Monday, February 10, 2020

वाचाळता पुरे झाली

Image result for chandrakant patil

महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी मध्यंतरी केलेले वक्तव्य कितीसे आवश्यक आहे? किंबहूना अनेक भाजपा नेत्यांनी नित्यनेमाने जाहिर वक्तव्ये करण्याची खरोखरच गरज आहे काय? कारण त्यांनी सत्ता गमावलेली आहे, म्हणून त्यांच्या कुठल्याही वक्तव्याकडे वैफ़ल्यग्रस्त म्हणूनच बघितले जाणार आहे. त्यातून त्यांची टवाळी फ़क्त होऊ शकते. पक्षाला त्याचा लाभ मिळण्याची शक्यता नसताना असली वक्तव्ये कशाला केली जातात, तेच समजत नाही. किंबहूना अशाच अनाठायी तोंडपाटिलकीमुळे कॉग्रेस पक्षाने आपले सर्वाधिक नुकसान करून घेतलेले आहे. एका पक्षाला जो धडा जनता देते, तो त्यांच्यापुरता मर्यादित नसतो, तर उर्वरीत पक्षांसाठीही तो धडा असतो. मुद्दा असतो, त्यातून शिकण्याचा. कॉग्रेस जाणिवपुर्वक शिवसेनेला हिंदूत्वापासून दुर घेऊन जाते आहे, असे पाटलांनी केलेले वक्तव्य, खरेच आवश्यक होते काय? शिवाय आपण शिवसेनेचे हितचिंतक म्हणून बोलल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण अशा हिंतचिंतकाची शिवसेनेला गरज आहे काय? शिवाय त्या पक्षाला आपले हित कळत नाही काय? एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने दुसर्‍या पक्षाचा हितचिंतक असण्याचे काहीही कारण नसते. त्यापेक्षाही त्याने आपल्याच पक्षाच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे आणि आज भाजपाचे हित नसती विधाने करण्यात नाही. राजकीय घटनाक्रमाला आपल्या गतीने पुढे जाऊ देण्यात भाजपाचे हित सामावलेले आहे. मध्यावधी निवडणूका होतील तेव्हा होतील आणि शिवसेनेचे हित-अहित त्या पक्षाच्या नेतृत्वाला वाटायला हवे. भाजपाच्या नेत्याला तसे काही वाटून उपयोग नसतो. इथे भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कित्ता गिरवण्याची गरज आहे. किती आरोप झाले म्हणून त्याला मोदी सहसा उत्तर देत नाहीत. किंबहूना मागल्या तेरा चौदा वर्षात त्यांनी माध्यमांशी बोलणेही बंद केलेले आहे. तो सर्वात मोठा धडा आहे.

गुजरात दंगलीचे भांडवल करून मोदींना सतत माध्यमांनी हैराण करून सोडलेले होते. पाचसहा वर्षे उलटून गेली तरी बहुतांश पत्रकार दंगलीविषयी बोलूनच त्याचा विपर्यास करीत होते. त्याला कंटाळून बहुधा मोदींनी पत्रकारांशी असलेला संवादच बंद करून टाकला. २००७ नंतरच्या काळात मोदींनी कुठल्याही पत्रकाराला मुलाखत देणे साफ़ बंद करून टाकले. त्यासाठी त्यांच्यावर पळपुटेपणाचा वा माध्यमांना घाबरत असल्याचा आरोपही होत राहिला. पण आपल्या जाहिर भाषणाखेरीज कुठल्याही मुलाखती देण्य़ाचे मोदींनी साफ़ बंद केले. त्यांचे काय नुकसान झाले? त्यांनी तिनदा गुजरात विधानसभेत सहज बहूमत मिळवले आणि ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले. तेव्हा त्यांच्या मुलाखतीसाठी बहुतांश माध्यमे लाचारासारखी वाडगा घेऊन फ़िरत होती. यातला पहिला धडा असा, की जेव्हा आपल्या वक्तव्याचा विपर्यासच केला जाणार आहे, तेव्हा अशी वक्तव्ये देण्यापेक्षा सोशल मीडियातून आपले मत मांडून बाजूला व्हावे. त्यातून तुमच्या विरोधकांना दारुगोळा पुरवण्याची चुक तुमच्याकडून होत नाही. यातला फ़ायदा बघायचा असेल, तर गेल्या दोनतीन वर्षापासून कॉग्रेसचा झालेला लाभ बघता येईल. कॉग्रेसने लोकसभेच्या मतदानापुर्वीच बहुतांश वाहिन्यांवरून आपले प्रवक्ते बाजूला काढले होते. तीन राज्यात भाजपाची सत्ता हिसकावून घेण्यात कॉग्रेस यशस्वी ठरली. त्यात ही प्रवक्त्यांची अनुपस्थिती मोठे योगदान देऊन गेलेली आहे. आताही इथे महाराष्ट्रात भाजपाने विद्यमान सरकारला नावे ठेवण्यापेक्षा भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्याला महत्व आहे. त्यात शिवसेना असेल किंवा नाही आणि सरकार मोडून सेना भाजपा सोबत येईल किंवा नाही, या गोष्टींचा उहापोह फ़क्त टिंगलीचा विषय होऊ शकतो. शिवसेनेने आपला मार्ग चोखाळला आहे आणि भाजपानेही आपली भूमिका घेऊनच सत्तेबाहेर बसणे स्विकारले आहे. मग ही मोडतोडीची भाषा कशाला?

