Saturday, February 8, 2020

पुरोगामी गणपतीही दूध पितो

Image result for ganesh drinks milk

आज सोशल मीडियात सतत गुंग असलेल्या विशीतिशीतल्या लोकांना कदाचित ही घटना आठवणार नाही. कारण ती घटना दोन तपापुर्वीची आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे १९९५ सालात गणेशोत्सव संपला होता व पितृपक्ष सुरू झाला असताना एके दिवशी अचानक देशाच्या कानाकोपर्‍यात सगळीकडे असलेल्या गणपतीच्या मुर्ती दुध पिवू लागल्या होत्या. कुठून ही अफ़वा किंवा वावडी उडाली ठाऊक नाही. पण बघता बघता देशाच्या नव्हेतर जगातल्या गणेशाच्या मुर्तींना दुध पाजण्यासाठी भक्तांची झुंबड उडालेली होती. अगदी सिंगापुर हॉंगकॉंग अशा दुरच्या देशातूनही गणपती दुध पित असल्याच्या बातम्यांनी धमाल उडवून दिलेली होती. सहाजिकच अशा वेळी अंधश्रद्धा निर्मूलन वा नास्तिक लोकांना आवेश चढला तर नवल नव्हते. बहुतांश बुद्धीजिवींनी या बातम्यांची यथेच्छ टिंगल उडवली होती आणि कुठला गणपती दुध पितो, त्याचे पुरावेही मागितले होते. नशिब तेव्हा वाहिन्यांचा जमाना आलेला नव्हता की सोशल मीडियाही गावगन्ना पसरलेला नव्हता. अन्यथा काय काय व्हायरल झाले असते, त्याची कल्पनाही करवत नाही. पण तो प्रकार पुरोगामी नसून प्रतिगामी असल्याने लवकर आटोक्यात आला होता. एकदोन दिवसातच गणपतीला दूध पाजण्याची भक्तांची हौस फ़िटली आणि लोक आपापल्या नित्यजीवनात गढून गेले. समजा कोणा पुरोगाम्याने तसा शोध लावला असता, तर आजही कदाचित पुरोगामी मंडळी गणपतीलाच दुध पाजत बसले असते. कारण शेवटी गणपती असो वा नागरिकत्वाचा कायदा असो, मुद्दा श्रद्धेचा असतो. समजूतीचा असतो. एकवेळ माणसाला श्रद्धेतून मुक्त करता येईल, पण समजूतीच्या शॄंखलांमधून मुक्त करणे केवळ अशक्य असते. कारण समजूत हेच बुद्धीजिवींना आपले ज्ञान वाटत असते. त्यासाठी त्यांना पुरावे वगैरे लागत नसतात. म्हणून शाहीनबागचे नाटक संपण्यापेक्षा देशभर पसरत चालले आहे.

तेव्हा गणपती दुध पितो म्हटल्यावर बघता बघता प्रत्येक शहरात, गावात, राज्यात गणपतीच्या देवळात त्या मुर्तीला दुध पाजण्यासाठी झुंबड उडाली होती आणि दुसरीकडे तथाकथित बुद्धीजिवी पुरोगामी मुर्तीने प्यायलेले दूध गेले कुठे? असा साधासरळ सवाल विचारला होता. तो योग्य सुद्धा होता. कारण निर्जीव मुर्ती दूध पिणार असेल तर दूध कुठेतरी गेले पाहिजे. मुर्तीला आकार असला तरी पोट नसते, किंवा पचनसंस्थाही नसते. मग प्यायलेले दूच पोटात नसेल, तर गेले कुठे? प्रश्न अगदी योग्य होता आणि कुठलाही आस्तिक त्याचे उत्तर देऊ शकत नव्हता. किंवा पुरावा देऊ शकत नव्हता. म्हणून आस्तिकांनी नास्तिकांचा दावा मान्य केला असे होत नाही. मुद्दा श्रद्धेचा होता. भक्तांना वाटत होते, गणपती दुध पितो आणि तेवढे त्यांच्यासाठी पुरेसे होते. त्यांनी भराभर देवाला खुश करण्यासाठी झुंबड केली होती. पण म्हणून त्यांना प्रतिगामी ठरवले गेले होते. कुठल्याही वैज्ञानिक पुराव्याशिवाय गणपती दूध पितो, म्हणणे मुर्खपणाच असतो. पण मग आताही नागरिकत्व कायद्याने देशातल्या मुस्लिमांना छळले जाणार; याचा तरी कुठला पुरावा आहे? तशी काही तरतुद त्या कायद्यात केलेली आहे काय? असेल तर कोणी पुरोगामी त्याचा पुरावा देऊ शकलेला नाही. यात पुरोगामीत्व कुठे आले? तर सगळेच स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे तेव्हा गणपतीचे दुध पिणे नाकारत होते आणि तेच सगळेच्या सगळे नागरीकत्व कायद्यामुळे मुस्लिमांचा छळ होणार असे छातीठोक सांगत आहेत. पण त्याचा पुरावा त्यांच्यापैकी कोणालाही देता आलेला नाही. त्यांना फ़क्त तसा संशय आहे आणि संशय आहे म्हणूनच त्यांना त्यात तथ्य वाटलेले आहे. हा नेमका तेव्हाच्या गणेश भक्तांचाच दावा नाही का? भक्ताला वाटले आणि गणपती दुध पिवू लागला. हा कायदा मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेणार हा आजच्या पुरोगाम्यांचा दावाही मग तितकाच अंधश्रद्धेचा भाग नाही काय?

