत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे सांगून टाकले हे बरे झाले. किंबहूना आपण आजकाल राजकारणाचे धडे शरद पवारांकडूनच घेतो आणि गिरवतो; याची ही कबुली सत्य विदीत करणारी आहे. कारण अलिकडल्या काळात काही लोक शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही, म्हणून कुरबुरत असतात. त्यांची तोंडे या खुलाशाने बंद व्हावीत. कारण खुद्द पक्षप्रमुखांनीच आता स्थिती बदलली असल्याचे मान्य केले आहे. किमान वा कमी आमदारातही सरकार कसे बनवावे, ह्याचा राजकीय धडा त्यांनी पवारांकडून घेतला व यशस्वीपणे राबवून दाखवला आहे. अर्थात त्यासाठी अगदी पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची काहीही गरज नव्हती. खुद्द पवारांनी तो धडा ४१ वर्षापुर्वीच यशस्वी करून दाखवला होता. त्यांनी आघाडी युतीऐवजी पक्षातलेच किमान आमदार घेऊन मुख्यमंत्रीपद मिळवले होते. आपल्या पक्षातील पितृतुल्य वसंतदादांना जमिनदोस्त करून त्यांच्या जागी पवार मुख्यमंत्री म्हणून स्थानापन्न झालेले होते. अवघ्या २२ आमदार मंडळींना सोबत घेऊन त्यांनी ९९ आमदारांच्या जनता पक्षाला दुय्यम स्थान सरकारमध्ये दिलेले होते. किंबहूना ज्याला आज उद्धवराव धडा म्हणतात, तो पाठ पवारांनी तेव्हा तितकेच पितृतुल्य एस. एम जोशी यांनाही शिकवला होता. कारण आज भाजपा १०५ आमदार घेऊन विरोधी पक्षात बसलेला आहे आणि तेव्हा सर्वात मोठा पक्ष असून देखील जनता पक्षातील महाराष्ट्राचे अध्यक्ष जोशी आपल्या पक्षाच्या ९९ आमदारांना घेऊन विरोधात बसलेले होते. पवारांनी त्यांना सत्तेत येऊन बसायचे धडे शिकवले होते. असो. मात्र या अभ्यासक्रमामध्ये पवार एकटेच गुरू वा उस्ताद नाहीत. त्याहीपेक्षा कमी आमदारात वा एकांड्या आमदारालाही मुख्यमंत्री होता येण्याचे धडे देऊ शकणारे गुरूजी व प्राचार्यही उपलब्ध आहेत. अर्थात उद्धवरावांना पुढले धडे गिरवायचे असतील तर.

काही वर्षापुर्वी म्हणजे बहुधा २०१२ च्या महापालिका निवडणुका रंगात आलेल्या असताना बहुतांश मराठी वाहिन्यांनी बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्या प्रदिर्घ मुलाखती घेऊन प्रक्षेपित केल्या होत्या. तेव्हा पवारांनीच या विषयातील आपले एक प्रमाणपत्र कथन केलेले आठवते. १९७९ सालात जनता पक्षातील बेबनावामुळे मोरारजी देसाई सरकार कोसळले होते आणि विरोधी नेता असलेल्या यशवंतराव चव्हाणांना पर्यायी सरकार स्थापन करू शकता काय, अशी विचारणा राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी केलेली होती. पण संख्याबळ नसल्याने आपली असमर्थता चव्हाणांनी व्यक्त केली होती. पुढे रेड्डी निवृत्त झाले आणि एका प्रसंगी त्यांच्यासह यशवंतरावांच्या गप्पा चालल्या असताना पवार तिथे पोहोचले आणि रेड्डींना तो जुना प्रसंग आठवला. त्यांनी पवारांकडे बघत यशवंतरावांना सांगितले, तुमच्या जागी तीच ऑफ़र शरदला दिली असती, तर त्याने आधी पंतप्रधान पदाची शपथ घेतली असती आणि नंतर बहूमताचा आकडा जमवण्याची धावपळ केली असती. हा किस्सा खुद्द उद्धवरावांच्या नव्या वस्ताद पवारांनीच कथन केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या पुर्वायुष्यातील घटनाक्रम तपासूनही खुप काही शिकता येणे शक्य आहे. त्यासाठी खाजगी ट्युशन घेण्याची काहीही गरज नाही. खरेतर आपल्या अनेक नेत्यांनाही उद्धवरावांनी आता पवार क्लासेसमध्ये दाखल करावे आणि नवनवे धडेही शिकून घ्यायलाही भाग पाडावे. बाळासाहेबांची हिंदुत्व वा तत्सम जुन्या समजूतीमध्ये अडकून पडलेली शिवसेना अधिकाधिक ‘राष्ट्रवादी’ करण्याची एक योजनाच हाती घ्यावी. त्यासाठी देवेगौडा, कुमारस्वामी वा चिमणभाई पटेल, शंकरसिह वाघेला. मधू कोडा असे एकाहून एक महान उस्ताद धडे द्यायलाही येऊ शकतील. मग मतदान, जागावाटप वा निवडणुका असल्या गोष्टी राजकारणात क्षुल्लक होऊन जातील.