एक गोष्ट साफ़ आहे, शिवसेनेने दोन्ही कॉग्रेससोबत जाताना सत्तेसाठी मोठा जुगार खेळलेला आहे. आपल्याच विचाराशी दोन्ही मित्रपक्ष समरस होणारे नाहीत, हे शिवसेनेला कळते. त्यातून वारंवार सेनेची होणारी कोंडी भाजपा नेत्यांना कळते आणि सेनेच्या नेतृत्वाला समजत नाही, अशा भ्रमात रहाण्याचे कारण नाही. पण शिवसेना सुडाला पेटलेली असेल तर तुम्ही डिवचणार तितके त्यांना तोंड दाबूब बुक्क्याचा मार खात दोन्ही कॉग्रेससोबतचे सरकार टिकवून धरावेच लागणार आहे. दारात समोरचा शेजारी भांडायला उभा असताना घरातली धुसफ़ुस झाकून ठेवावीच लागत असते. त्यामुळे भाजपाचे नेते प्रवक्ते जितके डिवचतील, तितके शिवसेनेला मित्रपक्षांचे जोडे खाऊनही खुश असल्याचे दाखवावेच लागणार. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रक्षेपित झालेली मुलाखत वा त्यांची वेळोवेळी आलेली वक्तव्ये ऐकली; तरी त्यातली वेदना लपून रहात नाही. सरकार स्थापन करून दोन महिन्याचा कालावधी उलटलेला आहे. पण आपण केलेले कृत्य वा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे अजून उद्धवराव स्वत:लाच पटवल्यासारखे बोलत असतात. आपले सरकार व त्याने आतापर्यंत घेतलेले निर्णय; याविषयी बोलण्यापेक्षा असे चमत्कारीक सरकार कशाला स्थापन केले, त्याचाच खुलासा देणे कायम चालू आहे. त्याचा अर्थच त्यांनाही मनाने केले ते पटलेले नाही. ते दुखणे सातत्याने वक्तव्यातून समोर येत असते. नव्याने मित्र झालेल्या पक्षांचे गुणगान व सहकार्याचे कौतुक करण्यापेक्षा त्यांचा वेळ भाजपाशी युती मोडल्याचे खुलासे देण्यात जातो, ही वेदना आहे. त्या वेदनेवर भाजपाच्या प्रवक्त्यांची विधाने मीठ चोळत असतात. तितके त्यांना आपले दुखणे लपवणे भाग आहे. अर्ध्या सत्तेसाठी व मुख्यमंत्री पदासाठी महायुती मोडून मांडलेला संसार सुखाचा नाही, हे सत्य आहे. पण ते दुखणार्‍याला जाणवण्यापर्यंत प्रतिक्षा महत्वाची असते.