दोन तपापुर्वीचा गणपती निर्जीव मातीचा वा दगडाची मुर्ती होती. आजचा गणपती पुरोगामी आहे. त्याला संशय असे म्हणता येईल. तो गणपती निदान डोळ्यांना दिसणारा होता. हा गणपती कुठे दिसत नाही. तो पुरोगाम्यांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. तो कायद्यात, त्याच्या कलमात वा सरकारच्या कारभारातही कुठे दिसत नाही वा दाखवता येत नाही. पण पुरोगाम्यांच्या मनात शंका आहे, म्हणून तो असलाच पाहिजे; असा पुरोगामी शहांण्याचा दावा आहे. अर्थात दावा करणारे अंधश्रद्ध पुरोगामी असल्याने त्यांच्या अशा खुळ्या समजुतीला वैज्ञानिक मानावे, असाही त्यांचा आग्रह आहे. कारण अजून तरी दोन महिन्यात शाहीनबाग ते देशाच्या कानाकोपर्‍यात का त्याचा विरोध होतोय, त्याचा विश्वासार्ह पुरावा कोणी देऊ शकलेला नाही. यात सगळे पुरोगामी कंबर कसून उतरले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्यांना वारंवार विचारले गेले, की भिती कसली आहे आणि कायद्यात काय तरतुदी आहेत, त्याचे उत्तर नकारार्थी येते. म्हणजेच त्याला नुसती समजूत वा गैरसमज म्हणायला पर्याय उरत नाही. श्रद्धा अशीच असते. तिला पुरावा लागत नाही. मानले तर असते नाहीतर नसते. ह्यात नवे काही नाही. फ़क्त सहासात महिन्यापुर्वी हे सर्व पुरोगामी अंधश्रद्ध चौकीदार चोर असल्याचा दिवसरात्र गजर करीत नव्हते का? त्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आणि राफ़ेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे मोठमोठे दावे केलेले होते. ती सर्व कागदपत्रे सरकारने कोर्टाला सादर केली आणि कसलाही घोटाळा नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलेला होता. म्हणून त्यांनी ते सत्य मानले का? अजिबात नाही. मुद्दा पुराव्याचा नसतोच. समजुती व श्रद्धेचा असतो. ह्या श्रद्धा दिर्घकालीन आणि भक्कम असतात. त्यातून माणसाला जीव गेला तरी बाहेर काढता येत नाही. विज्ञानही त्याला त्यातून मुक्त करू शकत नाही. मग पुराव्याची काय मजाल?

यशवंत सिन्हा वा अरूण शौरी यासारखे दिग्गज बुद्धीमान लोक आहेत. दोघेही भारताचे मंत्री म्हणून काम केलेले आहेत. सिन्हा तर अर्थमंत्री वा परराष्ट्रमंत्री म्हणून सत्तेत होते. त्यांना मंत्रीमंडळाची कार्यपद्धती ठाऊक आहे. पण त्याचा उपयोग नसतो. श्रद्धा बुद्धीला शिरजोर होऊ देत नाही. म्हणूनच मोदींना विरोध करायचा म्हटल्यावर त्या दोघांना राहुल गांधी यांच्या खुळेपणाला शरण जावेच लागले. राहुल गांधी यांनी राफ़ेल खरेदीत घोटाळा झाल्याचे आरोप केले आणि मोदींना घेरण्यासाठी टपून बसलेल्या सिन्हा शौरींना आपली तपस्या फ़ळास आल्याची भावना झाली. त्यांनी तात्काळ राफ़ेल आरोपावर झडप घातली आणि सुप्रिम कोर्टात धाव घेतली. वास्तविक कारभाराचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी त्यात पडायला नको होते. पण मोदी हा चोर इसम असल्याची श्रद्धा इतकी पक्की होती, की त्यांना काडीचा आधारही पुरेसा होता. पुरावे असते तर सिंघवी किंवा सिब्बल यांना घेऊन राहुल गांधीच सुप्रिम कोर्टात धावले नसते का? पण तसे झाले नाही. ते दोन्ही वकील वा राहुल आवई पिकवून बाजूला बसले आणि प्रशांत भूषण व सिन्हा शौरी कोर्टात धावले. भक्त अंधश्रद्ध असेच असतात. त्यांना चमत्कार वा अनाकलनीय गोष्टींचे मोठे आकर्षण असते. आपल्या इच्छा पुर्ण होण्यासाठी काहीतरी चमत्कार घडण्याच्या ते कायम प्रतिक्षेत असतात. इथे तेच झाले आणि राफ़ेलचा घोटाळा सिद्ध करायला कोर्टात जाऊन सिन्हा शौरी पुरते तोंडघशी पडले. नागरिकत्व कायद्याचे पुराण किंचीतही वेगळे नाही. त्यातही असेच अंधश्रद्ध अलगद येऊन फ़सलेले आहेत. दिल्लीतल्या जामा मशिदीचे इमाम वा अन्य बड्या मुस्लिम धार्मिक नेत्यांनी या कायद्याने मुस्लिमांच्रे कुठलेही नुकसान होणार नसल्याची खात्री दिली आहे. पण पुरोगाम्यांना व त्यांनी द्वेष शिकवलेल्या मुस्लिम वस्तीतल्या मुठभरांना कोणी शहाणे करावे?