१९९६ सालात लोकसभेची निवडणुक होऊन प्रथमच भाजपा हा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला, तरी त्याला बहूमत मिळवता आलेले नव्हते. म्हणून तेरा दिवसाचे सरकार बनवून अटलबिहारी वाजपेयी यांनी राजिनामा दिला होता. त्यात शिवसेनेचे सुरेश प्रभूही सहभागी होते. कदाचित तेव्हाच बाळासाहेबांनी पवारांकडून काही शिकून घ्यायला हवे होते, असेही आज उद्धवरावांना वाटत असेल ना? पण पवारांशी मैत्री राखली तरी बाळासाहेब कधीच पवारांकडून काही शिकले नाहीत. म्हणून शिवसेनेला इतकी वर्षे सत्तेबाहेर बसावे लागले असेल का? बाळासाहेब तिथे चुकले की त्यांनी ती मोठीच चुक केली होती? पवारांची ही उपयुक्तता त्यांना कधीच कळलेली नसावी. अन्यथा सेनेला कधीच सत्तेत मोठा हिस्सा मिळाला असता. अधिक आमदार निवडून आणायचे कष्ट उपसावे लागले नसते. उद्धवराव अधिक समजूतदार निघाले म्हणायचे. खरे तर त्यांनी पाच वर्षापुर्वीच पवारांच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला असता, तर राजिनामे खिशात ठेवून सेनेच्या मंत्र्यांना उगाच भाजपाच्या नाकदुर्‍या तरी काढायला लागल्या नसत्या. ५६ पेक्षा ६३ आमदार ही संख्या अधिक मोठी होती. त्यामुळे सत्तावाटपातही मोठा हिस्सा पदरात पडला असता. पण दुर्दैव असे, की त्यावेळी भाजपाचे नेते पवार क्लासेसमध्ये आधीच दाखल झालेले होते आणि उस्तादांनी त्यांना अल्पमतात असताना वा बहूमत हुकले असताना सरकार कसे स्थापन करावे, त्याचे धडे देण्याचे कंत्राट घेतलेले होते. त्यामुळे उद्धवरावांची मोठी संधी हुकलेली असावी. पण यावेळी त्यांनी आधीपासूनच पवार क्लासेस जॉईन केलेले होते. त्यामुळे ५६ आमदारातही मुख्यमंत्रीपद मिळून गेले. अधिकचे मंत्रीही घेता आले. असो, यापुढे आता मधू कोडा वा देवेगौडांची शिकवणीही लावून घ्यावी. म्हणजे शिवसेनेला केंद्रातही अठरा खासदारांच्या बळावर पंतप्रधानपद मिळवता येऊ शकेल.