प्रेमात पडून घरातून पळालेल्या मुलीचा घरातल्या विरोधावर अधिक राग असतो. तिला अशा दुखावलेल्या स्थितीत डिवचून काहीही साध्य होणार नसते. उलट ती नवविवाहिता आपल्याच आईबापाच्या विरोधात पोलिसात तक्रारही देत असते. तिला कोणी फ़सवणारा नवरा भेटलेला असेल, तर त्याने तिचा भ्रमनिरास करण्यापर्यंत प्रतिक्षा करणे भाग असते. उलट ती कशी फ़सली वा चुकली, त्याचा पाढा वाचत राहिल्यास ती अहंकारापायी चटके सोसूनही सासरी खुश असल्याचे नाटक रंगवित रहाते. हा आपला व्यवहारातला नित्याचा अनुभव आहे. तिला चटके बसण्यापर्यंत आणि ते दुखण्यापर्यंत आपण शांतता राखावी लागते. जितके तिला डिवचण्याचा प्रयत्न कराल, तितकी ती आपल्या त्याच चुकीच्या निर्णयाला घट्ट चिकटून बसत असते. म्हणून भाजपाच्या नेते प्रवक्त्यांनी अकारण चालवलेली वक्तव्ये निरूपयोगीच नाहीत, तर त्यांच्याच पक्षाला हानिकारक आहेत. राजकारणात असो किंवा कौटुंबिक जीवनामध्ये अहंकाराच्या आहारी जाऊन उचललेले टोकाचे पाऊल, मागे घेताना खुप घालमेल होत असते. त्यापेक्षा मरणही सोपे वाटत असते. अशावेळी त्या निर्णयाचा मानकरी असतो, त्याला आपली चुक समजण्यास मदत करण्याला महत्व असते. म्हणूनच शिवसेनेला छेडण्यापेक्षाही त्रयस्थपणे त्याकडे बघणे भाजपाला शिकले पाहिजे. बिहारच्या अशाच आघाडीत नितीशकुमार यांची कोंडी झाल्यावर एका दिवशी त्यांनीच ती मोडली होती ना? त्यासाठी कोणी मोठे डावपेच खेळलेले नव्हते. लालूंच्या कुटुंबाने नितीशचा भ्रमनिरास करण्यापर्यंत सुशील मोदींनी संयम राखला होता ना? कुमारस्वामी यांची स्थिती वेगळी नव्हती. तिथल्या जनता दल कॉग्रेस आमदारांचा धीर सुटण्यापर्यंत येदीयुरप्पा शांत राहिले होते ना? मग महाराष्ट्रातील आघाडी कुठे वेगळी आहे? गळू पिकल्याशिवाय फ़ोडायचे नसते म्हणतात. इथल्या भाजपाच्या नेत्यांना हे जितक्या लौकर कळेल तितके शिवसेनेपेक्षा त्यांच्याच पक्षाच्या हिताचे असेल.

25 comments:

  1. हाच फरक असतो जनतेच्या नेत्यात व सिलेक्टेड़ नेत्यात.फड़णवीस व पाटिल हे दोघेही अपाॅईंट केले गेलेले नेते आहेत. मुंड़ेंनंतर महाराष्ट्र भाजपा नेतृत्वहीन झालेला आहे.

    ReplyDelete
  2. चंद्रकांत पाटील यांनी सांगली सातारा कोल्हापूर भागातून भरती केलेले नेते यांनीच अपयश पदरात पाडलं
    हे निव्वळ गप्पा मारतात असेच वाटते....
    यांच्यापेक्षा चांगली उत्तरे विनोद तावडे गिरीश महाजन देतात.....

    ReplyDelete
  3. भाऊ, आज पहिल्यांदाच तुमच्या विश्लेषणाशी पूर्णपणे असहमत आहे.