भयगंड माणसातील वा पशूतील कळपवृत्तीला उत्तेजित करीत असतो. आपल्या हितापेक्षाही मग कळपाची वृत्ती उफ़ाळून येते आणि आत्मघातालाही प्रेरीत होत असते. नागरिकत्व कायद्याने आपल्याला भारतातून हाकलून लावले जाईल असा भयगंड निर्माण केल्यास मुस्लिमांना जमावाने घराबाहेर काढता येईल, असे यामागचे गणित आहे. जो मुस्लिम समाज अयोध्येचा निकाल आल्यावर आणि ३७० कलम रद्द झाल्यावरही निश्चींत होता, त्याला रस्त्यावर आणायचा एकमेव मार्ग भयगंड होता. त्यातून मोदी सरकारला गोत्यात आणायचा पुरोगामी डाव खेळला गेला आहे. जो संसदेत यशस्वी ठरला नाही वा सुप्रिम कोर्टातही फ़सला. तो अशा मार्गाने यशस्वी करण्याची खेळी रंगलेली आहे. या निमीत्ताने समोर येणारे चेहरे व झेंडे बघितले तरी त्यामागचा डाव लपून रहात नाही. अर्थव्यवस्थेत आलेली मंदी वा मरगळ हा गंभीर विषय असताना मुस्लिमांना चिथावण्या देऊन रस्त्यावर आणले गेले आहे. त्यांच्या हातात संविधानाच्या प्रति देऊन जणू कायदाच संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचे नाटक रंगवले गेले आहे. पण खरेच त्यात घटनात्मक चुक असती, तर विनाविलंब सुप्रिम कोर्टाने त्याची सुनावणी आरंभली असती. पण तसे झालेले नाही. कारण निदान वरकरणी तरी त्यात कुठे घटनेचा भंग झालेला नाही. आणि कोर्टात जाऊन कायद्याला आव्हान देण्याची सोय असताना देशाच्या प्रत्येक शहरात असे मुस्लिमांना रस्त्यावर आणायचे कारण काय? राफ़ेल वा चौकीदार चोरचे फ़सलेले नाटक आता नागरिकत्व कायद्याच्या नावाने परत चालवले जात आहे. माध्यमांना खळबळ माजवायला मसाला हवा असतो. बाकी यातून काहीही निष्पन्न होणार नाही. गणपती पुरोगाम्यांचा असला म्हणून दूध पिण्याची अजिबात शक्यता नाही. कारण राजकीय शिक्के तपासून विज्ञान बदलत नाही आणि गणपतीलाही पुरोगामी प्रतिगामी असल्या भांडणाशी कर्तव्य नाही. गणपती आणणार्‍यांनाच त्याचे विसर्जनही करावे लागते, हे विसरून  चालत नाही.

3 comments:

  1. भाऊ, सध्या सर्व मीडियात तुमचे नाव उडवले जात आहे. तुम्हाला सहस्रचंद्रदर्शन झालेल्या काकासाहेबांची आणि त्यांच्या ब्रिगेडची भीती वाटत नाही का?

    ReplyDelete
  2. भाऊ, अगदी बरोबर लिहिले आहात आपण. माझा पण एक जूना मित्र अंधश्रद्धा निर्मूलन, पुरोगामी, सेक्युलर वगेरे वगेरे आहे. CAA वर पण त्याच्या अशाच पोस्ट बघत असतो. LIC चा IPO येणार आहे तर लगेच LIC उद्योगपतींना विकायला काढली. पण लगेच विचारले १९९२ पासून एका अर्थतज्ञ माणसाने निर्गुतंवणूक सुतशरु केली सरकारी बँका, तेल कंपन्यातून निर्गुतंवणूक केली पण अजूनही बँका व तेल कंपन्या सरकारीच आहेतच अजूनही यावर म्हणणे काय? तर उत्तर नाही विषय बदलला. ही अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांची अंधश्रद्धा.

    ReplyDelete
  3. POST TRUTH म्हणजे हाच प्रकार. आम्ही मानतो म्हणून ते सत्य.

    ReplyDelete