मधू कोडा हे नाव अलिकडल्या पत्रकारांनाही ठाऊक नसेल, तर लोकांच्या स्मरणात असायचे काही कारणच नाही. हे मधू कोडा पवार पॅटर्नमध्ये महाप्राचार्य आहेत. उद्धवराव कमी आमदारात सत्ता वा मुख्यमंत्रीपद मिळवण्यावर बोलत आहेत. मधू कोडा यांनी तेच एकमेव आमदार असतानाही झारखंडाचा मुख्यमंत्री बनुन दाखवले आहे. फ़ार कशाला त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा, कॉग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल अशा मोठ्या पक्षांना ओलिस ठेवून आपले मुख्यमंत्रीपद उपभोगलेले आहे. शिबु सोरेन, अर्जुन मुंडा अशा मोठ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना खेळवून व पाडून कोडा यांनी शिताफ़ीने अपक्ष आमदार असूनही मुख्यमंत्रीपद मिळवले होते. पवारांना इतका मोठा पराक्रम अजून करता आलेला नाही. बाकी आपली मुदत संपल्यावर मधू कोडा खाण घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले हा भाग वेगळा. धडा महत्वाचा. अल्प वा एका आमदारातही सत्ता मिळवणे व सरकार बनवण्याचा विषय चालू असताना; घोटाळा वा तुरूंगवास असल्या गोष्टींचा उहापोह करण्याची गरज नाही. अवघे ४६ लोकसभा सदस्य पाठीशी असतानाही देवेगौडा १४० खासदारांच्या कॉग्रेसला ओलिस ठेवून १९९६ सालात देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. पवारांना विरोधी नेता असूनही अंधारात ठेवून देवेगौडांचे सरकार कसे पाडावे, हा धडा द्यायला सीताराम केसरी आज हयात नाहीत, हे दुर्दैव. मुद्दा इतकाच, की सत्तेच्या राजकारणात उद्धवरावांना खुप धडे शिकायचे आहेत आणि त्या अभ्यासक्रमातले पवार म्हणजे तुलनेने हायस्कुलचे मास्तर आहेत. कॉलेज वा विद्यापीठाचे प्राध्यापक वा प्राचार्य भरपूर आहेत. लौकरात लौकर उद्धवरावांनी त्यातले जे कोणी उपलब्ध असतील, त्यांच्या शिकवण्या लावून घ्याव्यात. मग शिवसेनेला कधीच सत्तेबाहेर बसावे लागणार नाही वा निवडणुका वगैरे जिंकण्याच्या फ़ंदातही पडावे लागणार नाही. किती उमेदवार जिंकतील, त्याचीही फ़िकीर करण्याची गरज नसेल. उस्तादांचे वस्ताद कमी नाहीत.

15 comments:

  1. मला भीती वाटायला लागली आहे,मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत विरुद्ध बोलणारांचे एकतर मुंडण केले जात आहे फोटोला जोडेमार आंदोलन किंवा घरात घुसून मारण्याच्या धमक्या येत आहेत.

    ReplyDelete
  2. मार्मिक भाष्य ,शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete
  3. भाऊ
    आता बाळासाहेबांची शिवसेना नसून पवारांची शरदसेना झाली आहे.

    ReplyDelete
  4. देवेगौडा यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता आणि इंदर कुमार गुजराल हे पंतप्रधान झाले नव्हते, त्यावेळी बसपाचे कांशीराम जाहीरपणे म्हणाले होते की जर बसपाचे निदान ५० खासदार निवडून आले असते तर आमचा बहुमत नसतानादेखील पंतप्रधान होऊ शकतो.

    ReplyDelete
  5. निवडणुकीच्या वेळी पवारांनी शिवसेनेच्या "शिवभोजन 10 रुपयात" ची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते, तुम्हाला राज्य करायचे आहे स्वयंपाकघर चालवायला नाही सांगितलंय. आज तिच योजना सर्व प्रथम सुरू करायला पवारांनी आडकाठी केलेली नाही. पवारांनी मुख्य मुद्यांना हात लावू न देता, इतर काहीही करायला उद्धव यांना परवानगी दिली असावी.
    सामना शिवसेनेचा आहे की राष्ट्रवादी चा हे ही कळेनासे झाले आहे.
    काल परवा उद्धव म्हणाले, आम्ही धर्म आणि राजकारण याची गल्लत केली. म्हणजे बाळासाहेब चुकीचे होते असेच झाले ना?
    खरे तर मला कधीकधी शंका येते, बाळासाहेब यांची शिवसेना हे पुसुन, उद्धव यांची शिवसेना असा काही कार्यक्रम चालू आहे काय?
    अनेक बॅनर वर देखील हल्ली बाळासाहेब दिसत नाहीत. मध्ये एकदा उद्धव म्हणाले देखील होते, आम्ही बाळासाहेबांचा फोटो व्यासपीठावर न लावता मते मागितली होती..
    एकंदरीत शिवसेना बदलते आहे हेच खरे...
    कारण बाळासाहेब यांची "80% समाजकारण आणि 20% राजकारण" ही घोषणा आता शिवसेनेसाठी कालबाह्य झाली आहे...

    ReplyDelete
  6. भाऊ एकदम बरोबर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे . इतकी वर्षे राजकारण केले पण यांची मजल ही बारामती व प महाराष्ट्र याच्या पुढे कधी गेलीच नाही . यांचा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षातून फोडून बनलेला आहे .स्वतः एक्त्यानं 48 सीट देखील महाराष्ट्र काबीज करता आला नाही . आणि हे आता उपदेश करतात की आम्ही प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन bjp ला पर्याय देऊ शकतो . म्हणजे ते सुदधा सगळ्यांना एकत्र करून स्वतःच्या जीवावर घंटा .आणि हे म्हणे जाणते राजे 😃😃🤑🤑