    *कॉग्रेस जाणिवपुर्वक शिवसेनेला हिंदूत्वापासून दुर घेऊन जाते आहे, असे पाटलांनी केलेले वक्तव्य, खरेच आवश्यक होते काय?*
    -- मला वाटतं हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांसाठी नाहीच आहे. हे आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आणि हिंदुत्व मानणाऱ्या मतदारांसाठी. वारंवार हेच ठसवलं जातंय की हिंदुत्त्वाची खरी बूज आम्हालाच, बाकी सगळे एकतर हिंदुत्व विरोधी किंवा दिखाऊ. (धृवीकरण)

    *शिवाय आपण शिवसेनेचे हितचिंतक म्हणून बोलल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण अशा हिंतचिंतकाची शिवसेनेला गरज आहे काय?*
    -- निव्वळ कांगावा. हे शिवसेनेचे हितचिंतक नाहीच आहेत. मी वर सांगितलेल्या वर्गाला आपल्याकडे ओढण्याची खेळी आहे ही.

    *नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रक्षेपित झालेली मुलाखत वा त्यांची वेळोवेळी आलेली वक्तव्ये ऐकली; तरी त्यातली वेदना लपून रहात नाही.*
    --तोच तर खरा उद्देश आहे. शिवसेनेला सत्तेतच राहू द्यायचं पण ही वेदना सतत या ना त्या मार्गाने सर्वांसमोर आणायची.

    *बिहार आणि कर्नाटक*
    बिहारमध्ये नितीशकुमारांना सोबत घ्यायचं होतं म्हणून जास्त डिवचलं नाही आणि कर्नाटकात ना कुमारस्वामी ना कॉंग्रेस कोणालाही बरोबर घ्यायचं नव्हतं; फक्त आमदार फोडायचे होते, म्हणून कोणालाच डिवचायचा प्रश्र्न नव्हता. महाराष्ट्रात डिवचून डिवचून परतीचा दरवाजा बंद केला जाणार नाही पण एवढा लहान केला जाईल की सेनेला गुढग्यावर बसून किंवा रांगतच आत यावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. इतके सरळ नाही ते. जितके तुम्ही सेनेला डिवचाल, तितका सेनेचा मतदार पक्का होत जाईल, आणि उद्धव ठाकरेंना victim card खेळायची संधी मिळत जाईल. त्यापेक्षा शांत राहून एकच परिणामकारक घाव घातला पाहिजे

      Delete
    2. 1. राजकारणात संधी मिळणे, आणि मिळाल्यावर ती साधणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात.
      राज ठाकरेंना संधी मिळाली आहे, ती ते साधतात का हे आता कळेल.
      भाजपला पण महाराष्ट्रात संधी मिळाली आहे, अमित शहा ती साधतायत, पण स्थानिक नेते ते साधत आहेत का कल्पना नाही.

      Delete
    3. वेगळे विष्लेशण दमदार आहे.

      Delete
  4. अतिशय योग्य सल्ला दिला आहेआहे व तोही संसार जीवनातील तसेच राजकीय घडामोडींवर घडणाऱ्या घडामोडी चे समर्पक उदाहरणे देऊन.

    ReplyDelete
  5. भाऊ ही वाचाळता नसावी कदाचित हे मुद्दाम बोलले जात असावे असे वाटते त्याचे कारण म्हणजे सत्तेत काहीच वाटा न मिळालेले असंतुष्ट शिवसेना आमदार हे भाजपच्या रडारवर असले पाहिजेत बिहारचे उदाहरण इथे लागू नाही याचे कारण नितीश यांनी जरी भाजपशी युती तोडली होती तरी त्यांनी कधीही पातळी सोडून भाजपवर टीका केली नव्हती त्यामुळे परत दोन्ही पक्षांना एकत्र काम करणे शक्य झाले महाराष्ट्रात मात्र ते शक्य वाटत नाही कारण सामना मधून रोज ज्या पद्धतीने भाजपवर टीका केली जात आहे ते पाहता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता या पुढे एकत्र काम करणे अशक्य आहे आणि ज्या अमित शहा यांनी सत्तेवर पाणी सोडले पण उद्धव ठाकरे यांच्याशी तडजोड करणे नाकारले ते पाहता भाजप परत उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्ता स्थापन करेल हे शक्य वाटत नाही मात्र हिंदुत्वावरून कोंडमारा झालेल्या सेना आमदारांमध्ये चलबिचल निर्माण करणे हा भाजपचा हेतू असावा, त्यात परत राज ठाकरे जेवढे जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार करतील तेवढी ही चलबिचल वाढत जाईल, पुढे काय होते ते बघणे रंजक ठरणार आहे