    ReplyDelete
  7. 2 खासदार अस्ताना भाजप ला ही सत्तेची स्वप्न कशी पडली होती हे ही सांगायचे होते़ भाऊ!
    18 खासदार अस्तानाही 1 मंत्रीपद पण कमी खासदार असनार्या LJP आणि JDU ला जास्त आणि चांगली मंत्री पदे असे पाहिल्यावर उद्धव ठाकरे यांचे म्हणणे किं पालखिचें भोई सेनेनेच का वाहवे हे पटते. आणि ह्याच पवारांच्या क्लास मधे मोदी ADMISSION साठी विचारणा करत होते त्यांना दिल्लीला बोलावून. आणि फडणवीस तर् आधीच ADMISSION घेऊन क्लास पूर्ण करून गेले आहेत किवा त्यांना क्लास मधून काढून टाकण्यात आले असे म्हटले तर वावगै होणार नाही

    ReplyDelete
  8. मस्त! भाऊ मान लीया. हे सर्व हेड मास्तर वाचतात कि नाही ते कळायला मार्ग नाही.

    ReplyDelete
  9. १) पवार यांच्या बद्दल, पूर्वी चा आपला , विश्र्वास ठेवायला लावून, अविश्र्वासाने दगा द्यायचा, असा लेख आठवतो २)पण अजित व शरदचंद्र यांच्याशी वागताना, एका दिवसाची खातरजमा भाजप ने करायला हवी होती.आता भाजप ला डॅमेज कंट्रोल करावा लागेल. लेखाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  10. भाऊ, शालजोडीतील फटके यालाच म्हणतात का ???

    ReplyDelete
  11. गेंड्याची कातडी झालेली आहे उधोजीरावांची, बघुया आता पाठ फिरवली की पवारांचेच धडे गिरवतात का ते

    ReplyDelete
  12. कमी आमदारांत सरकार कसं बनवायचं हे पवारांनी शिकवलं, हे सत्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे सांगून टाकले. ह्या वाक्याने उद्धव ठाकरे हे संपूर्ण उघडे पडले. Bjp आणि शिवसेनेत जे काही ठरले होते त्या नुसार त्यात प्रचाराच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र असे समोरील जनसागराला सांगितले होते. स्वतः गृहमंत्री तेच सांगत होते. उद्धव ठाकरें तेव्हा चुप्प होते. Bjp ला सप्पोर्ट मिळाल्याशिवाय bjp चे
    सरकार येत नाही हे स्पष्टय झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पवारांची शिकवणी घेतलेली स्प्ष्टय होते आहे. उद्धव ठाकरेंनी पवारांची शिकवणी काय लावली अन राऊत कडवा त्वेष (फॅनॅटिसिझम) दाखवू लागले. उद्धव ठाकरेंनी पवारांची
    शिकवणी लावली अन त्यात यशस्वी होण्यासाठी शिवसेनेची
    बेसिक राजकीय-मूल्यप्रणाली उपटून फेकून दिली. उद्धव ठाकरेंना कदाचित मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची उब पवारांकडे
    शिकवणी लावल्यामुळे मिळाली पण मायबाप सरकारने फुकटेगिरीला वाव द्यायचा आणि स्वयंघोषित निराधारांनी/ग्रस्तांनी कोण काय ‘देतो’ यावर मते द्यायची, हा अनुरंजनवाद मात्र परस्पर राज्यभर पसरला. भाऊ, जेव्हा मूल्यप्रणाल्यांचा आशय क्षीण होत जातो तेव्हा लोकशाहीत द्विध्रुवीय स्पर्धा अपरिहार्य बनते. आता येणाऱ्या काळात सगळंच बदलेल.
    संपर्कक्रांतीच्या या टप्प्यावरचा आणि नागरी स्वातंत्र्याची चव चाखलेला राज्याचा नागरिक हिणकस वक्तव्ये करणाऱ्या आचरटांपेक्षा फडणवीस/गडकरीसदृश परफॉर्मर्स ना व्यवस्थित जागेवर नेईलच पण शिकवणी लावून सत्ता घेणार्यांना व नाही त्या वयात नाही त्या शिकवणी घेणार्यांना
    त्यांची जागा दाखवेल



    ReplyDelete
  13. Hinduhrudaysamrat BalasahebThakare yanchya shiwsenecha abhiman wataycha, hallichya shiwsenechi ghruna yete.

    ReplyDelete
  14. Hinduhrudaysamrat BalasahebThakare yanchya shiwsenecha abhiman wataycha, hallichya shiwsenechi ghruna yete.

    ReplyDelete