    ReplyDelete
  6. मेगा भरतीचे सूत्रधार हेच आहेत

    ReplyDelete
  7. जोपर्यंत महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील व फडणवीस हे भाजपचे प्रमुख नेते आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबणार नाही. हे दोघे नेतेपदी असले तर पुढील निवडणुकीत भाजपला फार तर ६०-७० जागा मिळतील.

    ReplyDelete
  8. Very very correct analysis Bhau.Ur this article again proves ur level as a good thinking journalist. Hats off to u.BJP must concentrate on increasing base in rural masses.Even if they look into policy decision taken at state and how much and how many r implemented they will understand d gap and try to correct in a better way whenever they get d opportunity.

    ReplyDelete
  9. वाचाळ वीरांना एक डोस पाजणे खरंच गरजेचं आहे. भाऊ, तुमचा हा डोस एकदम मस्त!

    ReplyDelete
  10. भाऊ, अगदी वर्मावर बोट ठेवले आहे. सध्या भाजपाने गप्प बसून मजा पहाण्यात खरी मजा आहे,पण हे सर्व जण एकसारखे शिवसेनेला खिजविण्यातच गर्क आहेत.
    त्यामुळे social media वर "सत्ता गेली म्हणून पिसाळलेल्या, वैफल्यग्रस्त झालेले आहेत " अशा प्रतिक्रिया येत आहेत.
    फडणवीसांबद्दल येणार्‍या प्रतिक्रिया तर वाचवत नाहीत.
    फडणवीस दिल्लीत जाणार अशी आवई उठताच "बरे होईल महाराष्ट्र स्वच्छ होईल" अशा posts येऊ लागल्या.
    फडणवीस नक्की का नकोत हे उघड लिहिता येत नाही इतकेच.
    परंतु सध्या नाही बोलणे भाजपच्या हिताचे आहे नक्की.
    छान विवेचन केलेत भाऊ तुम्ही.

    ReplyDelete
  11. अगदी अचूक विश्लेषण केले आहे. भजपची टीका हे सत्ताधीशांवर टाॅनिक आहे.

    ReplyDelete
  12. Very correct analysis. BJP should stop commenting on unholy alliance issue. People know that. They ,in democracy ,can show their dislike only during election. BJP talking same thing every day had no value.Let BJP be watchful opposition

    ReplyDelete
  13. अप्रतिम लेख. भाजपा नेत्यानी हा लेख मनःपूर्वक वाचावा आणि भाऊ नी दिलेला सल्ला आचरणात आणावा.

    ReplyDelete
  14. Once again Great analysis Dear Bhau 👍. Here we learn not only politics but more than that, which we can use in day to day Life. Salute to Bhau. 🙏

    ReplyDelete
  15. अत्यंत योग्य टिप्पणी. दररोज त्यांच्यावर टीका करण्यात कांहीच स्वारस्य नाही. त्यापेक्षा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करणे आवश्यक आहे. शिवसेनेचे काय चुकले किंवा काय बरोबर हे चंद्रकांत पाटील यांनी सांगण्याची काहीही गरज नाही. यामुळे आपलीच सोशल मिडीयावर टर उडवली जाते हे काय पाटलांना समजत नसेल? फडणवीस व पाटील हे वर्ष/सहा महिने गप्प रहातील तर चांगले होईल.मला पटणारा लेख. मित्रमंडळात चर्चा करताना मी हाच मुद्दा मांडतो.

    ReplyDelete
  16. आ.भाऊ नेहमीप्रमाणे लेख ऊत्तम.परंतु अलिकडे प्रत्येक राज्यात भाजपची पिछेहाट का यावर सविस्तर लिहिले तर बरे होईल.

    ReplyDelete
  17. भाजपाची पीछेहाट झाली नाही शिवसेनेने दगा दिला प्रमोद कुलकर्णी

    ReplyDelete